अती होतेय !!
माझा एक वर्षाचा मुलगा झोपेतून उठला आणि आजू बाजूला त्याची आई किंवा मी नाही दिसलो तर कावरा बावरा होऊन जातो. रडायला लागतो. आम्ही हातातले काम सोडून त्याच्याकडे धावत जातो आणि पहिले त्याला हृदयाशी घेतो. आपल्या माणसाला बघितले आणि ओळखीचा स्पर्श भेटला की तो हुंदके देत शांत होऊन मिठीत झोपतो. त्याचाकडे पोचायला वेळ झाला तर त्याचे आतल्याआत फुटणारे हुंदके खूप वेळ शांत होत नाही ..झोपेत सुद्धा ते फुटत राहतात....आणि उगाचच मनाला अपराधीपणाची भावना वाटत राहते.
त्या बिचाऱ्या दिल्लीच्या 'गुडिया'ची काय हालत झाली असेल. झोपेतून उठल्यावर आई बाबा दिसत नाही म्हटल्यावर तिची काय मनस्थिती झाली असेल? पाच दिवस काय खाल्ले असेल? बलात्कार झाल्यावर किती त्रास झाला असेल? तेवढा त्रास आणि वेदना तिने कश्या सहन केल्या असतील? आपल्याला जराशी कुठे ठेच लागल्यावर किती वेदना होतात. वेदना शामक गोळ्या खाव्या लागतात. तिने चार/पाच दिवस त्रास कसा सहन केला असेल?
त्या नराधामाकडे काय मागितले असेल तिने? आई बाबा कुठे आहेत म्हणून विचारले असेल का त्याला? जेवायला काही मागितले असेल का तिच्याकडे? तिला प्यायला पाणी तरी दिले असेल का त्याने? किंवा तो तिच्या शरीराशी खेळत असताना तो काय करतोय म्हणून तरी विचारले असेल का त्याला? एक शारीरिक रित्या सक्षम तरुण मुलगी जबरदस्तीचा संभोग सहन करू शकत नाही त्या बिचारीने एवढा अत्याचार कसा सहन केला असेल? किती प्रतिकार केला असेल ? की प्रतिकार न करताच बेशुध्द होऊन गेली असेल?
तिच्या सारख्या लहान मुलीला त्रास देताना त्याला काहीच नसेल वाटले? तिच्या वर बलात्कार करताना एकदा तरी ती रडली असेल ना ? तिचे रडणे बघून त्याला दया नसेल का आली? बलात्कार करून वर त्या राक्षसाने मेणबत्तीचे तुकडे आणि तेलाची बॉटल तिच्या अंगात घुसवली...त्याचे त्याला काहीच कसे वाटले नाही? एखाद्याची माणुसकी एवढी मरू शकते? माणूस एवढ्या नीच आणि खालच्या पातळीवर कसा जाऊ शकतो? कल्पनाच नाही करू शकत.
आता पुढचे काही दिवस न्यूज वाहिनी आणि सर्व मंत्री धाय मोकलून कोकलत बसतील..... काही उत्साही रस्त्यावर मेणबत्त्या घेऊन उतरतील ...निवडणुका आल्यावर जेव्हा सत्ता बदलायची वेळ असते तेव्हा हे सगळे घरात अंडी घालत बसून राहतील.....काही एनजीओ आणि स्वयंसेवी संस्था ह्याचे पाप आजच्या पिढी आणि भारतीय सिनेमावर व सेन्सॉर बोर्ड वर मारतील.....काही महिला संघटनाच्या अधिकारी मेकअप करून टिव्ही वर मुलाखती देतील आणि गरज वाटल्यास थोडे फार डोळ्यातून अश्रू काढून दाखवतील.....सिनेमाचे नट आणि नट्या ट्विटर वर संदेश देतील.....फेसबुक वर त्या नराधामा विरुद्ध कमेंट पास होतील, त्या मुलीच्या चांगल्या आयुष्याची प्रार्थना होईल ....आम्ही उत्साहानं ते लाईक आणि शेअर करू....काही मुर्ख माझ्यासारखे ब्लॉग लिहून राग आणि मनाची हतबलता व्यक्त करतील....संसदेत वादळ(?) उठेल.....सर्व महिला मंत्री धाय मोकलून बोंबलतील आणि आमच्या पक्षाला महिलांबाद्द्दल किती सहानुभुति आहे ते दाखवतील..... कुठला तरी कायदा पास करायचे ठरवले जाईल आणि अचानक एखादा पक्ष त्या कायद्या विरोधात उभा राहील...प्रसंगी सरकार पडायची धमकी देईल....आणि परत तो कायदा भिजत पडत राहील......गृहमंत्री तक्रार न नोंदवणाऱ्या पोलिसांची हकालपट्टी करेल.....अगदीच कमी वाटले तर कमिशनर, आयुक्यांची बदली करेल......कोर्टात केस उभी राहील....१०/१५ वर्षांनी त्या नराधमाला शिक्षा होईल किंवा तो निर्दोष सुटेल......चुकून फाशीची शिक्षा झाली तर तो दया अर्ज करेल मग पुढे येणारा राष्ट्रपती ती फाईल अशीच पेंडिंग ठेवेल....अजून दहा वर्षानी काही बुद्धीजीवी उठतील आणि सांगतील त्या नराधमाने २० वर्षे जेल मध्ये काढली आहेत आता त्याला फाशी देणे योग्य नाही......त्याची सुटका झाली पाहिजे...हो अगदी संजय दत्त च्या बाबतीत सुद्धा असे होतेय ना!....थोडे दिवस असेच चालेल...हळू हळू पब्लिक विसरायला लागेल....मग सगळे पूर्वपदावर येईल...परत एखाद्या निष्पाप मुलीचा बळी जाईल आणि परत सर्व चक्रे चालू होतील.
'त्या' धर्मांध आणि कर्मठ लोकांना विचारायचे आहे की त्या लहान 'गुडीयाला' पण सांगायाचे का? बाबा! मुलांबरोबर खेळू नकोस...शोर्ट स्कर्ट, मिनी स्कर्ट घालू नकोस...रात्री अपरात्री बाहेर फिरू नकोस...मुलीची जात आहे तुझी....क्लब,पार्ट्यांना जाऊ नकोस. नाहीतर तुझा असच बलात्कार होत राहील.
मुलींच्या कपड्यांची किंवा त्यांच्या वागण्याची किंवा त्यांची आधुनिक मानसिकता बदलण्याची गरज नाही तर तुमच्या मुलाची स्त्री कडे बघण्याच्या नजर आणि दृष्टीकोन बदलण्याची आहे. स्त्री हि उपभोग्य वस्तू नाही हे त्याच्या मनावर बिंबवून देण्याची गरज आहे.
कित्येक वर्षे हेच चालत आले आहे आणि असेच चालत राहणार आहे. ह्यात बदल अशक्यच आहे. ह्याला दोषी कोण ह्याची चर्चा मला करायची नाही त्यासाठी मंत्री, न्यूज वाले, पोलीस, कायदा आणि न्यायव्यवस्था आहे. मी फक्त एकच करू शकतो आणि ते म्हणजे स्वत:ला आणि माझ्या मुलांना व माझ्या हाताखालून जाणाऱ्या पुढच्या पिढीला शिकवणार की कधीही मनाविरुद्ध संभोग करायचा नाही.
No Sex without Consent.
आणि हो! सगळ्यात महत्वाचे म्हणजे दिल्ली पोलीस!! त्यांना तर शत शत प्रणाम!!! त्यांच्याकडे कदाचित पेन किंवा पेपर नसतील, एफआयआर लिहायला...किंवा एफआयआर लिहिण्या इतपत त्यांना लिहिता वाचता येत नसेल...किंवा त्यांना स्वत:ला काही अपत्य नसतील आणि त्यांच्या हरवण्याने पालकांची काय परिस्थिती होऊ शकते एवढी विवेकबुद्धी त्यांना नसेल.....किंवा एखाद्या मुलीवर कोणता प्रसंग उद्भवू शकतो ह्याची त्यांना कल्पना करता येत नसेल.....किंवा पगार कमी पडत असल्यामुळे वरचा पैसा खायची संधी चालून आल्यामुळे ते जास्त खुश झाले असतील......किंवा त्या मुलीचे आई बाबा अगदीच गरीब असल्यामुळे त्यांना पैशाने मॅनेज (manage) करता येईल व प्रकरण दाबता येईल असे वाटले असेल...
बिचारे अगदीच नवशिके पोलीस असावेत.....कसलाच अनुभव नव्हता....देव त्यांना चांगली बुद्धी देवो....मी विचार करतोय दुकानातून चांगल्या प्रतीच्या 'बांगड्या' आणून दिल्ली पोलिसांच्या पत्त्यावर पाठवून द्याव्यात.
---आशिष सावंत
1 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!