अशाच एका कातरवेळी...
कधी कधी एखाद्या कातरवेळी उगाच मनावर मळभ दाटून येते. मनात उगाचच नको त्या विषयांची कालवाकालव होते. सगळे जुने... नवीन विचार घुसळणीत टाकल्या सारखे घुसळत मनाच्या कप्प्यातून तरंगत वरती येत राहतात. मनावर आणि मेंदू वर एक वेगळाच विचारांचा तवंग निर्माण करतात. त्या तवंगाला दुसरे काही विचार भेदु शकणार नाही अशी काहीशी बिकट अवस्था होऊन जाते. उगाचच कशाची तरी ओढ लागल्यासारखे होते. दूर कुठेतरी लता किशोर मुकेशची दर्दी गाणे कानावर आदळत असल्या सारखे वाटू लागते. दूर कुठल्या तरी प्रवासाला चाललोय आणि महत्वाची एखादी वस्तू घ्यायची राहून गेलीय असे उगाच वाटू लागते.
जुन्या चाळीच्या व्हरांड्यात बसून मावळतीची उन्हं अंगावर घेत हातातला गरम चहा थंड होण्याची वाट बघतोय असे भासतेय...कुठेतरी एकटक नजर लावत स्वत:ला विसरून जावेसे वाटतेय...'ये आकाशवाणी है...और आप सून रहे है...'असे काहीतरी कानावर येतेय पण लक्ष तिकडे नाहीये. कशाच्या तरी अनामिक ओढीने मन भरून गेलेय....मोठी काठी घेऊन सगळे तरंग विस्कटून टाकावे असे आतून वाटतेय....पण उगाच नक्षी मोडेल म्हणून जीव घाबराघुबरा होतोय.
उगाचच बालपणीचे दिवस आठवल्या सारखे होतात. ती शाळेतून घरी जाण्यासाठी लागलेली ओढ आठवायला लागते. पाठीवर भले मोठे दप्तर सांभाळत मी धावत सुटतोय. संध्याकाळच्या फिक्कट पिवळ्या केशरी उजेडाचे काळ्या रात्रीत रुपांतर होताना पाहून जीवाची घालमेल वाढू लागते. मी घरी जाण्यासाठी धावतोय की त्या क्षितिजा कडे धावतोय...काही समजत नाहीये...हा रस्ता जिथे पर्यंत दिसतोय... तिथ पर्यंत धावायचे आहे.....रक्त धमन्यांमधून जोरात पळत हृदयाला धडकू लागते. हृदय पण नेहमीपेक्षा जोरात फडफडू लागते. त्याचे धडकणे आपल्याच कानाला जाणवू लागते. तिकडे मुकेशचे गाणे हृदयाला अजून पिळवटत असते. हृदय छातीतून बाहेर येईल की काय असे वाटू लागते...ओठ शुष्क पडलेत...कपाळावरून घर्मबिंदू टपकतोय..
तेवढ्यात दूर क्षितिजावर नजर जाते. सुर्य जवळपास पूर्णपणे मावळतीला गेला असतो आणि रात्र हळूहळू आपले काळे हात पसरू लागते. स्वतची लांब झालेली सावली सुद्धा सोडून जायला तडफडत असते. चुलीवरच्या चहाच्या आंदणाला उकळी फुटल्यागत विचित्र भावनांचा कल्लोळ मनात कालवाकालव करू लागतो. एक अनामिक ओढ मेंदूतून शरीरभर नाचू लागते. पण कसली ओढ?? कशाचा थांगपत्ता लागतच नाहीये....मन सांगतेय पुढे काहीतरी विपरीत... नको असलेले घडणार आहे.....'हे कुठे तरी थांबवा' असे कानावर हात ठेवून बेंबीच्या देठा पासून ओरडावेसे वाटतेय...पण ऐकणारे कोणी जवळपास दिसत नाहीये....तिकडे क्षितिजावर अजून मारामारी चालू आहे. मला जीवाच्या आकांताने धावावेसे वाटतेय. क्षितिजावरच्या उरल्या सुरल्या उजेडाला मदत करायला.....पण हे काय? पाय का असे गोठून गेलेत? उचलले का जात नाही? कसले वजन बांधल्या सारखे का वाटताहेत?
अचानक प्रेयसीची आठवण का येतेय? आज तिने शेवटचे भेटायला का बोलावले होते? 'शेवटचे' का म्हणाली होती? मला तिकडे जायला पाहिजे होते का? मला तिचीच तर ओढ लागली नाहीये ना??.... नाही!!....क्षितिजावरून कोणी तरी बोलावतेय.....ते कोणी वेगळेच आहे... मला तिकडे गेले पाहिजे..तिकडे माझी खरी गरज आहे...मी जीवाच्या आकांताने पळायचा प्रयत्न करतोय.,...कसे बसे माझे पाय उचलले गेले आहेत..पण पाहिजे तसे पळत नाही आहेत...त्या टेकडी कडे चाललेल्या काळ्या डांबरी रस्त्यावरून मी धावतोय....धावतोय कि चाललोय...तो रस्ता क्षितिजा कडे चाललाय....दूरवर रस्त्याच्या कडेला एकच झोपडी दिसतेय...कोणीतरी चुरगळून टाकलेल्या कागदासारखी....मी बहुतेक तिकडेच पळतोय आणि माझी सावली माझ्या विरुद्ध दिशेला पळतेय...पण मला मागे वळून तिच्याकडे बघायलाही फुरसत नाहीये...
'अगला नगमा आप के लिए पेश है महंमद रफी के दर्दभरी आवाज मे...’ अरे यार!! आता हा रडवणार बहुतेक मला......थांब बाबा!! मला क्षितिजाकडे पळायचे आहे....पण झाडाआडून कोणीतरी हात धरून थांबवलेय मला....तो ओळखीचा सुगंध पूर्ण मनातून आणि शरीरातून दरवळलाय....सकाळी तळ्याकाठी जेव्हा ती भेटायची आणि हात हातात धरून चालायची तेव्हा जसा तिच्या धुतलेल्या केसांचा सुगंध आसमंतात आणि मग माझ्या रोमरोमांत दरवळायचा तसाच हा सुगंध आहे.....हो बहुतेक झाडामागून तीच आली आहे.....आवेगाने मारलेल्या मिठीने माझा तोलच गेलाय...मी स्वत:ला सावरून घ्यायचा प्रयत्न पण करत नाहीये... डोळ्यासमोर प्रेयसीने सोडलेला काळेभोर केशसंभार येतो आहे.....तिच्या पदराने की ओढणीने माझे घर्मबिंदू टिपले जाताहेत....मी नको नको म्हणताना तिने मला जवळ ओढलंय....माझे डोके तिच्या मांडीवर ठेवून ती माझ्या शुष्क ओठावरून हाथ फिरवतेय....मी उगाचच हात पाय झटकून बाजूला होण्याचा प्रयत्न करतोय....आणि ती माझ्या ओठांवर तिचे लांबसडक बोट ठेवून डोळ्यांनी मला गप्पं राहण्यास खुणावतेय....मी पण हळू हळू निष्क्रिय होतोय....तिच्या चेहऱ्यावर एक कणव असलेले हास्य येतेय....खूप काही दडलंय त्या नाजूक हास्यामागे....पण मी जाणीवेच्या पलीकडे चाललोय.....
तिच्या डोळ्यात मला क्षितिजावरच्या फिक्कट पिवळ्या केशरी रंगाची झाक दिसतेय....एक अनामिक ओढ दिसतेय...सगळंच्या नजर चुकवून गर्दीत जशी ती मला बघायची आणि नेमके त्याचवेळी मी तिला बघायचो आणि तिची कळी खुलायची तसेच काहीसे भाव मला तिच्या डोळ्यात दिसताहेत...... नाही... नाही.... हे तर दु:खाचे भाव आहेत..पण कसले दु:ख??......नाही..नाही....हे तर समर्पणाचे भाव आहेत...कोणाचे समर्पण...माझे तिला कि ती स्वत:ला मला समर्पित करतेय.....अरे! मला ह्याचीच तर ओढ नाही न लागलीय...काही समजेनासे झालेय....नक्कीच काहीतरी गोधंळ चाललाय... भंजाळून चाललोय मी....
मला तिला काहीतरी सांगायचे आहे...पण काय? हातातला चहाचा कप थंड होतोय की...पाठीवरचे दप्तर कुठे तरी गळून पडलेय की....क्षितिजावर कोणी तरी वाट पाहतेय...की अजून काही? ......तेवढ्यात तिने मनातले सगळे भाव ओळखल्यासारखे मला एकदाच पापण्यांची उघडझाप करून शांत होण्यास सांगितले....आणि ती मला अजून जवळ ओढायचा प्रयत्न करतेय.....अरे!! तिला समजत का नाहीये?? आज ती नेहमीसारखे माझ्या मनातले ओळखत का नाहीये?? माझ्या मनात लाटा उसळल्या आहेत.....त्या किनाऱ्यावर फुटल्याशिवाय नाही गप्प होणार...पण ती ऐकतच नाहीये...आणि मला हि तिच्या बंधनातून सुटता येत नाहीये...
ती एका हाताने तिच्या केसांना बांधलेला रुमाल सोडतेय..आणि तिचा सगळा केशसंभार माझ्या चेहऱ्यावर येउन आदळतोय...क्षणार्धात नजरेसमोर सगळा काळोख झालाय...जो, काळोख होऊ नये म्हणून एवढा वेळ धडपडत होतो....तोच समोर येउन उभा ठाकलाय....पण त्याबरोबर माझ्या आवडीचा एक मंद सुगंधही आसमंतात दरवळलाय.....हा तिच्या सुंदर केसांचा सुगंध आहे कि पहिल्या पावसात भिजलेल्या मातीचा सुगंध आहे...काय झालेय मला आज? मला काहीचं का उमगत नाहीये? गालावर गरम श्वास जाणवताहेत.....हळू आवाजात कुजबुजलेले तिचे उच्चार जाणवताहेत पण मेंदू ते पर्यंत का पोहचत नाहीये....गरम श्वास अजून जवळ आल्यासारखे वाटताहेत.....त्यांची गती वाढलेली जाणवतेय...आणि एका सुखद क्षणी ओठांवर ओलसर स्पर्श जाणवतोय....एक वेगळीच चव ओठांवर पसरलीय...हातातल्या चहा पेक्षाही अप्रतिम अशी चव...एक वेगळीच अतुलनीय चव.....भेगा पडलेल्या शुष्क मातीवर पाण्याचा अमर्यादित वर्षाव झाल्यासारखे वाटतेय...दूर वर ओल्या मातीतून फुटलेला एक कोंब ही आनंदाने मान डोलावतोय...शुष्क पडलेले माझे ओठ प्रेयसीच्या चुंबनाने भिजून गेलेत..... तिची लांब सडक बोटे माझ्या केसांमधून फिरताहेत .... त्या सोबत एक वेगळीच शांतता मेंदूवर पसरत चाललीय.... लाटा शांत होऊन परतीला लागल्या आहेत...तरंगांची नक्षी न विस्कटता बाजूला होतेय...नितळ पाणी दिसू लागलेय...आसमंत स्वच्छ झाल्यासारखा वाटतोय...
पण..पण हे सगळे क्षणभंगुर आहे....असे एक मन आतमध्ये पण खूप खोलवर...दूरवर कोठे तरी बजावतेय...पण त्याचे कोणी ऐकत नाहीये...आत्ता मिळणाऱ्या स्वर्गीय आनंदापासून मुकु नकोस असे सगळे ओरडून सांगताहेत आणि मी पण त्यांचे ऐकतोय....आवेगाने तिला जवळ ओढतोय....तीही विरोध न करता एखादे सुंदर फुल स्वत:हून कुस्करावे तशी माझ्या मिठीत कुस्करत चाललीय... पण दुरवर कुठे तरी त्या दुसऱ्या मनाची कीव पण येतेय...तोच बहुतेक त्या क्षितिजावर उभा आहे.....माझा हितचिंतकच आहे तो... हे समजतेय मला...पण नाईलाज आहे माझा....मी गोठून गेलोय...एवढ्यात दात लागल्यामुळे ओठांमधून एक कळ येतेय..मी डोळे किलकिले करून तिला डोळ्यांनीच विचारतोय... "का?"..ती कानात कुजबुजतेय....माझी आठवण पुन्हा पुन्हा येत राहावी म्हणून...ओठांतून आलेला रक्ताच्या थेंबाची चव हृदयापर्यंत..मनापर्यंत पोचली...मी परत डोळे मिटून धुंद होऊन पडलोय...असा किती वेळ धुंद होऊन पडलोय मलाच माहित नाही.
डोळ्यावर कसला तरी उजेड येतोय...मी परत त्याच डांबरी रस्त्यावर आलोय बहुतेक...ती समोरची टेकडी आता पूर्णपणे काळोखात बुडालीय...क्षितीज कधीच त्या काळोखात हरवून गेलाय...रस्त्यावरच्या दिव्याचा केशरी उजेड माझ्या चेहऱ्यावर पडलाय...माझी धुंदी अजून उतरली नाहीये....एक बस समोरून लांबच्या प्रवासाला निघालीय....खिडकीतून कोणी तरी हात हलवून निरोप घेतंय...
अरररे!!! हि मला सोडून कुठे निघाली......होय! ती म्हणाली होती की मला 'शेवटचे' भेटायचे आहे? म्हणजे हि शेवटची भेट होती तर...अरेssssदेवाss!!!! डोळ्यातून एक थेंब माझी परवानगी न घेता घाईघाईने गालावर ओघळून आलाय....मी हि त्याला थांबवले नाही...तिच्या दोन्ही डोळ्यातून आलेले मोत्या सारखे थेंब मला त्या रस्त्यावरच्या दिव्यात स्पष्ट दिसताहेत...मला निरोपाचा हात हि हलवता येत नाहीये....मी हात हलवून तिचा निरोप घेणार नाही हे तिलाही माहिती आहे... त्यासाठी ती रागावणार सुद्धा नाहीये...तेवढी समजुतदार नक्कीच आहे ती ...... डोळ्यातल्या पाण्यामुळे दूर गेलेली ती बस अजून फिक्कट झालीय. टेकडीवरील एका वळणावर तिचे मागून दिसणारे लाल लाईट्स एक छोटा ठिपका होत अदृश्य झालेत. क्षितिजावरचे ते दुसरे मन ओरडून सांगतोय की मी तुला सांगितले होते की हे सगळे क्षणभंगुर आहे तू माझ्या कडे ये...पण तू आलास नाही...आता का डोळे वाहावतोयस...आता हयातून तुझी सुटका नाही...
मला काही सुचतच नाहीये....दूरवरच्या त्या झोपडीत आता दिवा लागलेला दिसतोय...तिथेच बहुतेक तो रेडीयो लागलाय...आता त्याच्यावर आशा गातेय...
'ये क्या जगह है दोस्तों, ये कौन सा दयार है
हद-ए-निगाह तक जहां गुबार ही गुबार है
ये क्या जगह है दोस्तों....'
रस्त्यावरच्या दिव्याचा दहा पाऊले पुढे असलेला चहाचा टपरी वाला पोऱ्या माझ्याकडे 'साहेब ! सुट्टे पैसे द्या..सुट्ट्यांचे जाम वांदे आहेत बघा' म्हणून सांगतोय...मी पन्नास ची नोट काढून त्याचा हातात ठेवतोय आणि बाकीच तुला ठेव अशी खुण करतोय.....संध्याकाळ पासून किती चहा झाल्या माहित नाहीत....मी इथे कसा आलोय.... कधी आलोय...माहित नाही...कसल्या धुंदीत इथे उभा आहे माहित नाही...काहीच आठवत नाहीये...मन बधिर झालेय...सुन्न झालेय...ती गेलीय हेच एक अबाधित सत्य आहे.....मनाची ओढाताण अजून चालूच आहे....मगाशी काही तरी विसरल्याची जाणीव होत होती आता काहीतरी महत्वाचे हरवल्याची जाणीव होतेय.....मुठीतून जीव निघून चाललाय....आशा अजून राग आळवतेय...
'बुला रहा क्या कोई चिलमनों के उस तरफ़
चिलमनों के उस तरफ़
मेरे लिये भी क्या कोई उदास बेक़रार है
उदास बेक़रार है
'ये क्या जगह है दोस्तों, ये कौन सा दयार है.....'
हि बेचैनी आता कधी संपणार नाही बहुतेक...अश्या एका कातरवेळी, एकांतात परत ती उफाळून येणार आहे.....आता ह्यातून माझी सुटका नाही....."न जिसकी शकल है कोई, न जिसका नाम है कोई...........इक ऐसी शै का क्यों हमें अज़ल से इन्तज़ार है....ये क्या जगह है दोस्तों,...........'' भणभणतय डोकं सगळं......आतमधून हातोड्याचे घाव बसत आहेत......माझ्या ओठांवर परत आलेला रक्ताचा थेंब बघून तो चहाच्या टपरीवरचा पोऱ्या मनातल्या मनात उगाच हसतोय....
आता ह्यातून सुटका नाहीच...
2 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!