ठाण्याचे ८४ वे साहित्य संमेलन...
मागच्या आठवड्यात ठाण्यात ८४ वे साहित्य संमेलन चालू होते. साहित्य संमेलन ला जायचा योग पहिल्यांदाच आला. पुस्तकावर प्रेम असून आणि वाचायची आवड असून सुद्धा ८४ वे साहित्य संमेलन ला जायचा योग आला. ते सुद्धा सोसायाटी मधल्या एका काकूंना खाडीलकरांचे एक पुस्तक हवे होते म्हणून. दुसऱ्या दिवशी गेलो तर खुप गर्दी होती आणि गाडी पार्किंग ला सुद्धा जागा नव्हती म्हणून परत आलो. तिसऱ्या दिवशी अचानक ऑफिस ला सुट्टी मारली आणि संमेलनाला जायचा योग आला. कदाचित ते नशिबी होते म्हणूनच आज ऑफिसला दांडी झाली असावी.
आतापर्यंत वादामुळे नेहमीच चर्चेत असलेले साहित्य संमेलन ह्या वेळेला सुद्धा वादात होते. एक तर संभाजी ब्रिगेडने स्टेडियमच्या नावावरून वाद झाला. संभाजी ब्रिगेड काय सिद्ध करू इच्छिते आहे काय माहित? दादोजी कोंडदेव महाराजांचे गुरु नव्हते. हे कागदीपत्री सिद्ध करा पुरावे दाखवा आणि मग इतिहास बदला. त्या साठी आधीच घिसाडघाई करून संमेलन कशाला उधळायचे. हे साहित्य संमेलन आहे ज्यात आपल्या लेखकांचा, त्याच्या कवितांचा, लेखांचा, कादंबरीचा गौरव करायचा आहे. आजच्या पिढीला वाचनाकडे आणायचं आहे. त्यांना पुस्तके घेण्यास प्रवृत्त करायचे आहे का त्यांना संमेलन उधळून लावायच्या भीतीने पळवून लावायचे आहे. स्टेडियम चे नाव क्रित्येक वर्षापासून दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे अचानक एका रात्रीत त्यांना जाग आली आणि स्टेडियमचे नाव बदलण्याची इच्छा झाली ते सुद्धा साहित्य संमेलन तोंडावर असताना. संभाजी ब्रिगेड चा मुख्य राग बहुतेक ब्राह्मण समाजावर आहे असे त्यांच्या एकंदर जाहिराती आणि भाषणावरून वाटते आणि त्यासाठी ते साम दाम दंड आणि भेद वापरायलाहि तयार आहेत. त्यांच्यात आणि इतरांत फरकच तो काय उरतोय? नशीब शिवसेनेने दंड थोपटले आणि त्यांच्याविरुद्ध उभे ठाकले. त्यामुळे निदान साहित्य संमेलन तरी सुखरूप पार पडले.
त्याचे सावट दूर व्हायच्या आधीच अजून एक उभे राहिले ते म्हणजे संमेलनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडसे चे नाव टाकले. ते ठाण्यातल्या एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला आवडले नाही म्हणून त्यांनी हैदोस घातला. त्यांचा तो राग नक्की नथुराम वर होता कि मंडपाचे टेंडर नाही मिळाला म्हणून होता काय माहित? आजच सामना मधील संपादकीय लेख वाचला त्यात नथुरामने आपल्या सफाई मध्ये कोर्टापुढे जे वक्तव्य केले होते ते वाचण्यासारखे होते. त्या लेखातील तो भाग जसाच्या तसा इथे देत आहे.
‘‘मला चांगल्याप्रकारे जाणणार्यांना माहीत आहे की मी शांत प्रकृतीचा माणूस आहे; परंतु आम्ही जिला आपली परम आराध्य देवता मानतो अशा आमच्या मातृभूमीची कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी फाळणी केली आणि गांधीजींनी त्याला संमती दिली. तेव्हा माझ्या मनात भयंकर संताप दाटून आला. थोडक्यात सांगायचे तर मी गांधीजींना ठार मारले तर माझा सर्वनाश होईल आणि लोक माझा भयंकर तिरस्कारच करतील. माझी माझ्या प्राणाहूनही जास्त मोलाची अशी प्रतिष्ठा धुळीस मिळवतील हे सर्व मला आधीच दिसत होते. मी विचार केला तेव्हा या सर्व गोष्टी स्पष्टच दिसल्या; परंतु त्याचबरोबर मला असेही वाटते की, गांधीजींवाचून भारतीय राजकारण नक्कीच व्यावहारिक बनेल. ते जशास तसा प्रतिकार करण्यास समर्थ होईल आणि सशस्त्र सेनादलांनी सुसज्ज राहील. व्यक्तिश: माझा सर्वनाश नक्कीच होईल; परंतु पाकिस्तानच्या धाडींना नक्कीच पायबंद बसेल. मला लोक माथेफिरू किंवा मूर्ख म्हणतील; परंतु राष्ट्र तर्कसंगत मार्गक्रमण करायला मोकळे राहील आणि निकोप राष्ट्रनिर्मितीसाठी हीच गोष्ट अत्यंत आवश्यक आहे असे मला वाटत होते. या प्रश्नाचा सर्व साधकबाधक अंगानी पूर्ण विचार केल्यावर मी अंतिम निर्णय घेतला. सारे धैर्य एकवटून मी ३० जानेवारी १९४८ रोजी बिर्ला हाऊसमधील प्रार्थना मैदानावर गांधीजींवर गोळ्या झाडल्या...’’
असो राजकारणाचा भाग सोडला तर बाकी साहित्य संमेलन खूप छान होते. ठाण्याच्या नगरीमध्ये होते म्हणून तर अजून छान वाटले. कडकडीत पोलीस बंदोबस्त होता. जवळपास २३० च्या वर प्रकाशक आणि विक्रेते ह्यांची दुकाने लागली होते. वर्तमानपात्रच्या आकड्यावरून जवळपास दोन कोटीच्या वर पुस्तके विकली गेली. मृत्युंजय, छावा, ययाती सारखी गाजलेली पुस्तके खूप कमी किंमतीत विकली जात होती. मीही काही चित्रकलेची पुस्तके विकत घेतली. अगदी दूर दूरच्या शहरातून माणसे पुस्तके विकत घ्यायला आली होती. ठाण्याच्या अनेक वस्तू, तलाव, रस्ते, ऐतिहासिक वाडे ह्यांचे एक छोटेखानी प्रदर्शन हि होते. जवळपास पूर्ण ठाणे त्या फोटो प्रदर्शनात समाविष्ट केले होते.
नक्कीच एक आयुष्यभरासाठी चांगला अनुभव होता.
0 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!