खेळ मांडियेला...


नेहमीप्रमाणे  भिंगरी सकाळी लवकरच उठली होती. ऑफिसचा डबा बनवायचा होता. दहा पंधरा मिनिटे किचनमध्येच बसून राहिली काही सुचतच नव्हते करायला. मनावर एक मळबट आल्यासारखे वाटत होते. खूप रडावेसे वाटत होते तिला. काही करायचा मूड होत नव्हता. काहीतरी वेगळेच वाटत होते. तशीच परत बेडरूम मध्ये गेली. भोवरा चादर ओढून मस्त झोपला होता. तिने जाऊन चादर ओढली आणि त्याला उठवायचा प्रयत्न केला. भोवऱ्याने डोळे किलकिले करून पहिले, आताशी सव्वा सहाच वाजले होते, तो झोपेतच म्हणाला, अग अजून अर्धा तास आहे. का लवकर उठवते आहेस? भिंगरी म्हणाली, 'आज मला कामावर जायचा मूड नाही आहे, कंटाळा आला आहे, मी डबा पण नाही बनवणार'. भोवरा बोलला, 'अगं! तुला कोणी सांगितले आहे हे सर्व करायला. आज सुट्टी टाक आणि झोप मस्तपैकी, टीवी बघ, आराम कर. मला पण डबा वगैरे काही नको. मी जेवेन बाहेर.'

ती बोलली, 'तू पण राहा ना माझ्याबरोबर एकट्याला कंटाळा येतो फार.'

तो बोलला, 'अगं मला खूप काम आहेत ऑफिस मध्ये....मला नाही सुट्टी टाकता येणार.'

ती बोलली, 'तू जर सुट्टी घेणार नसशील तर मी पण नाही घेणार. मला एकटे नाही राहायचे आहे. एकदा ऑफिस मध्ये गेले कि काही वाटत नाही. अशी तशी आपल्याला बाळ झाल्यानंतर सुट्टी पाहिजेच आहे ना ! तेव्हा सुट्ट्या कमी नको पडायला.' असे म्हणत तिने आपल्या पोटावरून हात फिरवला.

तो बोलला, 'ठीक आहे! पण आता तरी झोप ये. अजून अर्धा तास आहे. माझी झोप घालवू नकोस.'

असे बोलून त्याने तिचा हात पकडून तिला जवळ खेचून घेतले. तीही मग त्याच्या कुशीत विरघळून गेली. त्याला घट्ट मिठी मारत ती त्याच्या कानात कुजबुजली. मला ना आज कसे तरीच होतेय. खूप रडावेसे वाटतेय. त्याने विचारले, असे का वाटतेय. बरं नाही वाटत आहे का ?

ती बोलली, 'नाही रे असे काही नाही....पण असच काही तरी वेगळे वाटतेय. खूप उदास झाल्यासारखे.'

त्याने तिची मिठी घट्ट करत तिच्या पाठीवर हात फिरवत तिला समजावले, 'अगं! असे निगेटिव्ह विचार करू नको, तुझ्या पोटात आपले बाळ आहे. तू रडलीस कि तो पण रडणार. मला रडका बाळ नकोय. तुला आता सहावा महिना चालू आहे ना! आपले बाळ ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असणार.' तिनेही हुंकार भरला व त्याच्या कुशीत तोंड खुपसून झोपून घेतले.

पाऊन तासाने भोवऱ्याला अचानक जाग आली. घड्याळात बघितले तर पावणे सात वाजून गेले होते. उठायला उशीर झाला होता. आज त्याला ऑफिसला जायची बस चुकवायची नव्हती. त्याने भिंगरीला आपल्या मिठीतून बाजूला केले आणि उठायचं प्रयत्न केला. भिंगरी ने झोपेतच त्याचा हात पकडला आणि म्हणाली, 'आज नको ना जाऊ ऑफिसला.' भोवऱ्याने तिच्या केसावरून हात फिरवून तिला परत समजावले.'अगं! तुला नसेल जमत तर नको ना जाऊ, मला गेले पाहिजे ऑफिसला....खूप काम आहे.' बोलता बोलता त्याने तिच्या हातातून आपला हात सोडवून घेतला आणि अंघोळीला निघून गेला.

आंघोळ करून बाहेर आला तरी भिंगरी झोपली होती. सहसा ती एकदा उठल्यावर परत कधी झोपत नसे, पण आज झोपली होती. त्याने तिला हाक मारून ऑफिसला नक्की जात नाही आहेस ना, असे विचारले. तशी ती ताडकन झोपेतून उठली आणि म्हणाली, 'नाही नाही !मी घरात नाही थांबणार, मी जाते ऑफिसला एकदा गेले कि काही वाटत नाही. कंटाळा पण येत नाही. भोवऱ्याने सुट्टी घेण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ.

तिने अंघोळ उरकून दोघांसाठी चहा टाकला आणि शेंगदाण्याची लाल तिखट घालून बनवलेली सुखी चटणी बनवायला घेतली. भोवरयाने विचारले काय करतेस म्हणून. तर ती म्हणाली, 'अरे ऑफिस मध्ये काही खाण्यासारखे नसते म्हणून चटणी बनवतेय. ऑफिस मधून फक्त चपाती घेतली कि झाले. आणि सॉरी रे तुझ्यासाठी आज काही नाही बनवले. आज खूप कंटाळा आला आहे.'

भोवरा म्हणाला, 'अगं चालेल ना एवढे काय टेन्शन घेतेस त्याचे. मी एक दिवस बाहेर जेवण करेन.' चहा पिऊन आणि देवाच्या पाया पडून दोघे निघाले. बाईक वरून बस स्टॉप पर्यंत जाताना भिंगरीने भोवऱ्याला घट्ट मिठी मारून पाठीवर डोके ठेवून पडून राहिली. त्याने तिच्या हातांवर अलगद थोपटले आणि विचारले काय गं! बरं वाटतेय ना तुला? का तुला परत घरी सोडून येऊ?

नाही रे! जाईन मी...फक्त कंटाळा आलाय त्यामुळे थोडे थकल्यासारखे वाटतेय.

बघ विचार कर नाहीतर अर्ध्या वाटेवर उतरून तुझ्या माहेरी जा. ते वाटेतच लागते ना...उगाच अंगावर काढू नकोस..... बाळाला त्रास होईल.

ठीक आहे बघू....मी बस मध्ये बसल्यावर विचार करते. वाटले तर मध्ये उतरेन आणि आई बाबांकडे जाईन.

तिला त्याने एसी बस स्टॉप वर उतरवले. भोवरयाने पुलाखाली बाईक पार्क केली आणि परत तिच्या जवळ आला आणि समजावले.

दोघे बसची वाट बघत उभे राहिले. तिच्या स्टॉपवर दोन तीनच माणसे होती. तिने चौकशी केली तेव्हा समजले कि तिची नेहमीची पावणे आठ ची बस नुकतीच निघून गेली होती. ते दोघे तर नेहमीच्या वेळेवर आले होते पण आज बस लवकर निघून गेली होती. दुसरी बस सव्वा आठ वाजता होती.

भोवऱ्याची बस वेळेवर आली. भिंगरी ने सांगितले कि तू जा तुझ्या कामाला. मी १० मिनिटे थांबून बघते....बस आली तर ठीक...नाहीतर मी घरी जाईन.

भोवर्याने तिचा हात हातात घट्ट दाबून तिला तिची आणि बाळाची काळजी घ्यायला सांगितली. बस मध्ये चढताना सुद्धा तो सर्वात शेवटी चढला. बस चालू होई पर्यंत दरवाज्यात उभा राहून तिला हात हलवून टाटा करत होता. तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे आणि पोटात असलेल्या बाळाकडे मन भरून पहिले. तोपर्यंत बस पुढे सरकली आणि भिंगरी त्याच्या नजरेआड झाली. त्यालाही समजले नाही त्याने तिला असे मन भरून का पहिले?

१० मिनिटाने भिंगरीने फोन केला, कि अजून बस नाही आली, मला उभे राहायला होत नाही आहे. खूप थकवा येतोय. भोवरा म्हणाला, मी उतरून मागे येऊ का ?

भिंगरी म्हणाली, नको! तुला ऑफिस ला जायला परत उशीर होईल मी वाट बघते अजून. तेव्हढ्यात तिला समोरून बस येताना दिसली पण ती बस फिरून जाणारी होती. भिंगरी म्हणाली की त्या बस ने गेले तर मला खूप उशीर होईल. मी नेहमीच्या बसचीच वाट बघते. असे म्हणून तिने फोन ठेवून दिला.

थोड्या वेळाने तिला त्याच मार्गावरून जाणारी बस मिळाली. इकडे भोवरा ऑफिस मध्ये पोचला. दोघेही एकमेकांना ऑफिसला पोहोचले कि फोन करून सांगायचे....खुशाली घ्यायचे.

नेहमीप्रमाणे फोन आला नाही म्हणून ९.३५ ला भोवऱ्याने फोन केला. भिंगरी म्हणाली, मी अजून उतरली नाही. बस मध्येच आहे. दोन स्टॉप आहेत अजून. मी तुला ऑफिस मध्ये पोचल्यावर फोन करते. भोवऱ्याने फोन ठेवून दिला.

९.४५ ला भोवऱ्याला घरून फोन आला. भोवऱ्याने फोन उचलला. समोर भोवऱ्याचे वडील होते. ते सहसा कधी फोन वर बोलत नाही. भोवऱ्याला आश्चर्य वाटले. त्याने विचारले काय झाले? वडिलांनी विचारले, तू कुठे आहेस? भोवरा बोलला, मी ऑफिस मध्ये आहे.का काय झाले? वडील बोलले, 'तू आत्ताच्या आत्ता निघ आणि गुरुनानक हॉस्पिटलला जा. तिला (भिंगरीला) हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले आहेत. ती कुठेतरी पडली आहे. 
त्याने विचारले, 'तुम्हाला कसे समजले? तुम्हाला कोणी सांगितले?' ते म्हणाले, 'एका मुलाचा फोन आला होता. त्याने सांगितले..... तू निघ लवकर.' असे म्हणून पुढे काही बोलायच्या आताच त्यांनी फोन ठेवून दिला.

भोवऱ्याला कसेतरीच झाले. नेमके काय झाले असावे? भिंगरी कुठे पडली असावी? तिला कसे लागले असावे? ती तर आता बस मध्ये होती? बस मध्येच पडली असेल का? का उतरताना ड्रायवर ने बस नेमकी चालू केली असेल त्यामुळे तिचा तोल गेला असेल? ती ठीक असेल ना? बाळाला काही लागले नसेल ना? राहून राहून तिचा सकाळी टाटा करतानाचा चेहरा डोळ्यासमोर येत होता....तिचा थोडा राग हि आला कि तिने घरी फोन करून का सांगितले ? पहिले मला फोन करायचा होता ना? मी तिच्या ऑफिसच्या जास्त जवळ होतो....पण तिला जास्त तर लागले नसेल ना! पप्पा म्हणत होते कि एका मुलाने फोन केला होता. मग ती कुठे होती...तिला अपघात तर नसेल ना झाला? तिने फोन नाही केला म्हणजे तिला जास्त लागले असणार? हे देवा ! काय झाले असेल रे तिला?

एका सेकंदात एक नाही हजारो प्रश्न भोवर्याच्या डोक्यात गरागरा फिरत होते. काही सुचतच नव्हते. भोवऱ्याने तिच्या मोबाईल वर फोन केला. एका मुलाने उचलला. त्याने सांगितले कि तुम्ही लीलावती हॉस्पिटलला निघून या. आम्ही तिला तिथेच घेऊन जात आहोत. भोवऱ्याने विचारले तुम्ही कुठे आहात? तर तो मुलगा म्हणाला, आम्ही गुरुनानक हॉस्पिटल मध्ये आहोत. पण तिला आता लीलावती हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला सांगितले आहे. भोवऱ्याला एसी ऑफिस मध्येसुद्धा दरदरून घाम फुटला, त्याने विचारले, पण तिला झालेय तरी काय? लीलावतीला कशाला घेऊन चाललाय ? (लीलावती हे मुंबईतील मोठ्या हॉस्पिटलमधील एक मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून गणले जाते.) तिथे का घेऊन चालले आहेत? ती जास्त सिरीयस तर नाही ना? पुढे काही विचारायच्या आधीच त्या मुलाने तुम्ही लवकर या. असे सांगून फोन कट केला.

लीलावती हॉस्पिटल 
भोवरा तसाच ऑफिस मधील एका मित्राच्या कार मधून निघाला. भिंगरीच्या ऑफिस मध्ये, इतर मैत्रीणीना फोन लावून झाले, कुठून काही कळायचा मार्गच नव्हता. कोणच पूर्ण माहिती देत नव्हते. फक्त तुम्ही लवकर या! लीलावती मध्ये डायरेक्ट या! एवढेच सांगत होते. लीलावातीला पोहचायला ३० ते ३५ मिनिटे लागली. ती ३० ते ३५ मिनिटे कशी काढली असतील ते त्यालाच माहित. नको नको ते विचार मनात येत होते. काय झाले ते कळायला मार्गच नसल्यामुळे मन सर्वात पहिले वाईट गोष्टींकडे धावत होते. राहून राहून भिंगरीचा सकाळी टाटा करतानाचा चेहरा आठवत होता. डोळ्यांच्या कडा जड झाल्या होत्या. बहुतेक पाण्याचे बांध वाहून येण्यासाठी उसळत होते. मोठ्या मुश्किलीने त्यांना थांबवावे लागत होते. एक मन सतत त्यांची पाठराखण करत होते, समजावत होते, अरे काही झाले नाही आहे, सगळे काही ठीक असेल, थोडसे कुठे तरी लागले असेल, गरोदर असल्यमुळे सगळे घाबरले असतील. स्वत: बघितल्याशिवाय काही विचार मनात आणु नको. पण वाईट मन चांगल्या मनावर कधीच भारी झाले होते. चांगल्या मनाने सकारात्मक राहायचा खूप प्रयत्न केला पण त्याचे त्याला समजत होते कि ते प्रयत्न किती तोकडे आहेत. वाईट मनाने पूर्ण कब्जा घ्यायला सुरुवात केली होती. मनावर एक मळभ यायला लागली होती. लख्ख उजेडातहि डोळ्यासमोर अंधारी यायला लागली होती.


तो कसा बसा ट्राफिक मधून लीलावातीला पोहोचला. गेट मध्ये एन्ट्री करण्यासाठी यु टर्न घ्यावा लागला. समोरून एक अॅम्ब्युलंस जीवाच्या आकांताने बोंबलत फुल स्पीड मध्ये गेली. मित्र बोलला बहुतेक हीच असावी.  त्या अॅम्ब्युलंसचे धूड आपल्याच अंगावरून जात असल्याचा त्याला भास झाला. त्याच्या मागोमाग यु टर्न घेऊन त्याची कार घेतली. कार थांबायच्या आधीच दरवाजा उघडून उतरला... धावत अॅम्ब्युलंस ज्या गेट जवळ गेली तिथे गेला....भिंगरीच्या ऑफिस मधील इतर कलीग दिसले. म्हणजे तीच अॅम्ब्युलंस होती. पुढे जावून बघतो तर ....

पायाखालची जमीनच सरकली...अंगातून त्राण गेल्यासारखे झाले, अचानक अशक्तपणा वाटू लागला, कोणीतरी तोंडावर उशी दाबून धरली आहे आणि आपण श्वास घेऊ शकत नाही असे वाटू लागले. स्ट्रेचर वर भिंगरी बेशुद्ध पडून होती. तिला मोठा अपघात झाला होता. सफेद पंजाबी ड्रेस रक्ताने पूर्ण लाल झाला होता. केस विस्कटले होते....केसात रक्त सुकल्यामुळे केसांच्या जटा झाल्या होत्या. हातापायाला खूप ठिकाणी खरचटले होते. जखमा झाल्या होत्या...काहीमधून थोडे रक्त अजूनहि वाहत होते. गरोदर पोटाची टम्मी खूप वर आल्यासारखी झाली होती. पोट खूप मोठे वाटत होते. तिचा चेहरा त्या बाजूला होता. त्यामुळे दिसत नव्हता. भोवरा धावत तिच्या जवळ गेला तिला आवाज दिला, ती शुद्धीवर आल्यासारखी झाली आणि मान फिरवून बघितले आणि भोवऱ्याने मोठ्या प्रयत्नाने आवरलेला अश्रू त्याच्या नकळत गालावरून धावत सुटले. तिचा नाजूक गोरापान आणि सदा हसरा चेहरा एखाद्या फुटबॉल सारखा सुजला होता. रक्त साकाळल्याने काळानिळा झाला होता. ती तोंडावर आपटली होती. चेहऱ्यावर डोळ्याखाली, गालावर, कानाच्या बाजूला आणि हनुवटीवर मल्टीपल फ्रॅक्चर झाले होते. डावा डोळा सुजल्यामुळे जवळपास बंदच झाला होता. ओठ सुजून दोन बोटांएवढे जाड झाले होते. डोळ्यात पूर्ण रक्त उतरल्यामुळे डोळ्यातील सफेद पार्श्वभाग दिसतच नव्हता, लाल डोळ्यामध्ये काळे बुबुळ फिरायचा प्रयत्न करत होते. पण कदाचित रक्ताने जड झाल्यामुळे हालचाल होत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर अपार वेदना दिसून येत होत्या. भोवऱ्याला बघितल्यावर तिने उजवा हात उचलून भोवऱ्याचा हात धरायचा प्रयत्न केला. भोवऱ्याने तिचा हात दोन्ही हातात धरून अलगद दाबले. तिच्या चेहऱ्यावर एक वेदनेची कळ येऊन गेली. तिने ओठ उघडून बोलण्याचा प्रयत्न केला
'.... खूप दुखतंय रे! मला पाठीवर नाही झोपवत आहे'...मला काय झाले? माझा बाळ तर ठीक आहे ना?

भोवऱ्याने तिच्या केसांवर हात फिरवत म्हणाला 'काही काळजी करू नको बाळ ठीक आहे, तू पण ठीक आहेस. शांत झोपून राहा. बोलायचं प्रयत्न करू नकोस.'

ती तसेच ओठ विलग करून कण्हत कण्हत परत बेशुद्ध झाली. मार लागल्यामुळे तिचे दात आतल्याबाजुला पूर्ण उभ्या दिशेत फिरले होते. आतली हिरडी उचकटून बाहेर आली होती. ओठांवर जखमा दिसत होत्या. नाकातोंडात सगळे रक्त सुकून गाठी झाल्या होत्या. नाक रक्ताने भरले होते. त्यामुळे श्वास घ्यायला जमत नव्हते. धाप लागत होता. पोटातील बाळ कदाचित घाबरल्याने आत एका बाजूला अंग आक्रसून बसले होते. त्यामुळे पोट एका बाजूला जास्त सुजल्या सारखे वाटत होते.

तिथल्या नर्स ने पटापट दोन /तीन डॉक्टरांना फोन केले. एक स्त्री डॉक्टर बघायला आली. तिने तिची सर्व हिस्ट्री विचारायला सुरुवात केली. भोवऱ्याने तिची मेडिकल हिस्ट्री सांगितली, तिला सहावा महिना चालू होता. आता पर्यंतचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते. कुठेही अडचणी (complications) नव्हत्या. कशाचीही एलर्जी नव्हती. तिला कसे लागले? ह्या प्रश्नाला त्याच्याकडे उत्तर नव्हते. त्याने तिच्या ऑफिस मधल्या कलीगला बोलावले. त्याने सांगितले ती रस्ता क्रॉस करत असताना एका खाजगी बसने तिला उडवले. कसे उडवले ते आम्ही बघितले नाही. पण जोरात किंचाळल्याचा आवाज आला म्हणून आम्ही मागे बघितले तर ती ९ / १० फुट लांब रस्त्यावर पडली होती. बस ने तिला जोरदार धक्का मारला होता. पडल्यावरच ती जागीच बेशुद्ध झाली होती.

भोवऱ्याला दरदरून घाम फुटत होता. सर्व चित्र डोळ्यासमोर येत होते. बस चा धक्का किती जोरात लागला असेल. ९/ १० फुट उडल्यावर ती हनुवटीवर आणि गालावर आपटली होती. किती जोरात लागले असेल तिला? एवढ्या वेदना सहन न झाल्यामुळेच ती लगेच बेशुद्ध पडली होती. देवा! हे काय केलेस? का तिला एवढा त्रास दिलास? आतमध्ये बाळ कसे असेल ? दहा फुट उडल्यावर आतमध्ये काही लागले तर नसेल न ?बाळाला काही झाले तर तो धक्का ती सहन करू शकेल का?

डॉक्टरांनी आवाज दिल्यावर भोवरा तंद्रीतून बाहेर आला. डॉक्टरांनी सर्वाना बाहेर थांबायला सांगितले. बाहेर मित्राला बघितल्यावर भोवऱ्याने आपले सगळे मन मोकळे केले आणि अश्रूंना वाट करून दिली. काय चुकले? का असे झाले? दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा तिला का? तीन तासापूर्वी तर तिला आपण बाय करून गेलो होतो. तिला ह्या परिस्थितीत बघावे लागेल असे मनात पण नव्हते आले. काही क्षणांमध्ये हे काय अघटीत घडून बसले होते. तिची, येणाऱ्या बाळाची काय चुकी होती जे ह्या दोघांना असा त्रास सहन करावा लागणार आहे. आदल्याच दिवशी त्याने तिचे फोटो सेशन केले होते. तिचे आणि तिच्या गरोदर पोटाचे फोटो काढले होते.तिचे गाल ओढून तिला जाडी होत चाललीय म्हणून चिडवले होते.....आणि बारा तासाच्या आत तिचे गाल फुटबॉल सारखे सुजले होते. हात लावणे तर दूरची गोष्ट होती. भोवऱ्याला ते सगळे आठवून अजून रडू फुटत होते. 

प्राथमिक तपासणी नंतर तिला सहाव्या माळ्यावर असलेल्या आयसीयू मध्ये घेऊन गेले. तिचे वाहणारे रक्त पुसून तिच्यावर प्राथमिक मलमपट्टी करण्यात आली. तिला शुद्धीवर आणून डॉक्टर तिला कुठे कुठे लागले आहे ते विचारून आपल्या नोंद वहीत लिहित होते. तीन चार मोठे डॉक्टर आणि चार पाच नर्सेस तिला गराडा घालून उभ्या होत्या. त्याला लांब उभे राहून बघायला सांगितले होते. मध्ये मध्ये लागणारी माहिती त्याच्याकडून विचारून लिहित होते. भिंगरीला मार एवढा जबरदस्त बसला होता आणि वेदना भयंकर होत होत्या, त्यामुळे तिची बोलता बोलता शुद्ध हरपत होती. डॉक्टर तिला आवाज देऊन उठवत होते आणि परत ती त्यांच्या  प्रश्नांना डोळे उघडझाप करून उत्तर देत होती. तोंडाने बोलण्याचा प्रयत्न करत होती....रडत होती.

तिची अशी हालत त्याला बघवत नव्हती. हताश मनाने तो अंग गाळून आणि खांदे पडून उभा होता. प्राथमिक चौकशी नंतर आयसीयू चा मुख्य डॉक्टर त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, "तुमच्या मिसेसला खूप लागले आहे आणि तिची कंडीशन खूप क्रिटीकल आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे तिच्या चेहऱ्याला मल्टीपल (एकाहून जास्त) फ्रॅक्चर आहेत. डोळ्याचा खाली असलेल्या हाडाला मार लागला आहे. तो मार जास्त असेल तर डोळ्याचे अलायीनमेंट (प्रमाण बद्धता ) जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिचा एक डोळा चकना होऊ शकतो. तिच्या डोक्याला मार लागला आहे आणि तिच्या मेंदूमध्ये पण गाठ (clot) झाली असावी. त्यासाठी सिटीस्क़ॅन करणार आहोत. तिच्या दोन्ही हाताला आणि हाताच्या कोपऱ्याला जखमा आहेत त्यामुळे दोन्ही हातांचे एक्सरे काढावे लागतील. आपल्या हनुवटीचे हाड हे शरीरातले दुसऱ्या नंबरचे मजबूत हाड असते आमच्या अंदाजाप्रमाणे तिची हनुवटीला तडा गेले आहेत किंवा तुटली तरी आहे. त्यावरून तुम्ही अंदाज करू शकता कि तिला किती जोरात लागले आहे" तो फक्त मान हलवण्याशिवाय काही करू शकत नव्हता.

"ती सांगते आहे की तिची पाठ खूप दुखते आहे आमचा अंदाज आहे की तिला पाठीला मार लागला आहे जर मार मणक्याला किंवा माकड हाडाला लागला असेल तर तिच्यावर उपचार करायला खूप कठीण आहे. दुसरी गोष्ट ती गरोदर असल्यामुळे आम्ही तिचा एक्सरे किंवा सिटीस्क़ॅन करणे खूप धोकादायक आहे. एक्सरे आणि सिटीस्क़ॅन च्या किरणांमुळे आतील बाळाला त्रास होऊ शकतो. ते जर किरण त्याच्या डोळ्यात गेले तर कायमचे अधूपण येऊ शकेल. त्यामुळे आम्हाला तिच्या पोटाला प्रतिबंधक कवच (Protective sheild) लावून एक्सरे काढावा लागणार आहे. त्यामुळे जेवढे शरीर त्या कवच बाहेर असेल तेवढाच एक्सरे आपण काढू शकतो आणि तेव्हढ्यावरच उपचार करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे ती सहा महिन्याची गरोदर आहे काही दिवसांनी तिला सातवा महिना लागेल. खरं तर ह्या पिरेड मध्ये आम्ही पेन किलर किंवा पॅरासिटॅमॉल (Paracetamol) देऊ शकत नाही. तिला जो काही त्रास आहे तो सर्व सहन करावा लागणार आहे. आता आम्ही तिला एक्सरे काढायला घेऊन जात आहोत तुम्ही हे काही फॉर्म्स आहेत ते भरून द्या मग आम्ही पुढचे काम चालू करतो. तुम्हाला मान्य आहे ना तिचे एक्सरे आणि सीटीस्कॅन करायला.'

तो काय बोलणार...काही सेकंद विचार करून म्हणाला. माझी पहिली गरज तिच्यावर उपचार करणे आहे. तिला वाचवण्यासाठी काहीही करा. भोवऱ्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय होता. प्रत्यक्ष जरी त्याने सांगितले नसेल तरी अप्रत्यक्षपणे त्याने तिच्यासाठी एका निष्पाप जीवाचा विचार केला नाही. त्याच्यासाठी सध्या तरी ती महत्वाची होती. एका बापाला आपल्या जन्माला न आलेल्या बाळाबद्दल असा निर्णय घेण्याचा काय अधिकार? जरी ते बाळ त्याचे असले तरी त्याच्या जीवाशी खेळण्याचा हा अधिकार कोणी दिला?...असा निर्णय घेताना एका बापाची मनस्थिती काय झाली असेल? एका हताश बापाचे दु:ख काय असते त्याचे त्यालाच माहिती. त्यासाठी तो स्वतःला कधी माफ करू शकणार नव्हता.

त्याने विचारले डॉक्टर ती कधी पर्यंत रिकव्हर होण्याचे चान्सेस आहेत. किती दिवस लागतील. डॉक्टर म्हणाले तिला कमीत कमी ३ महिने तरी हॉस्पिटल मध्ये ठेवावे लागेल. जर मेंदूचे क्लॉट जास्त असतील तर अजून महिने पण लागतील. सर्व डीटेल्स रिपोर्ट आल्यावरच सांगू शकेन.

तिला स्ट्रेचर वर एक्सरे आणि सिटीस्कॅन रूम मध्ये घेऊन गेले. रिपोर्ट आल्यावर डॉक्टरने ज्या शक्यता वर्तवल्या होत्या त्या सर्व बरोबर निघाल्या. तिच्या हनुवटीला ३ मोठे तडे जावून हनुवटीचा तुकडा पडला होता. हनुवटीवरची चामडी कमी प्रमाणात फाटली असल्यामुळे तो तुकडा आत मध्ये लोंबकळत होता. नाहीतर तो बाहेर आला असता. बरगड्यांना दोन मोठे फ्रॅक़्चर होते. खांद्याला मार लागला होता. संध्याकाळी सहा- साडे सहाला डॉक्टरांनी पुढे काय करायचे ते प्लानिंग चालू केले आणि त्यानुसार तिच्यावर उपचार चालू झाले. डॉक्टरांनी जास्तीत जास्त एक महिना ठेवावे लागेल असे सांगितले. त्या दिवशीची रात्र जरा तिला त्रासदायक जाणार होती. डॉक्टरांनी तिला उद्यापासून आराम पडेल असे सांगितले.

भिंगरीच्या चेहऱ्याचा सिटीस्कॅन. जिथे लाल रंगाने मार्क केले आहे तिथे फ्रॅक्चर झाले होते. हनुवटीला पडलेले दोन मोठे क्रॅक दिसताहेत.
 हनुवटीला पडलेल्या दोन मोठे क्रॅक मुळे हनुवटीचे हाड खाली सरकले होते.
हनुवटीवर झालेली जखमेवरची चामडी जास्त फाटली नसल्यामुळे तुटलेले हाड बाहेर आले नव्हते.
क्रॅक जवळ उचकटलेली हिरडी दिसत आहे.

पुढे तीन दिवसांनी तिच्यावर सर्जरी केली, हनुवटी मध्ये तीन धातूच्या पट्ट्या बसवण्यात आल्या. हनुवटीवर प्लास्टिक सर्जरी केली गेली. सहा सात दिवस तिला आयसीयू मध्येच ठेवण्यात आले. तिला सातवा महिना लागायच्या आधीच सर्जरी करणे जरुरीचे होते. म्हणून सहावा महिन्याच्या शेवटच्या दिवसात घाईघाईने तिच्यावर सर्जरी उरकण्यात आली. खांद्याच्या दुखण्यासाठी आणि बरगड्यांना काहीच उपचार केले गेले नाही. बरगड्यांच्या फ्रॅक़्चर वर तसा काहीच उपाय नाही. फक्त वेद्नाशामक गोळ्या दिल्या जातात. ती गरोदर असल्या मुळे तिला तेही देता येत नव्हते. पाठीवर १५ मिनिटापेक्षा जास्त झोपू शकत नव्हती. दोन्ही खांद्यांना मार असल्यामुळे कुशीवर झोपता येत नव्हते आणि गरोदरपणाचे पोट असल्यामुळे पालथेही झोपता येत नव्हते. अतिशय कठीण परिस्थितीत अडकली होती. सातवा महिना असल्यामुळे तिची डिलीवरीही करता येऊ शकणार नव्हती. ती जर आठव्या किंवा नवव्या महिन्यात असती तर कदाचित प्री-मॅच्युर (pre-mature) डिलीवरीचा निर्णय घेता आला असता. पण सहाव्या/सातव्या महिन्यात बाळाचा पूर्ण विकास झालला नसतो आणि आई साठी सुद्धा ते धोकादायक असते.
सर्व रस्ते बंद होते आणि सर्वाना त्यांच्या वाट्याला आलेले दु:ख सहन करणे क्रमप्राप्त होते. त्यात अजून जन्माला न आलेल्या बाळाचा सुद्धा सहभाग होता. त्याच्या वाट्याला पण ते दु:ख सहन करणे भाग होते.

पुढे १२ दिवस ती हॉस्पिटल मध्ये होती. भरपूर दुखणे घेऊन घरी पण आली. तोंडावर केलेल्या सर्जरी मुळे, आणि दात व हिरड्या लाईन वर येण्यासाठी लावलेल्या तारेमुळे ती पुढचे कित्येक महिने काही कडक पदार्थ खाऊ शकणार नव्हती. दोन महिने फक्त पाणी, ज्यूस आणि तांदळाची पेज ह्यांच्यावरच राहायचे होते. ज्या महिन्यात तिने स्वत:साठी आणि पोटातल्या बाळासाठी खूप खाल्लेपिले पाहिजे होते त्याकाळात तिला फक्त पाणी आणि तत्सम जल पदार्थांवर राहवे लागणार होते.

त्या दोघांची जी काही पुण्याई असेल, त्यामुळे एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा बाळाला इजा झाली नाही. श्री स्वामी समर्थांची कृपादुष्टी असावी म्हणून एवढ्या मोठ्या प्रसंगातून बाळाचे प्राण वाचले. देवानेच मारले आणि देवानेच तारले. त्याच्या आयुष्यातील आलेल्या अनेक कठीण प्रसंगापैकी एक प्रसंग होता. खूप काही प्रश्न ह्या प्रकरणाने अनुत्तरीत राहिले. भोवरा अजून हि त्या प्रश्नांची उत्तरे आपल्या परीने शोधत आहे.
 • चांगल्या चाललेल्या आयुष्यात अचानक असे जीवघेणे प्रसंग का येतात ? 
 • भोवऱ्याने आणि भिंगरीने आयुष्यात आता पर्यंत कधी कुणाचे वाकडे केले नाही? कोणाला मानसिक अन शारीरिक त्रास दिला नाही तरी त्यांच्या बाबतीत असे का घडावे?
 • असे काय चुकले होते कि ज्याची एवढी मोठी शिक्षा मिळाली होती? का हि गोष्ट फक्त दुसऱ्याच्या चुकीने त्यांच्यावर लादली गेली?
 • माणसाचे मन नेहमी दोन पातळीवर काम करत असते. एक चांगला विचार करते आणि एक वाईट विचार करते. भिंगरी चे चांगले मन तिला कदाचित ऑफिस ला जाऊ नको सांगत होते का? 
 • का तिने आपल्या चांगल्या मनाचे ऐकले नाही? वाईट मनाने तिच्या मनाचा पूर्ण कब्जा केला असेल का?
 • भिंगरीला उठायला न होणे, ऑफिसला जायची इच्छा न होणे, नेहमीच्या वेळेवर पोहोचूनहि तिची नेहमीची बस चुकणे, दुसरी फिरून जाणारी बस येऊन हि ती न पकडणे, हे सगळे येणाऱ्या संकटाची चाहूल होती का? पुढे घडण्यारया अशुभ गोष्टींचे मिळणारे संकेत होते का?
 • एवढे सगळे संकेत मिळूनही ते भोवऱ्याला आणि भिंगरीला समजून का आले नाही?
 • तिने जेव्हा त्याला एक दिवस सुट्टी काढायला सांगितली ती जर त्याने काढली असती आणि दोघेही त्या दिवशी घरी राहिले असते तर हा अपघात टळला असता का?
 • नंतर जेव्हा ती हॉस्पिटल मध्ये होती तेव्हा त्याने २० दिवस सुट्टी काढली. तीच  आधी एक दिवसाची  सुट्टी काढली असती तर काय झाले असते? २० दिवसाच्या सुट्टीमध्ये ऑफिस मधली अर्जंट आणि महत्वाची कामे त्याच्याशिवाय पूर्ण झालीच ना! मग ????
 • त्या दिवशी सर्वपित्री अमावस्या होती. त्याचा ह्या अपघाताशी काही संबंध असेल का? खरच अमावस्या गरोदर स्त्रियांना अशुभ असते का? अमावस्या संपल्यावरच तिला आराम पडणे, ह्याचा काही अर्थ असेल का?
 • येणाऱ्या बाळाचा, ज्याने अजून ह्या जगात पाउलही नाही ठेवले, त्याला हा त्रास का सहन करावा लागणार होता?
 • पुढचे तीन महिने, ज्यात त्याच्या शरीराचा आणि मुख्यत्वे मेंदूचा विकास होणार होता, त्या महिन्यात त्याला जेवणातून मिळणारे आवश्यक जीवनसत्वे मिळणार नव्हती. त्या बिचाऱ्या अजाण बालकाचा काय दोष होता?
 • एवढा मोठा सहा पदरी रस्ता असूनसुद्धा ड्रायवरने तिला कसे उडवले ?
 • ड्रायवर सिग्नलला दोन मिनिट थांबला असता आणि त्याने जर वाहतुकीचे नियम पाळले असते तर आज एवढा मोठा अपघात झाला नसता. का नाही तो थांबला ?
 • झेब्रा क्रॉसिंग वर चालून आणि सिग्नल चे सर्व नियम पाळून सुद्धा जर असे अपघात होणार असतील तर का सर्व नियम पाळावेत?
 • भोवऱ्याने स्वत: गाडी चालवताना कधीही नियम तोडले नाहीत. कधीही नियमांचे उल्लंघन केले नाही तरीसुद्धा त्याच्या आयुष्यात अशी घटना का घडावी.
त्यादिवशी रात्री हॉस्पिटलमधून घरी जात असताना त्याच्या मनात ह्या सगळ्या गोष्टींची वादळे घोंघावत होती. लोकल मध्ये कोणाच्या तरी मोबाईल वर नटरंग मधील  'खेळ मांडीला' गाणे वाजत होते.

तुझ्या पायरिशी कुणी सान थोर न्हाई 
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई 
तरी देवा सर ना ह्यो भोग कशा पायी 
हरवली वात दिशा अंधारल्या दाही
वावलुनी उधळतो जीव माया बापा 
वनवा ह्यो उरी पेटला 

खेळ मांडला...... खेळ मांडला...... देवा....
.
.
.
उसवला गण-गोत सारं.... आधार कुणाचा नायी 
भेगाळल्या भुई परी जीणं...अंगार जीवाला नायी
बळ दे झुंझायाला किरपेची ढाल दे 
इनाविती पंच प्राण जीव्हारात त्राण दे 
करपला रान देवा जळल शिवार 

तरी नाही धीर सांडला 
खेळ मांडला......

हा अपघात आणि त्या अनुषंगाने उद्भवणारी प्रश्नमालिका ही कधीच न संपणारी आहे. पुढे भिंगरीच्या बाळाचे काय होणार होते? ह्या अपघाताचे परिणाम त्या तिघांच्या आयुष्यावर होणार होते का?

हे सर्व खऱ्या अर्थाने क्रमश: चालू राहणार आहे.

खेळ मांडीलाय  !!! खेळणे क्रमप्राप्तच आहे.CONVERSATION

3 comments:

 1. hi satykatha aahe?
  bapre, bhovara, bhingari aani tyanchya balala lavkarat lavkar yatun baher padnysathi shubhecha.

  ReplyDelete
 2. wachata wachata sagal cinemasarakha dolyasamorun jat hot. Sagal athawal ani office madhe basunsuddha kitihi prayatn kela tri ashrunna thambau shakale nahi.
  Devala prarthana nehmich karate asa prasng dushmanawar pan anu nako...

  ReplyDelete
 3. wachata wachata sagal cinemasarakha dolyasamorun jat hot. Sagal athawal ani office madhe basunsuddha kitihi prayatn kela tri ashrunna thambau shakale nahi.
  Devala prarthana nehmich karate asa prasng dushmanawar pan anu nako...

  ReplyDelete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top