रिक्षा आणि बाप
सकाळी ८.४० ला स्टॉप वर येऊन उभा राहिलो....नेहमीप्रमाणे शेअर रिक्षा साठी भली मोठी रांग होती आणि बस स्टॉप वर कमीत कमी दोन बस मध्ये बसतील एवढी माणसे उभी होती.
सकाळी सकाळी घरापासून कॅडबरी जंक्शन पर्यंत रिक्षा मिळणे म्हणजे महदिव्यचं.
१० ते १५ मिनिटे रिक्षावाल्यांकडे भीक मागीतल्यानंतर एखादा रिक्षावाला तयार होतो.
मी नेहमीप्रमाणे बसस्टॉप च्या १० पावले विरुद्ध दिशेला जाऊन उभा रहिलो....एखादा रिक्षावाला तिथे मिळतो हा नेहमीचा अनुभव.
पण आज जवळपास १० मिनिटे झाली तरी काही रिक्षा भेटली नाही...चार पाच रिक्षावाले येऊन गेले... कॅडबरी जंक्शनचे नाव ऐकून भूत बघितल्या सारखे पळून गेले.
शेअर रिक्षाच्या लाईनीच्या बाजूला एक माणूस आपल्या अंदाजे पाच/सहा वर्षाच्या बारकट मुलाला शाळेत घेऊन जाण्यासाठी उभा होता. मला नाकारून गेलेल्या रिक्षा त्याच्या समोर उभ्या राहत होत्या आणि त्या माणसाने विचारल्यावरही त्याचे भाड़े नाकारून पुढे जात होत्या.
जस जसा वेळ पुढे सरकत होता तसतशी त्या माणसातल्या 'बापाच्या' चेहऱ्यावरची बेचैनी वाढत होती. पोरगा पण बहुतेक बापच्या बेचैनी कड़े बघून काहीसा चुळबुळ करू लागला होता. ते दोघे कदाचित मी यायच्या आधी पासून उभे असावेत आणि मिनिटा मिनिटाला त्यांची बेचैनी वाढत जात होती....ना बस येत होती ना रिक्षा थांबत होत्या.
८.५५ होत आले होते...बाप आता जागच्या जागी हालचाल करून चुळबुळ करू लागला होता.
गल्लीतून येणाऱ्या जाणाऱ्या...मला नाकारून गेलेल्या रिक्षावाल्यांना थांबवून कळवळून विनंती करत होता...मुलाला शाळेत घेऊन जायचे आहे असे त्याच्या कड़े बोट करून दाखवत होता.
पण निगरगट्ट रिक्षावाल्यांच्या हृदयाला पाझर फूटेल हयाची शक्यताच नाही हे त्या गरीब बापड्याला कोण समजावून सांगणार.
असा प्रसंग माझ्यावरही २/३ वेळेला मुलाला शाळेत घेऊन जाताना ओढ़वला आहे. सकाळी ९ ची शाळा असताना आम्ही रिक्षा न भेटल्याने किंवा रिक्षा न थांबल्यामुळे म्हणा....आम्हाला शाळेत पोहोचायला उशीर झाला आहे. नऊ वाजून पाच मिनिटांनी पोहचलों म्हणून शाळेचे गेट बंद झाले होते.....आणि मग मला मुलाला दुसऱ्या गेटने आत घेऊन जाऊन प्रिन्सिपलच्या सेक्रेटरीची परवानगी घेऊनच मुलाला शाळेत सोडता आले होते. त्या सेक्रेटरीला कोणतीही करणे खोटीच वाटायची आणी ती चांगले तोंडसुख घ्यायचा सोनेरी चान्स सोडायची नाही. ही बाई आपल्या डॅड्डी ला ओरड़ते आणि डॅड्डी सगळे ऐकून घेतोय...आणि फक्त सॉरी बोलतोय हे बघून माझ्या लहान मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायचे. त्याला ते आवडायचे नाही. काहीतरी मोठी चूक झालीय एवढे त्याला समजायचे आणि बिचारा तो घाबरून जायचा. ह्या सगळ्या प्रक्रियेत १० ते १५ मिनिटे सहज निघून जायची आणि मुलगा ९.२० पर्यंत वर्गात पोहोचयचा. ५ वर्षाचा माझा मुलगा पण त्याला वर्गात उशीर झाला म्हणून टीचर डॅड्डीला ओरडते ह्याचे वाईट वाटायचे आणि घरी आल्यावर तो मला सांगायचा, ‘डॅड्डी मला उशीर झाला की टीचर ओरडते मी तिला सांगितले की मला रिक्षा नाही भेटली तरी ओरडते आणि ती दुसरी टीचर तुला पण ओरडते. तू मला तुझ्या बाईकनेच सोड.’
त्यावेळी रिक्षावाल्यांच्या मुजोरी मुळे एक बाप आपल्या मुलासमोर हरल्यासारखे वाटते. नशिबाने कितीही आयुष्यात उतार चढाव आले तरी चालतील पण एक बाप कधी आपल्या मुलासमोर हरला नाही पाहिजे. मुलासाठी आपला बाप सुपरमॅन, सुपरह्युमन वगैरे....सर्वकाही माहित असणारा आणि सर्व काही करणारा असतो त्याच्या त्या प्रतिमेला कधी तडा नाही गेला पाहिजे असे माझे प्रांजळ मत आहे.
आणि तशीच काहीशी मनस्थिती बहुदा त्या बापाची होत असावी. कशीबशी मला कॅडबरी जंक्शनला जाण्यासाठी रिक्षा मिळाली. मी रिक्षावाल्याला बसतानाच म्हटले की त्या मुलाजवळ थांबव.....त्याला शाळेत सोडून पुढे जावूया...नशिबाने तो रिक्षावाला पण तयार झाला. कदाचित त्याला वाटले की तो शाळेत जाणारा मुलगा माझ्या ओळखीचा असावा. नाहीतर रिक्षावाले सहसा एक भाड़े असताना दुसरी माणसे घेत नाही.
रिक्षा त्या माणसाजवळ येऊन थांबली मी मान बाहेर काढून विचारले, ‘कुठल्या शाळेत जायचे आहे?’
तो अचंबित आश्चर्यचकित वगैरे होऊन गडबडीत म्हणाला, ‘सावरकर नगर च्या शाळेत’
सावरकर नगर... मी ज्या रस्त्याने जाणार होतो त्या रस्त्यावर पुढे अंदाजे एक किलोमीटर जाऊन येणाऱ्या नाक्यावर वळून पूर्णपणे विरुद्ध दिशेला जावे लागणार होते. तिथे त्याला सोडून मला एक तर मागे यावे लागले असते अथवा पुढे मोठा वळसा घालून कडबरी जंक्शन च्या पुढच्या स्टॉपवर म्हणजे नितिन कंपनीच्या जंक्शनला बाहेर पडावे लागले असते.
तो मुलगा एकदा माझ्याकडे आणि एकदा बापाकडे बघायला लागला. मी सेकंदाचाही विचार न करता त्याला म्हणालों ‘या आत बसा.....मी सोडतो तुम्हाला...’
रिक्षावाल्याने माझ्याकडे बाघितले...मी नजरेच्या खुणेने त्याला ‘चल’ म्हणून सांगितले...त्याला भाड़े जास्त मिळणार होते...त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नसावा.
बापाने घाई घाईने मुलाला आत मध्ये बसवले आणि मग स्वत: अवघडल्यासारखा अर्धवट पाय बाहेर काढून बसला.
मी म्हटले, ‘आत सरकून बसा बाहेर पायाला लागेल’....मग जरा तो आत सरकून बसला.
मुलगा पण अनोळखी पणाने रिक्षाचा दांडा पकडून उभाच राहिला होता..जणू काही ही रिक्षा माझीच आहे आणि तो सीटवर बसला तर मी त्याला ओरडेन. मी त्याला खांदा दाबून ‘बस’ म्हणून म्हटले तसा बापा कड़े एकदा बघून त्याने आपला बुड़ सीट वर टेकवले.
बापची तगमग अजूनही चालूच होती. त्याला रिक्षा भेटली आहे हयावर कदाचित विश्वास नव्हता किंवा शाळेत वेळेवर पोहोचेन की नाही ह्या विचाराने तो चिंताग्रस्त झाला होता.
रिक्ष्यावाल्यांवर फिरलेले डोके, त्यांचा आलेला राग, मुलाला शाळेत सोडायची झालेली घाई, घड्याळाचे सरकलेले काटे, त्यात अचानक एक अनोळखी माणसाने का रिक्षात बसवले ह्या सगळ्या विचारांच्या जंजाळात तो चांगलाच गुंतलाय हे त्याच्या आरश्यातून दिसणाऱ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
त्याच्या विचारांची गाड़ी पूर्वपदावर यायला जवळपास एक किमी अंतर कापायला लागले. त्यानंतर तो थोड़ा शांत होताना दिसला.
त्याचा मुलगा ही अचंबित झाला होता. रिक्षात बसवलेल्या माणसाबरोबर आपला बाप बोलत का नाहीये असा भाबडा प्रश्न बहुतेक त्याला पडला होता. आपल्या बापाच्या ओळखीचा माणूस नाही तर आपण रिक्षात बसलो कशाला???....असाही प्रश्न त्याला पडला असावा.
तो एकदा बापाच्या चेहऱ्याकडे एकदा माझ्या चेहऱ्याकडे बघत होता. जवळपास एक किमी अंतर कापल्यावर त्या बापाच्या विचाराचे तवंग स्थिर होऊ लागले होते आणि अत्यंत पोटतिडीकीने तो म्हणाला, ‘अहो, मुलाची परीक्षा आहे हो...२०/२५ मिनिटे झाली एक रिक्शा नाही की बस नाही.....माज आलाय सगळ्यांना....’
मी फक्त ‘हुम्म’ केले.
मुलगा एकदा माझ्या चेहऱ्याकडे बघून हसला. त्याचा बाप माझ्याशी काहीतरी बोलला ह्याचाच त्याला आनंद झाला होता बहुतेक...
मी पण त्याला डोळे मिचकावून स्मित हास्य दिले आणि वातावरण जरा निवळल्यासारखे झाले...बाप आणि मुलगा दोघेही थोड़े सैलावले.
बापाला काय बोलावे हे सुचत नव्हते...त्यामुळे मी पण काही विचारले नाही...एक वादळ आपोआप शांत होताना जसे दिसत असेल तसाच काहीसा तो बाप दिसत होता.
सावरकरनगरला शाळा जवळ आल्यावर मुलगा सीट वरून आपले बुड़ उचलून उभा राहिला.
बाप रिक्षा थांबायच्या आधीच पाय बाहेर काढून बसला. मी रिक्षावाल्याच्या खांद्यावर थोपटून रिक्षा थांबवायला सांगितले नाही तर त्याने चालत्या रिक्षातूनच पाय बाहेर ठेवयाचा प्रयत्न केला असता.
रिक्षा थांबल्यावर तो उतरला...मुलाला उतरवले....माझ्याकडे फक्त एकदा बघितले पण काय बोलावे हे त्याला सुचले नाही.
कदाचित आभार मानायचे असेल, थॅंक्यु बोलायचे असेल, लिफ्ट दिली त्याबद्दल धन्यवाद द्यायचे असेल पण त्याच्या मितभाषी आणि भिड़स्त स्वभावामुळे कदाचित त्याला ते जमत नव्हते..
मुलाने आपला बाप काही बोलतोय का ते बाघितले आणि मग माझ्या कड़े बघून फक्त खुश होऊन टाटा केला...मी ही त्याला टाटा केला...आणि त्याच्या बापला उगाच अडचणीत आणण्याआधी रिक्षाला पुढे चलायला सांगितले.
बाप फक्त नजरेत नजर घालून बघत राहिला...त्या नजरेत एक कृतज्ञतेची, एका बापच्या सन्मानची आणि भिड़स्त स्वभावची फक्त झलक डिसली.
पुढे मलाही मजबूत ट्राफिक लागले...रिक्षावालाही ट्राफिकवर वैतागला होता. मी कॅडबरी जंक्शनच्या पुढच्या स्टॉप वर येऊन उतरलो. रिक्शाचे भाड़े जे सहसा २८ ते ३० रुपये होते ते ५२ रुपये झाले होते...
रिक्शावाला म्हणाला, ‘काय साहेब उगाच पैसे घालवले, साधा थॅंक्यु पण नाही म्हणाला तो माणूस आणि वेळही वाया गेला तुमचा...काय मिळाले उगाच??’
मी म्हटले, त्याच्या नजरेत मला सगळे काही भेटले....एका बापची तगमग तुम्हा रिक्षावाल्यांना नाही समजणार. आणि एक बाप आपल्या मुलासमोर हतबल न होता...न हारता ताठ मानेने उभा राहिला ह्यातच मला सर्व काही भेटले...
रिक्शावाला माझ्याकडे तुच्छतेने बघून हसाला....मनात म्हणाला असेल, ‘काय चू** आहे साला’ आणि रिक्शा वळवून जोरात निघून गेला.
3 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!