चाळीसगाव - नाशिक सुपरफास्ट व्हाया मालेगाव

ढगळ पण तोकडा पठाणी घातलेला पन्नाशीच्या आतील...टिपिकल मुस्लीम पद्धतीने मिशी न ठेवता खुरटी दाढी वाढवलेला एक गृहस्थ हातात कपड्याचे गाठोडे घेऊन 'मालेगाव ...मालेगाव' करत लाल यष्टीत चढला. त्याच्या मागोमाग एक त्याच्याच वयाची बाई कदाचित.... त्याची बायको... हातात एक कापडाची वळकटी पोटाशी धरून यष्टीच्या तीन पायऱ्या चढली. 

मला पुढच्या दरवाज्यातली कंडक्टरच्या बाजूचीच जागा भेटली होती त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला न्याहाळता येत होते. बाजूला बसलेला कंडक्टर आपले बुड अर्धवट जागेवरून उचलून एक हात दरवाज्यावर ठेवून आणि एक हात बेलच्या रस्शी ला पकडून 'चाळीसगाव...मालेगाव...नाशिक...डायरेक्ट सुपरफाष्ट' असे बोंबलत होता...चढणाऱ्या प्रत्येकाला डायरेक्ट गाडी आहे सांगत, मागे जाऊन 'बसून घ्या बसून घ्या' म्हणून ओरडत होता.

मगासचा म्हातारा मागे जागा अडवून परत दरवाज्यात आला आणि खाली वाकून कुठे तरी बघून खुणेने कोणाला तरी 'उप्पर आव' अशी हाक घातली. थोड्या वेळाने दरवाज्यात एक कोवळी १५ ..१६ वर्षाची नाकीडोळी सुंदर अतीव गोरीपान मुलगी कमरेवर हात ठेवत हळू हळू चालत आली. ऐश्वर्या राय किंवा RHTDM मधली दिया मिर्झा पार अगदी त्यांच्या तारुण्यात जश्या दिसत होत्या तशीच काहीसी सुंदर ती मुलगी होती. अंगावर करडी शाल घेऊन तोकडा पंजाबी ड्रेस घातलेली ती मुलगी कॉलेजात जाणारी वाटत होती. पण एवढा सुंदर चेहरा कसल्याश्या अतोनात दुखण्यामुळे झाकोळला गेला होता...चेहऱ्यावरचे हावभावावरून तिला खूप कसलातरी त्रास होत असावा हे शेंबडे पोरगे सुद्धा सांगू शकले असते.

तिच्या मागे असलेली तिच्या सारखीच दिसणारी एक मुलगी....बहुतेक तिची लहान बहिण...तिला कमरेला पकडून पुढे चालवत घेऊन आली. तिच्या आधाराने ती मुलगी ओटीपोट धरत यष्टीच्या तीन पायऱ्या हळू हळू चढली. तिच्या ओटीपोटा वर रक्ताचे डाग दिसले...पोट थोडेसे वेगळेच बाहेर आलेले दिसले आणि तेव्हा मला अंदाज आला की ही मुलगी ओली बाळंतीण असावी आणि नुकतीच हॉस्पिटल मधून आली असावी...व बहुतेक आता घरी जात असावी...

पण तिचे मुल कुठे दिसले नाही...कदाचित तिचा नवरा मागून घेऊन येत असावा. 

बस हळू हळू भरायला लागली आणि ड्रायवर बस चालू करून इंजिन गरम करायला लागला. तो म्हातारा परत पुढे माझ्या बाजूला आला...आणि कंडक्टरला मालेगाव जवळील कुठल्याश्या गावात जाणाऱ्या फाट्यावर गाडी थांबेल का असे विचारू लागला.....कंडक्टर तसा भसकन त्याच्या अंगावर आला....

अरे चाचा! बोर्ड वाचला नाय काय? मगापासून जीव कोकलून ओरडतोय कि बस डायरेक्ट मालेगाव आहे...सुपरफाष्ट आहे...मध्ये कुठे थांबणार नाय.....समजता कैसे नय तुमको...अभी के अभी उतर जावो.

तो म्हातारा- अरे साब मग त्या अमुक अमुक रोड ने लेकर जावोगे न ...तभी उधरीच उतार देणा...

कंडक्टर अजून वैतागून बोलला...अरे चाचा बस हायवे से जायेगा...वो रोड से नाही जायेगा...अभी उतर जावो..

तो म्हातारा बिचारा मागे जाऊन सगळ्यांना खाली उतरायला सांगून आपले गाठोडे घेऊन दरवाज्यात आला...

लगबगीने खाली उतरून तो फलाटावर आलेल्या दुसऱ्या बसच्या मागे विचारायला धावत पण गेला.

त्याच्या मागोमाग ती म्हातारी पोटाशी धरलेले बोचके घेऊन उतरायला आली...तेव्ह्या त्या बोचक्यात हालचाल दिसली...आणि समजले ते बोचके नसून एक दोन दिवसाचे तान्हे बाळ आहे....त्याला पूर्ण शाली मध्ये गुंडाळून तिने पोटाशी धरले होते..

खाली उतरून ती पण गर्दी मध्ये विरघळून गेली..

तिच्या मागोमाग त्या मुलीची छोटी बहिण आली. ती पण पायऱ्या उतरून पुढे फलाटावर जाऊन त्या म्हाताऱ्याला शोधायला उभी राहिली...

सर्वात शेवटी ती मुलगी हळू हळू एकेक सीट पकडत दरवाज्यापर्यंत आली....दोन मिनिटे श्वास घेत तिथेच उभी राहिली....तिच्या अवस्थेकडे बघून बस मधल्या इतर बायका कुजबुजत हळहळ व्यक्त करायला लागल्या....

ह्यांच्यामध्ये असचं चालतं ग बाई !!! हे काय वय आहे पोर काढायचं !!! हे वाक्य पण ऐकायला आले.

त्या मुलीने आपले ओटीपोट घट्ट दाबून धरले आणि तिरकी होऊन पहिली पायरी उतरायचा प्रयत्न केला...आणि त्यात बसचा दांडा नीट न पकडता आल्याने तिचा तोल गेला...अनावधानाने आणि प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून माझा हात पुढे केला गेला...तिचा तोल जाता जाता तिने माझा हात घट्ट पकडला आणि कसाबसा स्वताचा तोल सांभाळला आणि ती पायरी न उतरता परत मागे फिरली. 

मग परत माझा हात तिच्या डाव्या हाताने घट्ट पकडत उजव्या हाताने ओटीपोट दाबून तिने पुनः पहिली पायरी उतरायचा प्रयत्न केला.

भयंकर वेदना सहन करत तिने आपला डावा पाय पहिल्या पायरीवर ठेवला...तो पाय ठेवेपर्यंत ज्या ताकदीने तिने माझा हात घट्ट दाबून धरला होता त्यावरून तिला होणाऱ्या वेदेनाची थोडी का होईना पण मला कल्पना आली.

पहिल्या पायरीवर थोडा श्वास घेऊन परत तिने माझा हात घट्ट दाबून धरत दुसरी पायरी उतरायचा प्रयत्न केला...तश्याच अंगभर जाण्याऱ्या वेदना सहन करत....'अम्मी' असे अस्फुट उच्चारत तिने दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला...आणि परत ती श्वास घ्यायला दोन मिनिटे उभी राहिली...

आता तिला तिसऱ्या पायरीवर उतरण्यासाठी आधार द्यायला मला माझ्या सीटवरून उठून उभे राहावे लागले होते. ती उतरेपर्यंत तीन चार पुरुष बसच्या दरवाज्यात येऊन उभे राहिले होते....ती हळू हळू खाली उतरत असताना तिच्या अंगावरची शाल खाली सरकून एका बाजूला झाली होती...ती दुसऱ्या पायरीवर दम खाईस्तोवर त्या पुरुषांनी तिच्या धपापलेल्या दुध भरल्या ओल्या छाती कडे पाहून घेतले...आणि हाताने कोना मारून दुसऱ्या मित्रांना पण बघायला सांगितले...

भयंकर वासना डोळ्यात आणून तिच्या छातीवरची आणि चेहऱ्यावरची नजर न हटवता ते चौघे तिला लागणाऱ्या वेळेचा फायदा घेत तिच्या कडे बघत उभे होते..

परत तश्याच वेदना सहन करत ती तिसरी पायरी उतरली,...आणि तेवढ्यात तिची बहिण लक्षात आल्यासारखे मागे धावत आली...तिची शाल तिच्या अंगावर टाकत.....माझ्या हातातून तिचा हात आपल्या हातात घेत...मला 'शुक्रिया' करत तिने तिला पुढे बस मधून फलाटावर उतरायला मदत केली आणि तिला बाजूच्या फलाटावर नेऊन उभे केले.

पुढे गेल्यावर त्या मुलीने मागे वळून फक्त डोळे उघडझाप करून व मान तिरकी करून मला शुक्रिया केला...मी ही 'ठीक आहे' असे मान डोलावून सांगितले....आणि मग ती परत तशीच कंबरेवर हात ठेवून ओटीपोट दाबून धरत कळवळत उभी राहिली.

एव्हाना पायऱ्या चढ उतर करून तिच्या शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागला होता....तिचा तोकड्या पायजम्यातून रक्ताची धार लागली होती....थोडे थोडे रक्त पायावरून आणि तिच्या चप्पल मधून ओघळत खाली फलाटावर पडायला लागले होते....तिच्या बहिणीने तिला ते दाखवून दिले...पण ती काहीच करू शकत नव्हती...बहिणीच्या खांद्यावर एक  हात ठेवून दुसऱ्या हाताने पोट दाबत...ओठ दाताखाली चावत ती तशाच वेदना सहन करत उभी होती....तिच्या वेदना तिला कुठल्याही लाज लज्जा, सामाजिक जाणीवा आणि सामाजिक शिष्टाचार पाळण्याच्या पलीकडे घेऊन गेल्या होत्या...खरच मनापासून दया आली त्या पोरीची.

तिची म्हातारी येऊन तिच्यावर आणि तिच्या बहिणीवर खेकसायला लागली...त्यावरूनचं अंदाज आला की ही नक्कीच तिची आई नसावी...असेही कुठलेच लक्षण त्या दोन्ही म्हाताऱ्या म्हातारी बरोबर जुळत नव्हते....त्या बिचाऱ्या दोघी बहिणी तिची बडबड ऐकत खाली मान घालून उभ्या होत्या..

जवळपास १० मिनिटाने कंडक्टरने बेल मारून सगळ्यांना आपापल्या जागेवर बसून घ्यायला सांगितले...दरवाजा खाडकन आपटून..."चल हमीद भाई...टायीम झालाय आता '' असे ड्रायवर ला तिथूनच ओरडून सांगितले...आणि तो तिकिटे काढायला मागे निघून गेला...ड्रायवरने तंबाखू हातावर चोळून तोंडात विशिष्ठ ठिकाणी कोंबून डोक्यावरची गोल टोपी घट्ट बसवली आणि बस फलाटावरून मागे काढून घेतली. बस त्या डेपोतून बाहेर पडे पर्यंत त्या तिघी जणी तिथेच उभ्या होत्या...तो म्हातारा बहुतेक येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक बस च्या मागे पळत होता...तिचा नवरा कुठेच दिसला नाही.


यष्टी बाहेर पडली आणि रस्त्याला लागली...माझे मन बधीर झाले होते ...मनात दया...चीड...राग..ह्या सगळ्या भावना दाटून आल्या होत्या..झाल्या घटनेत कोणाची चुकी...कोण जवाबदार...असे प्रश्न पडू लागले..नेमका कशाचा राग आणि कोणत्या गोष्टीचा राग आला होता तेचं समजत नव्हते.

कदाचित त्या मुलगीचाच राग आला होता का ??? ...जिने एवढ्या कमी वयात लग्न केले...केले तर केले...त्यात बाळंतपण पण सुद्धा काढले...

की तिचा नवरा???..... ज्याला एवढी हि अक्कल नसावी... की गर्भ धारणा करून देण्याशिवाय इतर ही जवाबदारी असते पुरुषाची....निदान आपल्या बायकोसाठी, मुलासाठी तरी इथे उपस्थित असायला हवे होते....तिला हॉस्पिटलमधून सुखरूप घरी तरी घेऊन जावे..

की तिची सासू??? .....एक स्त्री असूनसुद्धा एका स्त्रीचे दु:ख समजून घेऊ शकत नव्हती...एवढ्या लहान वयात लग्न लावून देण्यासाठी ती सुद्धा तेवढीच जवाबदार नसावी का? आताही तिला होणाऱ्या वेदना दुर्लक्ष करून भर गर्दीत तिथेच तिला खेकसत होती...ही तिची चूक नव्हती का??

का तो म्हातारा? जो आपल्या मुलाला -  तिच्या नवऱ्याला - तिथे न येण्याबद्दल काहीच बोलला नसावा का?? तिची परीस्थिती बघून एखादी रुग्णवाहिका किंवा रिक्षा करून तिला घरी घेऊन जाऊ शकत नव्हता का?

की तो धर्म???? जो ह्या सगळ्या गोष्टीला मान्यता देत होता..

की ती गरिबी व परिस्थिती ??? जे हे सगळे करण्यास भाग पाडत होती 

का ते चौघे पुरुष???  एका असहाय्य स्त्रीला मदत करायचे सोडून तिचा नजरेने उपभोग घेणारे?

की ते इवलेसे बाळ ??? ज्याचा काही दोष नसताना तो ह्या जगात...ह्या कुटुंबात ...ह्या माणसांमध्ये जन्माला आला होता...

की ही अंधार पडायच्या आधीची ओढ लावणारी विचित्र वेळ???? जिने मला ह्या घटनेमुळे अंतर्मुख केले ...बेचैन केले??

मन कासावीस झाले...

यष्टीच्या इंजिनाच्या एकसुरी आवाजामुळे...खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे...बसमधल्या हळू हळू कमी होत जाणाऱ्या कलकलाटामुळे.... पुढच्या काचेवर संथ लयीत आपटनाऱ्या 'चाळीसगाव - नाशिक सुपरफास्ट- व्हाया मालेगाव' बोर्डच्या एकसुरी आवाजामुळे...मेंदूच्या आतमधल्या घड्यातून पाझरत एक झोपेची गुंगी डोळ्यावर दस्तक देऊ लागली...

तसा एका मनात झालेला कल्लोळ...राग...चीड हळूहळू निवळायला लागला ...दुसरे मन सांगत आले....उगाच जास्त विचार करू नकोस...तुला काय करायचे आहे? तू संवेदनशील आहेस हा तुझा दोष आहे?...आणि हळूहळू दुसरे मन पहिल्या मनावर भारी पडू लागले...डोळ्यावर गुंगी वाढू लागली...पहिल्या मनाने शेवटी हार मानून स्वत:ला दुसऱ्या मनाच्या स्वाधीन केले...

दुसरे मन कुठे तरी खुश झालेले दिसू लागले...

"हमीद भाई तुम गाडी ऐसे ही भगाते रहो...अपने को ये सब झंझट से क्या करना है.." असे ते मन बोलत असताना ही मी ऐकले बहुतेक. डोळ्यावर आलेल्या गुंगीने सगळे विसरायला भाग पाडले.

बरोबर आहे....आपण आपले पुढे चालत राहावे...

ठ्ठ्लवि ठ्ठ्लवि ठ्ठ्लवि ठ्ठ्लवि..
-- आशिष सावंत
CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top