नव्या नावाने ....


नावात काय आहे ? असे खूप जण म्हणत असले तरी माझ्या अनुभवानुसार नावातच सर्व काही आहे. एक नाव पुरेसे असते खूप काही गोष्टींचा उलगडा करण्यासाठी. त्यामुळे ब्लॉग ला एक चांगले नाव असावे हि खूप दिवसापासून इच्छा होती. आशिष सावंत हे नाव किती दिवस लोकांच्या लक्षात राहील? स्वत:च्या नावावर ब्लॉग लिहायला असेहि आवडतच नव्हते. काहीतरी एक युनिक नाव शोधणे चालू होते. 
माझा आताचा ब्लॉग चालू करून दोन/ सव्वा दोन वर्षे झाली. जानेवारी २००९ मध्ये ब्लॉग लिहायला सुरुवात झाली पण दीड वर्षात फक्त ३/४च ब्लॉग लिहून झाले. ह्या दीड वर्षात आयुष्यात खूप स्थित्यंतरे झाले. आयुष्याचे मोठ मोठे आणि काही कडवे निर्णय पण घ्यावे लागले. खूप काही मोठे व्यवहार एकट्यालाच करावे लागले. ह्याच काळात दोन मोठे अपघातहि झाले. सुदैवाने दोन्ही अपघातातून वाचलो. त्याच्या जखमा आणि दुखणे अजून ही अंगावर आहे. आतापर्यंतचा आयुष्यातला सर्वात कठीण आणि खडतर काळ होता. त्या झटक्यातून सावरायला कमीत कमी पुढची ८/९ महिने तरी जावी लागली. ह्या काळात हातून काहीच निर्मिती झाली नाही. अगदी महिनोन महिने इंटरनेटला हात पण लावता आला नाही. जमेची बाजू एकची की नशिबाने आणि परिस्थितीने एवढे अनुभव दिले कि मॅच्युरिटी लेवल जवळपास दहा वर्षांनी वाढली. 

ashish sawant stuffजरा गाडी रुळावर आल्यावर सर्वात आधी लॅपटॉप घेतला अगदी टीवी घेण्याआधी सुद्धा. इंटरनेट घेतले आणि परत ब्लॉगिंग ला सुरुवात झाली. जुन्या ब्लॉगवरुनच गाडी पुढे चालायला लागली. पण स्वत:च्या नावाने ब्लॉग बनवण्यापेक्षा काहीतरी युनिक असे नाव शोधत होतो. पण मनासाखे मिळतच नव्हते. एक छोटे, उच्चारायला सोपे, टाइप करायला सहज असणारे नाव शोधत होतो. काही नावे आवडली पण काही महाभागांनी आधिच अडकवुन ठेवली होती. ब्लॉग तर काही लिहिले नव्हते फक्त नावे बुक्ड करुन ठेवली होती. अगदी “बुक्ड” (booked) नाव सुद्धा. बघा चेक करुन. जवळपास ३ महिन्यात पत्नि, बहिण आणि मित्रांनी हजारो नावे तरी सुचवली असतील पण काहीच पसंत पडत नव्हते. काही दिवसापूर्वी एका शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी मराठी डिक्शनरी उघडली होती. तेव्हा सुचले कि डिक्शनरीच काढून बघूया काही नावे भेटताहेत का ? साडेचारशे पानाची डिक्शनरी, त्यात शोधून शोधून कसे शोधणार? शेवटी एक चान्स घ्यायचा म्हणून कुठल्यातरी एका पानावर हात ठेवायचा आणि त्यात काही नाव दिसते का बघायचे असे ठरवले आणि लहान मुले करतात तसे राम लक्ष्मण सीता करत एका पानावर हात ठेवला. पान निघाले "भ" ह्या अक्षराचे. 


म्ह्टले झाले कल्याण !!! आता काही मिळत नाही. पण नजर एका शब्दावर जाऊन थांबली आणि मन एकदम फिल्मी स्टाईलमध्ये वीस वर्षे फ्लॅशबॅक मध्ये गेले. लहानपणी हि वस्तू घेऊन खूप खेळलो होतो. एप्रिल मेच्या सुट्टीत तर खिशात घेऊनच फिरायचो. जमिनीवर असो, हातावर असो, पोटावर असो कुठेही फिरवता यायची हि वस्तू. लोखंडी कानस वर धार करून तिचे टोक अजून टोकेरी करायचो जेणेकरून तो जास्त वेळ फिरेल आणि खेळताना सुद्धा दुसर्‍याच्या वस्तू वर नेम धरून मारता पण येईल. त्यावेळेला लाकडामध्ये सुंदर रंगकाम केलेलं मिळायचे आणि काही ठिकाणी प्लास्टिकचे पण मिळायला सुरुवात झाली होती. पण लाकडाचे सौंदर्य कायम राहिले. त्यासाठी लागणार्‍या रश्शीला एखादा थमसअप किंवा पेप्सीचा बिल्ला लावायचा आणि अख्ख्या चाळी मध्ये फिरवत राहायचो. ह्या वस्तूने कमीत कमी खर्चात आतापर्यंत फक्त आनंदच दिला आहे ते सुद्धा बदल्यात काही न मागता. मी कुठल्या वस्तूबद्दल म्हणतोय ह्याचा अंदाज आला असेल एव्हाना. नुसत्या 'त्या' शब्दावर माझ्या एवढ्या वीस वर्षापूर्वीच्या आठवणी चाळवल्या गेल्या अगदी ढवळल्या गेल्या.....विचार केला कि ह्या पेक्षा चांगले नाव भेटनारच नाही....." भोवरा "

भोवरा ह्या शब्दाबरोबर कितीतरी जणांच्या गोड आठवणी असतील ना ?

सुदैवाने ब्लॉग कोणी रजिस्टर पण केला नव्हता. पहिले बायक़ोला फोन केला, तिला विचार सांगितले ...तिने हुश्श्य केले....म्हणाली, एकदाचे तुझ्या पसंतीचे नाव भेटले तुला. आणि ते सुद्धा आम्ही सुचवण्यापेक्षा तुलाच सुचले आहे ते नशीब. मित्रांना पाठवले त्यांनीही सहमती दर्शवली. जिगर ला सांगितले, माझ्या स्वभावाला आणि भोवर्‍याला साधर्म्य होईल अशी एक चारोळी लिहून दे गुजराती असून हि त्याने पाच मिनिटात मराठीत दोन तीन चारोळ्या लिहून पाठवल्या. त्यात व्याकरणाचे बदल करत हि चारोळी फायनल केली. (जिगर ला धन्यवाद देवून शिवी देणार नाही.) 

आपल्याच धुंदीत फिरतोय मी,
मदमस्त होऊन जगतोय मी,
बेधुंद वाऱ्यातही स्थिर आहे मी,
दुनिया म्हणते की भोवरा आहे मी.

मग काय ! त्या रात्रीच लगेच ब्लॉग रजिस्टर केला. जुना ब्लॉग सर्व पोस्ट सहित एक्सपोर्ट केला आणि नवीन ब्लॉग मध्ये इम्पोर्ट केला. १८ ते २० मिनिटे लागली. पण सर्व सुरळीत पार पडले अगदी काही एरर(error) न येता. काही विजेट आणि स्क्रिप्ट कॉपी पेस्ट झाल्या नाही त्या मॅन्युअली कराव्या लागल्या. बाकी सगळे झाले. पण तरी सुद्धा ब्लॉग पब्लिश करायला दोन आठवडे वाट बघावी लागली कारण हेडर मध्ये लावायला भोवर्‍याचा चांगला फोटो मिळत नव्हता. 

जे उपलब्ध होते ते कॉपीराईट होते. विचार केला स्वत:च भोवर्‍याचा फोटो काढून ब्लॉग वर टाकावा. घरात जुने भोवरे होते पण शोधून काहि मिळत नव्हते. कितीतरी दुकाने पालथी घातली पण लाकडी भोवरे मिळणेच बंद झाले. सर्वांकडे प्लास्टिक मधले होते. ते सुद्धा खास नव्हते. एक मे ला, महाराष्ट्र दिनी ब्लॉग पब्लिश करायचा विचार होता पण जमलेच नाही. शेवटी काल कसेही करून नेट वर मिळालेल्या इमेज एडीट करून दोन तीन हेडर इमेज बनवल्या. मित्रांमध्ये इमेलबाजी केली आणि सर्वांनी त्यातल्या त्यात ह्या हेडरला पसंती दर्शवली. इमेज लावून झाली आता पब्लीश कधी करायचा...कालच करणार होतो पण नंतर आठवले कि उद्या अक्षयतृतीया आहे चांगला मुहूर्त आहे. चांगल्या दिवशीच उदघाटन करूया. 

आज चांगल्या मुहूर्तावर उद्घाटन करतोय. ह्या सोहळ्याला सध्या तरी मी आणि माझी बायकोच उपस्थित आहे. आणि अर्थातच सर्व हितचिंतकांचा पाठींबा आहेच. जसा आतापर्यंत मिळाला आहे तसाच पुढेही मिळेल हि सदिच्छा. आशा करतो कि माझा भोवरा ह्या ब्लॉग च्या अनोख्या दुनियेत कायम फिरत राहील. मराठी मंडळी, मराठी ब्लॉग विश्व, मराठी कॉर्नर, मराठी ब्लॉग जगत यांच्या मुळे जुन्या ब्लॉगला चांगले वाचक मिळाले त्याचं आणि त्यांच्या टीमचे आभार. माझा नवीन भोवरा ब्लॉग सुद्धा ते आपल्या परिवारात सामील करून घेतील अशी आशा करतो. जुना ब्लॉग आता फक्त इंग्लिश ब्लॉग लिहायला वापरेन. 
bhovra blog

वाईट एका गोष्टीचे वाटते कि जुन्या ब्लॉगला गेल्या चार महिन्यातच ६००० च्या वर भेटी मिळाल्या होत्य़ा (ते सुद्धा स्वत:चे पेज विजिट ब्लॉक करून) त्यावर आता पाणी सोडावे लागणार आहे. परत शुन्यातुन सुरुवात करायची आहे....आयुष्यात खूप वेळा करावी लागली आहे अशी....बघू परत सहा हजार करायला किती महिने लागताहेत.


तुमचा पाठिंबा मिळेल अशी आशा आहे एकदा तरी नक्की भेट दया माझ्या नवीन ब्लॉगला...


भोवरा
http://bhovra.blogspot.com/


bhovraheader
भोवरा


CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top