वृत्तपत्रे। ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी ।
मिलिंद धुरीच्या फेसबुक भिंती वरच्या एकेक आठवणी मनाला भूतकाळात नेऊन सोडतात. अशीच एक आठवण ऐंशी..नव्वदीच्या दशकातली होती ती म्हणजे त्या काळातली कृष्णधवल वृत्तपत्रे
त्या काळातल्या वृत्तपत्रांचा दर्जा आजच्या तुलनेत तसा म्हटला तर सुमारच होता. आजच्या सारखी रंगीत वृत्तपत्रे त्या काळी नव्हती, पेपरचा दर्जा 80 gsm चा पण नसेल...पण त्या काळी पेपर मध्ये छापून येणारा मजकूर, सामग्री (कंटेंट) आज कालच्या पेपर पेक्षा शंभर पटीने चांगला होता. खिळ्यावर केलेली प्रिंट कदाचित आताच्या कॉम्पुटर वर केलेल्या सुसह्य फॉन्ट पुढे वाचायला आता कंटाळवाणी वाटेल पण त्या काळी तीच वेडीवाकडी अक्षरं वाचायला आवडायची..आताच्या कम्प्युटरच्या युगात सुद्धा आजकालच्या मराठी वृत्तपत्र मध्ये व्याकरणाच्या ढीग भर चुका सापडतील पण त्यावेळी मानवी चुका शोधून सुद्धा सापडायच्या नाहीत...उलट अभ्यास करताना एखादी वेलांटी, उकार हे ऱ्हस्व की दीर्घ हे आम्ही वर्तमान पत्रातून तपासून पाहू.
त्या काळी घरात वृत्तपत्रे येणे म्हणजे सुखवस्तू घराचे लक्षण असे....आमच्या कडे वृत्तपत्र सणासुदीला, कोणता मोठा नेता खपला, शिवसेनाच दसरा मेळावा झाला किंवा तशीच काही मोठी वाचनीय घटना घडली की तेव्हाच येत असे...दररोज वृत्तपत्र आणण्याची चैन परवडणारी नव्हती...तरी मला आठवते की मी आवडीने वाचायचो...म्हणून वडिलांनी दर रविवारी वृत्तपत्र आणायला सुरवात केली होती.
इतर दिवशी मी बाजारातून घर सामान आणावे लागले की कंटाळा करायचो पण रविवारी मात्र दूध, अंडी, विब्स कंपनी चा ब्रेड आणायला मी आवडीने पिशवी नाचवत जायचो कारण उरलेल्या २५ किंवा ५० पैशात वृत्तपत्र घ्यायला परवानगी असे...बाकीचे मित्र २५ पैशात बर्फाचा पेप्सी कोला घ्यायचे ...५० पैशात दुधाचा पेप्सीकोला घ्यायचे...पण मी माझी आवड मारून वृत्तपत्र घायचो...कधी कधी जास्त पैसे उरले तर दोन तीन वृत्तपत्र पण घ्यायचो...घरी आलो की ओरडा पडायचा पण ५...१० मिनिटात सगळे विसरून जायचे...वडीलच सगळे पेपर एकूणएक वाचून काढायचे.
वाचनाची सवय मला त्यांच्यामुळेच लागली बहुतेक...एकेक करून अख्खा पेपर अतः पासून इत पर्यंत वाचून काढायचो. अगदी त्यात येणाऱ्या जाहिराती पासून, हरवले आहे, भाड्याने देणे आहे वगैरे सगळे सदर वाचून काढायचो.त्यातही महाराष्ट्र टाईम्स किंवा लोकसत्ता परवडणारा नव्हता म्हणून नवाकाळ, सामना, तरुण भारत हे पेपर वाचायचो. चाळीच्या एखाद्या घरात आलेला पेपर हा पूर्ण माळ्यावरच्या सगळ्या घरात फिरायचा...अगदी दुसऱ्या दिवशी 'शिळा' पेपर ही आवडीने वाचला जायचा. कोणाच्या घरी जाऊन पेपर वाचत बसणे किंवा मागून आपल्या घरी आणणे कधी कमी पणाचे किंवा असंस्कृतपणाचे लक्षण वाटले नाही.
महाराष्ट्र टाईम्स चा ठळक 'म', लोकसत्ता चा लठ्ठ 'ल', नवा काळ च्या अक्षरावर असणारा पक्षी, तरुण भारत चा तटस्थ वाटणारा फॉन्ट, सकाळ मधला स्टायलिश 'स' ही सगळी अक्षरे आणि ठसे डोळ्यासमोर अजूनही आहेत.
वाचनीय सामग्री मध्ये मला सगळ्यात जास्त 'सामना' वृत्तपत्र आवडायचं... सामना चा जाडा फॉन्ट मराठी माणसाचे कणखर मनगट असल्या सारखा वाटायचा. त्याच्या खाली बुरुजसारखी नक्षी असायची आणि मधोमध संपादक म्हणून 'बाळ ठाकरे' नाव..हे सगळे त्यावेळच्या गरम रक्ताला आवडायचे.... कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत चे रोखठोक संपादकीय पण आवडायचे.... त्यात हा माणूस बाळासाहेबांनाच तुम्ही कालच्या भाषणात कुठे चुकलात म्हणून बिनधास्त त्यांच्याच मालकीच्या वृत्तपत्रात बेधडक पणे सांगायचा त्याचे अप्रूप वाटायचे. रविवार पुरवणीत ग्रेस च्या कविता यायच्या...काही कळायचे नाही...पण शब्दरचना वाचायला खूप आवडायची...रेघोट्या मारत केलेली चित्रे सुद्धा ग्रेस च्या कवितांसारखी अनाकलनीय असायची...द्वारकानाथ संझगिरी ह्यांचे क्रिकेट वरचे समीक्षण....क्राईम डायरी मधील पोलिसांचे अनुभव...शिरीष कणेकरांची चौफेर फटकेबाजी...कधी कधी एखाद्या मोठ्या नावाजलेल्या लेखकाचे ललित लेखन....सोमण ह्यांचे खगोल, भविष्य विषयक लेख...एखाद्या लेखकाचे प्रवासवर्णन.. हे गोष्टीरूपात वाचणे म्हणजे एका अर्थाने रविवारची मेजवानी असायची..
सामना सारखी वाचन सामग्री दुसऱ्या कुठल्या पेपर मध्ये सापडली नाही म्हणून कित्येक वर्ष घरी सामना पेपर यायचा. क्वचित कधी लोकसत्ता मध्ये वाचनीय लेख असायचे. मध्यंतरी कधी 'संध्याकाळ' पेपर चालू झाला होता तो मार्केट मध्ये दुपारी यायचा..त्यामुळे उशिरा आलेल्या बातम्या, उशिरा संपलेली क्रिकेट सामन्याचे वृत्तांकन त्या पेपर मध्ये वाचायला मिळायचे....मराठी शब्दकोडी पण बहुतेक त्याच पेपर ने चालू केली होती... त्यामुळे त्या पेपर ला मागणी असायची. नंतर नंतर तो पेपर सकाळीच यायला लागला...आणी तो उशिरा येण्याचा थ्रिल गेला.
वृत्तपत्रांमध्ये रंगीत पेपर येणे बहुदा टाइम्स ग्रुप ने चालू केले पहिल्यांदा महाराष्ट्र टाइम्सचा दिवाळी किंवा गणपती मध्ये आलेला स्पेशल एडिशन रंगीबेरंगी बघितला तेव्हा खूप चांगले वाटले. काही रंगीत कात्रणे, गणपतीचे, नवरात्रीतल्या देवींचे फोटो, सचिन तेंडुलकरच्या शतकी पारी अशी अनेक कात्रणे अजुनही संग्रहित आहेत. नंतर हळूहळू रविवारचा पेपर रंगीत होऊ लागला आणि काही वर्षात दररोजचा पेपर पण रंगीत येऊ लागला.
नव्वदीच्या सुरुवातीला चाळीमध्ये आलेल्या एका सधन कुटुंबामुळे आम्हाला दररोज 'शिळे' वृत्तपत्र वाचायला मिळू लागले. चंपक, ठकठक, चाचा चौधरी, चांदोबा अश्या कॉमिक्सची, साप्ताहिके, दिवाळी अंक, मासिक यांची ओळख त्यांच्यामुळे झाली. महिनाअखेरीस त्यांच्या घरातून जाणारी रद्दी एक दिवस आधी माझ्याकडे आणून जमेल तेवढे अधाशा सारखे वाचून काढायचा प्रयत्न असायचा. वडिलांना ते आवडायचे नाही पण काहीतरी वाचन करतोय म्हणून काही बोलायचे नाही. दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक, वार्षिक ह्या सगळ्या मधला फरक आणि ओळखी ह्याच काळात त्यांच्या घरी निघणाऱ्या रद्दी वरच झाल्या. पुढे काही वर्षांनी शेजारी आलेल्या एका दक्षिण भारतीय कुटुंबामुळे इंग्लिश वृत्तपत्रांशी ओळख झाली आणि मोडके तोडके का होईना पण इंग्लिश वाचनाची सवय होऊ लागली. रविवारचा पेपर मात्र हट्टाने 'ताजा' आणि स्वतःच्या पैश्याने वाचायचा प्रयत्न असायचा.
आमच्या बाल वयातून किशोर वयात जाताना होणाऱ्या महत्वपूर्ण सामाजिक आणि मानसिक जडणघडणीमध्ये त्याकाळच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' वृत्तपत्रांचा सिंहाचा वाटा होता.
खूप छान दिवस होते ते...गाठीशी काहीच नव्हतं किंवा जे होते ते खूपच कमी होते पण आयुष्य सुखाचे होते...आयुष्यात कितीही कमावले तरी बालपणीचा तो 'रविवार' आयुष्यात परत कधी येणार नाही ह्याची खंत नेहमीच राहील.
आशिष सावंत
0 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!