अर्जुन - 14 डिसेंबर 2016

प्रिय अर्जुन,

आज तुझा सहावा जन्मदिवस...हा हा म्हणता दिवस कसे पटापट निघून गेले समजलेच नाही....माझे इवलेसे बाळ खूप मोठे झाल्यासारखे वागायला लागलेय...2011 साली त्या हॉस्पिटल मधल्या लेबर रूम बाहेर उभा राहून वाट पाहतानाची धडधड  आज एवढ्या वर्षांनी अजून सुद्धा आठवते...

तुझे बालपण एवढे भुरुभुरु का उडून चाललेय हेच समजत नाहीये...असे वाटते तुझे हे निरागस बालपण संपूच नये...पण ही वेळ आतापर्यंत कधीच कोणासाठी थांबली नाहीये मग आपल्यासाठी तरी कशाला थांबेल..

ह्या गेल्या वर्षात तू सिनिअर केजी मध्ये गेलास...स्वतःहून अभ्यासाला लागलास...तुला सहजतेने इंग्रजीची करसिव्ह लिपी काढताना बघून मला आश्चर्य वाटले होते...शाळेचे भले मोठे दप्तर पाठीवरून घेऊन जाताना तुला बघून खरे तर मला खूप भरून आले होते...शेवटी तुला पण ह्या जगरहाटी मध्ये गुंतवावे लागले ह्याचे वाईट पण वाटले...असे वाटले की उगाच तुझे बालपण लवकर संपवायला घेतलंय पण नाईलाज होता रे!! ह्या शर्यतीत तुला उभे करणे एका बापाचे कर्तव्यच होते अस समज...

ह्या वर्षात आपल्या दोघांच्या आयुष्यात खूप मोठी उलथापालथ झालीय रे!!! 5 ऑक्टोबर 2016  ला माझी जळगाव ला बदली झाली रे...रात्री 11.50 ला समजले की बदली झालीय...तू त्या दिवशी नेमका लवकर झोपला होतास...आधी बदली ऑर्डर वर विश्वासच नाही बसला...पण नंतर जसे परिस्थितीचे भान आले तसा सगळ्यात पहिल्यांदा तुझाच विचार आला...तुझ्या शिवाय मी कसा राहू शकेन रे!!! तुला इथे ठेवून मला एकट्यालाच जावे लागणार ह्या विचाराने माझे डोकेच भंजाळून गेले...सकाळी 4 वाजे पर्यंत झोपच नाही लागली...रात्रभर तुला कुशीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घेत बसलो होतो रे!!!! तुझे ते निर्धास्त आणि निरागस झोपणे बघून आतल्याआत खूप रडत होतो रे...विचार करत करत कधी तुझ्या मिठीत झोप लागली ते समजलेच नाही...

सकाळी घरात बाकीच्यांना समजले तेव्हा सगळ्यांची तोंडं पडली होती...सगळेच टेंशन मध्ये आले होते...माझे पुढे कसे होणार आणि मला टेन्शन आले होते तुझ्या शिवाय माझे कसे होणार..

17 ऑक्टोबरला मला जळगाव ला रिपोर्ट करायचे होते...हातात मोजून 10 दिवस राहिले होते..खूप डोईजड झालं होते...ना खाली उतरवता येत होते आणि पुढे नेवव्हत पण नव्हते...रात्री तू झोपलास की तुला मिठीत घेऊन आतल्याआत खूप रडत होतो..

माझ्या ऑफिस मध्ये निरोप सभारंभाला पण तू आला होतास...तुझे गाडीचे प्रेम बघून माझ्या सहकाऱ्यांनी तुझ्यासाठी एक रिमोट कंट्रोल ची कार पण आणली होती....त्या दिवशी तुला थोडे समजायला लागले होते की आपला डॅड्डी कुठे तरी लांब जाणार आहे..16 तारखेच्या रात्रीची 12 वाजताची ट्रेन पकडायची होती...11 वाजता घरातून निघालो...गेले दहा दिवस मी कोणासमोर डोळ्यातून एक थेंब हि येऊ दिला नव्हता...कारण मी तुटलो असतो तर घरातले सगळेच कोसळले असते...उलट मी सगळ्यांना धीर देत होतो...अगदी शेवटी घरातून निघताना पण सगळ्यांचे डोळे पाणावले होते पण मी माझे मन कठोर ठेवले होते...पण सोसायटीच्या गेट मधून बाहेर पडताना तू परत येऊन मला मिठी मारलीस आणि नकळत माझ्या अश्रूंचा बांध फुटला...नको नको म्हणताना मी तुला मिठी मारून रडायला लागलो...जेवढा मी बाहेरून रडत होतो त्याच्या दुप्पट मी आतल्याआत रडलो...पुरुषांना कदाचित ओक्साबोक्सी रडणे शोभत नाही बहुतेक....तू आम्हा सगळ्यांना असे बघून थोडा घाबरलाच होतास पण त्यातही तू तुझी सदविवेक बुद्धी जागी ठेवून माझे डोळे पुसले होतेस...आणि मला घट्ट मिठी मारली होतीस...

त्या वेळी रिक्षात बसून तुम्हां सर्वांना टाटा करताना खांद्यावर मण भर ओझे घेऊन चालल्या सारखे झाले होते...त्या दिवशीची रात्र आयुष्यात सहजासहजी विसारण्या सारखी नव्हती...दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये रिपोर्ट करून संध्याकाळी जेव्हा हॉटेलच्या रुम वर आलो होतो तेव्हा दरवाजा बंद करून तुझ्या आठवणीने खूप म्हणजे खूप रडलो होतो...

जन्मल्या पासून तुला कधीच नजरेसमोरून दूर केले नव्हते रे!!!कधीतरी अगदीच जास्तीत जास्त दोन दिवस ...इथे तर किती दिवस तुझ्यापासून लांब राहणार हे प्रश्नचिन्हच होते...ह्या प्रश्नाला उत्तर नव्हते म्हणून अजून चिडचिड होत होती...

तू ह्या दिवसात दररोज रात्री कॉल करून माझ्याशी बोलत होतास...तुला व्हिडिओ कॉल करून बघणे हेच माझ्यासाठी तिथे दिवस काढण्याचे टॉनिक होते...दिवस कामात निघून जायचा पण संध्याकाळ झाली की तुझी आणि घराची ओढ लागायची रे...असं वाटायचं की सगळं काही सोडून रात्रीची ट्रेन पकडून तुझ्यासाठी परत यावं...पण तेवढी हिम्मत नव्हती रे तुझ्या बापात... तुझ्या भविष्याचा विचार आला की सगळं गुमानपणे सहन करावे लागत होते...

तुझ्या साठी रेल्वेच्या दरवाजात बसून अगदी टॉयलेटच्या जवळ बसून प्रवास करावा लागलाय पण तुला भेटण्यासाठी तोही त्रास सहन करत होतो...शनिवार रात्री तुझ्यासाठी जीव तोडून यायचो...रविवारी पहाटे 4 वाजता पोहचायचो आणि रविवार रात्री परत निघायचो...मोजून धड 12-15 तास पण नाही मिळायचे तुझ्या सोबत रे...पण नाईलाज होता...तेवढे तर तेवढे तास तुझ्या सोबत खेळता येतील म्हणून प्रमाणाबाहेर दगदग करून येत होतो...नशिबाने अचानक एवढी पलटी का मारली ह्याचे राहून राहून आश्चर्य वाटतेय..

मागच्या आठवड्यात तू माझा कॉल ठेवल्यावर मम्मा ला मिठी मारून डॅडी कायमचा परत कधी येणार ....मला असे नाही आवडत तो सारखा सारखा जळगावला जातो असं सांगून रडवेला झाला होतास...पण रडला नाहीस....डोळ्यातले पाणी डोळ्यातच थांबवलंस ....दुसऱ्या दिवशी मला समजल्यावर माझी हालत खूप खराब झाली होती रे...तुला दुःख देण्याचा मला काहीच अधिकार नाहीये रे माझ्या राजा...पण मी परिस्थितीने बांधलो गेलोय रे!!

पुढच्या दोन दिवसात मला जळगावला जाऊन दोन महिने पण होतील ...पण ह्या दिवसात तू खूपच परिपक्व झालास...तू समजूतदार पणे वागायला लागलास...डॅड्डी पाहिजे म्हणून उगाच हट्ट नाही धरलास...शनिवार रविवार मी तुला जेव्हा भेटायला येतोय तेव्हा तू माझ्या सगळ्या गोष्टी इमानदारीत ऐकून नको तो हट्ट करत नाहीयेस...मला त्रास देत नाहीयेस...एवढं समंजसपणा दाखवायचे तुझे वय नाहीये रे....माझ्यापायी तू तुझे बालपण लवकर घालवू नकोस रे...तू हट्ट ह्या वयात नाही करायचे तर कधी करायचे आणि तुझे बाल हट्ट ह्या वयात नाही पुरवायचे तर कधी पुरवायचे रे!!! वयाच्या आधी मोठा नको होऊस एवढेच सांगणे आहे तुला!!!

ह्या गोष्टी तुला समजतील अश्या भाषेत सांगताही येत नाहीयेत...कदाचित तूझा डॅड्डीच कुठे तरी कमी पडतोय...

उद्या पुढे मागे जेव्हा हे आज लिहिलेले पत्र तू वाचशील तेव्हा कदाचित एका अवघडलेल्या बापाची व्यथा तुला समजेल...

तुझ्या डॅड्डीला तुझ्या हक्काचा वेळ तुला न देऊ शकल्याबद्दल आणि तुझे बालपण लवकर संपवायला घेतलंय म्हणून माफ कर !! तुझा डॅड्डी लवकरच तुझ्या सोबत येईल....प्रॉमिस.... अगदी मग जॉब सोडावा लागला तरी...

ह्या वाढदिवशी तुला उदंड आयुष्य लाभो ही कामना देवाकडे करतोय.....देव तुला चांगली बुद्धी आणि चांगले कर्म करायची शक्ती देवो हीच त्या ईश्वराकडे प्रार्थना.

तुझाच लाडका
डॅड्डी
14-12-2016

CONVERSATION

1 comments:

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top