सैराट...याड लावलं रे बाबा याड लावलं!!
होय!! “सैराट” पहिला...एक वेळा नाही तर एकाच दिवसात दोन वेळा !!!
खूप चांगल्या आणि वाईट अश्या उलटसुलट चर्चा ऐकून सुद्धा पाहिला...आणि दोन वेळेला पाहिल्याचा तर जरा सुद्धा पश्चाताप नाहीये.…आणि चित्रपट न पाहता जाती भेद, लहान वयातील प्रेम वगैरे वर उलट सुलट प्रतिक्रिया आणि रिव्ह्यू लिहिणाऱ्या लोकांची कीव करावीशी वाटली.
मला तरी हा चित्रपट कुठे जाती भेदामध्ये अडकलेला आहे असे वाटले नाही. श्रीमंत गरिबीलती दरी आहे पण ती तर आजच्या डेली सोप मध्ये पण असते…ह्यात नेहमीचीच लव्ह स्टोरी आहे पण मांडणी नवीन आहे….खूप काही आगळेवेगळे नक्कीच ठासून भरलेले आहे….चित्रपट खूप मोठा आहे...चालणार नाही!! वगैरे पूर्वग्रहदुषित कॉमेंट वर तर आता हसायला येतेय.
चित्रपटाचा पूर्वार्ध रोमान्स, दोस्ती, कॉमेडी आणि अजय-अतुल च्या संगीताने ने ठासून भरलाय.… मध्यंतरानंतर चित्रपट जरा सुस्तावला आहे पण त्यातली कुठलीही गोष्ट जबरदस्तीने घुसडलेली वाटली नाही...कमी वयात प्रेम करून…उत्पन्नाचे काहीहि माध्यम नसताना पळून जाणाऱ्या जोडप्यांसाठी एक प्रकारे सबकच आहे तो.
कितीतरी प्रेमी युगुलांची लग्नानंतर का एकमेकांपासून फारकत का होते ह्याचा चांगला धडा मिळतो.… फँड्री मध्ये जसा शेवटी दगड भिरकावून आपल्याला विचार करायला भाग पडतो तसाच हा चित्रपट सुद्धा आपल्याला विचार करायला भाग पडतो….अर्थातच २ तास ५४ मिनिटांपैकी शेवटची दोन मिनिटे सोडली तर पूर्ण चित्रपट तुम्हाला जे काही अपेक्षित आहे ते सर्व दाखवतो. शेवटची दोन मिनिटे दिग्दर्शकाने आपल्यासाठी राखून ठेवली आहेत…आणि त्याला जे काही सांगायचे आहे… ते शेवटच्या दोन मिनिटात अगदी शांततेने सांगितले आहे.
सामाजिक चित्रपटाकडून व्यावसायिक चित्रपटाकडे होणारा नागराज साहेबांचा प्रवास चांगला जमून आलाय. दिग्दर्शकाने प्रेक्षकांची मानसिकता ओळखून त्याला जे मांडायचे आहे ते दाखवले आहे. एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या मानसिकतेची लोक कशी घेऊ शकतात ह्याची चांगली जाण दिग्दर्शकाला आहे आणि त्याने ती योग्य रीतीने मांडली आहे. उदाहरणार्थ बोलायचे झाले तर मास्तराच्या वाजवलेली कानाखाली काहींना अस्वस्थ करून गेली तर काहींना हसवून गेली…परश्याचे फास लावून घेणे काहींनी हसण्यावर घालवले तर काहींनी चुकचुक करून दाखवले.… परश्याचा बाप पंचायती समोर थोबाडीत मारून घेताना काहींनी हसण्यावर नेले तर काहींनी उस्फुर्तपणे 'अरे बस …बस" करत थांबवले.....परश्या आणि मित्रांना पडलेला मार आणि त्याचं विव्हळणे पाहून काहींनी मजा घेतली तर काहींनी वाईट वाटून ''आई..ग्ग!!! " अश्या प्रतिक्रिया दिल्या
एकच गोष्ट लोक कितीप्रकारे घेऊ शकतात आणि त्यांची मानसिकता कशी असू शकते ह्यावर असलेली दिग्दर्शकाचा पकड चांगली दिसून येते. पण ‘शेवट’ मात्र दिग्दर्शकाने आपल्याच पद्धतीने घ्यायला लोकांना भाग पाडलाय. आणि ह्यात तो १०० टक्के यशस्वी झालाय हे बाहेर पडणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर बघून समजते… एक मोठा " असं का ?" घेऊनच सगळे बाहेर पडतात.
अजय अतुलच्या जोडीचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे...मराठी चित्रपट सृष्टीला पुन: सोन्याचे दिवस दाखवण्यात त्यांचा नक्कीच सिहांचा वाटा आहे. त्यांच्या संगीताबद्दल बोलायला माझ्या सारख्या पामरची काय गरज. खूप दिवसांनी किंवा पहिल्यांदाच म्हणा अतिशय अत्युत्तम चित्रीकरण मराठी चित्रपटामध्ये पहायला मिळाले. काश्मीर, स्वित्झर्लंड किंवा परदेशी पार्श्वभूमी वर चित्रपट आणि त्यातली गाणी दाखवून प्रेक्षकांची वाहवा मिळवणाऱ्या हिंदी चित्रपटांनाही नागराज साहेबांनी मागे टाकलेय…गावातलीच शेती, नद्या,रान, विहिरी, रस्ते वापरून सुंदर पार्श्वभूमी तय्यार करता येते... ह्याचे उत्तम उदाहरण नागराज साहेबांनी नवीन पिढीच्या दिग्दर्शकांपुढे ठेवले आहे. अत्युत्तम छायाचित्रण आणि ड्रोन कॅमेराचा केलेला वापर मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतो.
खिशात दमडी नसताना सुद्धा आयुष्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद कसा साजरा करू शकतो ह्याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे ट्रेन च्या झुक झुक आवाजावर आणि मोबाईलच्या रिंगटोन वर काहीही पार्श्व संगीत न लावता केलेला मुक्त नाच.....मनापासून आलेला असा नाच कोणी कोरियोग्राफर पण नाही शिकवू शकत. मोबाइल च्या जगात सुद्धा चिट्ठी पाठवून मुलगी पटवणे कुठे वावगे वाटत नाही. लंगड्या आणि सल्या जेव्हा 'चला हवा येऊ द्या' मध्ये आले होते...त्यावेळेस त्यांना धड माईक वर बोलताही येत नव्हते...त्यावेळी वाटले होते कि नागराज साहेबांनी ह्यांच्याकडून अभिनय कसा करून घेतला असेल...पण चित्रपट संपल्यावर ते सुद्धा लक्षात राहतात. त्या दोघांनी केलेले अभिनय खास करून लंगड्याचा प्रेमभंग तर अतिशय उत्तम... झोपडपट्टी मधील जगणे… आंघोळीची जागा...मराठी माणसाने हैद्राबाद मध्ये आहे म्हणून तेलगु बोलणे.... ह्या गोष्टी नक्कीच मनात घुसून राहतात. आर्चीच्या म्हणजे रिंकूच्या अभिनयात दिसणारा पाटीलकीचा आव...आणि परश्याचा म्हणजे आकाशचा साधाभोळा अभिनय चांगलाच लक्षात राहतो....नेहमीच्या हिरोच्या प्रतिमेला म्हणजे समाजाच्या विरुद्ध उठुन बंड पुकारणारा.... मुलीच्या घरी जाउन तिचा हात मागणारा.... आणि नाही मिळाला तर मुलीला पळवून नेणारा.....एकाच वेळी दहा दहा गुंडाशी मारामारी करून हिरोइनचा जीव किंवा अब्रू वाचवणारा हिरो..... ह्या सगळ्या झूठ मुठ प्रतिमेला तोडत……सहज सोपा अभिनय आकाश ने केलाय.
परश्या आणि आर्ची ह्यांचा पहिला चित्रपट आहे असे कुठेही वाटत नाही.... तेच कशाला पडद्यावर येणारा नागराज आणि सुरज (फँड्री फेम) सोडले तर सगळे कलाकार नवीनच आहेत.... पण कुठेही कोणी कमी पडला नाहीये...प्रत्येकानं आपापल्या वाट्याला आलेल्या भूमिकेचे सोने केलेय....अगदी परश्याच्या करमाळ्याला राहणाऱ्या म्हातारीने सुद्धा मोजून दिलेला १०/१५ सेकंदाचा अभिनय सुद्धा चांगला केलाय....निवोदित कलाकारांकडून एवढा सहज सोपा अभिनय करून घेणे हे क्वचितच काही डायरेक्टर करू शकले आहेत....आणी नागराज साहेबांचे नाव त्यात नक्कीच वर राहील.
ह्या सगळ्या झाल्या जमेच्या बाजू…
आता न आवडलेल्या गोष्टी.....पण न आवडलेल्या गोष्टी असे काही नाहीच आहे.... उगाच ओढून ताणून चुका काढायला मी काही पैसे घेऊन लिहिनारा फिल्म क्रिटिक नाही…आवडले ते आवडले...नाही ते नाहि....
उगाचच आपले वास्तववादी आहे…किंवा नाहीये ह्या झंझटी मध्ये पडायचे नाहीये.... वास्तववादी एवढे बघायचे असेल तर 'रियालिटी शो' बघा आणि निखालस मनोरंजन पाहिजे असेल तर ''सैराट" बघा.
अशी खूप कारणे आहेत 'सैराट' बघायला जायची''....खरच जर तुम्हाला मनोरंजन पाहिजे असेल तर …अजय अतुलच्या संगीताचा रस प्यायचा असेल तर.... नागराज मंजुळेचे डायरेक्शन बघायचे असेल तर…. उत्कृष्ट सिनेमाटोग्राफी आणि नवीन कॅमेराचे अँगल बघायचे असतील तर....धीट रिंकूचा अभिनय बघायचे असेल तर....निरागस हिरो म्हणजे परश्याचा अभिनय बघायचा असेल तर.…मित्र काय चीज असतात हे बघायचे असेल तर.... काही चिकने चुपडे आणि ओळखीचे चेहरे न घेता.... साध्या लोकांकडून अभिनय कसा करून घेत येतो ते बघायचे असेल तर..... तुमच्या शाळे-कॉलेजांमध्ये केलेले प्रेम आठवायचे असेल तर...... मराठी चित्रपटाला काठोकाठ अगदी पहिल्या रांगेपर्यंत भरलेले थिएटर बघायचे असेल....थिएटर बाहेर हाउसफुल्लचा बोर्ड बघायचा असेल.....आणि अश्या कित्येक नवीन गोष्टी पहायच्या असतील तर सैराट नक्कीच बघा..... आणि थियेटर मध्ये जाऊनच बघा.…
कळकळीची विनंती आहे.....आत्ताशी कुठे मराठी चित्रपटाला सोन्याचे दिवस येताहेत….कृपा करून पायरसी करू नका....आणि पायरसीला प्रोत्साहन देऊ नका.... आणि तुमच्या जर जवळपासच्या थियेटर मध्ये लागला नसेल तर तिथल्या मॅनेजरला नक्की फोन करून चित्रपट का नाही लावला आहे हे हक्काने विचारा.
(सर्व चित्रे इंटरनेट वरून साभार)
2 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!