येऊर पर्वतरांगा.


हो नाही करत शेवटी अर्ध्या दिवसासाठी का होईना येऊरला जायचे ठरले. माझ्या घरच्या मागेच येऊर च्या डोंगररांगा आहेत. हा भाग संजय गांधी नॅशनल पार्क ह्या राखीव अभयारण्यात येतो. ह्या डोंगररांगा ओलांडून गेलो तर दुसर्‍या बाजूला बोरीवली येते. सगळ्यांना वेळ कमी असल्यामुळे फक्त अर्धा दिवसातच भटकून यायचे ठरले. त्यात वटपौर्णिमा असल्यामुळे ह्या दिवशी बायकोचे प्रेम उतू जात असते. त्यामुळे सर्वांनाच अर्ध्या दिवसात घरी परत यायची धमकीवाजा सूचना मिळाली होती. त्यामुळे येऊर शिवाय पर्याय नव्हता. दुसरीकडे जाणे म्हणजे अर्धा वेळ फक्त प्रवासातच जाणार. म्हणून सर्वानुमते हीच जागा ठरली. 
सकाळी सुजीतच्या कार ने सात वाजता घरातून बाहेर पडलो. सोबत एसएलआर कॅमेरा, ट्राइपॉड आणि कॅमेरा भिजू नये म्हणून एक छत्री आणि खायला ३ पार्ले-जी, गुड डे, पाण्याच्या बोटल वगैरे घेऊन निघालो. कार येऊर गावात अगदी आतपर्यंत जाते. रस्ते बांधणी खूपचचांगली होती. वनखात्याच्या किंवा एअरफोर्स च्या अखत्यारीत येत असल्यामुळे कदाचित रस्त्यांची स्थिती उत्तम होती. येऊर गावाच्या टोकाला जिथे पर्यंत रस्ते आहेत आणि कार जाईल तिथे पर्यंत कार ने गेलो. कार पार्क करून तिथेच असलेल्या एकुलत्या एक टपरी वर एक कडक चहा घेऊन अभयारण्याच्या हद्दीत शिरलो. 

गेटवरच एक वनखात्याची चौकी आहे. तिथल्या अधिकार्‍याने फक्त पेपर वाचंताना एक नजर टाकली आणि परत पेपर वाचायला सुरूवात केली. आम्ही आपापले कॅमेरे काढून पुढे सरसावलो. पाऊस पडल्यामुळे झाडे हिरवीगार दिसत होती. पण पूर्णपणे हिरवळ अजुन पसरली नव्हती. जमिनीतून नवीन अंकुर फुटले होते. कदाचित एक दोन आठवड्यात सगळे हिरवाएगार होऊन जाईल पण सध्यातरी फक्त झाडेच आणि झाडांच्या  खाली असलेली झुडुपेच दिसत होती. हिरवळ नुकतेच बारसे धरायला लागत होती. जंगलातून जाणारी पायवाट बर्‍यापैकी होती. पायवाट धरून चालले असता कुठे भरकटण्याची शक्यता नाही. 

हा भाग जंगलमध्ये मोडत असल्यामुळे आणि आधीचा थोडाफार अनुभव असल्यामुळे मी सर्वाना जीन्स आणि फूल शर्ट घालून यायला सांगितले होते. कारण जंगलातले किडे आणि डास भयंकर चावतात असा आधीचा अनुभव होता. आणि त्याची प्रचीती लगेचच आली. जंगलात शिरून १० मिनिटे पण झाली नसतील . टायगर डास आपापले इन्जेक्शन घेऊन तयारीतच होते. अंग पूर्ण झाकले होते तरी सुद्धा हातचे तळवे आणि चेहरा त्यांच्यासाठी पुरेसा होता. ह्या डासांच्या अंगावर वाघा सारखे पट्टे असतात म्हणून कदाचित ह्यांना टायगर डास म्हणत असावेत. 

मध्ये येणारे छोटेमोठे पाणवठे ओलांडत आम्ही एका थोड्या मोठ्या ओढा वजा ओहोळ जवळ आलो. सकाळ पासून पाऊस कमी पडल्यामुळे पाण्याला तसा जोर नव्हता. पण तरी गुडघाभर वाहते पाणी होते. थोडा वेळ बसून आराम केला. पार्ले जी गुडडे खाऊन जरा ताजेतवाने झालो. आता पुढे जायचे की परतायचे ह्या विषयावर चर्चा चालू झाली. तो ओढा ओलांडून १५ मिनिटे चालून गेल्यावर एक धबधबा येतो ते माहीत होते.

लहानपणी एकदा असाच सोसायटीची मुले धबधब्यावर गेलो होतो. आम्ही जाऊन आल्यावर जोरदार पावसाची सर आली आणि ओढा पूर्ण भरून जोरदार वाहू लागला होता. त्यामुळे पलीकडच्या काठावरचे लोक तसेच अडकून पडले होते. पोलिसांपर्यंत बातमी पोचल्यावर ते काठ्या घेऊन  आले. एक तर त्याना जंगलात फरफटत यावे लागले होते त्यात संध्याकाळाची वेळ होती त्यांना परतताना अंधरातून जावे लागणार होते. त्यामुळे ज्याला भेटेल त्याला मारत सुटले होते.आम्ही सोबत सोसायटीची मोठी माणसे असल्यामुळे त्यावेळेला त्या तडाख्यातून वाचलो होतो. पण पलीकडच्या काठावर अडकलेले लोक तसेच रात्रभर अडकून पडले होते. झाडाला दोरया बांधूनसुद्धा पाण्याच्या जोर जास्त असल्यामुळे त्याना तो ओढा ओलांडता आला नव्हता. दुसर्या दिवशी पाऊस कमी झाल्यावर ते सगळे सुखरूप बाहेर पडले होत. त्यामुळे तो ओढा ओलांडून जाण्याची भीती होतीच. 

पण सकाळ पासून पाऊस पडला नसल्याने आम्ही रिस्क घेण्याचे ठरवले. कॅमरा बॅगे पॅक करून आम्ही सगळे ओढा ओलांडानारच तेवढ्यात पावसाने हजेरी लावली. पण तसा जास्त जोर नव्हता त्यामुळे आम्ही पुढे सरकत राहिलो. पुढे पंधरा मिनिटे चालल्यावर धबधब्या आवाज येऊ लागला. झाडी बाजूला करत डोंगर खाली उतरताच धबधब्याचे नयनरम्य दृष्य दिसून आले. आमच्या आधी अजुन एक ग्रूप आधीच तिथे येऊन ओली पार्टी करत बसले होते. आम्ही सोयीची जागा बसून विसावलो. मग थोडे फोटो क्‍लिक करून पाण्यात पाय सोडून रिलॅक्स झालो. निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला.मुंबईच्या च्या प्रदूषणातून दूर मोकळा श्वास घेतला. कोणाला अचानक ह्या जंगलात आणून सोडले आणि सांगितले की ह्या जंगलच्या बाहेर १.२० करोड लोक रहातात. तर कोणाला विश्वास नाही बसणार एवढी अप्रतिम शांतता....फक्त धबधब्याचा वाहणे आणि पक्षांचा मंजुळ आवाज.


तिथली निसर्गरम्यता आणि मोकळे वातावरण पाहून तिथून निघायला मन करत नव्हते. पण बायकांची आणि त्यांनी धरलेल्या सावित्रीच्या  उपासाची आठवण झाली आणि आम्हा तिथून पाय उचलावे लागले. जेवढा मोकळा श्वास छातीत भरून घेता येईल तेवढा श्वास भरून घेतला.  निसर्गर्सौंदर्य कॅमेरा टिपून घेतले उरलेले डोळ्यात साठवून घेतले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. सुदैवाने ओढ्याचे पाणी तेव्हढेच होते त्यामुळे ओढा ओलांडताना काही अडच आली नाही. 

येताना मात्र वन खात्याच्या चौकी वर पोलिस होते. त्यांनी विचारले की कुठे फोटो काढायला गेला होतात का? आम्ही... हो!! त्यांनी विचारले वनखात्याची परवानगी आहे का? आम्ही म्हटले... नाही...त्याने आम्हाला एक बोर्ड दाखवला ...जाताना आम्ही त्या बोर्डाच्या खालुनच गेलो होतो पण कोणीच बोर्ड नाही वाचला. मग त्याने घाबरवयचा प्रयत्न केला..असे करू नका....पेनल्टी भरावी लागेल. मनात म्हटले, आता हा पैसे काढायला लावणार. पण त्याने सांगितले की तुम्ही पहिल्यांदाच आलात म्हणून तुम्हाला सोडून देतोय...पुच्या वेळेला बोरीवली नॅशनल पार्क मधून परवानगी काढून घ्यावी लागेल.... ह्यावेळेला सोडून देतोय.

आम्ही पण मग कशाला मागे वळून पाहतोय...तसेच आभार मानून तिथून सटकलो.










-x-

टिप्पणी पोस्ट करा

8 टिप्पण्या

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!