झाडाझडती | विश्वास पाटील

झाडाझडती | विश्वास पाटील

खूप दिवसांपूर्वी मित्राने सुचवलेले पुस्तक... कधी तरी वाचू ह्या विचाराने मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी नोंदवून ठेवलेले होते....अचानक पुस्तक समोर आल्यावर त्या नोंदीची आठवण झाली. त्यातल्या मुखपृष्ठावरील केविलवाण्या माणसांची चित्रे पाहून आतमध्ये काहीतरी भन्नाट खुराक असणार ह्याची जाणीव सुरुवातीलाच झाली होती.

जवळपास ४८० पानांची ही कादंबरी 'भरगच्च' लिखाणाने भरली आहे. भरगच्च अश्यासाठी म्हणायचे की प्रिंटिंग करताना फॉन्ट जर अजून सुटसुटीत असता तर कमीतकमी ७०० पाने तरी नक्की झाली असती. एवढा या कादंबरीचा आवाका मोठा आहे.

देशाचा, राज्याचा विकास कोणाला नको असतो पण हा विकास होताना कितीजणांचे आयुष्य पायदळी तुडवले जाते..लोक आपली वडिलोपार्जित संपत्ती, घरदार, पिढी दर पिढी लावलेली झाडे, शेती भाती, देवस्थान इ. सोडून भिकेला लागतात. असेच गाव आणि देव पाठीवर बांधून देशोधडीला लागणाऱ्या धरणग्रस्तांची ही कहाणी आहे. कादंबरीत जवळपास आठ दहा वर्षांचा धावता कालखंड चित्रित केला आहे.

कादंबरीची सुरुवात जांभळी गावातील गोम्या आणि त्याचा रेडा हल्या यांच्या साध्या वर्तनातून सुरुवात होते . सुरुवातीच्या काही पानांमध्येच गावाचे, आणि गावातल्या माणसांचे छोटेखानी वर्णन करण्यात आले आहे. रात्री गावात येणारी शेवटची एसटी आणि त्यातून परतणारी माणसे जेव्हा गावात येत नाही तेव्हा गावातल्या माणसांत चुळबूळ चालू होते आणि इथून कथानक चालू होते. इथेच एका कॅरेक्टरचा जन्म होतो तो म्हणजे खैरमोडे गुरुजी. आणि पुढे जवळपास चारशे पानांपर्यंत खैरमोडे गुरुजी आपल्या समोर येत राहतो .

माझ्या आतापर्यंतच्या वाचन प्रवासातील वाचलेल्या सगळ्या कादंबरी मधला सगळ्यात जास्त भावलेला आणि सगळ्यात जास्त सशक्त नायक....खैरमोडे गुरुजी. आपली नोकरी, आयुष्य सगळे पणाला लावून धरणग्रस्तांसाठी झटणारा...खासदारांपासून कलेक्टर पासून सर्व  राजकारण्यांना अधिकाऱ्यांना हलवून सोडणारा ... धरणग्रस्तांचा कैवारी...गरिबांचा देव.... खैरमोडे गुरुजी.

खासदार शिंगाडे आपल्या मुलासाठी साखर कारखाना उभारायच्या बेतात असतो. जो पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा दाखवला जाणार नाही तोपर्यंत साखर कारखान्याला परवानगी मिळणार नसते म्हणून खासदार शिंगाडे जुने प्रकरण उरकून काढून वाघजाई नदीवर धरण बांधण्यासाठी उपोषणाला बसतो. या धरणामुळे अख्खे जांभळी गाव आणि आजूबाजूची कित्येक गावे पाण्याखाली जाणार होती. म्हणून ह्या गावातील सर्व लोकांचा या धरणाला विरोध असतो आणि यातूनच न संपणाऱ्या संघर्षाचा जन्म होतो.   

या संघर्षातून होणारी तुरुंग भरती , नंतर खासदारांची खोटी आश्वासने देऊन केलेली मध्यस्थी, वेगवेगळी आमिषे दाखवून दिलेली भलावणी, लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी दाखवलेला खोटा भाईचारा, सरकारी हमी, सरकारी बडगे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर धरणाला अंशतः मान्यता मिळते. छोटय़ा मोठय़ा विरोधा खाली हैबतीच्या बापाचा आणि आवडाईच्या नवऱ्याचा बळी घेऊन धरणाला सुरुवात होते. होणारा विरोध सरकार ताकदीवर मोडून काढते. प्रत्यक्ष गाव उठवायला निसर्गसुद्धा सरकारच्या बाजूने येऊन जोरदार पाऊस पडून पूरस्थिती निर्माण करतो. खैरमोडे मास्तर आणि गावातील काही तरुण पोरे पुढाकार घेऊन गावातल्या सगळय़ा माणसांना सुखरूप बाहेर काढतात...गाव उठते.

एकदाचे गाव उठते आणि खऱ्या संघर्षाला सुरुवात होतो...
आश्वासने मोडीत निघतात...पावलापावलावर फसवणूक, निंदा, संघर्ष वाट्याला येतो....माणसाचे एकेक स्वभाव दिसू लागतात...आणि कादंबरीतील एकेक पात्र आपल्या मनावर खोलवर आघात करत जाते.

आपल्या सावत्र आईला मेलेले दाखवून जमीन लाटणारे दत्तू सरपंच, मध्यस्थी करून गरिबांना लुबाडणारा लाला, धरणाच्या कामावर कायम नोकरी मिळावी म्हणून झगडणारा हैबती, बुलडोझरखाली चिरडला गेलेला शिवराम, धायमोकलून रडणारी त्याची बायको, धरणग्रस्त म्हणून लग्न मोडणारी रूपा, आयुष्यभर संघर्ष करत आलेली आवडाई, दुसऱ्या गावातल्या धरणग्रस्तांची मुलगी नकुसा,  पैसे खाऊन जागेची पैशाची वाटणी करणारे सरकारी कर्मचारी,  खैरमोडे गुरुजींच्या संघर्षात फरफटणारी त्यांची मुलगी आणि बायको, अशोक मास्तर आणि त्याचा म्हातारा बाप, मुंबईचा सुभान दादा, धनगरांचा कुशापा राजा, धरणग्रस्तांच्या जखमांवर फुंकर घालणारा देशमुख नावाचा नवीन धडाडीचा कलेक्टर, चांगला सरकारी अधिकारी पवार असे एकापेक्षा एक पात्र लेखकाने आपल्या दमदार शैलीत उभे केले आहे.

नवीन वसलेल्या आणि काही सुविधा नसलेल्या गावठाणात होणारा नकुसाचे होणारे बाळंतपण मनाला चटका लावून जाते..येणारे बाळ ही अपरिमित संघर्ष करतच येते.  डोंगर आणि नदीकाठची साठ सत्तर एकर जमिनीचा मालक असलेला धनगरांचा कुशापा राजा सरकारी नियमांमुळे हाती काहीच न मिळता धरणग्रस्त होऊन जातो त्याचे अख्खे गाव दुसरीकडे वसले जाते पण सरकारी नियमामुळे त्याचे पुनर्वसन होत नाही आणि अख्या जंगलात फक्त त्याचे एकट्याचे घर राहते आणि वाट्याला येतो उभा डोंगर आणि त्यामागून येणारे दारिद्र्य. मुलीच्या लग्नाखातर पैसे जमावताना दारू गाळायचे बेकायदेशीर कामही हा राजा करतो...मुलीच्या लग्नाचा हुंडा जमवण्यासाठी तो शेवटी वाघाला मारून त्याचे कातडे विकायचा निर्णय घेतो... त्यासाठी चार दिवसाचा त्याचा भर पावसात उपाशीपोटी वणवण फिरून झालेला संघर्ष....वाघ समोर आल्यावर त्याच्याशी झालेली झटापट...आणि अंगावर जखमा घेऊन वाघावर मिळवलेला विजय....पोलिसांच्या आणि वन अधिकारांच्या नजरा चुकवून शहरापर्यंत कातडे घेऊन केलेला प्रवास आणि तिथल्या दुकानदारा बरोबर पुढे घडलेला प्रसंग हा ऐका बैठकीत वाचण्यासारखा आहे.

कुशापा राजा बराच वेळ मनात खोलवर रेंगाळत राहतो.

मुंबईला कामाला असणारा आणि आयुष्यभर सगळ्यांचे भले करणारा सुभान दादा आणि त्याचा बहिणीच्या गावात होणारा त्याचा दुर्दैवीअंत हा ह्या कादंबरीतील अजून एक जीवाला घोर लावून जाणार प्रसंग..आपल्याला शेवटी आपल्याच गावाला नेऊन जाळावे ह्या त्याच्या एका इच्छेपायी त्याच्या पार्थिवाचा गाव, शहर, सिव्हिल हॉस्पिटल, पोस्टमार्टेम, मोटारीचा प्रवास, नदीकिनारी बंद पडलेली नाव, त्यामुळे नदी काठावरून जंगलातून कावड मधून होणार दुर्दैवी प्रवास खूपच भयानक आहे. पोस्टमार्टेम आणि दोन दिवसाच्या प्रवासामध्ये होणाऱ्या विलंबामुळे त्याचे शरीर अगदी कुजून,दुर्गंधी सुटून शेवटी फुटते आणि शेवटी शेवटी तर दह्यासारखे गळायला लागते आणि वाट बघून शेवटी खांदेकरिच त्याच्या मुलाची वाट बघत बघत नदीकिनारी त्याला ओल्या लाकडांनी अग्नी देऊन टाकतात.. मुलाच्या हातून आपल्या गावात अग्नी घेण्याचे सुख ही त्या भल्या माणसाला लाभत नाही.

गुरुजींवर गावगुंडांकडून होणारा हल्ला,  त्यांच्या लाडक्या मुलीवर होणार बलात्कार आणि इतरांसाठी आयुष्यभर झगडणारा मास्तर आपल्या मुलीला न्याय देऊ शकत नाही म्हणून हताश झालेल्या एका बापाचे वर्णन काळजाला हात घालणारेच आहे. ह्याच बोझ्याने एका दिवशी गुरुजींचा मृत्यू होतो आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना शेवटी जाळायला स्मशान ही मिळत नाही.

हैबतीचा दगड घालून त्याच्या आईसमोर केलेला खून, तो दडपण्यासाठी पोलिसांनी केलेली अपघाती मृत्यू म्हणून नोंद....केस मागे घ्यावी म्हणून खासदाराने स्वतः गावात येऊन त्याच्याच आईला दिलेली लाच बघून आपल्यालाच राग आणि चीड येते.

आणि शेवटी एका मंत्र्याच्या जावयाने केलेल्या जांभळी पर्यटनाचा विकास आणि त्यातून धरणग्रस्तांना काढलेल्या विशाल मोर्च्यातून वर्षोनुवर्षे तुंबलेल्या त्यांच्या मागण्या काही अंशी तत्वतः का होईना पण मान्य होतात. ह्या अश्या अवघड वळणावरच येऊन लेखकाने आपल्याला पुढे विचार करायला सोडून दिले आहे.

पुस्तकाचा आवाका, पसारा, शब्दसंग्रह, पात्रांची गुंफण, भाषा, वर्णन सगळेच अप्रतिम आहे. एवढया मोठ्या कादंबरीत कुठेही संभाषणाची, कथेची पुनरावृत्ती नाही. पात्राची आणि कथेची मांडणी सुचिबद्ध आणि परिपूर्ण.

पुस्तकाचे रसग्रहण (समीक्षा नाही...समीक्षा करण्याऐवढा मी मोठा नाही) हे छोटे आणि संक्षिप्त असावे ह्या मताचा आहे मी. पण ह्या कादंबरीने आणि त्यातल्या पात्रांमुळे हा मोह आवरता आला नाही.

पु.ल., व.पु., सु.शी. ह्यांच्या काही मोजक्या कांदबरी प्रमाणे ही कादंबरी सुद्धा माझ्या फेव्हरिट लिस्ट मध्ये नेहमी वरच्या स्थानावर राहील.

आशिष सावंत

(चित्र नेट वरून साभार)

CONVERSATION

4 comments:

  1. very nice
    for similar topics you can follow me on https://kalyanikhalkar.blogspot.com/

    ReplyDelete
  2. ही कादंबरी कालातीत आहे आमचं दुर्दैव आहे की २०१८ साली सुद्धा परिस्थिती काहीच बदललेली नाही, सरकारी अधिकारी, स्थानिक राजकारणी ह्यांचं साटलोट हे आजतागायत तसच चालू आहे देशाच्या विकासासाठी किती किंमत मोजायची हा खरा प्रश्न आहे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अजय ...वाचून कमेंट केल्याबाद्द्दल.

      Delete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top