नोंदी - कोंकण डायरी !!
कोंकण डायरी मधल्या नोंदी:
फेब्रुवारी २७, २०१६
फेब्रुवारी २७, २०१६
कोंकण प्रवासात असलो की सकाळी अलार्म वाजून उठायची गरजच कधी पडली नाही. सकाळी सहा-साडे सहालाच टकटकीत जाग आली. भाड्याने घेतलेली स्कुटी काढून मालवणातले रस्ते फिरायला निघालो. आपल्या भाषेत बोलायचे तर एक्स्प्लोर (explore) करायला निघालो. मुंबई एवढी नसली तरी रस्त्यावर बऱ्यापैकी वर्दळ होती. .
मुख्य बाजाराच्या रस्त्यावर आलो ...दोन मजबूत वेण्या आणि मधोमध भांग पडलेल्या मुली लगबगीने लेडीज सायकली चालवत शाळेत चालल्या होत्या. त्यांच्या मागे पुढे खाकी चड्डी घालून नीटनेटका भांग पाडलेली मुले पाठीला दप्तरे लावून एकमेकांच्या खोड्या काढत शाळेत चाललेली….त्यांच्या चेहऱयावर दिसणारा ताजेपणा आणि टवटवीत ऊर्जा मुंबईच्या मुलांमध्ये क्वचितच दिसते
एका गल्लीतून डावीकडे वळत असतानाच समोरच सूर्य नारायणाचे दर्शन होतेय. आकाशात लाल केशरी रंगाची उधळण करतच सुर्य नारायण आपली एन्ट्री मारत आहेत. अशी एन्ट्री नाटकातल्या मुख्य नटाला पण येत नसावी. भास्कराच्या आगमनाची वर्दी मिळताच आजूबाजूचे घरे आणि झाडे आळोखेपिळोखे देत....अंगावरची ढगांनी आणि धुक्यानी घातलेली चादर हळू हळू बाजूला करत आहेत.... ह्या निसर्गाची अंग झाडत झोपेतून उठणारी ही हालचाल …बिछान्यातून उठणाऱ्या आणि दोन्ही हात वर करून आळस देणाऱ्या मादक तरुणी पेक्षाही मोहक आहे. ती अनुभवायला तिथे असणेच गरजेचे आहे.
थोडे पुढे आल्यावर मालवण डेपोत, मालवण-आचरा मार्गे रत्नागिरी जाण्यासाठी लाल यष्टीचा डब्बा उभा आहे. लोकं तिला 'लाल डब्बा' का म्हणतात हे मला अजून समजलेले नाही. खरा तर ती कोकणाची 'लाल परी' आहे. आतला कंडक्टर मास्तर सतत बेल वाजवून प्रवाशांना आपापल्या जागेवर बसून घ्यायला सांगतोय.... ड्रायवर टायर हाताने ठोकून हवा बरोबर आहे कि नाही ते बघतोय.
बस स्टॉप वर कडक इस्त्रीचे कपडे घातलेला एक रिटायर्ड माणूस हातात तंगुस ची पिशवी घेऊन घाईघाईने खरेदीला चाललाय.....कदाचित गावाकडे परतीची बस त्याला चुकवायची नाहीये.
बस स्टॉप वरच्या गर्दीत एक म्हातारी आजी दिसतेय...सुरकुतलेल्या चेहऱयावर कोकणीपणाचा एक साज चढलेला आहे...ती बहुतेक जवळच्याच धुरी वाड्यातील गाभीत असावी....तिच्या हालचालीवरून तरी तिला जास्त घाई नसावी.....मी तिचा फोटो काढताना नेमकी नजरानजर झाली आणि तिचा फोटो काढलेला कदाचित तिला आवडला नसावा तिला.... मी तिच्याकडे बघून एक स्मित हास्य करत पुढे निघालो
मालवणातील चिंचोळ्या रस्त्याच्या दुतर्फा - उतरत्या छपरांची घरे नुकतीच अंग झाडून जागी होत आहेत. काही आळसावलेले नवीन धाटणीचे बंगले अजून अंथरुणातचं धुक्याची चादर पांघरून लोळत पडले आहेत. खळ्या खळ्यातून घरातली बाई माणसे मॅक्सि, साड्या कमरेत खोचून घराचे खळे....अंगण खराट्याच्या झाडूने साफ करत आहेत. त्या खराट्यातून होणाऱ्या 'सपक सपक' आवाजातून एक वेगळेच संगीत तयार होत आहे. एक हात कमरेमागे ठेवून एका हाताने झाडू मारत असताना शेजाऱ्यांची चौकशी पण होतेय. मध्येच घरात झोपलेल्या मुलांना उठण्यासाठी आतल्या बाजूला तोंड करून पोरांना आवाज देऊन परत हात सपक सपक चालू आहेत. घरातील पुरूष माणूस जमा झालेला पतेरा (पचोला) चुलीत टाकण्यासाठी घरच्या मागल्या बाजूस घेऊन जात आहेत. मागच्या बाजूला काळ्या मडक्यात अंघोळीचे पाणी गरम होतेय. आळसावलेले एखादे पोरगे त्या चुलीच्या शेजारी धग घेण्यासाठी उकिडवा बसलाय.
एक सोनेरी केस केलेला, फुल्ल पॅन्टअर्धी दुमडून स्लीपर घातलेला एक सायकलवाला तरटाची पिशवी सायकलला अडकवून बाजारकडे चाललाय. मी तिथून पुढ निघतोय...पुढच्याच वळणावर शेतात साचलेल्या डबक्यामध्ये दोन तीन बगळे समाधी लाऊन सावज टिपण्यासाठी बसले आहेत.
त्याच्या पुढच्या वळणावर…डोक्यावरची सगळी केस सफेद झालेला…गालाच्या खापाड्या आत गेलेला ….उन्हातान्हात काम करून वेगळाच रापलेपणा चेहऱ्यावर आलेला …. टिपिकल कोंकणी माणसाची असणारी बारकट पण शिडशिडीत आणि राकट अंगकाठी असलेला….डोळ्यावर कांडीचा चष्मा असलेला ……अंगात जुने झालेलं पण घालण्यासारखे असलेले शर्ट आणि अर्धी विजार घालून …. जवळपास साठी गाठलेला म्हातारा हातातली काठी आपटत आपल्या गुराढोरांना चरण्यासाठी घेऊन जातोय.…
मी माझी स्कुटी थांबवून कॅमेरा सरसावतोय हे पाहून.....त्या राकट चेहऱ्यावर आलेले एक गोड हास्य मला एखादा पाळण्यातल्या लहान मुलाच्या हास्य सारखेच निरागस वाटतेय.
त्याच्या काठी आपटण्याचा आवाज हळूहळू दूर जातोय आणि त्या रस्त्यावर एक वेगळाच सुनसान पण आलय. मी इकडचे तिकडचे निसर्ग डोळ्यांतून मनात पाझरवत पुन्हा स्कुटी चालू करतोय .
पुढच्या वळणावर एक म्हातारा रस्त्यावरची कडेची माती सारखी करतोय .....त्याच्या पुढे जाणारा रस्ता एक कमनीय बांध्याच्या स्त्री सारखा हलकेच लचका देत आपल्याच धुंदीत पुढे जातोय.
मी त्या रस्त्याच्या कमनीय बांध्यावरून हलकेच गाडी दामटत पुढच्या मार्गाला लागतोय. साधारण दोनेक किलोमीटर वर गड नदीवरचा आडारी पूल येतोय. त्या पुलाच्या उजव्या बाजूने एक बैलगाडी जाईल एवढा एक पायवाट वजा रस्ता आहे. गड नदीच्या समांतर तो चालत पुढे गावात जातोय. बाजूला नारळीची झाडे माझ्यातल्या फोटोग्राफरला आव्हान देत आहेत. आकाशातील लालिमा आता निळसर होऊ लागलाय. मी तिथे थोडेफार फोटो काढून माझे लक्ष पुलावर केंद्रित करतोय. रिकाम्या पुलाचे फोटो अगदीच कृत्रिम वाटताहेत …मी कोणी तरी येण्याची वाट बघतोय.
हा एकपदरी पूल खूप जुना असावा. मी लहानपणापासून ह्या पुलावरून प्रवास करतोय पण नेहमी यष्टी ने जात असल्यामुळे १० सेकंदही ह्याचे दर्शन नाही व्हायचे. पण जेवढे व्हायचे तेवढ्या वरूनच ह्या पुलाचे चित्र माझ्या मनावर खूप खोलवर कोरलेले आहे. नेहमी त्या पुलावरून जाताना मी त्याला प्रॉमिस करून जायचो....की कधीतरी निवांत पणे थांबून तुझे सौंदर्य बघेन. आज मी दिल्या वाचनाला जागून - तिथे थांबून ते चित्र डोळ्यात भरभरून साठवून घेतोय. अगदी जुना मित्र खूप वर्षांनी भेटल्यासारखा आनंद मला होतोय. मी त्या पुलाला मनातल्या मनात अलगद आलिंगन देतोय.
पूल आणि पुलावरून दिसणारे निसर्ग सौंदर्य मनसोक्त पिउन झाल्यावर आता मी ते माझ्या कॅमेरात बंदिस्त करून घेणार आहे. पण नुसत्या पुलाचे फोटो काढण्यात तेव्हढी मजा नाही येत आहे.
कोणी अलीकडून किंवा पल्याडवरून आले असते तर जर अजून चांगले झाले असते. माझे ते मागणे सुद्धा त्या पुलाने पूर्ण केले. एक सायकलवाला समोरून ट्रिंग ट्रिंग करत येताना दिसतोय आणि मी त्याच्या नकळत फटाफट त्याला कॅमेरामध्ये बंदिस्त करतोय.
======
मनसोक्त फिरून झाल्यावर मी पुनः घरी परतलोय....संध्याकाळच्या सूर्यास्ताची वाट बघत समुद्र किनारी पहुडलो आहे. मालवणच्या चिवला बीच वर वातावरण खूप चांगले आहे. भल्या पहाटे मासेमारी करायला गेलेल्या बोटी दुपारपासून किनाऱ्यावर येऊन नांगर टाकून विसावा घेत आहेत.
पश्चिमेला रॉक गार्डनच्या किनाऱ्यावर सूर्यदेव अस्ताला जात आहेत. जाता जाता सोनेरी किरणांचा शिडकावा सगळ्या आसमंतावर करून जात आहे. अलगद किनाऱ्यावर येऊन आदळणाऱ्या फेसाळणाऱ्या लाटांना पाहून माझा मुलगा भयंकर आनंदात आहे. येणाऱ्या लाटांवर उड्या मारत तो किनाऱ्यावर धावतोय. खूप कमी वेळात समुद्राला त्याने मित्र बनवलेय.
जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल, की तुम्ही आयुष्यात खूप काही कमावलंय...तुम्ही खूप मोठे झालात ....त्यावेळी फक्त समुद्र किनाऱ्यावर येऊन उभे राहायचे....तुम्ही किती क्षुद्र आणि नगण्य आहात ह्याची तुम्हाला जाणीव होईल
सूर्य पूर्ण अस्ताला जाई पर्यंत आम्ही सर्व पाण्यात मनसोक्त डुंबतोय....आठवणींचे बोचके ओले झाल्यामुळे जास्तच जड झालेय...
======
मनसोक्त फिरून झाल्यावर मी पुनः घरी परतलोय....संध्याकाळच्या सूर्यास्ताची वाट बघत समुद्र किनारी पहुडलो आहे. मालवणच्या चिवला बीच वर वातावरण खूप चांगले आहे. भल्या पहाटे मासेमारी करायला गेलेल्या बोटी दुपारपासून किनाऱ्यावर येऊन नांगर टाकून विसावा घेत आहेत.
पश्चिमेला रॉक गार्डनच्या किनाऱ्यावर सूर्यदेव अस्ताला जात आहेत. जाता जाता सोनेरी किरणांचा शिडकावा सगळ्या आसमंतावर करून जात आहे. अलगद किनाऱ्यावर येऊन आदळणाऱ्या फेसाळणाऱ्या लाटांना पाहून माझा मुलगा भयंकर आनंदात आहे. येणाऱ्या लाटांवर उड्या मारत तो किनाऱ्यावर धावतोय. खूप कमी वेळात समुद्राला त्याने मित्र बनवलेय.
जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल, की तुम्ही आयुष्यात खूप काही कमावलंय...तुम्ही खूप मोठे झालात ....त्यावेळी फक्त समुद्र किनाऱ्यावर येऊन उभे राहायचे....तुम्ही किती क्षुद्र आणि नगण्य आहात ह्याची तुम्हाला जाणीव होईल
सूर्य पूर्ण अस्ताला जाई पर्यंत आम्ही सर्व पाण्यात मनसोक्त डुंबतोय....आठवणींचे बोचके ओले झाल्यामुळे जास्तच जड झालेय...
======
4 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!