शेजारच्या सोसायटीमध्ये एक पेरूचे झाड होते. त्या झाडावर एक डोमकावळ्याचे जोडपे दरवर्षी अंडी घालायला यायचे. आमच्या स्वयंपाक घरातून ते झाड पूर्णपणे दिसायचं. गेली दहा-बारा वर्ष तरी आम्ही त्या कावळ्यांच्या जोडप्याला बघत होतो.
कावळ्यांचे जोडपे फेब्रुवारी मार्चपासूनच घरट्याच्या बांधणीला सुरुवात करायची जेणेकरून पावसाळ्याच्या मध्यापर्यंत पिल्लू घरटे सोडून उडून जाऊ शकतील.
एकदा का अंडी घालून झाली की कावळा किंवा कावळीण दोघांपैकी एक जण सतत पहारा देत बसतात.
लहानपणी कुठेतरी वाचले होते की कावळ्यांच्या घरटे बांधण्याच्या जागेवरून शेतकरी त्या वर्षामध्ये किती पाऊस पडणार ह्याचा अंदाज बांधत असत आणि ते लॉजिक तंतोतंत गेले दहा-बारा वर्ष आम्ही अनुभवले होते.
कावळा कावळीण जेव्हा झाडाच्या टोकावर घरटे बांधतात त्याचा अर्थ असा होतो की त्यावर्षी खूप कमी पाऊस पडणार आहे किंवा बेताचाच पाऊस पडणार आहे. जर घरटे झाडाच्या मध्यावर बांधले तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे यामध्ये शेतीला पुरेल आणि प्यायला वर्षभर पुरेल एवढे पाणी मिळेल. जर त्यांनी घरटे झाडाच्या खालच्या बाजूला बांधले तर त्यावर्षी प्रचंड पाऊस पडणार असतं आणि पूरसदृश परिस्थिती सुद्धा निर्माण होत असते. हे आपल्या शेतकऱ्यांचे अचूक मोजमापनेचे तंत्र आम्ही गेली दहा-बारा वर्ष अनुभवत होतो.
एकदा का अंडी घातली की दोघांपैकी एक जण सतत अंडी उबवायला बसलेला असायचा. एक जण अन्न शोधायला जायचा आणि येताना आपल्या जोडीदारासाठी खायला घेऊन यायचा. मग दुसरा जोडीदार जायचा आणि आपल्या जोडीदारासाठी आणि नंतर पिल्लांसाठी अन्न घेऊन यायचा.
मी किंवा बायकोने स्वयंपाक घराची खिडकी उघडली की दोघांपैकी जो कोण पहाऱ्याला असेल तो आम्हाला कर्कश्श आवाजात काव काव करून आवाज द्यायचा. कदाचित 'हॅलो' करायचा. मग आम्ही थोडासा भात किंवा चपातीचा एखादा तुकडा किंवा पावाचा एखादा तुकडा त्यांच्यासाठी खिडकीवर ठेवून द्यायचो. एखाद्या वेळेस काही ठेवले नसेल तर आम्हाला काव काव करत आवाज देत राहायचा.
जर पोट भरलेले असेल तर कधी आमच्याकडे काही मागायचा नाही फक्त तिरपी मान करून आम्हाला बघत राहायचे.
त्या झाडावर काळी मैना किंवा साळुंकी पक्षी, खारुताई, लाल चोचीचे पोपट, कोतवाल पक्षी, रॉबिन पक्षी हे सुध्दा येऊन जाऊन असायचे. सहसा त्यांच्या यायच्या जायच्या वेळा ठरलेल्या असायच्या. ते कधी कधी कावळ्याच्या घरट्याच्या फांदीवर सुध्दा बसायचे..पण कधी घरट्याकडे वाकड्या नजरेने बघायचे नाही. कावळा ही त्यांना कधी हाकलयाचा नाही.
सगळे गुण्या गोविंदाने राहायचे त्या झाडावर.
कधी कधी कोकीळ पक्षी सुद्धा यायची.. ..कदाचित कावळ्याच्या घरट्यात अंडी घालण्यासाठी पण कावळ्याच्या सतर्कतेमुळे तिचा प्रयत्न हाणून पाडला जायचा.
त्या झाडाच्या फांद्या खूप वाढून सोसायटीच्या सदस्यांच्या खिडकीतून घरात जाऊ लागल्या होत्या म्हणून सोसायटीने मागच्या वर्षी त्या झाडाच्या 70 ते 80 टक्के फांद्या छाटून काढल्या.
त्यानंतर कावळा कावळी झाडावर येऊन परतून जायचे कारण त्यांचे घरटे बनवायला फांद्यांची बेचकीच राहिली नव्हती. ह्या वर्षी कावळ्यांनी बहुतेक दुसरे झाड शोधले असेल.
अजूनही खडकी उघडली की एखादा कावळा काव काव हाक मारत खडकी वर येऊन जातो. तो कदाचित त्याच कावळ्यांच्या जोडी पैकी एखादा असेल असा अंदाज आम्ही बांधतो. दिसायला सगळेच कावळे जवळपास सारखेच त्यामुळे ओळखणे कठीण. आता तर डोमकावळे दिसणेच बंद झाले आहे.
त्या झाडाने सुद्धा आपला जीव टाकून दिला. त्या नंतर ते पुन्हा बहरलेच नाही. फळे तर दूर...साधे नवीन पाने पण आली नाहीत. जास्तीत जास्त सुकतच गेले. उरल्या सुरल्या फांद्या सुद्धा वाळून गेल्या. पोपट..खार...साळुंकी ह्यांचे त्या झाडावर येणे जाणे बंद झाले.
कावळा, कोतवाल आणि रॉबिन पक्षी सकाळ आणि संध्याकाळ त्या झाडावर येऊन पाच मिनिटे बसून जातात....कदाचित त्या झाडाच्या शेवटच्या क्षणी त्याच्याशी हितगुज करून जातात.
ते सुकलेले झाड खालच्या पार्किंगमधल्या गाडीवर पडेल म्हणून सोसायटीने काही दिवसांपूर्वी पूर्ण छाटून घेतले.
त्या संध्याकाळ नंतर कोतवाल आणि रॉबिन पण दिसेनासे झालेत.
एका निसर्गचक्रामध्ये मनुष्याने पुन्हा यशस्वीरीत्या लुडबुड केली.
0 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!