परममित्र | जयवंत दळवी

जयवंत दळवी यांचे परममित्र हे पुस्तक वाचनात आले. हे पुस्तक म्हणजे जवळपास 300 पानांचे एक वेगवेगळ्या काळी लिहिलेले छोटे छोटे व्यक्तिचित्रणात्मक लेख आहेत. मॅजेस्टिक प्रकाशनाने त्याचे संग्रह करून पुस्तक बनवलेले आहे. ह्या पुस्तकात साहित्यविश्वाशी जोडलेल्या अनेक लेखक, प्रकाशक, वार्ताहर, संपादक, पत्रकार, चित्रकार अशा अनेक रथी-महारथी यांचे छोटेखानी व्यक्तिचित्रण आहे.

पुस्तकाच्या सुरुवातीला खांडेकर यांच्या साध्या सरळ जीवनशैली वरून झाली आहे दोन-चार पानामध्ये त्यांचे जीवन प्रवास समजून येतो. पुढे त्यांच्या मित्राची म्हणजे भाऊराव माडखोलकर - नागपुरातल्या सर्वात मोठे दैनिक तरुण भारत याचे संपादक - ह्यांची ओळख होते. त्यांच्या रंगेल आणि रसिल्या स्वभावाचा माफक शब्दात वर्णन केलेले आहे.

गजानन पांडुरंग परचुरे - ग प परचुरे  म्हणजेच 'परचुरे प्रकाशन मंदिराचे' सर्वेसर्वा प्रकाशक. ह्यांनी सावरकर-अत्रे-फडके ही तीन दैवते मिळवून त्यांचे प्रेम संपादन करून..त्यांची खूप पुस्तके छापून नाव कमावले.  इतर लेखकांची सुद्धाअनेक पुस्तके त्यांच्या प्रकाशनाखाली प्रसिद्ध झाली. प्रसंगी कर्ज काढून, खस्ता काढून, समकालीन सर्व प्रकाशकांचा आदर करून, सर्वांशी मैत्री ठेवून, लेखकाचे सगळे हट्ट पुरवून त्यांनी 'परचुरे प्रकाशन मंदिर' लहानाचे मोठे केले. अनेक पुस्तके छापली आणि यथोचित मराठी साहित्याची सेवा केली

धनंजय कीर नावाच्या एका व्यक्तीचा या पुस्तकामध्ये परिचय होतो. व्यक्ती वर्णनामध्ये त्यांचा हात धरणारा दुसरा लेखक विरळाच. एकोणीसशे पन्नास पंचावन्न च्या सुमारास त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर 450 पानाचे पुस्तक इंग्रजी भाषेत लिहिले होते. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे धनंजय कीर हे मराठी मधून शिकलेले मॅट्रिक पास झालेले साधे कारकून होते. त्यावरून त्यांच्या ज्ञानाचा आणि भाषेवर असलेल्या प्रभुत्वाचा अंदाज येऊ शकतो. दोन खोल्यांच्या संसारांमध्ये....मध्यरात्रीनंतर मांडीवर पाट येऊन ते पुस्तकांमागून पुस्तके लिहीत होते.....कारकुनी सांभाळून चार-पाच मुलांचे पोट भरत पुस्तकांवर पुस्तके विकत घेत होते आणि तेवढ्याच जाडीचे नवीन पुस्तके ग्रंथ लिहून काढत होते. या माणसाला म्हणे जाड भिंगाचा चष्म्या मधून माणसाला अचूक म्हणजे त्यांच्या गुणदोषांसकट जाणण्याची विलक्षण शक्ती लाभलेली होती. त्यामुळेच मराठी साहित्य मध्ये ते उत्कृष्ट चरित्रकार म्हणून गणले गेले.

मॅजेस्टिक बुक डेपोचे केशवराव कोठावळे आणि तुकाराम शेठ कोठावळे यांचे संक्षिप्त चरित्र या पुस्तकामध्ये आढळून येते.
फुटपाथवर झोपून....रस्त्यावर पुस्तके विकणे..... सिनेमाची तिकिटे विकणे.... दारोदार जाऊन लोणची विकणे  असे करत करत ते शेवटी पुस्तकाच्या धंद्यात उतरले.

मॅजेस्टिक सिनेमाच्या बाजूला टाकलेले एक छोटेसे 'खुराडे' म्हणजे पुस्तकांचे छोटेसे दुकान म्हणजेच..... मॅजेस्टिक बुक डेपो. ह्याच बुक डेपोचे पुढे विस्तार होऊन प्रकाशनामध्ये रूपांतर झाले. अतिशय मेहनत करून हे दोन्ही भाऊ पुढे खूप नावारूपाला आले. पुढे त्यांनी प्रसिद्ध 'ललित' मासिकाचे प्रकाशन केले.केशवराव जेवढे कणखर स्वभावाचे बाहेर तेवढेच मनातून मृदू स्वभावाचे. लेखकाच्या भाषेत सांगायचे म्हणजे चमत्कारिक नशीब असलेला हा माणूस जेवढा यशस्वी होता तितकाच अयशस्वी सुद्धा. डायबेटिस हृदयविकार  या आजारामुळे ते अनपेक्षितपणे जग सोडून गेले. मागोमाग थोड्या वर्षांनी तुकाराम शेठ ही जग सोडून गेले. त्यांच्यापुढे दोघांच्या मुलांनी मॅजेस्टिक प्रकाशनाचा व्यवसाय चालू ठेवला.

दत्तात्रय पांडुरंग खांबेटे म्हणजेच- द पा खांबेटे हे पण बहुगुणी व्यक्तिमत्व....निष्णात पत्रकार, चतुरस्त्र ललितलेखनकार... 'लोकमान्य' दैनिकामध्ये ते कामाला होते. नव्याने सुरू झालेल्या रविवारच्या चार पानी पुरवणीमध्ये वेगवेगळे लेख मागवणे.... प्रकाशकाला बजेट मुळे शक्य नसायचे. अशा वेळेस ते स्वतः एकटाकी चार-पाच लेख लिहून काढायचे आणि वेगवेगळ्या नावाने छापायचे. त्याबद्दल त्यांना पैसे तर मिळत नव्हते पण त्यांची लिहायची हौस पूर्ण होत होती. जवळजवळ दहा ते बारा टोपणनावांनी ते सतत लिहीत असायचे. त्याशिवाय इतर मासिक आणि साप्ताहिकांमध्ये त्यांचे लेख वेगळ्या नावांनी यायचे. 1960 ते 65 यादरम्यान ते बाळासाहेब ठाकरे यांच्या 'मार्मिक' साप्ताहिकाचे संपादक होते. असे म्हटले जाते की शिवसेनेच्या स्थापनेमध्ये खांबेटे यांचे सुद्धा तितकेच योगदान होते. एका कारखान्यामध्ये मराठी माणसावर कसा अन्याय होतो हे सांगणारे पत्र त्यांना आले होते ते त्यांनी मार्मिक मध्ये ठळक पणे छापले आणि एक प्रकारे मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली त्यानंतर जो तो मराठी माणूस आपल्यावर होणाऱ्या अन्यायासाठी मार्मिक कडे पत्र पाठवू लागला. मार्मिक मधले लेख आणि बाळासाहेबांचे व्यंगचित्र यातून एक चळवळ उभी राहिली आणि पुढे बाळासाहेबांनी त्या चळवळीचे नेतृत्व केले आणि शिवसेनेचे मूर्त स्वरूप दिले. साध्या सोप्या राहणीमानामुळे त्यांच्या गरजा खूप कमी होत्या. खूप कमी पैशात नवरा बायको भागवून बाकीचे सगळे दान करत होते. जीवनाबद्दल ते एवढे तटस्थ होते की मृत्यूच्या आधी दोन दिवस त्यांनी आपल्या बायकोशी शांतपणे चर्चा केली. मृत्यूनंतर कसलेही विधी करू नये, अग्निसंस्कार साधेपणे करावा अशा सूचना त्यांनी पत्नीला दिल्या होत्या. हे पुस्तक हाती नसते पडले तर खांबेटे यांचे योगदान मला माहितीच नसते पडले.

'आयडियल बुक डेपो' चे नाना नेरुरकर.... त्यांचा कोकणातून मुंबईतला  संघर्षमय प्रवास.... साधी राहणीमान असलेल्या ह्या माणसाचे  रद्दी पुस्तकांपासून नवीन पुस्तकांच्या दुकानापर्यंत केलेला प्रवास रंजक आहे. छबिलदास गल्लीमध्ये छबिलदास शाळेसमोर एक छोट्या गाळ्यात घेतलेले दुकान पुढे आयडियल बुक डेपो नावाने पूर्ण साहित्यसृष्टीत प्रसिद्ध झाले. त्यांनी सुरुवात केलेल्या दुकानाचे..धंद्याचे त्यांच्या मुलांनी कसे विस्तार केले ह्याचे थोडक्यात वर्णन ह्यात दिलेले आहे.

जयंत साळगावकर त्यांचा जीवनसंघर्ष तर वाचण्यासारखा आहे. जयंत वरून.....जयंतराव.... आणि जयंतराववरून ज्योतिर्भास्कर जयंतराव असा झालेला प्रवास खुपच भयानक आहे. साप्ताहिक प्रकाशन ते शब्दकोडी प्रकाशन करता करता अगदी त्यांच्या जीवावर बेतली होती. त्यांच्या घराच्या बाहेर गुंड वसुली करता, नाहीतर त्यांना मारण्याकरता टपलेलेच असायचे. बिकट प्रसंगांमधून त्यांनी स्वतःला आणि कुटुंबाला सांभाळत परत ज्योतिष विद्येकडे मोर्चा वळवला आणि हळूहळू पंचांग, दिनदर्शिका करत 'कालनिर्णय' कडे येऊन स्थिरावले. याच कालनिर्णयने त्यांच्यासारख्या फकीर माणसाला कोट्यावधी करून ठेवले त्यांची जीवन कहाणी नक्कीच प्रेरणादायी होती.

जे. कुलकर्णी या लेखकाचे वेगळेच व्यक्तिमत्व दिसून येते त्यांच्या पत्रातील एक शेवटचा उतारा उगाच बेचैन करून जातो..... रवींद्र किणी सारख्या झटपट लिहिणाऱ्या लेखकाचाही ह्यात परिचय होतो....एका दिवसात 35 पुस्तके प्रकाशित करण्याचा भीम पराक्रम सुद्धा त्यांनी केला होता. काका केणी नावाच्या एका हरहुन्नरी कलाकाराचं दर्शन घडून येते...तसेच इतर गोविंद तळवलकर, विजया मेहता, नाना नेरुळकर, अरविंद गोखले, मधु मंगेश कर्णिक अश्या अनेक महान लोकांचे संक्षिप्त स्वभाव वर्णन ह्यात केलेले आहे.

मौज प्रकाशन चे विष्णू पुरुषोत्तम भागवत हे पण एक अशीच असामी व्यक्ती. वयाच्या विसाव्या वर्षी मौज छापखान्याचे व्यवहार अंगावर घेतले. खर्चाचा ताळमेळ बसवत त्यावेळची दैनिक मासिके प्रकाशित करता करता त्यांची खूप तारांबळ उडायची शेवटी दैनिक बंद करून त्यांनी फक्त उत्कृष्ट साहित्य पुरवण्याकडे लक्ष दिले. स्वतःची वैज्ञानिक बनायची इच्छा सोडून ते जबरदस्तीने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी  जबरदस्तीनेच प्रकाशन व्यवसाय मध्ये आले...पण कोणतेही काम मनापासून करायची या त्यांच्या सवयीमुळे आणि दांडगी इच्छाशक्ती ह्यामुळे ते इतर प्रकाशन संस्थेपेक्षा वेगळे स्थान मिळवून नेहमी प्रथम स्थानी राहिले. ज्या माणसाला मुद्रणाचे, प्रिंटिंगची काहीच माहिती नव्हती त्यालाच लोक 'मुद्रण महर्षी' म्हणू लागले. 'मुद्रण ही आनंद देणारी 'निर्मिती' आहे आणि इतर कलांसारखीच नवनवीन उन्मेष व्यक्त करणारी कला आहे' असे त्यांचे म्हणणे असायचे आणि त्यामुळे त्यांच्या सौंदर्यपूर्ण छपाई आणि उत्कृष्ट प्रकाशन बद्दल महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात कौतुक होत होते. मराठीतील विश्वकोशाची पायाभरणी सुद्धा विष्णुपंतांनी केली. असे म्हटले जाते की महाराष्ट्रातल्या प्रत्येक छापखाना त्यांच्या माहितीचा होता, कितीतरी नवीन छापखाने त्यांच्या सल्ल्याने स्थापन झाले होते. नवनवीन मुद्रक धंद्यामध्ये स्थिरस्थावर होण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मुंबईला येत असत. अशा या मुद्रण महर्षी ला एक विचित्र आजार लागला.... ज्याने आयुष्याच्या विसाव्या वर्षापासून शब्दाने शब्द खेळवले मराठीला संदर्भ दिले त्यांना नेमके दुखणे सुद्धा विचित्रच होते. त्यांच्या मेंदूतले शब्दांचे केंद्र बधिर झाले आणि त्यांना शब्दांचा उच्चार करता येईना, शब्द लिहिता येईना आणि या दुखण्यावर उपचार करत असतानाच त्यांचे दुर्दैवी निधन झाले
मौज प्रकाशनचे अजून एक कर्ताधर्ता म्हणजे श्रीकृष्ण पुरुषोत्तम भागवत हे भागवत म्हणजे एक व्यासंगी व्यक्तिमत्व... तटस्थ विद्वत्ता आणि विलक्षण गांभीर्य वृत्ती यांच्या जोरावर स्वतः लेखन न करता त्यांनी मराठी साहित्याला उत्कृष्ट लेखक आणि उत्कृष्ट कथा मिळतील याची काळजी घेतली. प्रसंगी आपल्या स्थितप्रज्ञ व गंभीर वृत्ती वर टीका सहन करून मराठी साहित्य मध्ये उत्कृष्ट कथा आणि उत्कृष्ट पुस्तके छापणे यावरच भर दिला. त्यामुळे नवनवीन ऊठसूट लेखक बनू इच्छिणाऱ्या मंडळींचा रोषही रोषही सहन केला. निस्वार्थपणे मराठी साहित्याची खूप सेवा केली. या दोन भावांनी मिळून मराठी साहित्याला नुसताच आकार नाही तर उत्कृष्ट 'क्वालिटी आणि क्वांटिटी' त्याच्या सौंदर्य सकट दिली..... धन्य ते भागवत बंधू.

दीनानाथ दलाल एक लोकप्रिय व उदात्त कला अंगी असलेले चित्रकार.... त्यांचे चित्र असलेले मासिके हातोहात खपली जायची. त्यांच्या चित्राची त्यांच्या मितभाषी स्वभावाची धावती ओळख या पुस्तकांमध्ये होऊन जाते.

बेळगावच्या शशिकांत हनुमंतराव दातार नावाच्या एका कलाकार माणसाचे सुद्धा वर्णन ह्यात आहे.... ह्या व्यक्तीने कुमारी मोहिनी दिवाकर या नावाने लाडीक भाषेत पत्र लिहून सर्व लेखकांना कसे गुंडाळले होते ह्याची कथा सुद्धा वाचण्यासारखी.

या सर्व रथी-महारथींनी आपली उमेदीची वर्ष वाया घालवून. आपले संसार देशोधडीला लावून.... कर्ज काढून ....घरेदारे गहाण ठेवून मराठी साहित्याची मनापासून सेवा केली आहे. मराठी मधे नवीन साहित्य जन्माला यावे... चांगली पुस्तके, ग्रंथ निर्माण व्हावी....उत्तमोत्तम लेखक निर्माण व्हावे ह्यासाठी ह्या सगळ्या मंडळींनी त्या त्या काळात खूप मेहनत घेतली आहे.

त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आजच्या घडीला मराठी साहित्यामध्ये वाचण्यासारखी पुस्तके आहेत. एवढे गुणी लेखक आणि वाचनीय पुस्तके क्वचितच दुसऱ्या कुठल्या भाषेला लाभली असतील आणि या सर्वांचे श्रेय जाते ते वरच्या ह्या सगळ्या मंडळींना.

जयवंत दळवी ह्यांनी या सगळ्या साहित्य सेवकांचे अगदी मोजके पण पुढच्या पिढीला माहिती पडेल असे संक्षिप्त व सुंदर वर्णन त्या त्या काळी लिहिलेल्या लेखामध्ये केले आहे. त्यांच्या ओघवत्या आणि सरळसोप्या भाषेमुळे पुस्तक खाली ठेवावेसे वाटत नाही. लेखका सकट ह्या सर्व साहित्य सेवकांना साष्टांग नमस्कार.


- आशिष सावंत

टीप: हे परीक्षण नाही फक्त पुस्तकाचे रसग्रहण आहे.

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top