दृष्टिकोन !!

घटना पहिली 

जवळपास अठरावीस वर्षांपूर्वी एका मित्राच्या शेजारच्या कुटुंबामध्ये एक अपघात झाला होता. त्या कुटुंबाचा एकुलता एक मुलगा रॉयल एनफील्ड बुलेट चालवत असताना अपघात होऊन रस्त्याच्या दुभाजकावर आपटून जागच्या जागी वारला होता. बुलेटचे थोडे फार नुकसान झाले होते. रस्त्यावरच्या लोकांनी उचलून हॉस्पिटलला घेऊन गेले पण काही उपयोग झाला नाही. त्या कुटुंबावर तो मोठा आघात होता. त्याच्या पालकांची रडून रडून झालेली हालत अजून ही डोळ्यासमोर आहे. 

त्या काळात शेकडा एका व्यक्तीकडे एखादी बुलेट असायची. अपघात झालेली बुलेट त्याच्या वडिलांची खूप आवडती बुलेट होती. त्यांनी आपल्या मुलासारखीच खूप चांगल्यारीतीने तिची जपणूक केली होती. त्यांच्या धारदार व्यक्तिमत्वाला ती बुलेट खुलून दिसायची. मुलगा मोठा झाल्यावर तो पण बुलेट वापरायला लागला. पण अचानक त्या बुलेटला झालेल्या अपघातमध्ये मुलाला गमावल्यानंतर त्यांचे त्या बुलेट वरून मनच उडून गेले. झालेला अपघात बुलेट च्या चुकी मुळे की त्या मुलाच्या चुकी मुळे झाला हे कळायला मार्ग नव्हता पण त्यांनी ती बुलेट समोर नकोशी वाटायला लागली पण ती विकून टाकावीशी पण वाटत नव्हती. मनावर मोठा दगड ठेवून त्यांनी ती विकायला काढली. 

अपघात झालेली बुलेट म्हणून कोणी ग्राहक पण लवकर येत नव्हते. त्याच्या आईचे म्हणणे होते बुलेट कोणाला न विकता भंगार मध्ये देऊन तोडून टाकावी जेणेकरून परत असा कोणाचा अपघात होऊ नये. 

हो ..नाही करता करता शेवटी त्यांनी बुलेट भंगारवल्याला पूर्ण तोडून स्क्रॅप मध्ये टाकण्यासाठी दिली. भंगारवाल्याने त्याचे पुढे काय केले माहीत नाही.

त्या आई वडिलांना आपल्या मुलाच्या निधनाला जवाबदार असलेली ती बुलेट जवळपास पण नको होती.
----------------------------------------------------------------------------
दुसरी घटना 

जळगावला असताना बँकेच्या एका शाखेत एक नवीन मुलगा लागला होता. आसामचा राहणारा होता. पहिलाच जॉब आणि पहिलीच पोस्टिंग अडीच हजार किलोमीटर दूर जळगाव मध्ये. तरुण कोवळे वय, काहीतरी करण्याची जिद्द, गरम रक्त पण तेवढाच नम्र स्वभाव, हुशार आणि कामामध्ये प्रामाणिक असल्यामुळे अल्प कालावधीत तो सगळ्यांचा लाडका झाला. त्याला स्पोर्ट्स बाइक ची भरपूर क्रेझ ...आपल्या कमाईने त्याने नवीन स्पोर्ट्स बाइक घेतली. बाईक स्पीड मध्ये चालवायची खूप आवड. इतर सहकार्‍यांनी स्पीड कमी करण्यावर समजावून पण संगितले होते. पण तरुण रक्त ते... साहसी गोष्टी करण्याच्या कोवळ्या वयात ह्या गोष्टी समजत नाही.

कोविडचा दुसर्‍या लाटेचा लॉक डाउन चालू असताना बँका अर्धा दिवस चालू असायच्या. तो ऑफिस मधून निघून एका हॉटेल मध्ये जेवणाचे पार्सल आणायला गेला आणि एका वळणावर गाडी घसरून तो रस्त्यावर पालथा पडला. तो जो पडला तो कधी उठलाच नाही. शरीरातून एक थेंबही रक्त आले नव्हते. आतल्या आत हृदयाला मुका मार  लागून तो जागीच मृत्यू पावला. लॉकडाउन मुळे रस्त्यावर वर्दळ पण नव्हती. खूप वेळाने रस्त्यावरून जाणार्‍या एका माणसाने त्याला बघून ओळखले आणि बँकेतील दुसर्‍या कर्मचार्‍याला फोन केला. त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले पण डॉक्टरांनी आधीच त्याला मृत घोषित केले. सगळ्यात मोठी गोष्ट होती ती त्याच्या आई वडिलांना कळवणे.

मोठ्या मुश्किलीने त्यांनी त्याच्या मोबाइल मधून नंबर घेऊन त्याच्या वडिलांना निरोप दिला. वडील दोन अडीच हजार किलोमीटर दूर...यायचे म्हटले तरी कमीत कमीत दोन दिवस जाणार. त्यांच्या घरापासून एयरपोर्ट 6..7 तास अंतरावर. जळगावला जवळचा एयरपोर्ट मुंबई किंवा नागपुर. तिथून परत 7..8 तासाचा प्रवास करून जळगाव... कमीत कमी दोन दिवस त्यांना लागणार होते...त्यात लॉकडाउन....दुसर्‍या राज्यातून आल्यावर 14 दिवसांचा विलग्नवास (quarantine).... लॉकडाउन मुळे ट्रेनच्या तिकीट मिळत नव्हत्या. खाजगी वाहन करून येणे शक्य नव्हते. त्याच्या आई वडिलांपुढे काहीच मार्ग नव्हता.  कसे तरी करून ते इथे पोचले असते तरी त्याचे पार्थिव परत कसे घेऊन जाणार हा मोठा प्रश्न.

शेवटी आई वडिलांनी नाइलाजाने आपल्या मुलाचे पार्थिव तुम्हीच रुग्णवाहिकेमधून पाठवून द्या म्हणून संगितले. इकडे डॉक्टरांनी पोस्टमार्टेम वगैरे सोपस्कार करून पार्थिव बँकेच्या शाखा अधिकारांच्या हवाली केले. हे सगळे बँकेच्या अधिकारांच्या ओळखीमुळे शक्य झाले नाहीतर पार्थिव फक्त नातलागांच्या हवाली केले जाते. 

त्याचे पार्थिव एक रुग्णवाहिका करून त्याच्या घरी आसामला पाठवण्यचे ठरवले. एक पूर्ण वातानुकूलित एसी रुग्णवाहिका बोलावून त्यात बर्फाच्या पेटीत त्याचे पार्थिव ठेवून घेतले. सोबतीला तीन ड्राईवर दिले जेणेकरून गाडी कुठे न थांबता डायरेक्ट आसामला पोचेल... पार्थिव घेऊन जाण्यासाठी लागणारे सगळे कागदपत्र, ड्राइव्हर चे ई-पास, त्यांचे तीन दिवसाचे खाणे पिणे (कारण मध्ये हॉटेल भेटतील..नाही भेटतील), आंतरराज्य ट्रान्सफर चे पेपर असे सगळे सोपस्कार करून त्याचे पार्थिव आसामला पाठवण्यात आले. बँकेच्या ओळखीमुळे सगळ्या गोष्टी अर्ध्या दिवसात जमवणे सोपे झाले सामान्य माणसाच्या आवाक्यात ह्या गोष्टी जमल्याच नसत्या.

तीन दिवसाचा प्रवास त्या रुग्णवाहिकेने दोन दिवसात केला आणि ते पार्थिव त्याच्या आईवडिलांकडे पोहचवले. तिथेच त्याचे अंत्यसंस्कार झाले.

त्याची स्पोर्ट्स बाइक पोलिस स्टेशन मध्येच तशीच पडून होती. काही महिन्यांनी त्याच्या आई वडिलांनी पोलिसांशी बोलणी करून बँकेच्या अधिकार्‍यामार्फत ती बाइक स्पेशल ट्रान्सपोर्टने त्यांच्या घरी मागवून घेतली.

त्या मागे त्यांचा एकच उद्देश्य होता. की त्यांच्या मुलाची ती सगळ्यात आवडती गोष्ट होती त्याचा खूप जीव होता त्या बाईकवर आणि मुलाच्या शेवटच्या क्षणी तीच त्याच्या सोबत होती. म्हणून त्यांनी तो खर्च करून ती गाडी मागवून घेतली.

वरील दोन्ही घटना जवळपास सारख्याच...दोन्ही कुटुंबाच्या लाडक्या मुलांचा अपघाती मृत्यू...एका कुटुंबाने बुलेटला दोषी ठरवून तिचे अस्तित्व मिटवून टाकले. दुसर्‍या कुटुंबाने स्पोर्ट्स बाईकला मुलाची शेवटची आठवण म्हणून दोन हजार किमीचा प्रवास करून मागवून घेतले.

आयुष्यात चूक आणि बरोबर असे काहीच नसते...प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन त्या गोष्टींना चूक किवा बरोबर ठरवतो.



CONVERSATION

1 comments:

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top