इन्तेहाँ हो गई...इंतेझार की | शराबी |
१९८४ साली प्रकाश मेहरा अमिताभ बच्चन ला घेऊन एक चित्रपट काढतो. ह्या वर्षातला अमिताभचा हा दुसरा चित्रपट. पहिला श्रीदेवी बरोबर केलेला इन्किलाब हा जेमतेम चालला होता. मागल्या वर्षी म्हणजे १९८३ मध्ये चार पैकी एकच चित्रपट हिट होता "कुली". पण तो सुद्धा त्याला झालेला अपघातातून वाचल्यामुळे. त्यामुळे त्याला बॉक्स ऑफिस वर एका जबरदस्त हिटची गरज होती. सिनेमाचे समीक्षक अमिताभ वर टीका करायची एक ही संधि सोडत नव्हते. त्यामुळे त्यांची तोंडे बंद करण्यासाठी तर त्याला एका हिट चित्रपटाची जास्तचं गरज होती.
प्रकाश मेहरानी दिलेली ऑफर अमिताभ लगेच स्वीकारतो. कारण प्रकाश मेहरा बरोबर त्याचे आधीचे पाच चित्रपट ओळीत हिट झालेले होते. (जंजीर, हेराफेरी, लावारीस, मुकद्दर का सिकंदर आणि नमक हलाल). त्यामुळे अमिताभला ह्या चित्रपटाकडून खूप आशा होती. ह्या चित्रपटात त्याला एका मद्यधुंद तरुणाचा रोल सादर करायचा होता. चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात व्हायच्या आधीच फटाके वाजवताना त्याच्या हाताला जखम होते. त्यामुळे पूर्ण चित्रपट त्याला आपला हात कायम कोटाच्या खिशात घालून ठेवायला लागतो आणि पुढे तीच त्याची स्टाईल बनते.
मी त्याच्या "शराबी" चित्रपटाबद्दलचं बोलतोय. त्यात त्याने आपली 'अँग्री यंग मॅन' ची इमेज कायम ठेवत रोमॅंटिक इमेज सादर केली आणि तो प्रेक्षकांची आणि समीक्षकांची दाद घेऊन गेला. एका गर्भश्रीमंत दारुड्या मुलाची इमेज त्याने आपल्या ढंगात सादर केली. त्याच्यासाठी हा दमदार कमबॅक होता.
ह्या चित्रपटातील अमिताभच्या भूमिकेचे जेवढे कौतुक झाले तेवढेच चित्रपटाच्या दिग्दर्शन, कथा आणि संगीताचे झाले. किंबहुना चित्रपटाच्या संगीताचे कौतुक जास्त झाले. ह्या चित्रपटाला संगीत बप्पीदांचे -बप्पी लहीरींचे होते. बप्पीदांना ह्या चित्रपटासाठी फिल्मफेयर पुरस्कारपण मिळाला होता.
चित्रपटातील सर्वच गाणी हिट होती.
मुझे नौलाखा मंगा दे
मंझिले अपनी जगह है
दे दे प्यार दे
जहां चार यार मिल जाये
आणि
इन्तेहाँ हो गई इंतेझार की
तशी ह्या चित्रपटातील सर्वच गाणी मला आवडतात. पण खास करून इन्तेहाँ हो गई .... आणि मंझिले अपनी जगह है ही दोन गाणी जरा जास्त भाव खावून जातात.
तशी ह्या चित्रपटातील सर्वच गाणी मला आवडतात. पण खास करून इन्तेहाँ हो गई .... आणि मंझिले अपनी जगह है ही दोन गाणी जरा जास्त भाव खावून जातात.
इन्तेहाँ हो गई ...
गाण्याची सुरुवातच गिटारच्या सुंदर पीस ने आणि किशोरदाच्या 'ल' च्या बाराखडीत गायलेल्या हमिंग ने होते.
किशोरदा ने नंतर उचक्या देत गायलेल्या गाण्याने तर ह्या गाण्याला चार चाँद लावले. बप्पीदा ने गिटार, व्हायोलिन, तबला, पिपाणी, ड्रम ह्या सगळ्या वाद्यांची सरमिसळ इतकी उत्तम रित्या केली आहे की त्याला तोडच नाही. किशोरदा च्या उदासभरी गाण्याचा मौहोल आशा ताईच्या आवाजाने एकदम जिंदादील होऊन जातो. वातावरणात आलेली मरगळ निघून जाते. किशोरदा आणि आशा ताई सारख्या गायकांकडून दुःख आणि आनंद अश्या दोन टोकांचे भाव एकाच गाण्यातून गाऊन घेऊन त्यात वाद्यांची उत्तमरीत्या सरमिसळ करून सुंदर गाणे बनवणे फक्त बप्पीदाच करू शकतो. सुरूवातीला आणि शेवटी वेगळे बोल असणारे आणि विरूद्ध भाव दर्शवणारे गाणे कदाचित एखादेच असेल.
अमिताभ ने हलत डुलत, हात खिशात घालून आणि मान उडवत जागच्या जागी केलेला अभिनय आणि जयाप्रदाचे उत्तम नृत्य ह्या गाण्याला ऑन-स्क्रीन सुद्धा प्रेक्षणीय बनवते.
मंझिले अपनी जगह है गाण्यावर पुढच्या ब्लॉग मध्ये..
0 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!