अण्णा धुरी | Anna Dhuri |


"आशिष !! अरे अण्णा आज गेले रे!!! "  मिलिंद ने फोन वर सांगितले. 
मला काय बोलावे ते सुचलेच नाही...तोंडातून फक्त अरे रे रे ! निघून गेले. 

अण्णा म्हणजे रघुवीर धुरी... मिलिंदचे सख्खे काका .. वय जवळपास नव्वदी पार .. माझे तसे डायरेक्ट नाते काहीच नव्हते पण लहानपणापासून आमच्या कुटुंबाचे खूपच घनिष्ट संबंध होते. 

मी आणि मिलिंद लहानपणापासून त्याच्या व्यक्तिमत्वाचे चाहते होतो. आमच्या गप्पा मध्ये त्यांच्या वर खूप वेळ प्रदीर्घ चर्चा व्हायची.  

अंगाचा रंग सोडला तर मला तर ते विनोद खन्ना सारखे वाटायचे . आडवा भांग , उंच शरीरयष्टी, काटक अंग, चेहऱ्यावर नेहमी एक मिस्कील हास्य, अंगाचा वर्ण फक्त काय तो  आयुष्यभर शेतात राबून सावळा झालेला...हातात एक बहुतेक HMT चे सोनेरी चप्पट घड्याळ असायचे. त्यांच्या काळ्या आणि काटक मनगटावर ते उठून दिसायचे. 
 
गावावरून पहाटे मिलिंद च्या घरी आले की आठ साडे आठ ला "काय सावंतांनु काय चालला हा?" अशी मालवणीत खणखणीत हाक टाकत आमच्या घरी यायचे. 

इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या, चहा-पाणी व्हायचे. मला त्यांच्या गप्पा ऐकायला मजा यायची. रविवारी तर गप्पा चांगल्या दोन-तीन तास चालायच्या. मग अगदी क्रिकेट पासून राजकारणापर्यंत, गावापासून देशापर्यंत गप्पा चालायच्या. त्यांच्या कडे नेहमी नवीन गोष्टींचा आणि घटनांचा खजिना असायचा. अगदी ऐकत राहावा असा...  

माझे वडील सांगायचे की राठिवडे गावात त्यांचे नाव होते. त्यांच्या शब्दाला वजन होते. गावकरी लोक सुद्धा त्यांना मानायचे. आमच्या आंगणेवाडी गावी जाणारा रस्ता त्यांच्या गावातून जायचा. मी रिक्षाने जाताना नेहमी रस्त्याच्या आजूबाजूला त्यांना शोधायचो. एकतर देवळात, शेतात किंवा चावडीवर ते हमखास दिसायचे. रिक्षा दोन मिनिट थांबवून त्यांच्याशी बोलूनच आम्ही पुढे जायचो. निघताना माझ्या हातात त्यांच्याच शेतातला एखादा कलिंगड जबरदस्ती द्यायचे.  एसटी बस मधून जाताना पण एसटीचा ड्राइवर त्यांना बघून हमखास बस थांबवायचा. त्या मार्गावरून जाणारे बहुतांशी कंडक्टर आणि ड्राइव्हर त्यांच्या ओळखीचे होते. आणि त्यांचा मान एवढा होता कि ड्राइवर गाडी धीमी करून त्यांना हाक मारूनच पुढे जायचा. 

मला लहानपणी नेहमी चांगला अभ्यास कर..खूप शिक आणि मोठा हो.... आई बापाचे नाव काढ असे नेहमी सांगायचे. त्यात इतर मोठ्या लोकांसारखे टिपिकल सांगणे नसायचे.  एका आपुलकीने अगदी मनापासून प्रेमाने सांगायचे....त्यात त्यांची कळवळ दिसून यायची त्यामुळे त्यांच्या बद्दल नेहमी एक आपुलकी वाटायची. थोडा मोठा झाल्यावर पाठीत प्रेमळ धपाटा घालून गेल्या परीक्षेत किती मार्क काढलेस असे हमखास विचारायचे. 

ते मुंबई ला आले की मिलिंद कडे चार पाच दिवस राहायचे. आम्हाला नेहमी त्यांचा आदरयुक्त दरारा असायचा. त्यांच्या पुढ्यात आम्ही कधी वाह्यात गप्पा किंवा फालतुगिरी करायचो नाही. गावी परत जाताना आमच्या कडे "सावंतांनु येतेय आता" अशी निरोपाची हाक टाकल्याशिवाय जायचे नाही. आम्ही पण आमच्या घरातले पाहुणे निघाल्यासारखे त्यांनाअगदी जवळच्या बस स्टॉप वर जाईपर्यंत हात हलवून  निरोप द्यायचो. 

ह्या अण्णांची एक खासियत होती. त्यांना शरीरातल्या नाडीचे आणि नसांचे चांगले उपजत ज्ञान होते. त्यांच्या वडिलांकडून की आजोबांकडून आणि स्वतःच्या अनुभवातून ते आले होते असे ते सांगायचे. नाडी बघून कसला त्रास आहे हे पण ते सांगायचे. 

मला आठवते .... मी सातवी आठवीला असताना मला खेळताना एकदा पाठीत उसण भरली होती . एकदोन दिवसात जाईल म्हणता म्हणता चांगली दोन आठवडे त्रास होत राहिला. डॉक्टरांच्या गोळ्याने फक्त तात्पुरते वेदना शमन व्हायचे. पण दुखणे काही जात नव्हते. मणक्याचे हाड आणि माकडहाड चांगलेच धरले होते. अश्यातच अण्णा नेमके गावावरून आले होते. वडिलांनी बोलता बोलता त्यांना माझ्या पाठीचे दुखणे सांगितले. त्यांनी मला नेमके कुठे दुखते आहे. उठताना बसताना कुठे कळ येते आहे ते नीट बघितले आणि मग मला हात सैल सोडून समोर उभे राहायला सांगितले. मग हाताच्या मागच्या कोपरावरून हात फिरवत पुढच्या बाजूची एक नस शोधून ती चिमटीत पकडून दाबली, एक सणसणून कळ डोक्यातून मणक्यात गेली.  तीच नस दाबून त्यांनी मला खाली ओणवे वाकून परत उभे  राहायला सांगितले प्रचंड वेदना सहन करत मी त्यांनी सांगितले तसे दोन तीन वेळा केल्यानंतर त्यांनी नस सोडून दिली आणि म्हणाले 'आता कमी होईल दुखणे' असे म्हणाले. आणि पुढच्या एक दोन तासात मला आराम पडला. आखडलेली पाठ आणि उसण जी गायब झाली ती आजतागायत परत आली नाही. 

संध्याकाळी चहाला घरी आले तेव्हा पाठीत धपाटा टाकून म्हणाले "काय मग गेले का पाठीचा दुखणे?" ...मी आनंदात हो म्हणालो जसे काही दुखणेच नव्हते मला. त्यांच्या चेहऱयावर सुद्धा मी कसे तुला बरे केले ह्याचा आनंद झळकत होता. आनंदाच्या भरात त्यांनी एक किस्सा सांगायला सुरुवात केली. 

एकदा कसाल किंवा मालवण (नेमके नाव लक्षात नाही) कुठल्यातरी एसटी डेपोतील एक ड्राइव्हर बस डेपोत लावून उतरत असतानां त्याच्या पोटरीत गोळा आला आणि त्याची पायाची नस आखडली गेली आणि त्याला ड्राइव्हरच्या खुर्चीवरून पाय बाहेर काढून उतरता येईना. खूप प्रयन्त करूनही त्याला हालचालच करता येईना. उलट नस अजून दाबली जाऊन त्याला कंबर आणि जांघेत भयंकर कळ येऊ लागली. बाकीचे ड्रायव्हर, कंडक्टर मदतीला आले.  त्यांना हि तो हात लावू देत नव्हता. त्याला आपली नस तुटायची भीती वाटत होती. शेवटी डेपोतील कामगारांनी ठरवले की ड्रायव्हरची खुर्ची कटर ने कापून काढायची आणि नंतर वेल्डिंग करून जोडता येईल. पण तो ड्रायव्हर घाबरून काहीच करायला देत नव्हता आणि वेदनेने कळवळून ओरडत राहिला. 

एकदोघांनी आजूबाजूचा डॉक्टर शोधून आणला त्याने पण प्रयन्त करून पहिले पण ड्रायवरला काही जागचे हलता येईना आणि वेदनेने तो हैराण होऊ लागला.  त्याचवेळी कोणाला तरी राठिवडे गावातील अण्णांची आठवण झाली तेच ह्या ड्रायवर ला मोकळे करू शकतात. पण त्यानं बोलावणार कसे? त्याकाळी फोन वगैरे नव्हते. गावात क्वचितच कोणाकडे रिक्षा असायची. शेवटी डेपो कंट्रोलरच्या परवानगीने एक एसटी स्पेशली अण्णांना आणण्यासाठी राठिवडे ला निघाली. 

गावात दिवसाला दोनच एसटी ची ठरलेल्या फेऱ्या व्हायच्या. अशी अवेळी आलेली एसटी बघून गावातली लोक पण आश्चर्यचकित होऊन बघायला आली. कंडक्टर नसलेली रिकामी एसटी बघून तर अजून बुचकळ्यात पडली. ड्रायव्हर ने गाडी देवळाजवळ थांबवून अण्णा कुठे भेटतील ह्याची चौकशी केली. ड्रायव्हर कडून सगळं मामला समजल्यावर गावातली दोन चार पोरे वेगवेगळ्या दिशेला पिटाळले गेली. एकाला घरी पाठवले गेले...एक शेतात गेला...एक चावडीवर गेला.. 

अण्णा त्यावेळी शेतात काम करत होते. त्यांना निरोप मिळाला आपल्याला न्यायला एसटी आलीय म्हणजे नक्कीच सिरीयस भानगड असणार. अण्णा तसेच अर्धी चड्डी आणि बनियान वर निघाले. गाडी डेपोत आली. तो अडकलेला ड्रायव्हर अण्णांना पण हातच लावू देत नव्हता.  त्याला शरीरातील नस तुटायची भीती वाटत होती....अण्णांनी समजावून सांगितले पण तो घाबरून काहीच करू देत नव्हता.  शेवटी असह्य वेदनेने त्याची शुद्ध हरपली.  अण्णांनी मग वर एसटी मध्ये चढून त्याच्या पाठीच्या आणि पायाच्या नसा शोधून त्या हळू हळू दाबून मोकळ्या केल्या. जश्या ह्या नसा मोकळ्या होत गेल्या तश्या त्याच्या वेदना कमी होत गेल्या आणि पाणी शिंपडल्यावर त्याला शुद्ध आली. पाय मोकळे होऊन तो स्वतः ड्रायव्हरच्या सीट वरून खाली उतरून आला आणि डायरेक्ट अण्णांचे पाय धरले. सगळ्यांनी अण्णांनी त्यांची फी विचारली अण्णांनी फक्त त्यांना मी पहिल्यांदाच हाफ चडडी आणि बनियान वर एवढा लांब आलोय मला घरापर्यंत सोडा एवढेच सांगितले. 

त्यांनी ह्या कामाचे कधीच पैसे घेतले नाही. त्यांचे म्हणणे होते की मला ह्या अश्या अडल्या नडल्या लोकांची मदत करण्यासाठी मिळालेली ही दैवी देणगी आहे. मी ह्याचा मोबदला घेतला तर माझी ही दैवी देणगी कमजोर होईल. त्यांनी कधीच ह्या कामाचे पैसे घेतले नाही आणि ह्या ज्ञानाची कधी जाहिरात ही केली नाही. ज्यांना माहित होते तेच अण्णांकडून अश्या नसा मोकळ्या करून घ्यायचे. अण्णा स्वतःहून कधीच कोणाला सांगायचे नाही किंवा सुचवायचे नाही. 

मी त्यांच्या ह्या कलेचा सॉलिड फॅन झालो होतो.  मी लगेच त्यांच्या मागे लागलो होतो मला पण हे शिकवा मी पण लोकांना मदत करेन. ते हसले आणि म्हणाले मी माझ्या स्वतःच्या पोरांना सुद्धा हे शिकवत नाही ही कला.... मी मरताना माझ्या बरोबरच घेऊन जाणार. 

'असे का?' मी विचारले 

"अरे !सकाळी मी जी तुझी नस शोधून दाबली त्याच्या ऐवजी चुकून बाजूची नस दाबली असती तर तुला आयुष्यभर पाय हलवता आले नसते.  एक चुकीची नस दाबली गेली तर लकवा मारू शकतो. मला पाहिजे तर मी कोणाला थोड्यावेळ साठी किंवा आयुष्यभरासाठी जायबंदी करू शकतो. म्हणून मी हे ज्ञान कोणाला देत नाही आणि माझ्याकडे आहे म्हणून कोणाला सांगतही नाही. कोणी चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीने किंवा चांगल्या व्यक्तीने सुद्धा रागाच्या भरात कोणाला ही त्रास देण्यासाठी असे करू शकतो. माझी मुले पण गरम डोक्याची आहेत राग आला तर कोणालाही त्रास देऊ शकतात म्हणून हे ज्ञान मी कोणालाच शिकवत नाही. अगदी स्वतःच्या पोटच्या पोरांना सुद्धा नाही .... इतकेच काय मी हे ज्ञान स्वतःवर सुद्धा वापरू शकत नाही . 

त्यांचे म्हणणे मला पटले. आयुष्यात असे कितीदा प्रसंग आले जेव्हा मी एखाद्या व्यक्तीवर वर खूप चिडलो असेन आणि त्या व्यक्तीला त्रास द्यायची पण इच्छा झाली असेल. ही कला माहित असती तर कदाचित उपयोग पण केला असता. म्हणूनच ते ज्ञान मिळवण्यास कधी पात्र नव्हतो. 

त्यानंतर ते जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेव्हा मी त्यांना ते ज्ञान शिकवण्याची विनंती केली आणि त्यांनी हसून टाळून दिली. आज ते ज्ञान किंवा शास्त्र पण त्यांच्याबरोबर निघून गेले.  त्यांचा मोठेपणा, व्यक्तिमत्व, कार्य क्षमता, मृदू स्वभाव , आपलेसे करण्याची वृत्ती, निस्वार्थीपणा, लोभस अन मनमिळावून स्वभाव, मित्रपरिवार नातेवाइकांबद्दलची आपुलकी  हे सगळे आज त्यांच्या बरोबर संपले. आयुष्याच्या शेवटी त्यांना अर्धांगवायू झाला होता. आजारपणामध्येच त्यांचे जीवन संपले. आपल्या ग्रामीण जीवनातील एक मोठा अध्याय संपला.  त्यांचे कार्य, व्यक्तिमत्व आणि जीवन प्रवास किती उत्तुंग होता ह्याचा अंदाजही कदाचित त्यांच्या नातलगांना नसेल पण माझ्यासाठी आणि मिलिंद साठी ते आभाळाएवढे मोठे होते. 

इतर माणसांप्रमाणे अण्णां मध्ये ही काही गुण दोष असतील...आयुष्यातील काही निर्णय चुकले पण असतील. पण आयुष्याचा शेवटी जेव्हा पाप पुण्याचा जमाखर्च होऊन फक्त पुण्य गाठीशी राहते तेव्हा माणसाचे आयुष्य सफल झाले असे म्हणता येते. अण्णा त्या बाबतीत नक्कीच पुण्यवान होते. 

त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या भावना ह्या आम्हा दोघांसाठी शब्दात मांडणे खूप कठीण आहे. त्यांचे व्यक्तिमत्व आणि आठवणी आम्ही आमच्या मनात आणि शरीरात रिझवतो. एक शब्दात न मांडता येणारा असा आदर त्यांच्याबद्दल होता आणि नेहमी राहील. 

एका ब्लॉग मध्ये त्यांचे आयुष्य मांडणे खूपच कठीण आहे त्यांच्यावर लिहायला एक पुस्तकही कमी पडेल. हा ब्लॉग म्हणजे त्यांच्या आभाळभर व्यक्तिमत्वाला एक छोटी श्रद्धांजली. 


CONVERSATION

4 comments:

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top