गेल्या आठवड्यात माझ्या मुलाच्या पुस्तकांना
कव्हर घालताना माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. जून महिना आला की शाळेचे दप्तर,
नवीन वह्या, पुस्तके, गंबूट, छत्र्या, रेनकोट ह्यांची जमवाजमव सुरु व्हायची. जुने कापडी दप्तर चांगले असले तर तेच ह्या
वर्षी वापरायचे....एकदा दप्तर घेतले की कमीत कमी ३ वर्षे वापरायचे आणि जास्तीत जास्त दप्तर फाटून पुस्तके रस्त्यावर पडत नाही तो पर्यंत वापरले जायचे. ३ वर्षे टिकण्यासाठी
कापडी गोणपाटाचे दप्तर खाकी किंवा पोपटी रंगाचे घ्यायचे. आता सारखी फॅन्सी प्लास्टिक
ची दप्तरे त्यावेळेला होतीच कुठे. असली तरी ती घेण्याची ऐपत नसायची. वर्गात एखादाच
सुखवस्तू कुटुंबातला कोणी तरी तशी फॅन्सी दप्तरे आणायचा. गोणपटचे दप्तर एखादे वेळेस फाटले तर जाड दाभणीच्या सुईने शिवता यायचे....प्लास्टिकच्या दप्तरामध्ये तशी सोय नव्हती. त्यामुळे गोणपाटाचे दप्तर
सर्रास चालायचे.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सहसा शाळा चालू
झाल्या की एक आठवड्या नंतर शिक्षक पुस्तके आणली का विचारायचे... कधी कधी शाळेतून यादी सुद्धा मिळायची... कोणती पुस्तके आणायची आणि मग नाक्यावरच्या एखादं दुसऱ्या दुकानावर पुस्तके घ्यालाला
झुंबड उडायची...६० वॉटच्या ब्लब मध्ये सगळे पुस्तके घ्यायला
उभी असायचे. त्यात भरीस भर म्हणून आपल्या पाठ्य
पुस्तक मंडळाची दरवर्षी गोची असायची...कधी पुस्तके चुकीची छापली जायची...कधी कधी नागरिकशास्त्रची
पानेच इतिहासाच्या पुस्तकात बाइंडिंग केलेली नसायची.....तर कधी कधी पानांचा क्रम उलटसुलट
व्हायचा...कधी कधी तर जून काय....जुलै संपेपर्यंत काही पुस्तके छापखान्यातून बाहेरच आलेली
नसायची...हमखास एखादे दुसरे पुस्तक जुलै पर्यंत बाजारात आलेलेच नसायचे आणि ज्या दिवशी एखाद्याने
खबर आणली कि पुस्तक बाजारात /दुकानात आलंय की संध्याकाळी सर्व त्या दुकानावर तुटून पडायचे...त्यात
सुद्धा येणार स्टॉक अगदीच लिमिटेड असल्यामुळे जो पहिला येईल त्यालाच पुस्तक मिळायचे...आणि
वर्गात एखाद्या चंपक मुलाला ते पुस्तक आवर्जून मिळून जायचे...वर्गात मग त्या तासाला त्याच्या बाजूला बसण्याची
चढाओढ असायची...आणि ते बेणं सालं फुकटचा भाव खाऊन जायचे...
हि सगळी नाटके बघून माझे वडील पुस्तके घ्यायची
घाई नाही करायचे...जेव्हा हे सगळे तमाशे संपायचे तेव्हा एक निवांत संध्याकाळी मला घेऊन
त्या पुस्तकांच्या दुकानात घेऊन जायचे आणि सगळी पुस्तके घेऊन द्यायचे. सोबत वर्षभर लागणाऱ्या वह्या आणि त्यांना
घातली जाणारी कव्हर्स ...हि सगळी खरेदी एका दमात होऊन जायची... गर्दी कमी झाल्यामुळे
सगळी पुस्तके चांगली आहेत की नाही.....पाने क्रमात आहे की नाही... बाइंडिंग बरोबर आहे की नाही हे निवांत पणे
बघता यायची... मला ही-मॅन (He-Man), स्पायडर मॅन ची स्टिकर घ्यायची खूप इच्छा असायची पण वडील नेहमी
पारदर्शी प्लास्टिक कव्हरं (वेष्टण) घेत असत आणि त्यातून पुस्तके कुठली आहे ते सहज समजायचे मग स्टिकरची
गरज काय आहे हे पटवून द्यायचे....ही प्लॅस्टिकची कव्हरं, खाकी कव्हरं पेक्षा पंचवीस /पन्नास
पैशांनी जास्त असायची पण त्याला स्टिकर ची गरज नसायची आणि गोणपाटच्या दप्तरातून चुकून
भिजली तरी खराब नाही व्हायची. त्यामुळे वडिलांना पण तीच कव्हरं आवडायची.
पुस्तके सगळ्यात शेवटी घेण्यात आर्थिक बाजू
सुद्धा होती, ह्याचा उलगडा मला खूप वर्षांनी झाला...वडलांना साधारण महिन्याच्या तिसऱ्या
आठवड्यात २२ किंवा २३ तारखेला पुढच्या महिन्याचा पगारातील ३०% पगार ऍडव्हान्स मध्ये कंपनीतून विनंती केल्यावर मिळायचा...आणि त्या पुढच्या महिन्याच्या
पगारावर.....माझी ह्या महिन्यातली......वर्षभराची खरेदी व्हायची...सहाजिकच पुढच्या महिन्याचा
पगार काढल्यावर पुढच्या महिन्यात तंगी यायची..पण ती माझ्या पर्यंत पोचू ना देण्याचा
अभिनय आई वडिल चांगला करायचे. हि गोष्ट समजल्यापासून मी स्टिकर साठी कधी विचारलेच
नाही...
जस जसे थोडे मोठे होत गेलो आणि वह्या पुस्तके
सांभाळायची अक्कल येत गेली तस तसे मी पुस्तके सोडून वह्यांना कव्हरं घेण्याचे बंद केले... तेवढाच खर्च कमी म्हणून... पण माझ्या अंदाजाप्रमाणे सातवी होईपर्यंत त्यांनी वह्या
आणि पुस्तके दोघांना कव्हरं घेऊन आणि घालून दिली.
आठवी नंतर मी पुस्तकांना पण गरज नाही सांगून
हट्टाने कव्हरं घालायला बंद केली. एखादे महत्वाचे पुस्तक अथवा प्रयोगवहीलाच मागच्या
वर्षीच्या उरलेल्या प्लास्टिक मधले कव्हरं घालून घ्यायचो..
वर्गातले बव्हतांशी मुलांची तशीच परिस्थिती
असायची. बहुतांशी मुले कमी किंमतीचे खाकी कव्हरं घालायची...त्यात प्लास्टिक कोटेड खाकी
कव्हरं वाली पुस्तके जरा जास्त भाव खाऊन जायची. त्यांची किंमत हि थोडी जास्त असायची.
काहींची तीही घेण्याची ऐपत नसायची, ती मुले
रद्दीच्या वर्तमानपत्रांची कव्हर घालायची. ती बघून मी सुद्धा वडिलांना सुचवून पहिले
पण त्यांनी 'एवढी भीक नाही लागलीय अजून मला.....तुला शिकवायला
मी अजून समर्थ आहे' असे सुनावल्याचे लक्षात आहे...मी ही त्यानंतर
कधी त्यांचा अहंकार ह्या बाबतीत दुखावला नाही.
तशीच गत सेकंड हॅन्ड वापरलेल्या पुस्तकांच्या बाबतीत असायची... शाळेतील अर्ध्या हुन जास्त मुले सेकंड हॅन्ड पुस्तके जी अर्ध्यांकिमतीत मिळायची
ती वापरायचे. त्यात सुद्धा पुठ्ठयाची बाइंडिंग असलेल्या पुस्तकांना ७० टक्के खरेदी किंमत हि मिळायची....हि पुस्तके शेवटपर्यंत टिकायची
आणि परत पुढच्या वर्षी परत विकतासुद्धा यायची... मागच्या अनुभवानुसार मी ह्यावेळेला वडिलांना न विचारता आईला विचारले. तिने तुझ्या बापाला आवडणार नाही असे सांगून तो
प्रस्तावही धुडकावून लावला. नंतर बहुधा पाचवी
किंवा सहावी पासून नवीन अभ्यासक्रमच चालू झाल्यामुळ दरवर्षीे नवीन पुस्तके घेणे क्रमप्राप्तच
झाले त्या मुळे हा विषय तिथेच संपला.
ही प्लास्टिक कव्हरं घालायची पण वडिलांची एक
विशेष पध्द्त होती. बाकीच्या मुलांची कव्हरं निघून जायची अथवा सेलोटेप निघाली कि कव्हरं
उघडायची. पण वडिलांची कव्हरं आंतरबद्ध (interlocked) असायची. एखादेवेळेस सेलोटेप निघाली तरी कव्हर
कधी निघायची नाही. पुढे पुढे मीही त्यांच्या बरोबर बसून कव्हर घालायला मदत करायचो.
त्यांच्या इतकी स्पेशालिटी यायला खूप वर्षे जावी लागली. त्यावेळेला जवळपास २० वह्या पुस्तकांना कव्हर घालायला 3 तास जायचा.
वडील कामावरून आले की पुस्तकांना कव्हर घालून
द्यायचे पावसाळा चालू झालेला असल्याने हमखास संध्याकाळी लाईट जायची आणि वडील मग मेणबत्तीच्या प्रकाशात बसून कव्हरं घालताना अजूनही डोळ्यासमोर येतात. लाईट गेल्यामुळे घामाघूम होत कव्हरं घालत असायचे. लाईट असली तरी पंखा न लावता कव्हरं घालावी लागायची कारण वाऱ्याने
पातळ कव्हर आणि पुस्तकाची पाने सारखी उडत राहायची. त्यामुळे दोन तीन तास घामाघूम होत
कव्हरं घालत बसण्याशिवाय त्यांना पर्याय नसायचा.
आज जवळपास 30 वर्षे होत आली साधने बदलली.... पुस्तके बदलली... अभ्यासक्रम बदलला....पण मानवी भावभावनांचा
खेळ, आवड ही पिढी दर पिढी बहुतेक तशीच रहाते. कदाचित एका पिढीच्या जनुकांमधून मधून दुसऱ्या
पिढीत स्थलांतरित होत राहते. साधे प्लास्टिक कव्हरचे उदाहरण घ्या. माझी आणि वडिलांची आवड तीच आहे. उद्या कदाचित माझ्या
मुलाची पण तीच आवड असेल. कदाचित मुलाच्या वेळी छापील पुस्तकेच नसतील. किंडले आणि टॅब
वरच सगळा अभ्यासक्रम येईल.
पण त्या पुस्तकांना कव्हरं घालताना मनात असलेल्या
सुप्त इच्छा तश्याच असतील. त्यावेळी एक बाप मुलाच्या पुस्तकाचे कव्हर घालायचा आता पण
एक बाप तेच करतोय. मनात तीच आकांक्षा बाळगून कि मुलाने उपलब्ध साधनांचा उपयोग
करून जास्तीत जास्त चांगला अभ्यास करून आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि स्वतःचे
भले करावे. उद्या माझा मुलगा बाप झाल्यावर सुद्धा त्याचीही हीच अपेक्षा असेल त्याच्या
मुलाकडून.
आज माझ्या मुलाच्या सिनिअर केजीच्या सुद्धा
जवळपास 21 वह्या पुस्तके आहेत. ह्या वयाच्या मानाने
खूपच जास्त आहेत असे उगाच वाटले. पण त्यांना कव्हरं घालता घालता आणि जुन्या आठवणी काढता काढता तीन तास कसे निघून गेले समजलेचं नाही....त्या पुस्तकांच्या कव्हरांच्या निमित्ताने माझे मन जुन्या चाळीच्या घरात मनसोक्त भरकटून आले.. आज ती चाळ जरी अस्तित्वात नसली तरी मनाच्या कांगोऱ्यातले त्या चाळीचे अस्तित्व ह्या अश्या आठवणींच्या जोरावर असेच शाबूत राहील. आज माझ्या मुलाच्या पुस्तकांना कव्हर घालताना ह्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर तरळून गेल्या...चाळीच्या १० बाय १० च्या खोलीत माझे वडील कव्हरं घालताना मी जशी मध्ये मध्ये लुडबुड करायचो तशीच लुडबुड आज माझा मुलगा मी कव्हरं घालताना करतोय... सगळे तसेच आहे...एका बापाची जागा दुसऱ्या बापाने घेतली आहे.....खरंच सगळे तसेच आहे...
हां !!! एक बदल नक्की झाला होता.... माझे वडिल त्या वेळी घामाघूम होत कव्हरं घालत होते....मी एसी लावून थंड डोक्याने कव्हरं घातली...
0 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!