एक अधुरी प्रेमकहाणी


चाळीच्या ग़ॅलेरीतुन नेहमी तो दोघांच्या खाणाखुणा बघायचा. त्याच्यासाठी ते सवयीचेच झाले होते. चाळीचे लैलामजनू, राजा-राणी होते ते. दोघांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. ते प्रेमात इतके बुडालेले होते कि आपल्या खाणाखुणा आपल्या दोघांशिवाय इतर कोणाला कळत असतील ह्याचेही भान त्यांना नसायचे. दररोज सकाळी अंघोळ झाली की ती केस सुकवायच्या निमित्ताने किंवा विंचरायच्या निमित्ताने ती गॅलेरीत उभी असायची आणि तो नेहमीप्रमाणे उशिरा उठून आळसावलेल्या चेहऱ्याने दात घासत आपल्या गॅलेरीत उभा असायचा. खाणाखुणांनी दोघांचे संभाषण चालू व्यायचे. दोघेही निरागस भोळे एकमेकांत गुंतलेले, प्रेमात आकंठ बुडालेले. जेवढे दोघे एकमेकांच्या प्रेमात तेवढेच त्यांचे आई बाप एकमेकांच्या विरोधात. आजोबांच्या पिढी पासून चालत आलेली दुष्मनी त्यांच्या आई बापाने चांगलीच निभावून आणली होती. एकमेकांचे प्रेम व्यक्त करायची खोटी की आई बापाने दोघांचे मुडदेच पडले असते.

तरीही त्यांचे प्रेम बहरत होते, फुलत होते आणि वाढत होते. बालपणीची मैत्री शाळेत दृढ झाली होती, कॉलेजात चांगलीच खुलून आली होती. मैत्रीचे रुपांतर कधी प्रेमात झाले ते दोघांनाही कळले नव्हते. एकेमकांना कधी प्रपोझ करावाच लागला नाही. वाहत्या पाण्यासारखे त्याचे प्रेम हि वाहत होते. थोडी हिम्मत जवमून ते आता एकांतात भेटायचा प्रयत्न करत होते. चाळीची गच्ची, कॉलेजची क्लासरूम आणि लायब्ररी आता त्यांना सुरक्षित वाटत नव्हती. बाहेर एकांतात भेटावेसे वाटत होते पण कोणी बघण्याच्या भीतीने त्यांना हिम्मत होत नव्हती.

तरीही राणी भाजी आणायला जायच्या निमित्ताने, राजा इस्त्रीला कपडे टाकायच्या निमित्ताने, राणी गच्चीवर पापड वाळत घालायच्या निमित्ताने त्यांच्या चोरून भेटी होत होत्या. त्याला हे सगळे समजत होते. सगळे त्याच्या डोळ्यासमोर घडत होते. एक दोनदा त्याने दोघांना रंगेहात पकडले ही होते आणि आई बापांची आठवण करून देऊन ह्या सगळ्या गोष्टीं पासून लांब राहण्यासाठी समज ही दिली होती. पण त्या दोघांचे प्रेम काही वेगळेच होते. एक तरल, निस्वार्थी, वासनारहित प्रेमाची अनुभूती त्यांच्या प्रेमात येत होती. भयंकर उकाड्यात थंड वाऱ्याची झुळूक यावी आणि मन प्रसन्न व्हावे तसे त्यांचे प्रेम निरागस होते. पण वाऱ्याची झुळूक जशी तात्पुरती येऊन जाते तसे त्यांच्या प्रेमाच्या बाबतीत न व्हावे असे त्याला मनापासून वाटत होते. त्या दोघांचे प्रेम असेच निरागस आणि मासूम राहावे त्यात त्यांच्या कुटुंबाची जालीम दुष्मनी आड न यावी ह्यासाठी तो नेहमी देवाची प्रार्थना करायचा.
पण सर्व काही त्याच्या हातामध्ये नव्हते. जे घडते ते बघत राहणे हाच पर्याय होता. 

चाळीत हळूहळू त्यांच्या प्रेमाचा सुगंध पसरायला लागला होता. काही रिकामटेकड्या बायकांच्या नाकात शिरायला लागला होता. पण दोन्ही घरामधली दुष्मनी पाहून कोणी जाहीरपणे बोलत नव्हते. पण कुजबुजणे वाढतच होते आणि एक दिवशी नळावरच्या भांडणात एकमेकांच्या आईचा उद्धार करताना एका शेजारणीने तिच्या आईला पोरीचे चाललेले चाळे दिसत नाही का असा टोमणा मारला. तिच्या आईने भांडणात ते कानावर घेतले नाही पण दुसऱ्यादिवशी नेमके दोघांना तिने रंगेहात गच्चीवर गप्पा मारताना पकडले आणि मग तिला नळावरच्या भांडणाचा उल्लेख समजला. अख्खी दुपार तिच्या आईने आपल्या दारातून तिच्या आईला शिव्या देण्यात घालवली. त्या दिवशीच्या संध्याकाळी चाळीमध्ये स्मशान शांतता पसरली होती. आज चाळीत नक्की काहीतरी होणार हे चाळीतल्या शेंबड्या पोरालाही समजले होते. संध्याकाळचे गिरणीचे भोंगे वाजले तशी सगळी चाळ सावध झाली. दोघांचे बाप घरात आले होते. दोन्ही घरातून पहिला आवाज कुठून येतो ह्या कडे सगळ्या चालीचे लक्ष लागून होते. आज भयंकर काहीतरी घडणार आहे ह्याची सगळ्यांनाच खात्री होती. त्या बिचाऱ्या दोन प्रेमी जीवांची सर्वांनाच दया येत होती पण कोणी मध्ये पडणार नव्हते. 

शेवटी एकदाचा त्याच्या घरातून बापाचा ग्लास फुटण्याचा आवाज आला. त्यामागे राजाला पट्ट्याने चोपाण्याचा आवाज आणि त्या मागे 'नको बाबा! नको बाबा' म्हणून ओरडण्याचा आवाज आला. त्याच्या बापाने रागाच्या भरात खूप दारू ढोसली होती आणि आता पूर्ण नशेत तो पोराला फोडून काढत होता. मध्ये येणाऱ्या त्याच्या आईला व बहिणीलाही त्याने रागाने मागे ढकलून दिले. मारत मारत त्याला गॅलेरीमध्ये आणले आणि तिच्या घराकडे बघून तिच्या बापाला शिव्या घालयला लागला. 

तिचा बाप पण बहुतेक ह्याचीच वाट बघत होता. कपडे सुकत घालायची काठी हातात घेऊनच तो आय माय काढत बाहेर आला. दोघांच्या शिव्या एकमेकांच्या वरचढ होत होत्या. तुझ्या मुलाने माझ्या मुलीला नादाला लावलेय आणि तुझ्या मुलीनेच माझ्या मुलाला फूस लावलीय ह्या वरून एकमेकांना शिव्या घालणे चालू होते. थोड्यावेळाने त्यांच्या आयांनी ह्यात सहभाग घेतला. तिच्या आईचे म्हणणे होते की माझ्या मुलीचे तसे काहीच नाही पण तुझा मुलगा मागे लागतोय, त्याला आवर नाही तर पोलिसात देऊ. त्याच्या आईने तर सरळ कमिशनर आमचा अमक्याचा अमका लागतो...त्याला सांगून तुम्हा सगळ्यांना खडी फोडायला पाठवू असे धमकावले. राजाच्या बापाचा हात चालूच होता. ते बघून तिच्या बापाला पण स्फुरण चढले तो त्याच्या पोराला मारू शकतो तर मी पण माझ्या पोरीला मारू शकतो. त्याने घरात जाऊन पोरीचा हात धरून तिला बाहेर आणले आणि गॅलेरीत उभे केले. तिला बघून अख्खी चाळ हळहळली. परी सारख्या नाजूक गोऱ्यापान मुलीचा चेहरा एकाबाजूने पूर्ण काळानिळा पडला होता. तिच्या बापाने तिला आधीच खूप मारले होते आणि आता त्याच्या बापाला मारून दाखवण्यासाठी तिला बाहेर आणले होते. हाताततली काठी बाजूला ठेवून त्याने तिच्या आधीच निळ्या पडलेल्या गालावर ठेवून दिली. त्याचा झटका एवढा होता की ती पाठीमागे भिंतीवर तोल जाऊन मटकन खालीच बसली. अख्या चाळीच्या तोंडून उसासे निघाले. राजाने तर तिच्या नावाने जोरात ओरड ठोकली ते बघून त्याच्या बापाला तर अजून चेव आला आणि तोंडाचा पट्टा चालू करत त्याने हातातला पट्टा सुद्धा जोरात चालवायला सुरुवात केली.

तो आपल्या घराच्या दरवाज्यात उभे राहून हा तमाशा बघत होता. त्याला ते बघवले नाही हे जर थांबवले नाही तर दोघे आपापल्या पोरांचा जीव घेतील. शेवटी हिम्मत करून तो राणीच्या बापाकडे गेला आणि त्याला शांत व्हायला सांगितले. तो पुढे आला बघून अजून चाळीचे जुने वयस्कर माणसे पुढे आली आणि दोघांच्या बापाला समजवायला लागली. कसे बसे करून अर्ध्या तासाने दोघांना आपापल्या घरात पाठवायला चाळीच्या लोकांना यश आले. दोन्ही घराचे दरवाजे बंद झाले पण घरात आवाज येत राहिले. पूर्ण चाळ शांत होती. घरातल्या घरातच काय ते कुजबुजणे चालू होते. 

रात्री अचानक जाग आली तर तो बाहेर आला त्याच्या घरातले तर शांत झालेले वाटत होते पण तिच्या घराची लाईट अजून चालू होती आणि मध्ये मध्ये अस्पष्ट आवाज बाहेर येत होते. त्या निरागस पोरीची काय हालत झाली असेल ह्याची कल्पनाही करवत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही घराची दरवाजे उघडली नव्हती. संध्याकाळ पर्यंत फक्त भाजी आणण्यापुरते आणि नळावर पाणी भरण्यापुरते दोघांचे बाप आळीपाळीने बाहेर पडले होते. दोन्ही घरातून काही हालचाल नव्हती. तिसऱ्या चौथ्या दिवसापासून दोघांचे बाप कामावर जायला लागले होते. राजा पण एक दोनदा सुजलेले गाल घेऊन बाहेर दिसला होता पण राणी काही बाहेर पडली नव्हती. त्याचा जीव तुटत होता. तिचे काय झाले असेल ह्या काळजीने तो वेडा झाला होता. एकदा रविवारी दुपारी आई गाढ झोपली आहे बघून तो त्याला भेटायला आला आणि तिच्या घरी जाऊन तिची काय परिस्थिती आहे ह्याची थोडी फार तरी माहिती काढायला सांगितली. पण तिचा बापाच्या रागापुढे कोणाचा टिकाव लागणार ह्या भीतीने तो गेलाच नाही. एक आठवडा गेला. राजा कॉलेज ला जाऊ लागला पण ती काही घराबाहेर पडत नव्हती. दोन आठवडे झाले तरी तिचा काही पत्ता नाही....तिची काही माहिती नाही....साधे दर्शन ही झाले नव्हते. खुपदा हिम्मत करून तिच्या घरात जावेसे वाटत होते त्याला त्याच्या बापाची भीती नव्हती. तो कितीही मार खायला तयार होता. पण तिच्या बापाने तिला जिवंत ठेवले नसते....अजून मार मार मारले असते म्हणून तो स्वत:ला आवरत होता.

काय करावे ते सुचत नव्हते. नेहमी कॉलेजमधून आला की तिला दुपारी भेटायच्या वेळेत तो गच्चीवर जाऊन एकटाच बसायचा, कधीतरी ती येईल ह्या आशेने तिची वाट बघत....आणि एके दिवशी ती सगळ्यांची नजर चुकवून खरचं आली. धावत धावत जीने चढत आल्यामुळे तिला धाप लागला होता. चेहरा रडून सुजला होता. गालावरचा काळानिळा झालेला भाग आता कमी झालेला दिसत होता. त्याचा हात हातात घट्ट पकडून तिने तिच्या बापाने लग्न जमवल्याचे सांगितले. काहीही कर पण मला लग्न तुझ्याशीच करायचे आहे. तू यातून काहीतरी मार्ग काढ. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. काय बोलावे ते सुचत नव्हते. तरीही धीर करून आधी आपले डोके शांत केले. 

त्याने राणीची विचारपूस केली. लग्न कधी ठरवले आहे ते विचारले. तिने पुढच्या महिन्याच्या १५ तारखेला गावाला आहे म्हणून सांगितले. 'मला दुसऱ्या कोणाबरोबर लग्न नाही करायचे आहे रे' असे म्हणत तिने रडत रडतच त्याला मिठी मारली. पहिलीच मिठी होती दोघांची....तिचा सुखद अनुभव ही दोघांना घेता आला नव्हता. तिने त्याच्या छातीवर डोके ठेवून त्याला मागच्या दिवसात काय काय झाले ते सर्व सांगितले. राजानेही तिच्या केसांवरून हात फिरवत शांतपणे सगळे ऐकून घेतले. 'काहीतरी मार्ग काढ रे ह्यातून...मी दिवसा दिवसाला मरत चाललीय रे!' असे म्हणत त्याला घट्ट बिलगली आणि हुंदके देऊन रडायला लागली. थोडी शांत झाल्यावर त्याने तिचे दोन्ही खांदे धरून तिला स्वत:पासून बाजूला केले...तिचे डोळे पुसले व म्हणाला मी नक्की काही तरी मार्ग काढतो तू काही काळजी करू नकोस. मी दोन दिवसांनी पुनः इथेच भेटेन असे सांगून ती तशीच घाईघाईत निघाली. जाताना मागे वळून पुनः त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, 'मी तुझ्यावर खरच खूप प्रेमं करते रे!. मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची नाही होऊ शकत. त्यापेक्षा मला मरण आवडेल.' त्याने तिच्या होठांवर हात ठेऊन तिला असे वाईट बोलू नको म्हणून समजावले व म्हणाला, 'मी पण तुझ्यावर जीवापाड प्रेमं करतो गं....मी तुला कधी अंतर देणार नाही.' पाणावलेल्या डोळ्यांनी ती जीने उतरून निघून गेली.

तिला वचन तर दिले पण पुढे काय हा प्रश्न त्याला पडला. अख्खा दिवस विचार करण्यात गेला पण मार्ग सुचत नव्हता. पळून जाणे हा एकाच पर्याय होता पण पळून जाणार कुठे? राहणार कुठे? खाणार काय? त्याच्या घरातले तर ऐकणार नव्हते. कॉलेज धड झाले नाही...नोकरी कुठे मिळणार नाही. अजून लग्नाचे वय ही झाले नाही. तिच्या बापाने जर माझ्या अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेला अशी पोलीस केस टाकली तर त्याचे काही खरे नाही. तिच्या सारख्या सुंदर मुलीला घेऊन कुठे रस्त्यावर फिरत राहणार. आणि कधी कुठे पकडले गेलो तर दोघांचे काही खरे नाही. काही सुचत नव्हते. एकाच पर्याय समोर होता जो तिनेच सुचवला होता. त्यापेक्षा मरण परवडेल. तिला दुसऱ्या कोणी हात लावलेले त्याला सहन झाले नसते आणि तोही तिच्याशी लग्न करू शकणार नव्हता. मग एकाच पर्याय डोळ्यासमोर होता. ते म्हणजे दोघांनी आपला जीवन संपवायचे.

दोन दिवस विचार करून डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली पण राजाला काही सुचतच नव्हते. दोन दिवसांनी राणी गच्चीवर भेटायला आली. 'काय करायचे ठरवले आहे?', त्याने सगळ्या शक्यता बोलून दाखवल्या आणि उदास मनाने शेवटचा पर्याय काय तेही सांगितले. तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. ती म्हणाली, 'अरे! एवढे का वाईट वाटून घेतो. दुसऱ्या कोणाची होण्यापेक्षा मला तुझ्याबरोबर मरण पत्करलेले आवडेल. ह्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी तरी आपण एकमेकांचे होऊ. मी तयार आहे तुझ्या बरोबर यायला. कधी निघायचे ते सांग. आता मी पुढच्या वेळेला भेटीन ते तुझ्याबरोबर निघण्यासाठीचं.'

राजाने त्याला भेटून सर्व हकीकत सांगितली आणि काही पर्याय सुचतो का ते विचारले. पण त्याच्यापुढे सुद्धा काही पर्याय नव्हता. महत्वाची गोष्ट म्हणजे दोघेही वयाने लहान होते आणि दोघांनाही लग्न करता येणार नव्हते. त्यामुळे त्यांना घेऊन कुठेतरी लपवून ठेवणे म्हणजे धोकादायकच होते. पण तरी सुद्धा त्याने त्याला समजावले व घाईत काही विचार करू नको..काहीतरी मार्ग निघेल असे सांगितले.त्यालाही माहिती होते. की मार्ग काही निघणार नव्हता. दोन प्रेमी जीवांची ताटातूट बघावी लागणार होती.

पुढचे काही दिवस राजा काही दिसला नाही. दिसायचा तेव्हा नेहमी घाईतच असायचा आणि बोलणे ही टाळायचा. मदत नाही केली म्हणून राग आला असेल असेही त्याला वाटले. पण तो खरचं काही करू शकणार नव्हता.

काही दिवसांनी तो पहिल्या पाळीसाठी कामावर जात असताना पहाटे साडे पाचच्या सुमारास त्याला राजा राणी दोघेही हातात हात घालून लगबगीने जाताना दिसली. त्याच्या बसस्टॉप समोरच्या रस्त्यावरून ते जात होते. तो आश्चर्यचकित होऊन विचारत पडला तो रस्ता तर शहराच्या मागे असलेल्या नॅशनल पार्क मध्ये जात होता. पुढे राखीव अभयारण्य होते. तिथल्या घनदाट झाडीत दिवसा जायला सुद्धा भीती वाटायची. अशा ठिकाणी दोघे कशाला चालले होते? त्याने त्याला हाक मारली. पहिल्यांदा तर राजा दचकलाच पण तो आहे पाहून थोडा जीवात जीव आला. तो रस्ता क्रॉस करून राजाकडे गेला आणि विचारले एवढ्या सकाळी तुम्ही इकडे कुठे चाललात आणि तिला घरातून बाहेर कसे पडायला भेटले. त्यावर दोघे काहीच बोलले नाही फक्त हसले. राजाने त्याचा हात हातात घेऊन म्हणाला, 'मित्रा, आम्ही चाळीत भेटू शकत नाही म्हणून इथे भेटायला आलोय....थोड्यावेळाने परत जाऊ. पण तू कोणाला सांगू नकोस. आणि तू आतापर्यंत केलेल्या मदतीबद्दल तुझे मनापासून आभार.'

'अरे! असे का बोलतोस?'

'काही नाही रे! असच.'

'तू जा! तुझी बस जाईल. संध्याकाळी भेटू.'

त्याने हम्म करून मान डोलावली. दोघांनी त्याच्याकडे बघून कृतज्ञापूर्वक हास्य केले. दोघांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. दोघे नक्कीच काहीतरी ठरवून आले होते. पण त्याला सांगत नव्हते.त्यालाही घाई होती. बस येताना दिसत होती. त्याने दोघांचा निरोप घेऊन बस पकडायला निघून गेला. 

दुपारी ४ च्या दरम्यान तो चाळीत परतला तेव्हा चाळीत काहीतरी वेगळे वातावरण वाटत होते. सगळ्या बायकांची कुजबुज चालू होती. पोरे खेळायचे सोडून कट्ट्यावर बसून काहीतरी कुजबुजत होती. तो पोरांच्या घोळक्यात गेला तेव्हा समजले की राजा आणि राणी दोघेही सकाळपासून गायब आहेत. दोघांच्या घरात भांडणे झाली आहेत. पोलीस ही येऊन गेले आहेत. दोघेही हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. पण दोघांचा काही पत्ता नाही. ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पिंट्या म्हणाला 'अरे! माझ्या बाबांनी त्यांना सकाळी ६ वाजता मार्केट मध्ये फिरताना बघितले होते'... गण्या म्हणाला 'अरे हो! मग माझ्या बाबांनी १० वाजता रेल्वे स्टेशन वर बघितले होते. बहुतेक ते दोघे पळून लग्न करतील.' आणि त्यांनी एकमेकांच्या हातावर टाळ्या दिल्या.

खरे काय ते त्यालाच माहित होते. ते मार्केट मध्ये किंवा स्टेशन वर नक्कीच जाणार नव्हते. पण मग ते गेले कुठे? सकाळी ते दोघे जंगलात काही बरे वाईट तर करायला गेली असतील. त्यांच्या चेहऱ्यावरचे निर्णय, निघताना त्यांनी केलेले स्मितहास्य, राजाने मानलेले आभार त्याला आता कळू लागले होते. ते दोघे लग्न तर नक्कीच करू शकत नव्हते आणि पळून जाऊन कुठे राहू शकतही नव्हते. जीवन संपवण्यासारखा त्यांच्या कडे दुसरा चांगला उपाय नव्हता. त्या दोघांचे काय झाले असेल ते त्याला नक्कीच कळून चुकले होते. त्याने कोणाचा गैरसमज दूर करायचा प्रयत्न केला नाही. अत्यंत जड पावलाने तो आपल्या घराकडे चालू लागला.

एक प्रेमकहाणी पूर्ण होता होता अधुरी राहणार होती.

CONVERSATION

4 comments:

  1. दादा फारच सुंदर ...वाचता वाचता कधी गुंतून गेलो समजले देखील नाही … फारच छान...

    ReplyDelete
  2. khupach sunder apratim...........tumacha blog vachayacha mi tar dhadaka ch lavlela aahe.....

    ReplyDelete
    Replies
    1. धनयवाद गणेश
      आवडला तर कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका

      Delete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top