वर्तक नगरची जानका देवी

परवा वर्तक नगरच्या (ठाणे) जानका देवी च्या मंदिरात गेलो होतो. हे मंदिर खूप जुने आहे. लहान पणी(म्हणजे अंदाजे १९८४ ते १९९० च्या काळात ) आम्ही ह्या मंदिरात महिन्या दोन महिन्यातून एकदा तरी जायचो. शहरात असून सुद्धा एखाद्या गावात आल्यासारखे वाटायचे. कोंबड्याचे आरवणे, मातीचा सुवास,कौलारू मंदिर, पोटापर्यंत दाढी असलेले आणि मागे कंबरे पर्यंत केसांच्या जटा असलेले पुजारी बाबा, पुजारी बाबांनी पाळलेले व अंगावर येणारे पण न चावणारे कुत्रे, आजूबाजूला असलेले घनदाट जंगल, इंग्रजांच्या काळातले एक पडीक चर्च, भयाण वाटणारे त्याचे अवशेष, संध्याकाळी सात वाजताच पडणारा गुडूप अंधार.... सर्व काही डोळ्यासमोर तरळून गेले. जणू काही आताच काही महिन्यापुर्वी घडले होते. सर्व आठवणी उगाळत विजु बरोबर पायऱ्या उतरलो. त्यावेळचे मंदिर आणि आत्ताचे मंदिर ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार झाला आहे. त्यावर केलेली प्रकाश योजना त्याचे सौंदर्य खुलवत होती.




मंदिरा पर्यंत जायचा मार्ग हि चांगला झाला होता. आता कार, बाईक अगदी मंदिरापर्यंत जाऊ शकते. त्यावेळेला एक पैदल पूल होता. तो चढून मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता होता. गाडी जायला रस्ता नव्हता. मंदिराच्या समोरच एक चर्च आणि इंग्लीश शाळा आहे. त्या चर्च मध्ये व शाळेमध्ये यायला रस्ता विरुद्ध दिशेने आहे. पण त्या दिशेने मंदिरात यायला परवानगी नाही. मंदिरात यायचा पुल काही वर्षापूर्वी कोसळलाआणि त्या नंतर त्यावर नवीन पूल बांधला गेला. तो पूल मग गाडी ये जा करू शकते असा बांधला गेला त्यामुळे खूपच चांगले झाले.

मंदिरातून आत शिरलो आणि गाभाऱ्या पर्यंत पोचलो. पुजारी बाबांची आठवण झाली, ते गाभाऱ्यात पायांवर बसायचे आणि ओटी घ्यायचे. देवी पुढचे गंध भक्तांच्या कपाळाला लावायचे. गाभारा खूप छोटा होता आणि खूप अंधारात होता. त्यात एक छोटा बल्ब सोडलेला असायचा. आता त्याच गाभाऱ्याचे सौंदर्य खुलून आले होते. मातीच्या भिंती जाऊन तेथे मार्बल च्या भिंती आल्या आहेत. त्यात देवी चे रूप अजून खुलून दिसतहोते. चक्क गर्दी कमी असल्यामुळे आणि मी उशिरा गेल्यामुळे जास्त माणसे नव्हती.त्यामुळे चांगले फोटो काढता आले. खूपच प्रसन्न वाटले.




मंदिरा समोरच मैदान आहे. लहानपणी तेथे क्रिकेट चे सामने व्हायचे त्यावेळेला देवीचे दर्शन करायला जायचो. मधल्या काळात जवळपास कितीतरी वर्ष मंदिरात जाता आले नाही. खूप वर्षांनी गेल्यामुळे मन अजूनच प्रसन्न झाले. मंदिरातून निघताना बाहेर गोंधळी होते. हे गोंधळी थेट तुळजापूर वरून येथे येतात. नऊ दिवस त्यांचा इथेच मुक्काम असतो. दसरा झाला कि ते दुसर्‍या दिवशी आपल्या गावी परततात. त्यांचे हि छायाचित्र काढावेसे वाटले. त्यांच्या झोळीत दहा ची नोट टाकली तर त्यांनी आम्हा दोघांना अगदी भरभरून आशीर्वाद दिले.


तुळजापुरचे ग़ोंधळी.

तुळजापुरचे ग़ोंधळी.

तुळजापुरचे ग़ोंधळी.

त्यांचा आशीर्वाद घेऊन मंदिरातून बाहेर पडलो. विजूला हि मंदिर खूप आवडले. लग्न झाल्यापासून का नाही आणले एवढ्या चांगल्या मंदिरात? मी काय उत्तर देणार जे जे नशिबात असते ते ते त्याच वेळेला मिळते. मंदिरातून निघताना मन खूप जड झाल्यासारखे वाटले. मग विचार केला कि हे मंदिर आपलेच आहे. आपल्याच परिसरात आहे. कधी पाहिजे तेव्हा येऊ शकतो. तेव्हा कुठे मन हलके झाले. आणि आम्ही निघालो.

----

पुजारी बाबा व धर्मवीर आनंद दिघे ह्यांचा एक जुना फोटो.


झाडामध्ये आलेला ग़णपतीचा आकार

देवीची एक जुनी मुर्ती

शंकराची पिंड


CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top