आता काय करायचे ??

हॅल्लो !!
हॅल्लो कोण
?
हा मी दादा बोलतोय.
हा दादा बोला.
अरे तो 'पॅंथर' 'वाघाच्या' गुहेत गेला ऐकलेय ?
हो ना ! दादा, त्यांची बोलणी चाललीय असे ऐकलेय. पुढच्या निवडणुकीत ते एकत्र शिकार करणार आहेत असे वाटतेय.आपली चांगलीच गेम होणार आहे. इथे 'अपना हात' आपल्याच मागे हात धुवून लागला आहे. आपण ना घर के ना घाट के अशी हालत झाली आहे.
अरे पण काय उपाय काढला आहे का त्यावर ?
नाही दादा काय सुचतच नाही.
अरे काय झालं काय तुम्हाला? तुमचे 'घड्याळ्याचे' सेल डाऊन झालेत काय ? काका साहेबाना समजले तर काय म्हणतील एक राज्य सांभाळता येत नाही हे अख्खे जंगल कसे सांभाळणार?एक काम कर आपल्या प्राणी सहकारी बँकेतून पैसे काढ आणि इतर प्राण्यांना वाटून त्यांना निवडणुकीआधीच कर्जे बिर्जे काय पाहिजे असेल ते देऊन टाक
पण दादा ???
अरे आता काय ? बाकीच्या संचालक मंडळाची काळजी करू नको. ते आपल्या हाताखालीच आहेत. त्यांना मी बघेन.
पण दादा ?? ऐका तरी ...
अरे काय ऐका ? तू सांगितले ते कर आधी बघू. सगळी घड्याळे पटापट चालली पाहिजेत.
अहो पण दादा. बँक आता आपल्या ताब्यात नाही आहे. मोठ्या बँकेने ती कधीच ताब्यात घेतली.
अरे काय बोलतोस काय ? पण मला काही नोटीस पण नाही आली.
अहो साहेब पण आता नव्या नियमानुसार मोठ्या बँकेला आपल्याला नोटीस द्यायची गरजच नाही. ती आपली बँक डायरेक्ट बरखास्त करू शकते. तुम्हाला नवीन नियम माहित नाही का?
ठीक आहे ठीक आहे ! मला माहित होते. मी तुझी परीक्षा घेत होतो
अं !! (?)
अरे पण काकांना पण माहित नव्हते का ? त्यांनी तर आपल्या जंगलाच्या अर्थ खात्याकडे सेटिंग लावली होती ना ?
हो दादा.पण ते तरी किती दिवस गप्प ठेवू शकणार.? कधी ना कधी बाहेर पडणारच ते.
ठीक आहे ठीक आहे ...ते जाउदेत ह्या पॅंथर चे काय करायचे ? नेमकी निवडणूक आली आणि तो बांद्र्याच्या गुहेत गेला.आपली एकगठ्ठा शिकार जाणार.
हो दादा !........पण आपण एक काम केले तर ?
काय रे ?
साहेब ह्या वाघाच्या बछ्द्यावर  हल्ला चढवला तर?
आयडिया तर चांगली आहे. वाघ एकदा बिथरला की काही तरी बडबड करेल आणि मिडीयाला पण चांगला विषय मिळेल आणि आपल्यावरचे आरोपांकडे दुर्लक्ष होईल. अशी तशी पब्लिक म्हणजे शोर्ट टर्म मेमरी लॉसच आहेत.
साहेब उद्या आपली सभा आहे तुम्ही वाघाला चीथवा..मग बघू काय करायचे.
============================================================
हॅल्लो !! ! साहेब तुम्ही तर वाघाच्या गुहेत जाऊन वाघावरच हल्ला केला.
अरे मग उगीचच लोक मला दादा म्हणत नाही. 
पण साहेब आता राडा होणार.  
अरे आपली माणसे काय उगाचच पोसतोय. करू दे साल्यांना. फोडू देत एकमेकांची टाळकी. मिडिया वाल्यांना पण काहीतरी खुराक मिळेल आणि आपल्याला दुसरी लफडी निस्तरता येतील. 


ते ठीक आहे साहेब पण वाघ ह्या जंगलातला सर्वात जुना आणि वयाने मोठा आहे. त्याच्यावर हल्ला करायला नाय पाहिजे होता. त्याच्या एका डरकाळीवर अख्खे जंगल जागे होते..
अरे घाबरतोस काय त्याला? ह्या जंगलात फक्त दोनच गोष्टी चालतात एक बाळासाहेब आणि दुसरे बाबासाहेब. दोघांपैकी एकाची जरी कळ काढलीस कि बस फक्त बघत बसायचे.
तसे नाही साहेब पण.....
अरे सोड पण बिन....तू अजून हल्ला करायच्या तयारीला लाग. एक काम कर पॅंथर त्या वाघाकडे गेला आहे ना ! त्या दोघांमध्ये फुट पाड. मग बघ कसा पॅंथर परत घड्याळाकडे येतो.
हो दादा पण ते कसे करणार. ह्यावेळेला पॅंथर पण भडकला आहे आपल्या काका साहेबांवर. म्हणूनच तो तिकडे वाघाच्या गुहेत गेला आहे ना.
एक काम कर पॅंथर च्या दुखत्या रगेवर असा बाण मार कि वाघ आणि पॅंथर दोघेही भडकून उठले पाहिजेत.
पण दादा कसे ?
उद्याच घोषणा करून टाक. आम्ही दादर चे नाव बदलून चैत्यभूमी करणार आहोत आणि पुढच्या अधिवेशनामध्ये सर्व प्राण्याच्या बैठकीत आम्ही हा प्रस्ताव मांडणार आहे.
अहो दादा, पण दादर हे जुने नाव आहे खूप वर्षापासून चालत आले आहे.
अरे असुदेत तुला काय फरक पडतोय रे. आपल्याला फक्त मताचे राजकारण तर करायचे. कोणाच्या भावनांशी आपल्याला काय मतलब. आपण दादर चे चैत्यभूमी केले तर वाघाला आवडणार नाही पण तो ओरडू शकणार नाही कारण आतच पँथर बरोबर त्याची मैत्री झाली आहे आणि पठार च्या गटातले लोकही आपल्यावर खुश होतील. जास्तीत जास्त काय होइल इंजिन येईल बोम्बलत. आपल्याला काय फरक नाही पडत. जसे पुण्याच्या लाल महालतून आपण दादोजींचा पुतळा हलवला तसेच एका रात्रीत नाव बदलून टाकायचे.
ठीक आहे दादा ..आता तुम्ही म्हणताहेत तर  करतो  तसे .
===========================================================
अहो !  दादा. राडे चालू झाले आहेत.
अरे होऊ देत अजून वातावरण गरम होऊदेत मग बघ अजून कसे तेल ओततोय. आपल्या सर्व पोलीस ठाण्यावर फोन करुन् सांगून ठेव. राडे आपल्या माणसांनी केले कि काही कारवाई करायची नाही आणि जरा वाघाच्या माणसांनी केली तर लगेच एकेकाला आत टाकुन फोडुन काढायचा. अगदी रक्ताची लघवी होइपर्यंत मारायचे.
हो साहेब ! आताचा फोन करतो.
======================================================
दादा काय झाले काय समजले नाही. वाघाने एक दोन डरकाळी फोडल्या , पण त्याने न फोडता त्याच्या प्रवक्त्यांनीच जास्त फोडल्या...वाघाचा बछडा पण मुंबईत नाही आहे. वातावरण एकदम शांत झाले आहे .
हा रे !! मला पण काही समजत नाही. इंजिनाने  ने पण एक दोनदा शिट्टी वाजवली आणि तो पण गप्प बसला. वाघाला चिथवुन सुद्धा तो गप्प कसा आहे.
दादा मला आतली खबर मिळाली आहे कि काका साहेबांनी बहुतेक वाघाला फोन केला आहे, काका साहेबांनी सांगितले कि मी पुतण्याला आवरतो तुम्ही घड्याळाकडे लक्ष देऊ नका. तुम्ही हाताच्या मागे हात धुवून लागा. मी दादर चा मॅटर सुद्धा थोडा वेळ साइडला करायला सांगतो. तुम्ही फक्त हाताच्या मागे लागा. आणि आपल्या सर्व मंत्र्यानी सुद्धा त्याला पाठिंबा दिला आहे.
च्यायला हे काका आपलाच बुच लावायला बसले आहेत का ? चांगला मोका होता एका दगडात दोन तिन पक्षी मारण्याचा..... साला चांगला चान्स गेला आता.
आता काय करायचे दादा !!!
आता काय एखादी सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करुया आणि काय  घड्याळ्याचे सेल बदलत राहायचे.
टिक टिक.....
DSCN2826
DSCN2716-2

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top