मुखवटा कादंबरी | लेखक -अरुण साधू
मुखवटा | लेखक -अरुण साधू | रसग्रहण
------------------------------------------------------------------------------------------
एका फेसबूक मित्राने सुचवल्यावर अरुण साधू यांची "मुखवटा" ही कादंबरी वाचायला घेतली. कादंबरी वाचण्याआधी अरुण साधू कोण आहेत? कादंबरी कशी आहे? काय आहे? याबद्दल काहीच माहिती नव्हती. जवळपास साडेपाचशे पानांची भरगच्च कादंबरी हातात घेतली आणि प्रस्तावना पासून सगळे वाचायला सुरुवात केली. सुरुवातीचे जवळपास दहा ते पंधरा पाने वाचून झाले असतील आणि त्या कादंबरीचा आवाका, भाषेवरची पकड, लिखाणाची सुसूत्रता हे सगळे बघून अचंबित झालो. नक्कीच हा लेखक खूप चांगला असणार असे वाटून सहज कुतुहल म्हणून अरुण साधू आणि मुखवटा कादंबरी यांच्याबद्दल गुगलवर सर्च केले.
मुखवटा - मुखपृष्ठ |
असो !! मनातले सगळे किंतु परंतु बाजूला ठेवून मी पुन्यांदा कादंबरी वाचायला सुरुवात केली. कादंबरी एवढी मोठी आहे की संपता संपत नाही.... खऱ्या अर्थाने ही कादंबरी आहे. जवळपास दोनशे पाने वाचून झाले असतील आणि वाचनामध्ये खंड पडला. कामाच्या व्यापामुळे एक दोन महिन्यात कादंबरीला हात लावता आला नाही. प्रवासामध्ये सुद्धा एवढी जाड कादंबरी वागवता येत नव्हती. काहीतरी वाचन करावे म्हणून शेवटी दुसरी पुस्तके वाचायला घेतली. मधल्या एक दीड महिन्याच्या कालखंडामध्ये तीन-चार छोटी-मोठी पुस्तकं वाचून झाली पण ही कादंबरी आणि त्या कादंबरीमधली पात्रे मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी दरवाजा ठोठावत होती. त्या पात्रांच्या आयुष्यामध्ये पुढे काय घडले असावे याची उत्सुकता मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी ठुसठुसत होती. मग पुन्हा या कादंबरीला हात घातला आणि वाचायला सुरुवात केली तसतशी मनाची तगमग शांत होऊ लागली आणि गाडी पुन्हा रुळावर आल्यासारखी वाटायला लागली.
कादंबरीचे नाव असल्याप्रमाणे कादंबरी एका 'मुखवट्या' भोवती फेऱ्या घालते. देवगिरी वर झालेल्या अब्दालीच्या आक्रमणाच्या काळापासून ते अगदी १९९० पर्यंतचा काळ त्या कादंबरीमध्ये वाचण्यास मिळतो.
अब्दालीच्या आक्रमणापासून वाचलेला वामन शास्त्री नावाच्या एका ब्राह्मणाचा वंश पिढ्यानपिढ्या चालत स्वातंत्र्य काळापर्यंत येतो. या वंशावळी वरच आणि आताच्या पिढीच्या प्रत्येक सदस्यावर, प्रत्येकाच्या स्वभावावर ही कादंबरी रेखाटली आहे. कादंबरीमध्ये एवढी पात्रे आहेत की पहिले कोणाचा कोण हे समजण्यासाठी दहा-बारा पाने मागे जाऊन संदर्भ घ्यावा लागतो.... पण हळूहळू लेखकाच्या ओघवत्या शैलीने आणि प्रत्येक पात्राच्या केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वर्णनाने सगळी पात्रे नावासकट लक्षात राहून जातात आणि थोड्या पाना नंतर त्या पात्राबद्दल मागे जाऊन बघण्याची गरज पडत नाही.
वामन शास्त्रीची ही पिढी 'आकसी' नावाच्या गावामध्ये भल्यामोठ्या वाड्यामध्ये राहत असते. या घराण्याचा वंशवृक्ष मुंबई, नागपूर, दिल्ली, पुणे, बेंगलोर, अमेरिका अशा विविध ठिकाणी ठिकाणी सेटल झालेला असतो. पण वामन महाराजांच्या मुखवट्या मुळे हा वंशवृक्ष आपल्या मूळ मातीशी आणि मूळ घराशी नाळ जोडून असतो. वामन महाराजांचा मुखवटा याबरोबरच 'नानी' नावाचे पात्र या सगळ्या कुटुंबाला जोडून असते. पहिल्या पानापासून चालू झालेले नानी चे पात्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत समोर येत राहते.
बालपणीच विधवा झालेली नानी या वाड्यात वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून आलेली असते. घरातला कर्ता पुरुष गेल्यावर ही नानी घरदार सांभाळण्या पासून शेती वसुली पर्यंत सगळी कामे कणखरपणे सांभाळत असते. घरातल्यांची ऊठबस करण्यापासून बाळंतपणे काढण्यापर्यंत ते वामन महाराजांचा उत्सव साजरा करण्यापर्यंत सगळी कामे अगदी मनापासून करत असते. सगळ्यांना कडक शिस्त लावण्यापासून, सगळ्यांवर मनापासून जीव लावण्याच्या तिच्या स्वभावामुळे सगळे कुटुंब 'नानी' नावाच्या वटवृक्षापाशी आपोआप येऊन जोडले जात असतात.
घरातल्या आजच्या पिढीच्या तीन मुख्य भावांपैकी एक भाऊ नागपूरला स्थायिक होऊन चांगले नाव आणि पैसा कमावत असतो. दुसरा भाऊ कुटुंबापासून दूर होऊन संन्यास घेतो आणि आबा नावाचा भाऊ वाडा सांभाळतो, शेती सांभाळतो आणि आकसी मधल्या ह्या भल्या मोठ्या वाड्यात स्थायिक झालेला असतो. या तीन भाऊ आणि त्यांच्या मुलांवर ही कादंबरी घुटमळत राहते. लेखकाने हे तीन भाऊ, त्यांची मुले, त्यांच्या बायका, त्यांचे नातेवाईक असे एकेक पात्रे त्यांच्या गुणविशेषांसह योग्यतेने रंगवलेले आहे. प्रत्येक सदस्याचे वेगळे असे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ही सगळी पात्रे जिवंत वाटतात आणि नजरेसमोर फिरत राहतात.
ती पात्रे कमी म्हणून काय लेखकाने या वाड्याशी संबंध येणाऱ्या अनेक माणसांचा विस्तृतरित्या उल्लेख आणि वर्णन केलेले आहे. त्यामुळे हि कादंबरी मुंबई पुणे नागपूर दिल्ली बंगलोर अशी फिरत राहते... ह्यामुळेच एवढ्या मोठ्या कादंबरी मध्ये येऊ शकणारा एकसुरीपणा टाळला गेला आहे. कादंबरीमध्ये वैविध्य खेळत राहते अगदीच कमी म्हणून की काय तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांच्यावर ही काही पाने खर्ची केली आहेत.
पण या कादंबरीमध्ये येणाऱ्या प्रत्येक पात्राचा काही ना काही संबंध या वाड्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीत्या येत असतो त्यामुळे कुठलेही पात्रे जबरदस्तीने घुसडलेली वाटत नाही. आणि प्रत्येक पात्र आपल्याला एक वेगळाच अनुभव देत जाते. जवळपास फरकाने अशी पात्रे आपल्याच आजूबाजूला कुठेनाकुठे फिरत असतात ह्याचा दाट अनुभव येऊन जातो.
नानीची कडक शिस्त पण तेवढीच लाघवी माया.... आबांचा कनवाळूपणा.... प्रदीपचा स्वतंत्रपणा..... शरदचा तुसडेपणा...... मंजुषाचा स्पष्टवक्तेपणा....शरद आणि मंजुषाचा हलका फुलका नवरा-बायको मधला रोमान्स..... द्वारका काकूंचा निर्मळ स्वभाव... रवींद्रची श्रीमंती.... गायत्री काकूंचा बडेजावपणा.....शोभाचे कवी मन.... शोभा आणि पाटील गुरुजी यांची प्रेम कथा....रमेशचा हट्टीपणा... तात्यांची अचूक भविष्य वाणी.... अच्युतरावांचा आणि रमेश ह्यांचा झालेला कायापालट..... आढाव कुटुंबीय..... आढाव कुटुंबातील शेषराव, उत्तमराव, बाई, यशवंत, वसंत आढाव कुटुंबीय, मंत्र्यांचा पीए मुंगळे आणि त्याची बायको सीमा...... ढोंगी प्रभाकर महाराज..... दिल्ली मधला धनंजय आणि त्याची बायको.... पुण्याची नलू आत्या.... वयात आल्यापासून संन्यासाकडे आकृष्ट झालेला विजू असे एकापेक्षा एक सुंदर व्यक्ती आपल्या गुणविशेष सकट या कादंबरीमध्ये लेखकाने आपल्या दणकट लेखन शैलीतून उभे केलेले आहेत.
वंशवृद्धी ही पुरुषाने होते.... वंश आणि घराणे नावारूपास येण्यास घराण्यात होऊन गेलेले पुरुषच जबाबदार असतो ही पूर्वापार चालत आलेली समजूत किती चुकीची आहे हे पटवून देण्यात लेखक यशस्वी झाला आहे........ ह्या अश्या घराण्यात बाहेरून येणार स्त्रीवर्ग ह्यांचा अशी नावाजलेली घराणे घडवण्यात किती हातभार असतो ह्याचे छोटेखाणी वर्णन लेखकाने उदाहरणासकट अतिशय सुंदर रित्या केलेले आहे. प्रत्येक घराण्यामध्ये स्त्री ही किती महत्त्वाची असते, मग ती कोणत्याही स्वरूपात असुदेत मुलगी असू देत ....सून असू देत.... सासु असु देत.... आई असू देत... किंवा आजी, पणजी असुदेत... ह्या वेगवेगळ्या कुटुंबातून येणाऱ्या स्त्रिया आपआपल्या घराण्यातले संस्कार, चालीरीती, परंपरा, अनुभव घेऊन येतात आणि ह्या घराण्यातील पुरुष घडवण्यात हातभार लावतात. ह्या सगळ्या चालीरीती परंपरा संस्कार आणि अनुभव ह्यांच्यामुळेच पुरुषाचे घराणे नावारूपाला येते. त्यामुळे स्त्रिया हे एखाद्या घराण्यांमध्ये किती महत्त्वाचा घटक आहे याचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही.
सावकारी करून कमावलेली किंवा हडपलेली शेती हळू हळू विकावी लागते. योग्य तशी शेती करू शकत नसल्यामुळे कर्जाचा वाढलेला डोंगर.... वामन महाराजांचा उत्सवाला येणारा खर्च... वाड्यावर येऊन जाऊन राहणाऱ्या प्रत्येकाची उठबस करताना आलेला खर्च यामुळे अक्षिकर कुटुंबांवर कर्ज वाढत जाते. पुढे पुढे वाडा सुद्धा मोडकळीला यायला लागतो. त्यावेळेस रमेश मुद्दाम भांडणे आणि कुरापत काढून मोठ्या भावाला आणि नानीला भांडणे लावून वेगळे करतो व मोठ्या भावाला शहरात वर्ध्याला नोकरीला पाठवून देतो. त्यांच्यामागोमाग आजारपणाची निमित्त काढून नानी आणि द्वारका काकूला सुद्धा त्यांच्याकडे पाठवून देतो. एक एक व्यक्ती बाहेर पडत वाड्यात फक्त दोन माणसे राहतात. दरवर्षी न चुकता दणक्यात साजरा होणारा वामन महाराजांचा उत्सव, एक वर्ष साजरा करण्यासाठी कोणीच नसतो.
आपल्या शेवटच्या घटका मोजत असलेल्या नानीला तिच्या नातवाची- विजूची आस लागलेली असते. विजू न सांगता संन्यास घेण्यासाठी हिमालयात निघून गेलेला असतो आणि नानीला खात्री असते तो आल्याशिवाय आपण प्राण जाणार नाही.....आपला प्राण गेला तर विजूच्या मांडीवरच जाणार आहे ह्याची तिला खात्री आणि अपेक्षा असते.
आयुष्यभर सगळ्यांना जीव लावलेल्या नानीच्या सोबत शेवटच्या क्षणी शरद आणि द्वारका सोडले तर कोणीच नसते. आणि तिचा बिचारीचा सगळा जीव तिच्या नातावामध्ये -विजू मध्ये अडकलेला असतो. तिच्या शेवटच्या क्षणी सुद्धा तिला वामन महाराजांचा उत्सवाची तारीख जवळ आलेली आहे हे लक्षात असते. गेल्या ऐंशी-नव्वद वर्षांमध्ये पहिल्यांदा तिचा उत्सव चुकणार असतो.
पूर्ण कथेवर एक उदासी दाटून आलेली असते. कादंबरी आणि कथानक जर-तरच्या काट्यावर उभे राहिलेले असते.
शेकडो वर्षापासून चालत आलेला वामन महाराजांचा उत्सव पूर्ण होतो की नाही...नानीला शेवटचा उत्सव मिळतो कि नाही..... नानी च्या तोंडामध्ये गंगाजल टाकण्यासाठी विजू परत येतो का?..... नानीला जीव घालणारे सगळे कुटुंब नानीच्या शेवटच्या क्षणी तिच्या सोबत येते का?...... वर्षानुवर्ष सांभाळून ठेवलेला वामन महाराजांचा मुखवटा त्याचे पुढे काय होते?..... हे सगळे जाणून घेण्यासाठी कादंबरी स्वतःच वाचल्यास योग्य राहील.
शेवटच्या वीस-पंचवीस पानांमध्ये लेखकाने कथेला अशा कलाटणी दिल्या आहेत, पाचशे पानांची कादंबरी शेवटच्या वीस-पंचवीस पानांमध्ये सुंदररीत्या पूर्णत्वास आणली आहे. कादंबरीमध्ये येणाऱ्या सगळ्या पात्रांचा आणि पूर्ण कथानकाचा 'क्लायमॅक्स' लेखकाने योग्य रितीने मांडला आहे. कादंबरी वाचून झाल्यावर एखादं कादंबरीचे कथानक पूर्ण झाल्याचे समाधान मिळते. सगळ्या प्रश्नांची उकल होते. एक मानसिक समाधान लाभते.
पण नानी, आबा, अण्णासाहेब ह्या पात्रांचे स्वभाव विशेष आणि त्यांचे मृत्यू वेगळाच रुखरुखीतपणा आणि एक वेगळीच बेचैनी मनावर सोडून जातात.
अरुण साधू |
असो !! मी ही कांदबरी पूर्ण वाचली, अनुभवली आणि तिचा रसास्वाद ही घेतला. तुम्हीही हि कांदबरी नक्कीच
वाचाल अशी अपेक्षा. स्वर्गीय अरुण साधू यांना खरच मनापासून अभिवादन आणि प्रणाम.
-आशिष सावंत
0 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!