रसग्रहण- देवों के देव महादेव
रसग्रहण- कहानी महादेव की
देवों के देव महादेव
मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे मनाला जास्त भावणाऱ्या
गोष्टी, कथा, वस्तू सर्व काही रसग्रहण ह्या सदराखाली मांडायच्या आहेत. खूप काही
आवडत्या, उपभोगायुक्त बाबींबद्दल लिखाण करायचे आहे. त्याच सदरातील पहिली पोस्ट.
रसग्रहणाची सुरुवात करण्यासाठी ‘महादेव’ सारखा दुसरा चांगला पर्याय नाही.
लाईफ ओके ह्या नवीन चालू झालेल्या वाहिनी वर ‘कहानी महादेव की’ नावाची नवीन मालिका चालू झाली. नवीन म्हणजे तसे आता
तिचे २२० हून अधिक भाग झाले आहेत. तश्या पौराणिक कथावर आधारित खूप काही मालिका
चालू असतात. काही पौराणिक मालिका तर सास बहूच्या डेली सोप सारख्या काही तरी न
ऐकलेल्या कथा दाखवत कितीतरी महिने चालू आहेत. पण ‘कहानी महादेव की’ मालिका ह्या सर्व टिपिकल पौराणिक मालिकांपेक्षा नक्कीच वेगळी आहे. रामायण,
महाभारत आणि काही वर्षापूर्वी परत नवीन आलेले रामायण ह्या मोजक्या पौराणिक मालिका
सोडल्या तर मी सहसा इतर पौराणिक मालिका बघत नाही. आज कालच्या पौराणिक मालिकेत
दाखवलेले देवांचे चमत्कार, वेडीवाकडी ग्राफिक्स, सहज कमतरता जाणवणारी लोकेशन्स,
महालाचे सेट, उडणारे देव, सफेद ढगातील स्वर्ग, काळ्या अंधारातील पाताळ, खोट्या
दाढ्या लावलेले ऋषीमुनी, काळेकुट्ट, गडगडाटी हसण्याचा प्रयत्न करणारे व डोक्यावर
शिंग लावून भयाण दाखवायचा प्रयत्न केलेले राक्षस हे बघून हसायलाच जास्त येते.
पण ‘कहानी महादेव की’ मालिकेचे सुरुवात व्हायच्या आधीचे
जे प्रोमो दाखवले गेले व त्यातून महादेव बनलेल्या नायकाचा चेहरा न दाखवता फक्त
त्याच्या बांधेसूद शरीरावर फोकस करून महादेवचे दाखवले गेलेले फोटो, रुद्राक्ष,
त्रिशूल ह्यांचा केलेला वापर, हिमालयातील दाखवलेले सौंदर्य ह्या वरूनच जाणवायला
लागले होते की ही मालिका नक्कीच इतर पौराणिक मालिकांपेक्षा वेगळी आहे पण प्रत्यक्ष
मालिका सुरु होऊन तिचे चार/ पाच भाग बघितल्याशिवाय ही मालिका पुढे पहायचे की नाही
ते ठरवणार होतो. जेव्हा मालिका चालू झाली आणि महादेव बनलेल्या नायकाचे दर्शन
(टीव्हीवर) झाले तेव्हा जरा वेगळेच वाटले. वर्षोनुवर्षे आपल्या लाडक्या देवांच्या
ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टी पाहून मनात त्यांच्याबद्दल एक प्रतिमा तयार झालेली
असते तिच्यापेक्षा जरा चेहरा वेगळा होता. बाकी शरीरसौष्ठव मनातल्या प्रतिमेशी अगदी
जुळत होते. सती बद्दल वाचन कमी होते त्यामुळे तिची मनातली प्रतिमा थोडी धुसर होती
त्यामुळे ह्या मालिकेत दाखवली गेलेली सती जरी मनाला भावली नसली तरी महादेवाच्या
पुढे ती चालून जात होती.
महादेवाच्या भूमिके नंतर सर्वात महत्वाचे होते ते म्हणजे
मागे उभारले जाणारे लोकेशन्स, सेट ज्याच्यामुळे त्या काळाचा भास झाला पाहिजे, एक
भावनात्मक फील आला पाहिजे आणि ह्या मालिकेच्या क्रियेटीव्ह निर्मात्याचे खरच कौतुक
केले पाहिजे. त्याने सर्व जुन्या कन्सेप्ट, जुन्या कल्पना मोडून काढत, खरचं नवीन
कल्पनाशक्ती लावून भन्नाट सेट उभारले आहेत. ते बघूनच ठरवले की ह्या मालिकेत नक्कीच
चांगले बघायला मिळणार आहे आणि ही मालिका न चुकवता नक्की बघायची.
महादेव बनलेला नायक सुरुवातीला जरी थोडा कल्पनेपेक्षा वेगळा
वाटला होता तरी आता एवढे भाग बघून असेल कदाचित आणि त्याच्या सहज सुंदर अभिनयामुळे
तो महादेवाच्या प्रतिमेला साजेसा वाटायला लागला आहे. महादेव म्हटले की भोळासांब पण
तेवढाच हुशार आणि ज्ञानी, विश्वातील सर्व गोष्टींचे ज्ञान असून ही गर्वाचा लवलेश
नसलेला, भयंकर रागीट पण तेव्हढाच प्रेमळ आणि भावनिक, चेहऱ्यावर व हालचालीमध्ये
असलेला शांत,तृप्त भाव....कुठे घाई नाही की गडबड नाही, अंगाला भस्म फासलेला, नेहमी
ताठ बसून शांत ध्यान करत बसलेला, भक्तांचे हरतऱ्हेचे लाड पुरविणारा, सतीच्या
मृत्युनंतर व्याकुळ होऊन रागाने तांडव नृत्य करणारा ह्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर
येतात. महादेव बनलेल्या नायकाने ह्या सर्व गोष्टींची पुरेपूर काळजी घेतली आहे,
त्याच्या अभिनय कुठेही खोटा वाटत नाही किंवा अविवेकी वाटत नाही, चेहऱ्याचे हावभाव
आणि शरीराची हालचाल अगदी शांतपणे साकारली आहे, सतीच्या मृत्युनंतर त्याने व्यक्त केलेला
राग, विषाद अगदी स्तुत्य होता. त्यात कुठेही ओव्हर अक्टिंग वाटली नाही आणि त्याच
वेळी दक्षाला मारताना रागावलेले, भडकले महादेव पण त्याने त्याच ताकदीने साकारला
होता. त्याची धावण्याची,रागावण्याची, त्रिशूल फेकण्याची, ज्ञान देण्याची,
समजावण्याची, ध्यानस्त बसण्याची, चेहऱ्यावर गुढ हसण्याची अभिनय क्षमता खरच
वाखाणण्यासारखी आहे. कदाचित त्याच्या एवढा न्याय त्या भूमिकेला क्वचितच दुसरा कोणी
देऊ शकला असता.
मलिकचे निर्माता आणि दिग्दर्शक ह्यांनी निवड केलेले सर्व
पात्र एखाद दुसरा अपवाद वगळता आपापल्या भूमिकेला अगदी परिपूर्ण आहेत. बी. आर.
चोप्रांच्या महाभारत मालिके नंतर योग्य पात्र निवड कदाचीत ह्याच मालिकेची असेल. एक
सती आणि नंदीचे पात्र जरा भूमिकेत वेगळे वाटते. दोघांचे अभिनय चांगले आहेत. पण
कदाचित त्यांना जास्त रडण्याचे डायलॉग दिले गेले असल्यामुळे दोघे जरा रडके वाटले
आणि नंदी म्हणजे जाड्या, ढेरपोट्या, थोडासा सावळा अशी आपल्या मनातील प्रतिमा
असल्यामुळे कदाचित मजबूत शरीरयष्टीचा आणि सपाट पोट असलेला नंदी पचवायला थोडा अवघड
गेला. बाकी दक्ष (महाभारतातील द्रोणाचार्य), पार्वती, ब्रह्मा, विष्णू, सप्तर्षी,
चंद्र, गंगा, अगदी तारकासुर, शुक्राचार्य हे सुद्धा आपल्या भूमिकेत चपखल बसले
आहेत. सर्वानी सहज सुंदर अभिनय पण केला आहे. खास करून असुर जमातीतील लोक हे शिंग
असलेले, भयानक चेहऱ्याचे दाखवले नाही आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावरून व अभिनयातून ते
नक्कीच दुष्ट मनाचे आहेत हे दिसून येते.
ह्या मालिकेचे ड्रेस डिझायनर, मेक-अप आर्टिस्ट ह्यांचे पण
कौतुक करण्यासारखे आहे. महादेव, सती, पार्वती, नंदी, दक्ष, सप्तर्षी तसेच राजघराण्यातील
स्त्रिया व पुरुष ह्यांची वेशभूषा व रंगसंगती खरच वाखाणण्यासारखी आहे. कुठल्याही
ऋषी-मुनींची दाढी खोटी लावलेली वाटत नाही अगदी दक्षाची वेणी बांधलेली शेंडी
सुद्धा, प्रत्येकाच्या भूमिकेला साजेसा असा मेक-अप केलेला आहे. त्यात कुठेही
भडकपणा वाटला नाही.
हिमालयातील लोकेशन्स, राजमहालाचे भव्य सेट, महादेवाचा कैलाश
पर्वतावरील सेट हे अप्रतिम आहेत. ते सेट आहेत हे माहित असून सुद्धा कुठेही कृत्रीम
पण वाटत नाही. कैलाशावरील महादेवाची बसायची जागा आणि तेथील वनसंपदा तर अप्रतिमचं.
तसेच दक्षाचा महाल, पार्वतीचा महाल हे अतिशय सुंदररीत्या उभारले आहेत. नेहमीपेक्षा
नक्कीच वेगळे, महादेवाच्या लग्नाच्या वेळी दाखवलेले लाखो उपस्थित हे ग्राफिक्स
वापरून दाखवले होते हे समजत होते पण त्यात चुका कुठेच आढळत नव्हती, तसेच महादेवाचा
रुद्रावतार दाखवते वेळी व महादेव की बारात वेळी वापरले गेलेले ग्राफिक्स पण
अप्रतिम होते. आता तर
पार्वतीचा महाकालीचा अवतारचे प्रोमोज दाखवायला सुरुवात झाली आहे. खरचं चलचित्रण
आणि क्रिएअतिव्हिति खरच खूप छान आहे.
अजून खूप काही नवीन बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. बघू पुढे
काय चमत्कार करताहेत महादेव.
हर हर महादेव !!!
देवों के देव महादेव
कथा – मिहित भुतिया,ब्रिज मोहन पांडेय, सुब्रत सिंह.
दिग्दर्शक – निखिल सिंह व मनिष सिंग
कलात्मक दिग्दर्शक- अनिरुद्ध पाठक
सिनेमाटोग्राफी- दीपक गर्ग
महादेव बनलेला कलाकार – मोहित रैना
0 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!