जुनी माणसे !!
चहा गरम करून नाश्ता करायला बसणार तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. हातातला गरम चहाचा कप बाजूला ठेवून दरवाजा उघडेपर्यंत थोडा वेळ झाला... तोपर्यंत अजून दोन वेळा बेल खणखणली.. आता कोण दरवाज्यात तडमडला?? अश्या मनातल्या मनात शिव्या घालत दरवाजा उघडला. दरवाज्यामध्ये सोसायटीतले एक ओळखीचे काका होते.
हे काका म्हणजे आता जवळपास 85 ते 90 च्या दरम्यान वय असेल त्यांचे....तसे तर त्यांना आजोबा म्हटले पाहिजे पण मी सोसायटी मध्ये राहायला आल्यापासून त्यांना काका नाहीतर बाबाच म्हणत आलो. तेसुद्धा मला प्रेमाने झिला झिला (मालवणी भाषेत मुलगा) करत असतात.
हे काका म्हणजे टिपिकल कोकणी माणूस... अंगाने बारकट... शिडशिडीत बांधा.... उंची सहा फूटला थोडी कमी असेल...अंगावर चरबीचा लवलेशही नाही.... ताठ कणा...पण वयोमानानुसार ताठ कण्याचे हळूहळू धनुष्य होत गेलेले... पण अंगातली रग आणि शिस्त तशीच....डोक्यावरचे केस विरळ झालेले…. शिस्तप्रिय पण सदा हसरे.....शर्टाच्या बाह्या नेहमी कोपरा पर्यंत दुमडलेल्या.... शर्टाची पहिली दोन तीन बटणं नेहमी उघडी ...गर्मी झाल्यासारखा शर्ट थोडा वर करून कॉलर मानेच्या मागे ढकललेली ...कॉलर खराब होऊ नये म्हणून एक छोटासा हात रुमाल खांद्यावर टाकलेला कपाळावर घाम आला की तोच हात रुमाल काढून कपाळ पुसून घ्यायचे आणि परत मानेवर टाकून द्यायचा....घरी असले की ...एका हाफ चड्डी वर आणि खांद्यावर टॉवेल घेतलेले...कुठेही बाहेर जाताना हातामध्ये सतत एक कापडी पिशवी.... पायात जाड शिवून घेतलेल्या वाहाणा... हो चप्पल नाही म्हणता येणार त्याला .... एकांतात चालत असले तर मनातल्या मनात विचार करत आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडत जाणारे...कधीही समोर दिसले तरी गोड हसणारे....चिवट पण प्रेमळ असे टिपिकल कोकणी व्यक्तिमत्व.
अरे काका !! तुम्ही कधी आले गावावरून??...मी विचारले
अरेऽऽय !! (नाकातल्या नाकात मालवणी हेल काढत) माका येऊन एक आठवडा होत इलो... तुम्ही नवरा-बायको तर काय कामावर असतास... माका काय तुम्ही लोकं गावना... रात्रीचो दरवाजा ठोकूक बरोबर नाही वाटत....कसां ?? म्हटला !! आज सुट्टी असतली म्हणून वायच दरवाजा ठोकून बघितलय....बाकी कसा काय चाललाय झिला....आमची काय आठवण बिठवण असा की नाय ??
मी म्हटलं, 'काका ! आठवण येते की ...आमचा सगळं मजेत चाललंय.... तुमचे कसे काय चालले आहे??
'आमचा काय राहिला आता.... दहातले आठ गेले दोन उरले....पांडुरंगाची कृपा.... सकाळी उठलो की समजायचा जिवंत असय'
अरे ! असं काय बोलता काकांनु.... काय नाय होताला तुमका.... आणि एवढे बारीक कसे झालात ??...मी आपल्या मोडक्या मालवणीत त्यांच्याशी बोलत होतो.
'झिला आता वय झाला.... किती वय झाला तां काय माहित नाही. पण 85 ते 90 च्या मध्ये असताला. त्याखेपेस कोनाक माहिती कधी जन्म झाला ता..'
आमचा हा संवाद दरवाजा मध्ये उभा राहूनच चालला होता. मी सेफ्टी दरवाजा उघडायला घेतला पण त्यांनी दोन्ही हाताने हाताने घट्ट दाबून नको नको म्हणत उघडायला दिला नाही. दरवाजाच्या जाळीवर दोन्ही हात घट्ट दाबून त्यांनी सेफ्टी दरवाजा पकडूनच ठेवला होता.
आता मी काय मध्ये येत नाही... तू काय माका एवढे दिवस दिसलस नाय आणि आज तुझी सुट्टी असतली म्हणून तुका हाक मारलंय.
हो काका !!आज सुट्टी ....सकाळीच आलो.
त्यांच्याशी बोलताना कधी विषयच आणावा आणावा लागत नाही. ते घडाघडा बोलत राहतात आपण फक्त ऐकत राहायचे. त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे किंवा प्रतिप्रश्न करायचा मग त्यांची कळी अजून खुलून येते.
पण आज त्यांचे बोलणे काही सुसंगत नव्हते, बोलताना ते मध्ये मध्ये थांबत होते, काहीतरी विचार करत होते, मग मध्येच एखादे वाक्य बोलत होते. यावेळेला ते जरा नेहमीपेक्षा जास्तच थकल्यासारखे वाटत होते. गालाची चिपाडे जरा जास्तच आत गेल्यासारखे वाटत होते. पु.लं. च्या भाषेत सांगायाचे झाले तर दातांचा बऱ्यापैकी अण्णू गोगट्या झाला होता.
मी विचारले, 'काय काका.. कसला विचार करत आहात? कसल्यातरी टेन्शनमध्ये दिसताहात.'
अरे झिला ! तुका तर आता माहिती असा, माझी परिस्थिती काय हा ती.... तुझ्यापासून आता काय लपवायचा??.... तू पण माझ्या झिला सारखच असस. आतापर्यंत आयुष्य ताठ मानेने जगत इलय. या वयात आता असं लाजिरवाणा जगायला नाही जमत... तुका माहिती हा ... ना माझो पोरगो आजारी पडल्यापासून घरीच असा.... आता बरो झाला तरी त्याका नवीन काम काय गावाक नाय ....आणि ज्या काम मिळाता त्या माझ्या झिलाक पटत नाय ...त्याका चांगलीच पगार असलेली..चांगली सोय असलेली नोकरी होयी असा...आता सगळा काय आपल्या मनासारखा गावतला (भेटणार) काय ?
त्यात तीन-तीन पोरीयो झाली असत.... घर कसं चालवायचं ह्यो त्याकाच प्रश्न पडला असा... मी काय आता म्हातारा झालयं... माझी काय दोन-तीन हजार रुपये पेंशन येता त्यात कसोबसो मी चालवतय. खरं तर या वयात त्याने माका काहीतरी देऊक होया तर माकाच उलटो काहीतरी देऊक लागता. तरी मध्ये मध्ये येणाऱ्या शेतीतून, नारळ इकून त्याला काही ना काही तरी देत असतंय. पण त्याने सुद्धा दुसरी नोकरी बघून काहीतरी सुरुवात करुक होयी ना !! आता मोठी नोकरी मिळाल्यावरच कामाक जातालय... असा थोडीच चालतला.
या साल्याने दारूपायी आणि तंबाखूपायी अशी वाट लावून घेतली आणि आता माका त्रास झालो...मी आता एवढी वर्ष झाले तरी कधी तंबाखू नाही खाल्ला आणि आजकालची पोरं काय सांगू तुला...
'काका तुम्ही आधी घरामध्ये या.... आपण बसून बोलू, मी चहा बनवली आहे, ती प्यायला या' असे म्हणून मी दरवाजा ढकलायचा प्रयत्न केला. पण त्यांनी नको नको उगाच तुला कशाला त्रास असे म्हणत दोन्ही हात खांद्यातून वर करत दरवाजा दाबून धरला, मला दरवाजा उघडायला दिलाच नाही.
'तुका ठाऊक असा ना.... या बिल्डिंगच्या सोसायटीच्या सगळ्यात पहिल्या सदस्यांपैकी मी एक असय. माझ्या मागून इलेले सगळेचं आता सोडून गेलेत. आता बिल्डिंगला पण चाळीस वर्षे होत इली, मीच काय तो सगळ्यात जुनो सदस्य रव्हलो असय. आतापर्यंत एवढ्या वर्षात सोसायटीचो एक रुपया पण कधी बाकी ठेवलंय नाय, पण आता परिस्थिती कशी ईली हा.. ता तू बघतोच आहेस ना..... मागच्या मिटिंग मध्ये बघितलंस ना, सोसायटीचे मेंबर कशे तावातावाने बोलत होते. मी फक्त डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघितले तेव्हा खय मायझये गप्प बसले. तुका माहितीय ना.... मी कधी कुनाचो पैसो चुकवणारो माणूस नाय. पण आता परिस्थितीच तशी ईली हा तर काय करणार.... आता हजार दोन हजारमध्ये घर खर्च चालवू की हजार रुपये सोसायटीचे भरू..... खरं म्हटला तर आता या घरात राव्हाक परवडत नाही... माझ्या मुलाला मी कधीच म्हटलंय की तू मुंबई सोडून गावाक येऊन रव्ह.... जी काही छोटी मोठी शेती असा..नारळाची झाडा असत त्येंका सांभाळ...छोटीशी काहीतरी नोकरी बघ.... घरासाठी पण मी गिराईक बघूचा ईचार करतंय.... तू मागे बोललो होतस नां रे....इकुच्या आधी माका सांगा म्हणून.
हो काका !! त्यावेळेस बोललो होतो पण आता घर घेणे जमण्यासारखे नाही आणि मला तेव्हढे लोन सुद्धा आता मिळणार नाही.
हो रे बाबा!! माहिती असा माका... मुंबईत रव्हूचा किती महाग झाला हा !! मला पण घर विकुचा नाही हा रे !! निदान मी मरेपर्यंत तरी.... पण तु बघतोयस ना सोसायटीचा मेन्टेनन्स माका देऊक परवडणा नाय... तू एकदा माझ्या झिलाक समजावून बघ.... निदान जो काय छोटो मोठो जॉब गावता तो करुक सांग....नाय म्हणजे कसा...रोलिंग चालू रवात ना..
"अहो बाबा!! तो माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे. मी त्याला काय समजावून सांगणार, त्याला उगाच राग नको यायला"..मी म्हणालो
'अरे कसला राग घेऊन बसलायस... बापाच्या पैशावर जगतो हा!! त्याचो कसलो इलो हा मान पान !!'...काका
'काका घरात तरी या, एव्हढ्यात चहा पिऊन झाला असता', मी उगाच विषय बदलावा म्हणून बोललो.
नको रे बाबा!! नंतर कधीतरी येईन सुनेच्या हाताची चाय पिवूक (माझ्या बायकोला प्रेमाने आणि हक्काने सुनबाई हाक मारायचे) .....आता गणपतीला परत गावी जावूचा हा. तिकीट पण मिळत नाही... मागच्या येळेला मे मध्ये पण ईलो व्हतय....तेव्हा पण खूप गर्दी होती. दिवा लोकल ने बाथरूम जवळ बसान इलय... या वयात आता या सगळ्या गोष्टी जमत नाही रे बाबा .....आता अर्धा तास पण उभे राव्हाक जमत नाही.....रीजर्येषण (रिझर्वेशन) करून येवूक परवडत नाही.... काय सांगू बाबा तुका आता??.
'बाबा समजू शकतो मी....' काहीतरी बोलायचे म्हणून मी उगाच बोललो.
"काय करणार बाबा..... भोग असऽऽत ते..... भोगल्या शिवाय काय सुटका नाही ह्याच खरा. तुका म्हणून सांगतंय झिला.....आयुष्यात कधी कोणाचा वाईट केला नाय...पण माझ्याच नशिबी ह्यो कसलो भोग ईलो हा...परमेश्वराक ठाऊक"...असे बोलता बोलता त्यांच्या लुकलुकणाऱ्या डोळ्यात पाण्याचे दोन थेंब उभे राहिले. एकदम दाटून आलेला हुंदका त्यांनी गळ्यातल्या गळ्यात दाबायचं आटोकाट प्रयत्न केला. दाबलेल्या हुंदक्यामुळे त्यांच्या खणखणीत आवाजाला एक वेगळाच जडपणा आला होता.
"मरता मरता कोणाची एक रुपयाची पण उधारी ठेवूची नाय माका" असे म्हणत त्यांनी खांद्यावरचा टॉवेल डोळ्यांना लावला आणि मला डोळ्यातले पाणी दिसू नये म्हणून टॉवेलने डोळ्याच्या कडांना घासू लागले....मोठ्या प्रयत्नाने डोळ्यात अजून जोरात येणारे पाणी त्यांनी त्याच ताकतीने परतवून लावले.
चित्र प्रतीकात्मक |
त्यांनी खांद्यावरचे टॉवेल जसे उचलले तसे खोल खड्डा पडलेले पोट बघून मला उगाच पु ल देशपांडेंच्या 'अंतु बर्वा' ची आठवण येऊन गेली. ते खोल खपाटीला गेलेले पोट माझ्या जिव्हारी लागले... मी पुढे काही बोलायच्या आतच काका निघून गेले.... मीही परत त्यांना हाक मारली नाही.
आपल्या मुलाच्या वयाच्या व्यक्तीसमोर डोळ्यातून येणारे पाणी त्यांच्या आत्मसन्मानाला शोभणारे नव्हते.
त्यांच्यातल्या चिकट आणि स्वाभिमानी कोकणी माणसाला कुठल्याही परिस्थितीत हरायचे नव्हते.
नंतर चहाची मला चवच लागली नाही. त्यांचे बोलणे, त्यांचे लुकलुकणारे डोळे, खपाटीला गेलेले पोट डोळ्यासमोर येत राहिले. पुढे ते कधी गावाला परत निघून गेले ते समजलेच नाही. त्यांना चहाला घरी बोलावयाचे राहूनच गेले. आता परत ते कधी मुंबईला येतील...येतील की नाही ते पण माहित नाही.... पुढच्या वेळेला तरी निदान त्यांना एक कप चहा पाजायची माझी इच्छा अपुरी राहायला नको एवढेच देवाला मागणे.
----
आशिष सावंत
5 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!