जय महाराष्ट्र !!! करून दाखवलं !!!

मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीस ह्यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती तेव्हा सत्ता स्थापने आधी किंवा शपथविधी सोहळ्यामध्ये अमित शहा ने, जी एक उद्धट किंवा हीन दर्जाची वागणूक उद्धव ठाकरेंना दिली होती ती बघून एक मराठी माणूस म्हणून मला खूप वाईट वाटलं होतं. भाजपचे काही अस्तित्व नसताना तिला सहारा देत 'केंद्रात तुम्ही राज्यात आम्ही' ही घोषणा देत शिवसेनेने भाजपा ला छोटा भाऊ म्हणत महाराष्ट्राच्या राजकारणात सहभागी करून घेतले. अडवाणी मोदी ह्यांच्या विरोधात जेव्हा देशात किंवा पक्षांतर्गत बंड पुकारले गेले तेव्हा तेव्हा बाळासाहेबांनी आवाज देऊन एकेकाला शांत केले होते (उदा. बाबरी मशीद पतन आणि गोध्रा दंगल) आणि त्या दोन्ही नेत्यांना समर्थन दिले होते. ती सगळी जाण विसरून शहा ने जी शिवसेना नेतृत्वाला वागणूक दिली होती ती नक्कीच एक मराठी माणूस म्हणून मला खटकली होती.

त्या वेळी शिवसेनेच्या हातामध्ये काहीच पत्ते नव्हते आणि झक मारत त्यांना सरकारमध्ये सहभागी व्हावे लागले नाहीतर राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देऊन सरकार बनवले असते.


त्याच वेळेला वाटले होते नशिबाने फिरून एकदा शिवसेनेलाही आणि उद्धवला एक चान्स द्यावा.... जेणेकरून दिल्लीश्वर भाजपाची खोड मोडता येईल. 2019 ला झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा शहा मोदी जोडीला बहुमताने बीजेपी परत येईल की नाही याची शाश्वती नव्हती तेव्हा त्यांनी परत शिवसेनेकडे मैत्रीचा हात पुढे केला....गळा भेटी झाल्या....त्यावेळेस बंद दाराआड ज्या काही चर्चा झाल्या असतील, सत्ता वाटपाचा कार्यक्रम ठरला असेल आणि देवाण घेवाण ठरल्या असतील त्यावरून सगळे चांगले झाले आहे असे वाटायला लागले...इतकेच काय तर मोदी चे अर्ज भरायला सुद्धा उद्धव वाराणसी ला गेले. ...राज्यात सुद्धा शिवसेनेने तिकीट वाटपावरून काहीच दंगा घातला नाही...अगदी हक्काच्या सीट सुद्धा शिवसेनेने भाजपा आणि त्यांच्या मित्रा पक्षाला दिल्या....ह्या एकाच गोष्टीवर की 'आमचं ठरलंय'

तेव्हाच अंदाज आला होता की उद्धव ने नक्कीच काहीतरी वेगळे मागितले आहे आणि भाजपा ने ते कबूल केले आहे...म्हणून शिवसेनेने पक्षांतर्गत धुसपुस सुद्धा शांत करून भाजपाला जे पाहिजे ते करू दिले फक्त एकाच शब्द सांगत 'आमचं ठरलंय'.

आता लोकसभेमध्ये बीजेपी ला पूर्ण बहुमत होते आणि राज्यांमध्ये शंभरच्या वरती जागा निवडून आल्या होत्या त्यामुळे खरंतर शिवसेनेची गरज नाही...केंद्रात काही भीती नाही...राज्यात सुद्धा इतर राज्यात केला तसा घोडेबाजार आणि फोडाफोडी करून आरामात बहुमत गाठता येईल आणि शिवसेनेला परत एकदा झुकवता येईल .....काहीतरी थातुरमातुर देऊन परत मुख्यमंत्रीपद भाजपाकडे राहील अशी  शहा आणि कंपनीची प्लॅनिंग होती बहुतेक....जे ठरलंय ते बघू आणि आयत्या वेळी पलटी मारू असे ठरवले गेले असणार.

पण या वेळेला शरद पवारांवर ईडी मागे लावून एक चूक झाली होती..... राष्ट्रवादीची पाठिंब्याची कुमक तोडून टाकली होती.

नेमकी 'हीच ती वेळ' साधून उद्धवने पवारांना दिलासा देऊन आपल्या बाजूला करून घेतले होते आणि हीच दूरदृष्टी महाराष्ट्रातल्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली.

उद्धवला आतापर्यंत बाळबोध, शक्तिहीन नेतृत्व, मवाळ संबोधलं जायचे आणि अजून ही जाते..... शिवसेना संपली असे बोलले गेले ...जाणून बुजून तसे पसरवले गेले.....सोशल मीडिया आणि मेमे बनवून शिवसेनेचे बाण शिवसेनेच्या पार्श्वभागात घुसवले गेले पण शिवसेनेची ताकत आणि नेतृत्वाची दूरदृष्टी कोणाला समजली नाही.... त्यात त्यांना शरद पवार सारख्या धूर्त राजकारणाची जोड मिळत गेली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राने दिल्लीच्या राजकारणाला झुकवले.

त्यात शिवसेनेचे कौतुक करण्यासारखे अजून काही गोष्ट म्हणजे शिवसेनेचे संघटन, मनापासून काम करणारे शिवसैनिक, काही मोबदला न घेता पक्षासाठी झगडणारे शिवसैनिक, पक्षाअंतर्गत असलेली एकजूट आणि उत्कृष्ट नेतृत्व.

गेल्या एक महिन्यामध्ये शिवसेनेच्या कुठल्याच नेत्याने किंवा नवीन निवडून आलेल्या आमदारांनी कुठलेही मिडीयाला बाईट दिले नाही. पक्षाला आणि नेतृत्वाला जे काही सांगायचे आहे ते फक्त 'संजय राऊत' नावाच्या धाडसी आणि तोंड फाट्या नेत्याला पुढे केले. 

Sanjay Raut
गेले दीड महिने बीजेपीला.... सोशल मीडियाला ....विविध न्यूज चैनल ला फक्त एकट्या संजय राऊत ने आपल्या शिंगावर घेतले..... सोशल मीडियामध्ये आणि भाजपने उघड उघड पत्रकार परिषद घेऊन त्यांची बदनामी केली पण पट्ट्याने एकही चुकीचा शब्द रागाच्या भरात किंवा आवेशाने बाहेर पडू दिला नाही. वैयक्तिक पातळीवर कोणालाच डिवचले नाही... प्रत्येक प्रश्नाला योग्य विचार करून योग्य ते उत्तर दिले. 'जे ठरलंय तेच आम्ही मागतोय' याचा वारंवार उल्लेख केला आणि जेव्हा बीजेपी कडून नकार यायला लागला तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या आजन्म विरोधी असणाऱ्या पक्षबरोबर योग्य ती बोलणी चालू केली. हॉस्पिटल मधून बाहेर पडल्यावर सुद्धा एकही दिवस आराम न करता नेत्यांच्या भेटीगाठी घेत राहिले...मीडियाला अंगावर घेत राहिले.... आणि तिन्ही पक्षांना एकसमान प्लॅटफॉर्मवर आणत महाआघाडी ची स्थापना करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला आणि आज जेव्हा फायनली शपथविधी समारंभ झाला तेव्हा संजय राऊत पडद्यामागे गेला..... त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर हे सगळं माझ्यामुळे घडले अशा तोऱ्यामध्ये पुढे पुढे नाचत राहिला असता किंवा हक्काने एखादे मंत्रीपद तरी मागून घेतले असते 


पण संजय राऊत आणि त्यांच्यासारख्या अनेक कट्टर शिवसैनिकांना या महाराष्ट्राने किंवा देशाने अजून पुरते ओळखलेच नाही..... कुठलेही क्रेडिट स्वतःला न घेता सगळे काही नेतृत्वाच्या हवाली करून संजय राऊत साईडला झाले. संजय राऊत सारख्या हजारो शिवसैनिकांच्या जिवावर शिवसेना उभी आहे..... आतापर्यंत किती तरी वेळा लोकांना वाटली की शिवसेना संपली....जेव्हा राज ठाकरे बाहेर पडले.... बाळासाहेब ठाकरे स्वर्गवासी झाले.... बीजेपी शी काडीमोड घेतला तेव्हा तेव्हा सगळ्यांना वाटले.....शिवसेना संपली. पण शिवसेनेची खरी ताकद संजय राऊत सारख्या कडवट शिवसैनिकांमध्ये आहे....तिचा पाया भक्कम आहे आणि आजच्या शपथविधीने तो अजून मजबूत झाला आहे.


160 आमदार घेऊन उद्धव आणि पवारांनी जो सज्जड दम दिला होता ना "....की हे गोवा किंवा कर्नाटक नाही हा महाराष्ट्र आहे..."आणि ".... आणि जर कोणी मध्ये आला तर त्याला बाजूला करण्याची ताकत शिवसेनेमध्ये आहे...." तो दम तर आपल्याला सॉलिड आवडला बुवा...

आज उद्धवने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि मला माझा सूड भेटल्याचे समाधान झाले. उद्धव ने पण तमाम जनतेच्या पाया पडून आपले संस्कार दाखवून दिले.
मुख्यमंत्रीपदाची शपथ चोरून लपून छपून नसते घ्यायची अशी उघडपणे छातीठोक लाखो लोकांसमोर घ्यायची असते.

हे सरकार पुढे कितीही दिवस टिकू दे पण दिल्लीच्या नेत्यांना आणि शहाला त्यांच्याच चालींवर मात देऊन, एकदा का होईना पण झुकवला ह्याचा आनंद आयुष्यभर राहील.... "करून दाखवलं"


जय महाराष्ट्र !!!!

#आमचंठरलंय
#हिचतीवेळ
#करूनदाखवलं

(बाळासाहेबांनी मोरराजीला झुकवल्यावर सुद्धा त्या काळी असाच आनंद माझ्या सारख्या सामान्य मराठी माणसाला झाला असेल काय?)



(images: from net)

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top