अलिबागचा किनारा

मागच्या एप्रिल महिन्यात शनिवार रविवार जोडून आले होते. खूप दिवस मित्रांचे प्लानिंग चालू होते. विकेंड साठी कुठे तरी जायचे. दोन दिवसात फिरता येण्यासारखे कोणते स्पॉट आहेत ते शोधणे चालू होते. सिल्वासा, जव्हार, तिथल, माथेरान, अलिबाग, मुरुड जंजिरा सारखे अनेक पर्यायांवर मेलबाजी चालू होती. फायनली मुरुड जंजिरा ठरत आले. असे तसे बीच वर जाऊन फिरण्यापेक्षा एक ऐतिहासिक स्पॉट करावा असे ठरले. जंजिराचा किल्याबाबत खूप ऐकून होतो. तो अजून बघायला मिळाला नव्हता. त्यामुळे तोच फायनल केला. दरवेळेसारखे उडाणटप्पू सारखे ठरले कि उचला बॅगा आणि चला फिरायला असे नव्हते. आता लग्न झालेले होते आणि प्रत्येकाच्या बायका सोबत येणार होत्या त्यामुळे रहायचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत निघता येणार नव्हते. अगदी शेवटच्या दिवशीपर्यंत रहायचा बंदोबस्त होत नव्हता.

पिकनिक जवळपास रद्द झाल्यामध्येच जमा होती. नेट वरून सगळे हॉटेल शोधून झाले. मित्रांचे, त्यांच्या मित्रांचे  बंगले शोधून झाले पण काहीच रिकामे नव्हते. मोठा विकेंड आल्यामुळे सर्वच  बाहेर पडले होते. त्यामुळे सर्व हॉटेल बुकिंग आधीच फुल झाली होती. मुरुड मध्ये जागा नव्हती, काशीद चे सर्व हॉटेल्स बुक्ड होते, अलिबाग पण फुल्ल होते. 

अगदी शेवटच्या क्षणाला ऑफिस मधून निघताना एका हॉटेल मीरा माधव -अलिबाग- ची साईट भेटली. तिथे फोन करून विचारले तर तिने सांगितले रुम्स उपलब्ध आहेत. तीन कपल असल्यामुळे तीन रूमची गरज होती. तिथे भेटल्या, रूमचे भाडे पण रीजनेबल होते. लगेच बुकिंग करून टाकली सगळी फोनाफोनी परत चालू झाली सर्वाना तयार व्हायला सांगितले. आता गाडीची अडचण होती ती पण मिळाली. बुक करून टाकली. 

दुसऱ्या दिवशी उन्ह लागायच्या आधी आणि ट्राफिक जमा व्हायच्या आधी निघायचे ठरवले. सकाळी सहा चे प्लानिंग ठरले. पण निघायच्या आधीच गाडीचा टायर पंक्चर झाला. दोन तास गेले. सकाळी आठ वाजेपर्यंत ठाण्यातच होतो. शेवटी साडे आठला ठाणे बेलापूर रोड ला लागलो. भूक लागली होती नाश्ता करायचा होता.  हॉटेल कर्नाळा आठवले. मागे कर्नाळा ट्रेक ला गेलो होतो तेव्हा तिथे भरपेट नाश्ता केला होता. तेथला नाश्ता परत करायची इच्छा झाली. तसे अलिबागला पण तेथूनच जायचे होते. मग गाडी त्याच रोड ला काढायला सांगितली. 


स्पेशल थाळी
हॉटेल कर्नाळा मध्ये मिसळ पाव, वडा सांबर, कोकम सरबत, वडा उसळ वर चांगला ताव मारला आणि तेथून पुढच्या प्रवासाला निघालो. पनवेलला वडखळ नाक्याला थोडे ट्राफिक जमा होत होते पण निसटलो आणि सरळ अलिबाग रोडला लागलो.

दुपार पर्यंत अलिबाग ला पोहचलो. हॉटेल मीरा माधव मध्ये चेक इन केले. फ्रेश झालो. हॉटेल जसे फोटो मध्ये बघितले होते तसे नव्हते. खूप अस्वच्छ होते. टॉयलेट , बाथरूम तर खूप अस्वच्छ होते. रूम मधली लादी पण कित्येक दिवस पुसली असेल असे वाटत नव्हते. फक्त बेड चांगला होता आणि एसी चालू कंडीशन मध्ये असल्यामुळे एसी ची हवा चांगली होती. त्यामुळे त्या रूम मध्ये राहवले. (हॉटेल ला पाच पैकी दोन मार्क्स)

फ्रेश होऊन बाहेर पडलो आधी भरपेट जेवण केले . मग किल्ल्यावर जायचे ठरवले पण उशीर झाला होता विचार केला कि बोटी सहा नंतर बंद होतात मग खूप घाई होईल. म्हणून किल्ल्यावर दुसऱ्या दिवशी जायचे ठरले. मग जवळपासचे स्पॉट करून यायचे ठरले. जेवण झाल्यावर बिर्ला मंदिर ला जायचे ठरले.


बिर्ला मंदिराचे प्रवेशद्वार

अलिबाग वरून रोहा रोड ला जाताना मध्ये बिर्ला मंदिर लागते. तेथे गेलो तर मंदिर अजून उघडले नव्हते. चार वाजता उघडणार होते. बाहेरून देवांचे दर्शन घेतले. साडे चार पर्यंत वाट बघितली पण मंदिर काही उघडले नाही. मग तेथून परत निघालो. फोटोग्राफी करायला परमिशन नव्हती त्यामुळे एवढ्या चांगल्या मंदिराचे फोटोच नाही काढता आले.


तिथून परतीच्या प्रवासाला लागलो. संध्याकाळ होत आली होती विचार केला सूर्यास्त बीच वर जाऊन बघायचा. बिर्ला मंदिराकडून अलिबाग रस्त्याला जाताना नागांव बीच लागते. अलिबाग बीच पेक्षा हे बीच जरा स्वच्छ आहे.येथे बोट रायडिंग वगैरे पर्याय पण उपलब्ध आहेत. इथे बीच वर असलेल्या छोट्या टपरीवर चहा प्यायलो. एका ठिकाणी जास्त गर्दी दिसली म्हणून बघायला गेलो तर तेथे बैलगाड्यांची शर्यत लागली होती. नंतर समजले कि शर्यत बुधवारी होणार होती त्याचा सराव चालू होता. पण त्यामध्ये बैलांची खूप हालत होत होती. बैलांना चाबूक मारून पळवत होते आणी थांबवायच्या वेळेला अगदी वेसन जोरात खेचून थांबवत होते. त्यामुळे बैलांच्या नाकातून पण रक्त येत होते. तेथे शुटींग केली आणि बीच वर निघालो. (हा विडीओ सर्वात शेवटी लावला आहे)




नारळांची आरास
बैलगाडी 
बैलगाडीची शर्यतीचा सराव
पाण्याला चांगला जोर होता. बीच वर धम्माल केली आणि परत हॉटेल वर आलो. अलिबाग ला तसा तीन चार वेळेला जाऊन आलो होतो. पण मला अलिबाग कधी चांगला नाही वाटला. कदाचित फक्त बीच वर जाऊनच परत यायचो आणि आतमध्ये कधी फिरलो नव्हतो म्हणून वाटले असेल. पण ह्या वेळेला कदाचित जास्त आत मध्ये फिरलो आणि बघण्याचा नजरिया बदलला होता. त्यामुळे अलिबाग ह्या वेळेला खूप आवडले. खासकरून तेथे असलेले जुने आणि वापरात असलेले मोठे मोठे वाडे आवडले. मला अश्या सागाच्या लाकडात बनवलेले वाडे खूप आवडतात. काही वाडे पडीक झाले होते तर काही अजूनही वापरात असल्यामुळे चांगल्या स्थितीत होते. त्याकाळी ह्या वाड्यांनी चांगले दिवस बघितले असतील. चांगले ऐश्वर्यात राहिले असतील. आता वापर नसल्यामुळे वाळवी लागून बहुतांशी वाड्यांची पडझड झाली होती.

माझ्या छोट्या कॅमेरातून चंद्राचा फोटो काढायचा केलेला प्रयत्न
आम्ही दोघे

ह्या वेळेला अलिबाग आवडला ते अजून एका कारणासाठी ते म्हणजे तिथे असलेल्या मंदिरांसाठी. अगदी स्वातंत्रपुर्व काळातील मंदिरापासून ते आता काही वर्षापूर्वी बांधलेल्या मंदिरांपर्यंत. खूप छान छान मंदिर आहेत. काही मंदिरांची बाहेरून पडझड झाली आहेत. पण आत अजून ही पूजा होत असते. अगदी अर्ध्या किलोमीटरवर एक मंदिर असेल. एवढी मंदिर तेथे आहेत. सगळ्या मंदिरात जाणे जमणार नव्हते पण बाहेरून जाताना जेवढी चांगली वाटली तेवद्यांचे फोटो काढले तर काही मंदिरांचे आत जाऊन दर्शन घेतले. पुढच्या वेळेला नक्की अलिबाग ला जाईन ते फक्त तेथील जुने वाडे बघण्यासाठी आणि सर्व मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी. (अलीबागचे वाडे आणि मंदिरांचे फोटो वेगळ्या ब्लॉग मध्ये टाकणार आहे)

रात्री अलिबाग बस स्टँड समोरच असलेल्या हॉटेल फुलोरा मध्ये जेवलो. एका कोंबडीला आणि दोन सुरमई माशांना ढगात पाठवले आणि सर्व पोटभर जेवलो. रात्री एक अलिबाग बाजारपेठेत राउंड मारला आणि गप् जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजताच उठून फिरायला जायचे ठरवले होते.
चिकन लोलीपोप

बटर चिकन

सुरमई फ्राय

दुसऱ्या दिवशी सहाला नाही पण सात पर्यंत तरी रुमवरून बाहेर पडलो. अलिबागचा बीच हॉटेल पासून जवळच होता. चालत चालत गप्पा मारत बीच वर पोहोचलो. सकाळ असल्याने गर्दी कमी होती. तरी काही उत्साही ग्रुप पाण्यात दिसत होते. भरतीची वेळ असल्याने किनाऱ्यावर एक पोलीस उभा राहून सर्वांकडे लक्ष ठेवून होता. समोरच कुलाबा किल्ला होता. पण वेळ कमी असल्यामुळे तेथे जाता आले नाही. सगळ टेन्शन विसरून शांतपाने अर्धा तास बसून राहिलो.

नाश्ता करून साडे दहा पर्यंत अलिबाग सोडले आणि मुरुडला निघालो. वाटेत एक दोन मंदिरांचे दर्शन घेत दुपारी अडीच पर्यंत जंजिरा किनाऱ्याला पोहोचलो. अजिंक्य असा जंजिरा पाहून डोळ्याचे पारणेच फिटले. त्या किल्ल्याचे वर्णन करायला एक अख्खा ब्लॉगच लिहावा लागेल.
अलिबागचा किनारा

आवळ्याचे झाड



वळू

कच्च्या कैऱ्या

डोंगरे हॉल

नगरपरिषद

नगरपरिषदेवर असलेला टिळकांचा पुतळा

इंग्रज कालीन इमारती

अलिबाग चा किनारा 

कुलाबा किल्ला 

कुलाबा किल्ला







रेवदंडा खाडीतून दिसणारा कोरलाई किल्ला

बैलांच्या शर्यतीचा सराव



पुढील पोस्ट मध्ये जंजिरा किल्ल्याचे फोटो नक्की पहा. लवकरच टाकेन 










CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top