एक आठवड्याचा नास्तिक...

लहानपणी नवरात्रीच्या दिवसात आजूबाजूचे वातावरण धार्मिक झालेले होते. आमच्या घरातपण अध्यात्मिक वातावरण असायचे. अश्यावेळी प्रवाहात न वाहता बगावत करायचे दिवस माझे. त्या दरम्यान दूरदर्शन वर अमिताभचा 'दिवार' चित्रपट बघून मला पण नास्तिक बनण्याची खुमखुमी आली होती. दोन तीन दिवसांनी शाळेतल्या उपमुख्याध्यापिका बाई ज्या आम्हाला विज्ञान शिकवायच्या त्यांनी आम्हाला देव वगैरे काही नसतो...कोणी आतापर्यंत बघितला आहे का? विज्ञानाने देवाला सिध्द केले आहे का?? देव अस्तिवात नाही... असे अर्ध्या तासाच्या विज्ञानाच्या पिरियेड मध्ये भरगच्च लेक्चर देऊन नस्तिक बनण्यास अजून खतपाणी घातले.

दुपारी शाळेतून घरी आल्यावर मी घोषित करून टाकले..की मी देवाला मानत नाही....आजपासून मला देवाबद्दल काही सांगू नकोस...मी काही देवाची पूजा करणार नाही....आईने नेहमी प्रमाणे काहीच प्रतिक्रिया दिली नाही...फक्त माझ्याकडे बघून हसली आणि आपल्या कामाला लागली.

संध्याकाळी काही मित्रांबरोबर एरिया मधील समाजमंदिर हॉल मध्ये गरबा बघायला गेलो...मित्र बोलला थांब आधी हॉल मध्ये जाऊन देवीच्या पाया पडून येऊया...मी म्हटले, मी नाही देवाला मानत..तुला जायचे तर जाऊन ये... तो म्हणाला, अरे गेट पर्यंत तरी चल.



मी विचार केला, अमिताभ पण मंदिराच्या पायऱ्या पर्यंत जायचा तर मी पण जाऊ शकतो. मित्र आतमध्ये पाया पडायला गेला...मी मित्र येईपर्यंत दरवाजात घुटमळायला लागलो...अमिताभ स्टाईल मध्ये खांदे वर करून समजमंदिराच्या पायर्‍यांवर बसलो...दरवाजातून आत नजर गेली तर मला सकाळची विज्ञानाची शिक्षिका दिसल्या...आधी विश्वास नाही बसला...मनात म्हटले त्या नसतील त्या तर विज्ञाननिष्ठ नास्तिक बाई आहेत...पण परत दरवाजातून त्यांची झलक दिसली... हातात मडके घेऊन...कपाळाला कुंकू फासून...

हा काय प्रकार आहे...मला समजेना...त्या नसतील दुसर्‍या कोणीतरी असतील.

मी चप्पल काढून आत गेलो तर त्याच बाई होत्या...दहा बारा बायकांचा रिंगण घालुन घागरी फुंकायचा कार्यक्रम चालू होता...आणि आमच्या बाई हातात रिकामे मडके घेऊन त्या रिंगणाच्या मध्यभागी अंगात देवी आल्यासारखे हा...हा...हा ...फु...फु..फु करत होत्या...बाजूच्या बायका हातात मडके घेऊन सुरात कुठलेतरी गाणे म्हणत रिंगण घेत होत्या..

आईशपथ!! आयुष्यातला पहिला अपेक्षाभंग असेल तो...जी बाई सकाळी आम्हाला नस्तिक्तेवर एवढे ज्ञान देत होती ती आता अंगात देवी आणून घागरी फुंकते आहे.. ..

सब साला झूठ है...ये दुनिया.. ये लोग...सब साले धोकेबाज है ...अश्या काही फिलिंग्ज यायला लागल्या होत्या...

घागरी फुंकणे- इमेज लोकमतवरून साभार
घागरी फुंकणे- इमेज लोकमतवरून साभार 

त्यात भर म्हणजे त्यांचा मुलगा कुठल्याश्या क्लास मधून आला होता..त्याने आई म्हणून हाक मारली...त्या तश्याच घागर फुंकत..हा...हा...हा करत रिंगणाच्या कडेला आल्या...मुलाने घराची चावी मागितली...

हा..हा...हा... करत त्यांनी कोपऱ्यात ठेवलेल्या बॅग कडे इशारा केला...मुलगा पटकन जाऊन चावी घेऊन आला... त्यांनी परत हा...हा...हा...  करत त्याला जवळ बोलावून सांगितले.... कुकरमध्ये भात लावला आहे फू..फू...फू.... डाळ बनवून ठवली आहे. हा..हा...हा.... तू आणि बाबा जेवून घ्या फू..फू...फू... मी येइन लवकरच ...हा ..हा...हा...

मुलगा निघून गेला... मी बघतच राहिलो... अमिताभ बच्चन कधीच माझी साथ सोडून गेला होता... ह्या बाई तर भक्तीत लिन आहेत...मीच...उगाच देवावर संशय घेतला.....आता मला देव माफ करणार नाही ही भीती वाटायला लागली...महिषासुरा सारखी मला लोळवून देवी माझ्या छाताडावर उभी राहणार असे वाटायला लागले... तिथेच देवीच्या पाया पाडून माफी मागून मी बाहेर पडलो.

घरी आल्यावर माझ्या कपाळाला लागलेले गंध बघून आई फक्त हसली...मला जाम ओशाळल्यागत झाले.

माझ्यातला नास्तिक एक आठवडा पण नाही टिकला.



---
आशिष सावंत

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top