माझ्यासाठी एक सुवर्णयोग....

मागच्या शुक्रवारी ऑफिस च्या कामानिमित्त नाशिक सिक्युरिटी प्रेस ला भेट देण्याचा योग आला.  हा !!! मला विश्वासच नाही बसत आहे कि मी नाशिक सिक्युरिटी प्रेस ला भेट देऊन आलो आहे.  चेकबुक आणि प्रशासन खात्यात असल्यामुळे अनेक छोटे मोठे शेकडोंनी प्रिंटर आणि त्यांच्या कंपनी बघण्याचा योग आला आहे. पण नाशिक प्रेस बघणे म्हणजे आयुष्यातला एक मोठा सुवर्णयोगच होता. 

सरकारचे राजस्व विभाग (Department of Revenue) म्हणून एक खाते आहे. जे स्टॅम्प ड्युटी, फ्रॅंकिग, स्टॅम्प पेपर च्या संदर्भातील कामे बघते. ह्या खात्या अंतर्गत एक नवीन उपक्रम चालू होत आहे. आपल्याला जे करार करण्यासाठी लागणारे स्टॅम्प पेपर मिळतात. ते आता आपण न्यायालयातून किंवा रजिस्टर एजंट कडून घेतो. ते आता बँके तर्फे उपलब्ध करण्याचे विचार आहे. ते काम देशात फक्त दोनच बँकांना द्यायचे ठरले आहे सुदैवाने त्यात आमच्या बँकेला सुद्धा मिळण्याचे संकेत आहे. त्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आमच्या गव्हर्मेंट रिलेशन खात्यातल्या अधिकार्‍यांसोबत मिटींग होती. त्यात माझ्या बॉसला हि आमंत्रण आले होते. मिटींग नाशिकला होती. माझ्या बॉस ने स्पेशल परवानगी घेऊन मला हि येण्यास सांगितले. 

स्टॅम्प ड्युटी, स्टॅम्प पेपर, कोणते सेक्युरीटी मानदंड (security features) ठेवावे वगैरे  वर खूप सविस्तर चर्चा झाली. सुरक्षेच्या कारणास्तव मी ती इथे लिहू शकत नाही पण मला अगणित माहिती मिळाली. भ्रष्ट मंत्री असून हि आपले सरकार कसे चालते हा प्रश्न मला नेहमीचा पडायचा. ते ह्या मिटींग मध्ये समजले. खरच खूप शिकलेले,  देशाचा विचार करणारे, सरकार बरोबर सामान्य जनतेचा हि विचार करणारे खूप सारे अधिकारी इमानदारीने आपले काम पूर्ण करत असतात. खरच त्यांच्यामुळेच आपली अर्थव्यवस्था टिकून असते. अगदी तेलगी ने कसे घोटाळे केले? खोट्या नोटा कसे बनतात ? हे सुद्धा ह्या मिटींग मध्ये समजले. 

आमची मिटींग श्री चोखालिंगम ह्यांच्याबरोबर होती. श्री चोखालिंगम हे आयईएस अधिकारी आहेत. जे स्टॅम्प ड्युटी व रेवेन्यू खात्याचे उच्चतम अधिकारी आहेत. त्यांचे रिपोर्टिंग हे प्रत्यक्षपणे अर्थ खात्याला असते. त्यांच्या सारख्या एकदम उच्च अधिकाऱ्याशी भेटण्याचा योग आला. माझ्या बॉस च्या अनुभवानुसार सहसा आयपीएस अधिकारी हे अश्या छोट्या मोठ्या मिटींगला येत नाही आणि आले तर आपलेच बोलणे खरे करतात दुसऱ्याचे कधी ऐकतच नाही. पण श्री चोखलिंगम हे त्याला अपवाद होते. त्यांनी सर्वाशी ओळख तर करून घेतलीच पण सर्वांशी उत्तम रित्या संवाद हि साधला. त्यांची कल्पना काय आहे हे त्यांनी समजावून तर सांगितले पण त्याच्यावर आमचे विचार काय आहेत हे हि जाणून घेतले. खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण चर्चा झाली. एवढा मोठा अधिकारी पण त्याला जरासुद्धा गर्व नव्हता. 

दुसऱ्या एका अधिकाऱ्याबरोबर ओळख झाली ते म्हणजे श्री ताहिरी. हे "इंडिअन सेक्युरीटी प्रेस" चे जनरल मनेजर आहेत. "इंडिअन सेक्युरीटी प्रेस" (नाशिक प्रेस ) चे जनरल मनेजर पद भूषवणे म्हणजे खूप मोठे काम असते. जरा जरी चुकी झाली तर त्याचे परिणाम खूप भयंकर होऊ शकतात. नाशिक प्रेस मध्ये प्रवेश हा सहज सहजी मिळत नाही. आतमधल्या अधिकारीची ओळख आणि परवानगी शिवाय आत मध्ये प्रवेश मिळत नाही. इथल्या प्रवेशद्वारी साधी सेक्युरीटी नसते तर सरळ बंदुकधारी पोलीस आणि मिलिटरी असते. प्रवेश पास असल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. श्री तहिरी ह्यांच्यामुळे आम्हाला प्रवेशच नाही तर नाशिक प्रेस हि जवळून बघायला मिळाली.

आपल्या पोस्टाची तिकिटे कशी बनतात? पासपोर्ट कसा बनतो? पासपोर्ट ची नक्कल बनू नये म्हणून काय काय सुरक्षेचे उपाय करतात? किती वेगवेगळी उघड्या डोळ्यांनी न दिसणारी सुरक्षित वैशिष्ट्ये/मानदंड  (Security features) टाकतात हे सगळे जवळून बघायला मिळाले. सरकारी चेक कसे छापतात ते सुद्धा जवळून बघायला मिळाले. इथे तयार झालेला माल हा रेल्वे स्टेशन वर जात नाही तर रेल्वे ह्या प्रेस मध्ये येते. इंग्रजांच्या काळातले रेल्वे मार्ग अजून हि इथे वापरात आहेत. आम्ही ज्या युनिट मध्ये जाऊ तेथे जनरल मनेजर चे पाहुणे म्हणून सर्व उठून उभे राहत होते. सर्व प्रक्रिया/ कामे आम्हाला आवर्जून दाखवत होते. एक गोष्ट चांगली वाटली कि ८० टक्के हून जास्त लोक मराठी आहेत आणि वाईट अश्यासाठी वाटले कि त्यांच्यावर असणारे २० टक्के सुपरवायझर हे अमराठी आहेत. पण सर्व मिळून मिसळून काम करतात अगदी साऊथ इंडिअन लोकही मराठीतून बोलतात. 

प्रेस एवढी मोठी आहे कि फिरायला कमीत कमी २/३ तास लागतील पण एक तर तशी परवानगी नसते आणि आमची मिटींग पण लगेच होती त्यामुळे आम्हाला आमची धावती भेट अर्ध्या तासात उरकायला लागली. मोठ-मोठ्या बँकेच्या चेअरमन ला हि  प्रेस सहजासहजी बघायला मिळत नाही ती नशिबाने मला आणि माझ्या बॉस ला बघायला मिळाली.

ह्याच प्रेस च्या दुसऱ्या युनिट मध्ये आपल्या नोटा छापतात. पण त्या युनिट मध्ये जायला एक तर अर्थ खात्याची किंवा आरबीआय (RBI) ची पूर्व परवानगी लागते ती प्रेस तर अजून बघायला नाही मिळाली आहे. बघूया तो योग नशिबात कधी येतोय.

अर्थातच कुठेही फोटो काढायला परवानगी नसल्याने कुठलेच फोटो ब्लॉग वर लावू शकत नाही.

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top