असे पाहुणे येती घरा...


ऐंशी नव्वद च्या दशकामध्ये मी चाळीमध्ये राहायला होतो. दोन खोल्यांची कॉमन गॅलरी असलेली चाळ होती. वडीलांचा आणि चाळीतल्या जवळपास सगळ्यांचाच पगार जेमतेम होता. खूप काही श्रीमंती नव्हती पण गरिबी पण नव्हती. दारिद्र्य रेषेच्या वरती आणि मध्यमवर्गीयांच्या थोडेसे खाली अशी सर्व साधारण परिस्थिती सगळ्यांची होती. संवादाची आणि संपर्काची साधने कमी होती पण सामाजिक बांधिलकी काही वेगळीच होती. संपर्क हा प्रत्यक्षात भेटूनच व्हायचा तो काळ होता. 

मला आठवते, लहानपणी असा एकही दिवस गेला नसेल ज्या दिवशी आमच्या घरी नात्यातले, ओळखीचे, मित्र परिवारातील कोणी ना कोणी पाहुणे म्हणून घरी आले नसतील. एखाद्या दिवशी कोणी आले नाही तर आई रात्री झोपताना सुस्कारा टाकून म्हणायची...नशीब आज कोणी आले नाही. पण तिला स्वत:लाच कोणी आले नाही म्हणून चुकल्यासारखे सुद्धा वाटायचे. रात्री नऊ साडेनऊ वाजता सुद्धा तिला वाटायचे की कोणी तरी येईल. त्यामुळे घरात नेहमी एका माणसाचे जेवण जास्तच केलेले असायचे. 

त्याकाळी पाहुण्यांची विविध कॅटेगरी सुद्धा ठरलेली असायची. आईकडचे पाहुणे, वडीलांकडचे पाहुणे, वडीलांची मित्रकंपनी, आईचे किंवा वडीलांचे दूरचे नात्यातले पाहुणे, काही सरळ नात्यात न येणारे पण कुठल्या दुसर्‍या नातेवाईकांच्या नात्यातले ओळखीचे पाहुणे, दोघांच्या गावाकडचे पाहुणे अशी सगळी सरमिसळ असायची. पण येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांची तितक्याच आपुलकीने सरबराई व्हायची. 

ह्या पाहुण्यांच्या येण्याच्या वेळा सुद्धा ठरलेल्या असायच्या. काही पाहुणे महिन्यातून एकदा चक्कर टाकायचे तर काही पाहुणे तीन महिन्यातून एकदा....काही पाहुणे हमखास रविवारी सकाळी सकाळी यायचे तर काही आठवड्यातून एकदा...थोडे लांबच्या नात्यातले सहा महिन्यातून एकदा तर कधी वर्षातून एकदा यायचे. 

काही जण सकाळी यायचे आणि नाष्टा करून जायचे तर काही जण नाष्टा आणि दुपारचे जेवण करून जायचे. काही जण दुपारी जेवणानंतर येऊन गप्पा मारून रात्री जेवण करून जायचे. तर काही जण संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान येऊन फक्त चहा पिऊन गप्पा मारून निघून जायचे. 

हीच भेटण्याची सायकल आमच्या घरी सुद्धा पाळली जायची. एखाद्या रविवारी किंवा मधल्या आड सुट्टीच्या दिवशी आईची बडबड चालू होऊन जायची. खूप दिवस झाले अमुक अमुक एका नातेवाईकांकडे जाऊन खूप दिवस झाले. जाऊन आले पाहिजे. मग वेळ ठरवून वडील आम्हाला सहकुटुंब घेऊन जायचे. मा‍झ्या इच्छेविरूद्ध जबरदस्तीने माझी पण वरात निघायची. काही नातेवाईकांकडे वडील एकटेच जाऊन यायचे. तर काहींकडे आई वडील जायचे. पण काही नातेवाईकांकडे सहकुटुंब जायचे असा दंडकच होता आणि त्याला पर्याय नव्हता. मग ही सायकल तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी तर काहींकडे वर्षातून एकदा अशी वारंवार केली जायची. 

मला आठवते, त्या वन रुम किचनच्या 10 बाय 10 खोलीमध्ये जेमतेम परिस्थिती असून सुद्धा घरात आलेल्या पाहुण्यांची सरबराई चांगली चालू असायची. आलेला माणूस कधीही रिकाम्या पोटी परत गेला नाही. चहा बिस्किट किंवा चहा खारी किंवा अगदी घरचा साधा डाळभात, भाजी, भाकरी खाऊन जायचा. आमच्या घरात नेहमी एक माणसाला पुरेल एवढे जेवण नेहमी केलेले असायचे. आईचा अंदाज कसा चुकत नाही ह्याचे मला नेहमीच अप्रूप वाटायचे. कधी कुणी उशिरा किंवा जेवायच्या वेळेला आलेला माणूस जेवल्याशिवाय जात नसे. 

आता हे येणारे पाहुणे सुद्धा जेमतेम परिस्थितीवालेच असायचे पण ते कधीही रिकाम्या हाताने आले नाही, अगदीच काही नाही तरी पार्ले-जी किंवा मारी बिस्किटचा पुडा तरी घेऊन यायचे. त्यातल्या त्यात थोडी चांगली परिस्थिती असलेले पाहुणे बॉर्बन, क्रीम बिस्किट किंवा गुड-डे बिस्कीट घेऊन यायचे. आमच्यासाठी ही बिस्किट म्हणजे पर्वणी असायची. त्यामुळे पाहुणे कधी जातात आणि तो बिस्कीटचा पुडा कधी फोडून खातो असे लहानपणी होऊन जायचे. पाहुण्यांनी आणलेला खाऊ त्यांच्या समोर फोडून खाणे हे त्यावेळेस असंस्कृतपणाचे लक्षण आहे असे लहानपणापासून बिंबवण्यात आलेले होते. कधीकधी मी शाळेत असताना हे पाहुणे येऊन निघून जायचे पण घरात आल्यावर एखादा मोठा बिस्किटचा पुडा आलेला दिसला की समजून जायचं की आज कोणीतरी पाहुणे येऊन गेले. त्या बिस्कीटपुडा वरून सुद्धा मला कोणते पाहुणे आले ते ओळखायचे सवय झाली होती आणि ते बरोबर ओळखल्यावर काहीतरी मोठा डिटेक्टीव बनून मोठा शोध लावल्याचा आनंद मला मिळायचा. 

आलेले पाहुणे असं काही विशेष कारणासाठी यायचे नाही. एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि संपर्कात राहण्याच्या प्रामाणिक प्रयत्न असायचा. सुरुवात इकडच्या तिकडच्या अवांतर गप्पा मारत व्हायची आणि मग गावाला गेला होतास का...गावची काय परिस्थिती...हा कसा आहे... तो कसा आहे...अमकाच्या मुलाचं लग्न ठरलं...तमक्याची मुलगी एवढ्या मार्काने पास झाली....त्याचा मुलगा यंदा दहावी/बारावीला आहे...ह्याच्या साठी मुलगी बघायला चालू केली आहे…त्याच्या मुलीचे लग्न जमत नाहीये....कोण मुलगा असेल तर सांग....अमक्याचा साखरपुडा झाला पुढच्या महिन्यात लग्न आहे...पत्रिका नाही आली अजून...अजून वाटायला सुरुवात नाही झाली...गावाला पैसे पाठवायचे होते...अमक्याचा पुतण्या पुढच्या आठवड्यात गावाला जाणार आहे त्याच्या कडे दे पाठवून...त्याचा भाचा ग्रॅज्युएट झाला त्याला कुठे नोकरी असेल तर सांग....आज काल नोकरीत काही राम राहिला नाही बघ....आपल्या मिल च्या नोकरी किती चांगल्या होत्या....उद्या चांगली मॅच आहे...त्याला घेतला पाहिजे होता...चांगली बॅटिंग करतो...ह्यावेळेला शिवसेनाच येईल...आमच्या कडे काँग्रेस वाला आहे ना...तोच जिंकून येतो...अश्या खूप काही गप्पा चालायच्या. आज कालची पिढी ज्या सोशल गोष्टी फेसबुक वर करते त्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला प्रत्यक्ष 'ह्याची देही' व्हायच्या. 

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या की हे पाहुणे घरात असलेला एखादा ताजा किंवा शिळा पेपर वाचत बसायचे कधी त्यांनी आणलेला पेपर आमच्या घरातले वाचत बसायचे...कधी कधी शेजाऱ्यांकडून पेपर आणून वाचायला दिला जायचा... त्यांनी उगाच न थांबता लवकर निघावे अशी कधी घाई व्हायची नाही आणि समोरच्याला पण घाई नसायची वेळ काढूनच येणे व्हायचे. दोन्हीकडेच्या गप्पा संपल्या...मन भरलं की सगळे निरोप घेऊन निघून जायचे त्यात कुठला दुजाभाव नसायचा किंवा एखादा पाहुणा कधी जातोय म्हणून कपाळावर आठ्या नसायच्या. कधी कोण पाहुणे जेवायला थांबले की वडील गप्पा मारता मारता शर्ट घालून हळूच बाजारात निघून जायचे आणि काहीतरी गोडधोड किंवा एखादी आवडीची भाजी घेऊन यायचे. मग ते पाहुणे सुद्धा आधी नको नको करत जेवायला बसायचे. ताटामध्ये काही वाढले असेल तर आवडीने आणि सगळे खाऊन तृप्त होऊन निघून जायचे. जेवायचा मेनू पण काही साग्रसंगीत नसायचा. डाळ भात, एखादी भाजी आणि तोंडाला कांदा लिंबू लोणचे एवढाच पण कधी काही तक्रार नसायची. 




वडिलांकडचे पाहुणे आले की आई तटस्थपणे सर्व पाहुणचार करायची पण तेच आईकडचे पाहुणे आले की आईच्या चेहर्‍यावर वेगळाच उत्साह असायचा. वडिलांकडून आलेल्या पाहुण्यांबरोबर वडील जास्त गप्पा मारत बसायचे आईला त्याच्या मध्ये इंटरेस्ट नसायचा त्यामुळे ती नेहमी स्वयंपाक घरात कामाला लागून जायची पण आईच्या घरचे पाहुणे आले असले की मग गप्पांना अंत नसायचा. आई त्यांना खास करून दुपारच्या जेवणाला बोलवायची आणि मग संध्याकाळी उशिरा पर्यंत गप्पांचा कार्यक्रम रंगायचा. काही मावश्या सकाळी दहा अकरा वाजता यायच्या. त्यांच्याबरोबर मनसोक्त गप्पा व्हायच्या मध्येच कधीतरी एक-दीड वाजता आठवायचे की जेवण केलं नाही आहे. मग पुढच्या एक तासांमध्ये जेवण व्हायचं. जेवण करून झाले की परत मनसोक्त गप्पा व्हायच्या काहीच काम न करता नुसत्या गप्पा मारत बसले की आईला चुकल्यासारखे वाटायचे. मग ती तांदूळ, गहू असे काहीतरी काढून निवडत बसायची, गप्पा मारता मारता समोरची व्यक्ति पण आपणहून त्याला हातभार लावायची. काम लवकर उरकले जायचे. संध्याकाळी चहा व्हायची आणि वडील कामावरून आले की मग त्यांच्याबरोबर परत मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. खूप संध्याकाळ झाली की निघणे व्हायचे. वडील त्यांना बस स्टॉप पर्यंत सोडून यायचे. बसमध्ये बसवून द्यायचे....कुठे उतरायचं कसं जायचं ते पण सांगायचे. मी पण कधीकधी त्यांच्याबरोबर बसस्टॉप वर सोडायला जायचो कारण बस येईपर्यंत तिथे असलेल्या दुकानांमधून एखादी चॉकलेट किंवा गोळी मिळून जायचे. कधी कधी तर मुंबईच्या दोन टोकाचे पाहुणे अचानक आमच्याकडे येऊन जायचे आणि खूप दिवसांनी अनपेक्षितपणे एकमेकांना भेटल्याचा आनंद द्विगुणित करून जायचा. 

कधीकधी गावाकडचे नात्यात नसलेले पाहुणे सुद्धा सकाळी सकाळी येऊन जायचे. गावावरून येणारी एसटी सकाळी साडेचार पाच वाजता ठाण्यात यायची. मग ते पाहुणे सकाळी आले की डायरेक्ट आमच्या घरी उतरायचे. आंघोळ करून, नाश्ता करून बस ट्रेन पकडून आपआपल्या नातेवाईकांकडे निघून जायचे. आईला या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायचा पण तिने जास्त कधी काऽकु केले नाही... 'अतिथी देवो भव' या उक्तीनुसार ती नेहमी वागत गेली. येणार्‍या जाणार्‍याचे नेहमीच यथाशक्ती स्वागत होत राहिले. 

आजच्या सारखी संपर्काची साधने नव्हती. आजकाल आधी फोन करून..विचारून मग कोणाच्या घरी जाणेयेणे होते त्यावेळी तसे नसायचे. घरच्या खिडकीवर कावळा येऊन काव काव करून गेला की आईला अंदाज यायचा. त्याच्या कावकाव करण्याच्या पद्धतीवरून सुद्धा आईला समजायचे जवळचे की लांबचे पाहुणे येणार आहेत... जवळपास आईचे अंदाज 99% अचूक असायचे ...त्याच्यामागे काय लॉजिक असेल ह्याचा उलगडा अजून ही मला झाला नाही. पण त्याकाळी टेलीकम्यूनीकेशन नव्हते म्हणून नैसर्गिक रित्या मिळालेली ‘टेलिपथी’ होती बहुतेक. कदाचित स्त्रियांना नैसर्गिक रित्या लाभलेली शक्तिच होती असे म्हणायला लागेल. 

टेलीकम्यूनीकेशन मध्ये होत गेलेली प्रगती टेलिपथीला हळूहळू मारक ठरली. आजकाल संपर्काची साधने वाढली आणि खुशाली समजायला लागली तशी पाहुण्यांची उठबैस कमी व्हायला लागली. आता क्वचितच महिन्यातून एखादे पाहुणे घरी येतात आणि ते सुद्धा आधी फोन करून त्यामुळे तो जो ‘सरप्राइज’ नावाचा भाग असायचा तो काही उरलाच नाही. कोरोना मुळे तर गेल्या वर्षभरपासून कोणीही पाहुणे घरी आले नाही. खरं सांगायचे तर आता तेवढी सरबराई करायला सुद्धा जमत नाही आणि ब्लॉकसंस्कृती मुळे तर आता प्रायव्हसी जास्त प्रिय होत चाललीय. सामाजिक बांधिलकी आता प्रत्यक्षात कमी आणि आभासी (व्हर्च्युअल) जास्त व्हायला लागली आहे. तंत्रज्ञानातील प्रगती माणसाला जवळ आणते आहे की प्रत्यक्षात दूर घेऊन चालली आहे हाच प्रश्न जीवाला लागून राहतो. 


--आशिष सावंत

CONVERSATION

5 comments:

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top