ये पब्लिक सब जानती है !!

आपल्या राजकारणी लोकांची एक मनोधारणा असते कि पब्लिक मेमरी ही शॉर्ट टर्म मेमरी असते. म्हणजेच भारतीय पब्लिक सर्व गोष्टी लवकर विसरतात आणि पुढच्या निवडणुका येईपर्यंत तर सर्व मेमरी लेवल अगदी सपाट झालेली असते. त्यामुळे आता पर्यंत तुम्ही कितीही भ्रष्टाचार, घोटाळे, चुका, गुंडागर्दी करा पण पुढचे निवडणुका येई पर्यंत ह्या पब्लिक समोर कुत्र्याला फेकतात तसे काही सुधारणांचे तुकडे टाकले, थोडी फार नोटांची बंडले टाकली, येण्याजाण्याचे रस्ते बनवले, नळाला अर्धा तास ऐवजी २ तास पाणी पुरवले कि पब्लिक सर्व विसरते अशी एक सर्वसाधारण समज आपल्या राजकारणी लोकांची झाली आहे. 

त्यात त्यांचे काय चुकतेय म्हणा आपण जनताच त्याला जवाबदार असतो. आपण पक्षनिष्ठ  न राहता व्यक्तिनिष्ठ राहतो. आपल्याला आवडणारा एखादा नेता एखाद्या पक्षामधून वर्षोन वर्षे निवडून येतोय आणि अचानक काही वादामुळे तो उद्या दुसऱ्या पक्षामध्ये जातो आणि येणाऱ्या निवडणुकीत तो परत नवीन पक्षाचा झेंडा घेऊन निवडून येतो. आपण येथे पक्षाची शिकवण, नियम बघत नाही. एवढे वर्षे तो नेता जुन्या पक्षाच्या नियमामध्ये, शिस्तीमध्ये राहून चांगली कार्ये करत असतो, त्यामुळेच आपण त्याला निवडून आणत असतो पण आपण समजतो की तो नेता चांगला आहे त्याने ही सर्व विकासकामे केली आहेत त्यामुळे तो जर दुसऱ्या पक्षात जाणार असेल तरी आपण त्यालाच निवडून आणले पाहिजे भले मग तो पक्ष कितीही बेकार असला, किंवा आपल्या विचारांशी सहमत नसला, किंवा अगदी दहशतवादाला पुरस्कृत करणारा असला तरी सुद्धा आपल्याला काही फरक नाही पडत. आपण त्यालाच निवडून आणतो. त्यामुळेच दर वेळेला त्रिशंकू सरकार ठरलेलेच असते.
(अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच नेते चांगले असतात जे आपल्या पक्षाशी इमानदार असतात आणि काही कारणास्तव आपला पक्ष सोडवा लागला तरी त्यांचे उद्दिष्ट्य समाजसेवाच हेच असते. पण असे नेते विरळाच !) व्यक्तिनिष्ठ राहण्याची आपली मनोवृत्ती कधी बदलणार आहे कोण जाणे? 

पण बहुतेक आता शिकलेला समाज विचार करू लागला आहे. त्याला घोटाळे, भ्रष्टाचार ह्यांचा अर्थ समजू लागला आहे. त्याचेच उदहारण म्हणजे बंगाल आणि तामिळनाडू मध्ये झालेल्या निवडणुका. तामिळनाडू मध्ये करुणानिधी हे सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व. गेले कित्येक वर्षे त्यांनी आपल्या राज्यातून केंद्रातल्या सरकारची  पण सूत्रे फिरवली आहेत पण २ जी घोटाळा झाला आणि त्यांच्या लोकप्रियतेला घरघर लागली. आश्चर्य म्हणजे त्यांनी एका शब्दानेही ए राजा ला किंवा त्यांच्या मुलीला, नातेवाईकांना किंवा संबंधित नेत्यांना दोषी धरले नाही किंवा त्यांची पक्षातून हकालपट्टी केली नाही उलट त्यांच्या विरुद्ध केलेली कारवाई मागे घेण्यास पंतप्रधानांवर दबाव आणला. दिवसरात्र डोळ्यांवर चढवलेल्या गॉगल मुळे त्यांना खरे खोटे करताच आले नाही. कदाचित हीच त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक असावी. जयललिता किंवा त्यांच्या सदस्यांनी निवडणुकीच्या प्रचारात एका शब्दानेही २ जी घोटाळ्याचे राजकारण केले नाही ही गोष्ट आश्चर्यचकित करणारी होती. जयललिता सारखी राजकारणी, जीने आतापर्यंत करुणानिधीच्या छोट्या छोट्या चुकांचे राजकारण केले तिने चक्क ह्या वेळेला २ जी घोटाळ्याकडे दुर्लक्ष केले. तिच्या प्रचारात एकदाही ह्याचा उल्लेख आला नाही. ही गोष्ट जरा खटकली.

पण लोकांना समजत नाही असे नाही. लोकांना समजण्यासाठी राजकारणी लोकांनी सांगण्याची गरज नाही. तमिळनाडू मधल्या समाजातील अगदी लहान घटकापासून मोठ्या घटकांपर्यंत सर्वाना २ जी घोटाळा माहित झाला होता. भले त्यातल्या तांत्रिक बाबी माहित नसतील पण एक देशात एक मोठा घोटाळा झाला आहे आणि तो तामिळनाडू मधील राज्याकर्त्यान्मुळे झाला आहे एवढे तरी नक्कीच समाजात होते. माझ्या चेन्नई ऑफिस मधल्या एका कलिगला काही दिवसापूर्वी कामानिमित्त फोन केला असता हा विषय निघाला त्यावेळेला तर ए. राजा बद्दल असलेला राग त्याच्या बोलण्यातून जाणवला. त्याने आतापर्यंत कधीच मतदान केले नव्हते पण तो रागाने ह्या वेळेला करुनानिधीच्या पक्षाविरुद्ध मतदान करायला जाणार होता. तो सांगत होता २ जी बद्दल इथले राजकारणी काहीच बोलत नाही आहे पण आम्हाला समजत नाही का? अरे आमच्या ऑफिस मध्ये झाडू मारणाऱ्या मुलाला ही माहित आहे कि ए राजा ने किती मोठा घोटाळा केला आहे.


तेथील सर्वांची एकच मनोधारणा झाली आहे कि राजा ने देशातील सर्वात मोठा घोटाळा केला आणि राजा हा तामिळनाडूचा आहे आणि त्याने तामिळनाडूचे नाव खराब केले आहे, हीच गोष्ट त्यांना जास्त खुपते आहे. त्यामुळे सर्व जनतेने ठरवले होते कि ह्या वेळेला करुनानिधीला बाय बाय करायचे मग दुसरा पर्याय काय तर जयललीता !

तीच गोष्ट बंगाल ची, तेथे ज्या सुधारणा झाल्या त्या फक्त शेतीतच झाल्या उद्योगधंदे वाढलेच नाही. जे काही उद्योगधंदे होते त्यांच्या मालकांना आणि मॅनेजमेंटला तेथील कम्युनिस्ट वाल्यांनी हैराण करून सोडले. काही कारखाने बंद पडले तर काहींनी आपला गाशा गुंडाळून दुसऱ्या राज्यात बस्तान बांधले. जेव्हा तेथील तरुण पिढीला काही नोकरीधंदाच उरला नाही. तेव्हा त्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली आणि सरकारला जाग आली. मग टाटांचे नॅनो गाडीचे सिंगूर सारखे प्रकल्प उभे राहायला सुरुवात झाली पण कारखान्याला लागणारी जागा ही शेतीची उपजावू जमीन बळकावून टाटांना देण्यात आली ती सुद्धा अगदी कमी भावात काही ठिकाणी तर अगदी एकर मागे एक रुपयात जागा देण्यात आली. साहजिकच तेथील शेतकरी लोकांच्या मनात धुसपूस चालू झाली. ममता बॅनर्जीने आवाज दिल्यावर तर सगळ्या शेतकरी लोकांनी तिच्या अधिपत्याखाली विरोध करायला सुरुवात केली आणि ममता बंगाल मधून हा प्रकल्प हलवण्यात यशस्वी झाल्या. तीच डाव्यांच्या 'लाल वतनाची' अखेर होण्याची सुरुवात होती. आताच्या निवडणुकीत हे स्पष्ट झाले.


वरील दोन्ही गोष्टीतून एकच जाणवते आहे.....
पब्लिकची मेमरी आता दिवसेंदिवस सुधारत चालली आहे ह्याचीच तर ही लक्षणे नाहीत का ??CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top