एक अविस्मरणीय अनुभव !!



भिंगरीला तसेच हॉस्पिटलमधून घरी आणले होते. तिच्यावर काही उपचार करताच आले नाही. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिला आता बाळ झाल्यावरच उपाय करता येणार होते. नुसतेच हॉस्पिटलमध्ये ठेवून काय करणार म्हणून तिला डिस्चार्ज देण्यात आला. त्यादिवशी दसरा होता. मराठी तिथीनुसार तिचा वाढदिवस. तिला घरी आणले. केक वगैरे कापून तिचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न केले. पण दुखण्यामुळे ती बेजार झाली होती.

(ही ब्लॉग पोस्ट समजण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी ह्या पोस्ट मागची इथे पार्श्वभूमी जरूर वाचा. तर ह्या पोस्टचा आस्वाद माझ्या जोडीने घेता येईल.)

तिला घरी आणले तेव्हा ऑक्टोबरची सहा तारीख होती व आताशी तिला सातवा महिना चालू होता. तिची डिलीव्हरीची तारीख अंदाजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे तिला कमीत कमी तीन महिने उपचार न करता राहावे लागणार होते. हे पुढील तीन महिने खूप कष्टदायक जाणारे होते. पोटात बाळ असल्याने ह्या काळात तिला खूप खायची इच्छा होत होती तिची भूक वाढत होती. पोटातल्या बाळाचीही भूक वाढत होती. पण तिच्या जबड्याचे ऑपरेशन झाले असल्यामुळे आणि पूर्ण दात व हिरड्यांना तारा व धातूचे चाप (clip) लावल्यामुळे तिला काही खाताच येणार नव्हते. कमीत कमी दोन महिने तिला जल पदार्थ आणि सूप खाऊनच राहावे लागणार होते.

तिचे आणि पोटातल्या बाळाचे हाल बघवत नव्हते. पण तिच्या हातातही काही नव्हते अन आमच्या हातात ही काही नव्हते. जे घडतेय ते फक्त बघत राहणे हाच पर्याय समोर होता. ह्या काळात तिचे मन खूप उदास राहायचे दुखण्यामुळे सारखी रडत राहायची. समजूत काढून तरी किती काढणार? तुझ्या रडण्याने पोटातील बाळावर वाईट परिणाम होतील एवढेच सांगून तिला शांत करता यायचे. होणाऱ्या बाळासाठी ती त्रास सहन करून गप्प राहायची.

पुढच्या तीन महिन्यात चार पाच वेळा तिला लीलावती हॉस्पिटल मधील तिच्या डॉक्टर कडे घेऊन जावे लागले. तिला झालेल्या अपघात आणि तिच्या वर झालेले ऑपरेशन तसेच तिच्या बरगड्यांना झालेले फ्रॅक्चर यामुळे तिला डिलीव्हरीच्या वेळेस होणाऱ्या कळा सहन होणाऱ्या नव्हत्या. प्रसव वेदना सहन करायची तिची मानसिक तयारीही नव्हती. तिचे फ्रॅक्चर बघून तिच्या प्रसुती तज्ञाने (Gynecologist)-डॉ. रंजना धानू-ह्यांनी तिचे इलेक्ट्रोनिक सिजेरीयन करावे लागेल म्हणून सांगितले. डॉ. रंजना धानू ह्या लीलावती मधील नावाजलेली प्रसुतीतज्ञ आहेत. डॉ. रंजनाने आधीच सांगितले होते की तिने आतापर्यंत खूप त्रास सहन केला आहे. त्यात तिला प्रसव वेदना देण्यात अर्थ नाही. त्यामुळे तिच्या जीवाला धोकाही होऊ शकतो. आपण तिची इलेक्ट्रोनिक सिजेरीयन करूयात. त्याने तिला त्रास कमी होईल. शिवाय पोटावर टाकेसुद्धा दिसणार नाही. तिने असेही सुचवले की जर तुम्हाला ह्या हॉस्पिटलचा खर्च परवडणारा नसेल आणि तुम्हाला कुठे दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये जर तिची डिलीव्हरी करायची असेल तर कुठल्याही साध्या हॉस्पिटल मध्ये करू नका तिच्यासाठी मल्टी-स्पेशालिटी - सर्व साधनांनी युक्त असेच हॉस्पिटल निवडा.

कौटुंबिक निर्णयात असे ठरले की तिला आधीच खूप त्रास झालेला आहे त्यामुळे बजेट जरी हलले असले तरी तिच्यावर उपचार हे लीलावती हॉस्पिटल मध्येच करायचे. लीलावती मध्ये २० हजार रुपये जमा (deposit) करायला सांगितले गेले आणि उरलेले पैसे तिच्या ऍडमिशन च्या वेळेला भरायला सांगितले. आम्ही सर्वजण डिसेंबर महिना कधी संपतो ह्याची वाट बघायला लागलो होतो. जानेवारी मध्ये येणाऱ्या नवीन बाळाची आणि तिच्या सही सलामत सुटकेची सर्वाना ओढ लागली होती. डिसेंबरच्या १० तारखेला तिला चेकअप साठी बोलावले होते. तिची अंतर्गत सोनोग्राफी केली गेली. डॉक्टर रंजनाने सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरशी फोनवर बोलून काही तरी बोलणी केली आणि नंतर आम्हाला सांगितले की तिची ह्या आठवड्यात सिजेरीअन करावे लागेल.

आम्ही आश्चर्यचकित होऊन विचारले की, 'आम्हाला तर जानेवारी महिन्याची सात तारीख दिली होती. मग एवढ्या लवकर का ?

डॉक्टर म्हणाले तिचे बाळाचे वजन डिलीवरी योग्य झाले आहे. बाळाने आपली दिशा बदलून डोके खाली केलेले आहे. तिला कधीही प्रसव वेदना चालू होऊ शकतील. रात्रीच्या वेळी अचानक प्रसव वेदना चालू झाल्या आणि जर तुम्हाला गाडी मिळाली तर तुम्ही तिला घरून हॉस्पिटल मध्ये आणेपर्यंत तिला खूप त्रास होऊ शकतो. दिवसा जर प्रसव वेदना चालू झाल्या तर ट्राफिक मधून येईपर्यंत तिला खूप त्रास होईल. तुम्ही पुढच्या आठवड्यातील एखादी तारीख ठरवा मला फोन वर कळवा आणि आदल्या दिवशी तिला हॉस्पिटल मध्ये भरती करा.

अचानक एवढे सांगितल्यामुळे भिंगरी जरा घाबरून गेली. तिच्या साठी २०११ हे वर्ष चांगले नव्हते गेले. तिचा एवढा मोठा अपघात झाला होता. तिच्या आणि बाळाच्या जीवावर बेतले होते. देवाच्या कृपेने दोघेही ठीक होते पण तिला ह्या वर्षात बाळ नको होते. नवीन वर्षात नवीन सुरुवात व्हावी असे वाटत होते. बाळाच्या दृष्टीने सुद्धा त्याचे शाळेत वय लागताना वर्ष २०११ लागणार होते त्यामुळे तिला ते नको होते. तिने डॉक्टरला विचारले सुद्धा की माझी डिलीव्हरी पुढच्या महिन्यात नाही होऊ शकत का? डॉक्टर ने तिला समजावले की ते किती धोकादायक आहे आणि ह्या महिन्यात आणि ह्या आठवड्यातच डिलीव्हरी करण्यास तिला मानसिक रित्या तयार केले.

आता आमच्या कडे एक सुवर्णसंधी चालून आली होती की आमच्या होणाऱ्या बाळाची जन्मतारीख आणि चांगला दिवसवार निवडायची. तो मार्गशीष महिना होता. घरातल्यांनी भटजीला विचारून ही घेतले की कुठला दिवस चांगला आहे. त्यांनी सांगितले मार्गशीष संपेपर्यंत सर्वच दिवस चांगले आहेत. नक्की काय करायचे ते सुचत नव्हते. नोव्हेंबर महिना असता तर ११-११-११ ही तारीख तरी निवडता आली असती. रविवार ते शनिवार कुठला दिवस घ्यावा हा प्रश्न होता. सोमवारी जन्मलेली मुले हट्टी असतात हा अनुभव होता. मंगळवार चांगला होता. त्यादिवशी १३ तारीख होती. जन्मतारीख पण १३-१२-११ आली असती. पण एका खास मित्राचा-जिगरचा जन्मदिवस पण १३ डिसेंबर होता. तो दिवस पण नको होता. बुधवारी १४ डिसेंबर होती. त्यादिवशी संकष्टी होती. गणपतीचा चांगला वार होता. खूप विचारांती तोच दिवस निश्चित केला. पण नेमकी त्या दिवशी डॉक्टरला दुसऱ्या दोन केसेस एक्स्पेक्टेड होत्या. त्यांच्या डिलीव्हरी जर नेमक्या त्या दिवशी आल्या असत्या तर हिची डिलीव्हरी पुढे ढकलावी लागली असती. तसेच डॉक्टर ने ऑपरेशन रूमची उपलब्धता, तिचा रक्तदाब आणि तिची मनाची तयारी ह्या गोष्टी ही महत्वाच्या असतील हे नमूद केले.

साशंक मनाने तिला मंगळवारी संध्याकाळी हॉस्पिटल मध्ये भरती केले. बाजूच्या बेड वर एक मुसलमान स्त्री होती. तिचे तिसरे बाळ जन्मणार होते. तिला प्रसुती वेदना चालू झाल्या होत्या आणि ती भयंकर किंचाळत होती, रडत होती, नर्सेस, डॉक्टर कोणाचेच ऐकत नव्हती. जे हातात भेटेल ते फेकून देत होती. त्यामुळे भिंगरी अजूनच घाबरून गेली. रात्री पावणे एकच्या सुमारास बाजूच्या बाईला लेबर रूम (प्रसुती करण्याची खोली) मध्ये घेऊन गेली आणि तिच्या रूम मध्ये शांतता झाली. पण पुढील पंधरा मिनिटातच तिला बाळ झाले आणि तिला परत रूम मध्ये आणले गेले. ती बाई शांत झाली होती पण तिच्या बाळाने रडणे चालू केले होती. भिंगारीला रात्रभर झोप लागलीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता ऑपरेशन थियेटर उपलब्ध झाले होते. तिला सकाळीच बरोबर पावणे नऊला एक सलाईन लावून आणि एक इंजेक्शन देऊन आत मध्ये घेऊन गेले. ती जायच्या आधी पोटाला मिठी मारून घेतली कारण आता वर आलेले पोट दिसणार नव्हते...बाळ बाहेर येणार होता.

तिला स्ट्रेचर वर घेऊन जाण्यापूर्वी आम्ही दोघेही खूप खुश होतो पण जशी तिला लेबर रूम मध्ये घेऊन गेले तसे मन उदास झाले. मनात एक भीतीचे तरंग उठून गेले. ती पण रुममध्ये आत जाईपर्यंत हात घट्ट पकडून होती. जाताना पण तिच्या मनावरची भीती आणि डोळ्यातले पाणी स्पष्ट दिसत होते. तिचे ऑपरेशन यशस्वी होईल ना! बाळ चांगले असेल ना ! अपघाताचे आणि उपचारांचे काही परिणाम तर नसतील ना झाले त्या बाळावर ? खूप शंका मनात डोकावत होत्या आणि मन उगाच कासावीस होत होते. धमण्यातील रक्त जोरात पळू लागल्याचे जाणवू लागले होते. अंगावर काटे उभे राहत होते. हृदयाची धडधड वाढू लागली होती त्यांच्या ठोक्याच्या आवाज स्वत:च्या कानांना जाणवू लागला होता. आजूबाजूचे जग विसरून गेल्यासारखे झाले होते. समोर धावपळ करणारे नर्सेस, डॉक्टर दिसत होत्या पण मनापर्यंत पोहचत नव्हत्या. एक वेगळीच समाधी लागत होती. मनातले सगळे वाईट विचार बाजूला केले आणि लेबर रुमच्या बाहेर उभे राहून बाप बनण्याचा आनंद घ्यायला सुरुवात केली. मुलगा होणार की मुलगी? दोघांसाठी नावे ठरवून ठेवली होती. कोणीही झाले असते तर आनंदच होणार होता. भिंगरीला मुलगा हवा होता. तिने देवाला त्या साठी खूप मस्के मारले होते. मला कोणीही चालले असते. फक्त बाप बनण्याचा आनंद उपभोगायचा होता. बस्स!!! स्व:ताच्या रक्तामांसाच्या गोळ्याला मिठीत घ्यायचे होते. जसे घड्याळाचे काटे पुढे सरकत होते तशी धडधड अजून वाढत होती.

डॉ रंजनाला मदत करायला अजून एक डॉक्टर येणार होता. त्याला दुसऱ्या पेशंटची इमर्जन्सी आल्याने यायला एक तास उशीर लागला. सव्वा दहा वाजता तो डॉक्टर आला. तोपर्यंत जीव कासावीस व्हायला लागला होता. कधी एकदा ऑपरेशन होते आणि बाळाची व बायकोची सुटका होतेय असे झाले होते. मागच्या भेटीत तिने डॉ. रंजनाला विचारले होते की ऑपरेशन च्या वेळेस माझ्या नवऱ्याला सोबत घ्याल का? तिने त्या वेळेस बघू असे सांगून उत्तर द्यायचे टाळले होते. आज ती यायच्या आधी तेथे असलेल्या डॉक्टरांना तिने मलाही ऑपरेशन थियेटर मध्ये घेऊन जाण्यासाठी हट्ट केला होता. पण डॉक्टरांनी तिला नाही म्हणून सांगितले. साडे दहा वाजता डॉ रंजना आल्या. ऑपरेशन थियेटर मध्ये जाण्याआधी त्यांनी मला भेटून काही घाबरायची गरज नाही सर्व ठीक होईल म्हणून सांगितले. मी त्यांना बाळाच्या जन्माची बरोबर वेळ नोंदवायला सांगितली त्यांनी 'हो नक्कीच!' असे म्हणून ऑपरेशन थियेटर मध्ये निघून गेल्या. त्या तश्याच उलट पावली बाहेर आल्या नी म्हणाल्या, तुम्हाला ही यायचे आहे का ? बाळाचा जन्म बघायला.?

मला हे अनपेक्षितच होते. काय बोलायचे सुचलेच नाही. मी म्हटले, 'मी आलो तर चालेल का?'

डॉक्टर म्हणाल्या, 'ते मी बघेन, पण तुम्हाला रक्त वगैरे बघून किंवा वासाने चक्कर वगैरे येणार नाही ना!'

मी म्हटले,' माहित नाही, आधी कधी असे झाले नाही'

(तसे मागे काही वर्षापूर्वी एकदा रक्त तपासायला गेलो होतो तेव्हा सुईने रक्त काढून घेतल्यावर रक्त बाहेर आले होते. ते बघून चक्कर आली होती.डॉक्टर ने काही तरी प्यायला दिले होते म्हणून चक्कर येऊन पडलो नाही)

डॉक्टर म्हणाल्या, 'मग तुम्ही आत या.'

मी माझ्या सोबत असलेल्या कुटुंबियांना सांगून आत गेलो. तिथे असलेल्या नर्सने परत बाहेर हाकलले व म्हणाली तुम्ही आत कसे आलात. आत मध्ये यायला परवानगी नाही. मी म्हणालो, 'मला डॉ रंजनाने यायला सांगितले आहे'. ती म्हणाली,'असे तुम्ही येऊ शकत नाही.तुम्ही बाहेर थांबा. मी विचारून सांगते.

मी काय करणार बाहेर येऊन थांबलो.

अर्ध्या तासाने त्याच नर्सने आतमध्ये यायला सांगितले. म्हणाली तुम्हाला डॉ. रंजना आतमध्ये बोलवत आहे. मी तिच्याकडे थोडे रागाने बघून बोललो. 'मग तुम्हाला आधीच सांगितले होते.....तुम्ही शहाणपणा करत होतात.' अर्थात हे सगळे मनातच बोललो. चेहऱ्यावर खोटे हास्य आणून तिला धन्यवाद म्हणालो. ती म्हणाली तुमचे मोबाईल, घड्याळ, पर्स सगळे बाहेर ठेवून या. परत बाहेर येऊन सगळे काढून ठेवून आत गेलो. मला तिने अंगावरचे सगळे कपडे काढून डॉक्टर वापरतात ते कपडे घालायला सांगितले. तोंडाला लावायला आणि केसांना घालायला मास्क दिला. मी तिची परवानगी घेऊन घड्याळ घालूनच ठेवले. बाळाचा जन्मवेळ बघायचा होता.

तिने मला विचारले, 'रक्त बघून चक्कर नाही ना येणार.? मी मानेनेच नाही बोललो.

कपडे घालून झाल्यावर ती ऑपरेशन थियेटर मध्ये घेऊन गेली. जवळपास आठ ते नऊ डॉक्टर घाई गडबडीत आपापले काम करण्यात गुंग होते. भिंगरीला अनेस्थेशिया दिला होता. त्यामुळे पोटापासून पायापर्यंत सर्व भाग बधीर झाला होता. पण ती बेशुद्ध नव्हती. तिचा आणि तिच्या बाळाचा आंतरिक संपर्क तुटू नये म्हणून तिला पूर्ण बेशुद्ध केले नव्हते. तिच्या पोटावर लग्नात एक अंतरपाट धरतात तसा हिरवा जाड फडका किंवा चादर धरली होती. त्यामुळे तिला आपल्या पोटावर काय करतात ते दिसत नव्हते. तिला अनेस्थेशिया देणारी डॉक्टर तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूस उभी होती. तिथेच एक छोटे लोखंडी टेबल ठेवले होते व तिने मला खुणेनेच बसायला सांगितले.

त्या अनेस्थेशिया देणाऱ्या डॉक्टर ने मला परत विचारले, 'ठीक आहे ना !! चक्कर नाही ना येत आहे.

मी तसे अजून काही बघितलेच नव्हते. त्या हिरव्या कपड्या मागे काय चाललेय ते अजून दिसत नव्हते त्यामुळे मी सांगितले, 'मी ठीक आहे.'

मला आत आलेले बघून भिंगरी खुश झाली आणि तिचा चेहरा हसरा झाला. ते बघून सगळे डॉक्टर तिला चिडवायला लागले, हम्म नवऱ्याला बघून बघा आता कशी खुश झालीय. इंजेक्शन देताना कशी रडायला आली होती.' हे सगळे तिचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी होते ते समजत होते. पण ती खुश झाल्यामुळे बहुतेक रक्त दाब नॉर्मल झाला. तिला ऑपरेशनला घेतल्यावर बहुतेक तिने डॉ रंजनाला परत माझ्याबद्दल विचारणा केली असल्यामुळे मला अर्ध्या तासाने परत बोलावले गेले होते.

मी जाईपर्यंत डॉक्टरने तिच्या पोटावर काप मारून गर्भ पिशवी मोकळी करायला सुरुवात केली होती. मी गेल्यावर पाचच मिनिटात तिने इतर डॉक्टरांना विचारले, 'Now, are you ready?' (तुम्ही बाळाला बाहेर काढायला तयार आहात का?) सर्व डॉक्टरांनी हो म्हटल्यावर सर्वांनी तिच्याभोवती घोळका केला. भिंगरीचे अंग जोरजोरात हलु लागले. तिने माझा हात घट्ट पकडला. तिच्या डोक्याच्या मागच्या बाजूस असणारया डॉक्टरने एक... दोन ....तीन करत तिच्या छातीपासून पोटाकडे खालच्या बाजूला धक्का द्यायला सुरुवात केली. धक्का देता देता तिने मला विचारले तुम्हाला बघायचे आहे का बाळाला बाहेर येताना?? पण चक्कर येणार नसेल तर.?

('हा प्रश्न ऐकूनच मला चक्कर येणार आहे बहुतेकच' अर्थातच मनातल्या मनात पुटपुटलो.)

'हो मला बघायला आवडेल. ती म्हणाली ठीक आहे तुम्ही उभे राहा. पण जर चक्कर सारखे काही वाटले तर सरळ बाहेर जाऊन बेड वर झोपून घ्यायचे.' मी म्हटले, 'ठीक आहे.'

मी उठलो, एसी मध्ये असून सुद्धा घाम फुटायला लागला होता. मी बाप होणार होतो. आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण बघणार होतो. काय असेल मुलगा की मुलगी.??? थरथरत्या हाताने पडदा थोडा खाली करून बघितले. तिच्या अंगावर सफेद चादर होती. आणि पोट पूर्ण उघडे होते. पोटावर बेंबीच्या खूप खाली आडवा काप मारला होता. पोटाला आणि अंगावरच्या चादरीला खूप रक्त लागले होते. सर्व डॉक्टरांचे हॅँडग्लोवज रक्ताने माखले होये. मन घट्ट केले. तिचा हात घट्ट पकडला. डॉ रंजनाने आवाज दिला. चलो रेडी!!!. तिने पोटावरचा काप अजून फाकवून बाळाचे डोके बाहेर काढायला सुरुवात केली. रक्तात पूर्णपणे माखलेल्या बाळाचे डोके तिने दोन्ही हातात धरून हळू हळू बाहेर काढले आणि थोडा वेळ थांबली. गर्भापिशवीत असलेल्या पाण्यामुळे बाळ पूर्ण पांढरा फिक्कट झाला होता. त्याला बाहेर काढल्यावर अंगावरचे पाणी लगेच सुकून गेले आणि रक्ताच्या छोट्या छोट्या गाठी डोक्यावर, कुरळ्या केसांवर राहिल्या. मग बाजूच्या सर्व लेडीज डॉक्टरांनी तिच्या पोटाला सगळीकडून दाबायला सुरुवात केली. त्या बाळाला बाहेर यायला मदत करत होत्या. डॉ रंजनाने बाळाचे डोके दोन्ही हातात घट्ट पकडले आणि त्याला हळू हळू बाहेर खेचायला सुरुवात केली. बाळाचे खांदे बाहेर आले. पाठ दिसू लागली.

त्याचे लाल रक्तात माखलेले अंग बाहेर येत होते आणि बाहेरच्या हवेवर ते सगळे सुखून बाळाचे अंग पांढरे फिक्कट पडत होते. पाठ बऱ्यापैकी बाहेर आल्यावर बाळाने पहिला ओंवा ओंवा चालू केले. त्याला पार्श्वभागावर फटके मारायचे गरजच नाही पडली. (वाचला बिचारा डॉक्टर नाहीतर माझ्या बाळाला फटका मारला म्हणून माझा मारच खाल्ला असता) मग डॉ रंजनाने परत त्याची मान दोन्ही हातात पकडली दुसऱ्या डॉक्टरने खांद्या खाली हात घालून हळू हळू बाळाला बाहेर खेचले. हे सर्व करताना त्याचे तोंड माझ्या विरुद्ध दिशेला होते. त्यामुळे त्याचा चेहरा दिसू शकला नाही. मला बाळाचे प्रथम मागचे डोके, नंतर पाठ नंतर पार्श्वभाग आणि नंतर पाय दिसले. पिशवीतल्या पाण्याने पूर्ण पांढरा फिक्कट झाला होता. बाहेर आल्यावर थंडी ने गारठून त्याने जोरजोरात रडायला सुरुवात केली.

जसे त्याचे पाय पूर्ण बाहेर आले. तसे सर्व डॉक्टर एका सुरात ओरडले, "Congratulations!!!". बाळाला बघून इतका आनंद झाला होता की आपोआप तोंडातून 'Thank you' बाहेर पडले. जसे बाळ पूर्ण बाहेर आले तसे मी हातातल्या घड्याळात किती वाजले ते बघितले. अकरा वाजून १ मिनिटे.(आज तक चा टाईम) पण तिथे आधीच एक मोठे डिजिटल घडयाळ भिंतीवर लावले होते. आणि एक डॉक्टर खास तिथेच उभी होती फक्त बरोबर टाईमिंग बघायला. तिथेच भिंतीवर बोर्ड होता तिथे आम्हा दोघांचे नाव लिहिले होते. वय लिहिले होते. आणि बाळाच्या जन्माच्या तारीख व वेळे साठी जागा होती. त्यांचा घड्याळाप्रमाणे बरोबर ११ वाजून १ सेकंद झाला होता. तो टाईम लगेच तिने बोर्ड वर लिहिला. मी म्हटले ठीक आहे त्यांचे टाईमिंग बरोबर असणार. सकाळी अकरा वाजून एक सेकंद.

बाळाला बाहेर काढल्यावर त्याला बालरोग तज्ञ कडे हवाली करण्यात आले. आणि बाकीचे डॉक्टर तिच्या पिशवीतले इतर पाणी बाहेर काढायच्या मागे लागले. डॉ रंजनाने इतर डॉक्टरांना पटापट करण्यास सूचना दिली व पोट लवकर टाके घालून शिवण्यास सांगितले. मला खाली बसायला सांगितले गेले. पहिल्यांदाच मनुष्याच्या पोटात बघितले होते, पहिल्यांदाच बाप झालो होतो, पहिल्यांदाच बाळाचा जन्म बघितला होता. मी खाली बसलो. बायकोचा हात घट्ट पकडून तिचे अभिनंदन केले. पण आम्हा दोघांना काही समजत नव्हते की आम्हाला मुलगा झालाय की मुलगी? बाजूला असलेल्या लेडी डॉक्टरला आम्ही विचारले तिला पण समजले नाही. ती म्हणाली थांबा सांगते विचारून.

बालरोग तज्ञाने तिकडूनच आवाज दिला. की बाळ चांगले धडधाकट आहे. सव्वा तीन किलो वजन आहे. त्याचे वडील हवं असेल तर ५ मिनिटांनी इथे येऊन बघू शकतात. आमच्या बाजूच्या डॉक्टरने विचारले अरे मुलगा की मुलगी. तो म्हणाला, अगं मुलगा आहे. माझ्यापेक्षा बायको खुश झाली. तिला मुलगा पाहिजे होता. मागच्या संकष्टीला तिला स्वप्न पडले होते की तिला मुलगा झाला आहे आणि ह्या संकष्टी ला तिला मुलगा झाला होता. 

बालरोग तज्ञ निघताना मला सांगून गेला की तुम्ही आता बाळाला बघू शकतात. माझे हातपाय आनंदाने थरथरत होते. मी बाळा जवळ गेलो. त्याला गरम हवा येणाऱ्या हिटरखाली ठेवले होते. हिरव्या रंगाच्या कपड्यात गुंडाळले होते आणि तो ओंवा ओंवा करून रडत होता. त्याचा सुंदर चेहरा बघून माझ्या अंगावर सरासरीत काटा येऊन गेला.

सर्वप्रथम हिरव्या चादरीतून बाहेर आलेले त्याचे पाय दिसले. सुंदर नाजूक गोरे गोरे पाय. रडण्या बरोबर थरथरत होते. डोळे अजून चिकटलेलेच होते. तसेच डोळे बंद करून तो रडत होता. रडता रडता डोळे उघडायचा प्रयत्न करत होता. पोटात असलेल्या अंधारामधून एकदम बाहेर आल्यावर डोळ्यावर पडणारा उजेड अजून सहन होत नव्हता. पण तरी सुद्धा डोळे उघडायचा प्रयत्न करत होता आणि ते होत नव्हते म्हणून परत रडत होता. पहिली नर्स (जीने मला बाहेर हाकलले होते.) माझ्याजवळ आली आणि म्हणाली तुम्ही हवे तर तुमचा कॅमेरा आणून फोटो काढू शकता पण फ्लॅश वापरू नका. 'मी ठीक आहे' म्हणून बाहेर गेलो व कॅमेरा घेऊन आलो.

माझ्या बाळाचे फोटो काढले. त्याचे पहिले रडणे रेकोर्ड केले. त्याची डोळे उघडायची पहिली लढाई पहिली. भले त्याच्या आईने त्याला नऊ महिने त्याला पोटात ठेवले असेल. पण ह्या जगात त्याचे स्वागत मी केले. आईच्या आधीही मला त्याला बघायला मिळाले. त्याची पहिली कृती रडणे आणि डोळे उघडणे हे मी स्वत: त्याच्या जवळ राहून अनुभवले. इथे लावलेला हा व्हिडीयो पहा.




हा आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण होता. एवढा आनंद दहावी, बारावी पास झाल्यावर झाला नव्हता की नोकरीत कायम झाल्यावर सुद्धा झाला नव्हता. अगदी लग्नाआधी बायकोला प्रेमाची मागणी केल्यावर तिचा होकार आला होता त्याच्यापेक्षा ही आनंद नक्कीच जास्त होता. सहसा हे सुख आईच्या नशिबी जास्त येते. बाळाचे जन्म त्यांच्या शरीरातून होत असल्यामुळे त्यांना बाळाचे पहिले दर्शन होते. पहिला आवाज त्या ऐकतात. पण माझ्या नशिबाने तो आनंद मलापण अनुभवायला मिळाला. अगदी त्याच्या आईच्या आधीसुद्धा मला त्याला बघायला मिळाले हेच माझ्यासाठी खूप महत्वाचे होते.

परदेशात स्त्रीला डिलीव्हरी करायच्या वेळेस तिच्या नवऱ्याला घेऊन जातात. आपल्याकडे अजून तो ट्रेंड आला नाही आहे. काही मोठ्या मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नवऱ्याला बायकोच्या डिलीव्हरीच्या वेळेस ऑपरेशन थियेटर मध्ये परवानगी देतात. पण अजून म्हणावी तशी ही पद्धत प्रचलित झाली नाही आहे. माझ्या मित्राची बहिण परदेशातच स्थायिक आहे तिची डिलीव्हरी परदेशात झाली होती. तिच्या नवऱ्याला पण तिच्या डिलीव्हरीच्या वेळेला लेबर रूम मध्ये घेऊन गेले होते. तिथे मुलगा होणार की मुलगी हे आधीच समजले जाते. तिथे गर्भलिंगनिदान सरकारमान्य आहे. कारण तिथे आपल्या सारखे स्त्री भ्रुण हत्या होत नाही. इतकेच काय बाळाचे नाव ही त्यांना आधीच ठरवून हॉस्पिटल मध्ये सांगावे लागते. बाळाच्या आईला जेव्हा हॉस्पिटल मध्ये भरती केले जाते तेव्हा बाळाच्या नावाने सुद्धा फॉर्म भरला जातो. बेड (पाळणा) बुक केला जातो. बाळ जन्मल्यावर आई नॉर्मल होई पर्यंत बाळाला वेगळ्या खोलीत ठेवले जाते. पाच दिवस बाळ हॉस्पिटलच्या ताब्यात असते. हे करण्यामागचा उद्देश्य असा की त्याला कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये. फक्त दोन /तीन तासाच्या अंतराळाने आई ला भेटायला व अंगावरचे दुध भरवायला आईकडे आणले जाते. परत त्याला बाळांच्या रूम मध्ये ठेवले जाते. बाळ अदलाबदली होऊ नये म्हणून त्याच्या पायाचे ठसे घेऊन ते कॉम्पुटर मध्ये रजिस्टर केले जातात. वडिलांना पण काचेतूनच बघायला मिळते.

पण नशीब आपल्याकडे ते एक चांगले आहे. बाळाचा जन्म झाल्यावर बाळ जर नॉर्मल असेल तर त्याला अर्ध्या एक तासात त्याच्या आई वडिलांकडे सोपवले जाते. नाहीतर पाच दिवस बाळाला फक्त बंद दरवाज्यातून बघत राहायचे म्हणजे खूप त्रास झाला असता. ती ताटातूट सहन नसती झाली. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे आपल्या इथे गर्भलिंगनिदान होत नाही (म्हणजे अधिकृतरीत्या तरी) त्यामुळे लेबर रुमच्या बाहेर राहून आता मुलगा होणर की मुलगी होणार हा आनंद, त्यातली भीती, चिंता काळजी आणि एक अनामिक ओढ हे सर्व सर्व काही अनुभवता येते. त्या ज्या काही भावना, उत्कंठा असतात त्या अवर्णनीय असतात.

बायकोला पुढे लीलावती हॉस्पिटल मध्ये सहा दिवस ठेवले होते. मी सुद्धा सहा दिवस हॉस्पिटल मध्येच राहिलो होतो. जेवण,राहणे, अंघोळ सर्व काही हॉस्पिटलमध्येच होते. पुढील सहा दिवसात कमीत कमी १२ ते १५ डिलीव्हरी झाल्या होत्या पण त्यातील कोणालाच लेबर रूम मध्ये बोलावले नव्हते. मलाच कसे बोलावले ते आश्चर्य आहे. कदाचित भिंगरीला झालेल्या अपघातामुळे आणि तिने सहन केलेल्या त्रासामुळे डॉक्टरांनी मला आत मध्ये यायला परवानगी दिली असेल.

काहीही असो, डॉ रंजना मुळे मला आयुष्यातला एक सुंदर आणि दुर्मिळ अनुभव घेता आला. माझ्या मुलाचा जन्म होताना, त्याला या जगात येताना, पहिल्यांदाच रडताना, पहिल्यांदा इवलेसे डोळे उघडून या जगाला बघताना ह्या सर्व गोष्टींचा अनुभव जवळून घेता आला. काही मुली गर्भार असताना अगदी पाय पडून घसरल्यामुळे, किंवा गर्दीत पोटाला धक्का लागून गर्भपात झालेल्या बघितल्या आहेत. पण भिंगरीचा एवढा मोठा अपघात होऊन ती जवळपास १० फुट हवेत उडून रस्त्यावर तिच्या तोंडावर पडली, हनुवटी फुटली, मल्टीपल फ्रॅक्चर झाले पण तरी सुद्धा तिच्या पोटातल्या बाळाला काही झाले नाही. तो सहीसलामत या जगात आला, कदाचित पुढे येणारे दु:ख तो आधीच भोगून सर्व मागचे पुढचे हिशोब चुकता करून आला. एवढ्या मोठ्या अपघात आणि मृत्यूच्या चक्रव्यूहातून त्याने स्वत:ला आणि त्याच्या आईलाही वाचवले. कोण आहे तो? अश्या शूर बाळाचे नाव काय ठेवले पाहिजे?


CONVERSATION

8 comments:

  1. wachun bharawale ani nishabdda zale..

    ReplyDelete
  2. मस्त अनुभव आहे रे तुझा. आणि व्हिडीओ सुद्धा मस्तच आहे.
    साला सामान्य माणसाला जर एवढ भोगावं लागलं असतं तर तो टेन्शन घेऊन मेला असता.

    जेव्हा शार्दूल चा जन्म झाला त्या वेळी शीतलला अठवा महिना चालु होता. ती जनरल चेकअप ला गेली होती आणि डॉक्टरांनी तिचा बिपी चेक केला तर खूप उच्च होता. डॉक्टरांनी लगेच मला फोन करून बोलावून घेतलं.
    ते म्हणाले लगेच सिजेरीअन कराव लागेल आणि बिपी खली नाही आला तर आईला किवा बाळाला धोका होवू शकतो असं म्हणाले. दुपरी एक ते आठ पर्यंत बिपी खाली येण्याची वाट पहिली. शेवटी जनरल अनेस्थेशिया देऊन शस्त्रक्रिया करायचं ठरलं. त्यांनी माझ्याकडून फोर्म पण भरून घेतला की काही वाईट झालं तर हॉस्पिटलला जबाबदार धरता येणार नाही. मी सुद्धा घाबरलो होतो पण ओपेरेशन च्या वेळी बिपी थोडा खाली आला (कदाचीत डॉक्टरांची चालबाजी असेल, पण त्यावेळी आपल्या हातात काही नसत रे) त्यामुळे स्पायनल अनेस्थेशिया देऊन सेजेरीअन केलं. जीव भांड्यात पडला.
    मला पण माझ्या बाळाच्या वेळी लेबर रूम मध्ये जायची इच्छा होती पण संकोच मुले मी डॉक्टर ला विचारल नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मिलिंद...
      तुझा अनुभव शेअर केल्याबद्दल सुद्धा धन्यवाद..

      Delete
  3. धन्यवाद चेतना..

    ReplyDelete
  4. बाळाचा जन्म हा बापासाठीही कितीमहत्वाचा असतो असतो आणि तो डबडबलेल्या डोळ्यांनी कसा भिरभिरा होतो याचा अनुभव मिही घेतली आहे. हा सगळा भाग खुपच छान जमला आहे. सुखांत झालाय हे महत्वाचं. मागचा भाग वाचताना विचित्र भावना जमा झाल्या होत्या. दु:ख, चीड, हताशपणा जाणवून गळा भरून आला होता. आधी वाटलं हे सगळं काल्पनिक आहे........आता सत्याच्या जवळ आल्यावर अजून गलबलून येतंय....खूप सांगायचंय पण शक्य होईल असं वाटत नाही.....असो. फ़िल्मी आहे पण खरंही आहे, अच्छे लोगों के साथ अच्छा होता है. अजून काय बोलू?

    ReplyDelete
    Replies
    1. बापरे !!! एवढ्या मिश्र प्रतिक्रिया ऐकून मला भरून पावले...धन्यवाद आमची कथा पूर्ण वाचून कमेंट केल्याबद्दल..

      Delete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top