भेटी लागे जीवा !!

२७ फेब्रुवारी २०१५ 
सकाळी नेहमी प्रमाणे ऑफिस ला जायला निघालो होतो. सोसायटीच्या पार्किंग मधून बुलेट बाहेर काढली. बायको आणि माझा तीन वर्षाचा मुलगा घराला कुलूप करून मागून येत होते. तेवढ्यात  चिपळ्या व टाळेचा आवाज ऐकू आला सोबत ' वासुदेव आला....वासुदेव आला ' चे गाणे ऐकू आले. विरुद्ध बाजूच्या दोन बिल्डिंग सोडून एक वासुदेव टाळ वाजवत आमच्या सोसायटी कडेच येत होता..... डोक्यावर गोल त्रिकोणी मोरपिसांची टोपी, गळ्यात विविध माळा, अंगात वारकऱ्यांचा पोशाख.....सफेद सदरा आणि धोतर, अंगावर केशरी वस्त्र, सफेद दाढी, अबीर आणि गुलाल चा टिक्का, कमरेला एक कापडी पोटली, हातात टाळ आणि चिपळ्या.......मी मुलाला आवाज देऊन लवकर खाली उतरायला सांगितले. मनात विचार आला की आजच्या पिढीला वासुदेव थोडा तरी माहित आहे...पुढच्या पिढी पर्यंत तो विस्मरणात जाईल. मुलगा खाली आल्यावर त्याला म्हटले, 'हे बघ वासुदेव, नमस्कार कर त्यांना'  माझ्या मुलाने वासुदेवाचे कपडे आणि एकंदरीत पोशाख बघून थोडा घाबरूनच नमस्कार केला. माझ्या मुलाकडे बघून वासुदेव रस्ता ओलांडून माझ्या जवळ आले.

माऊली माऊली करत त्यांनी कमरेच्या पोटलीतून अंगारा काढला माझ्या कपाळाला लावला आणि मुलाच्या कपाळाला लावला आणि त्याला तोंडातल्या तोंडात पुटपुटत न मागता आशीर्वाद दिला. मी पण आपसूक खिशात हात घातला आणि वर हातात आलेली दहाची नोट माझ्या मुलाच्या हातात दिली. त्याला बोललो, ' बाबांच्या हातात हे पैसे दे '. वासुदेवांनी सुद्धा ते पैसे हातात न घेता...झोळी पुढे घेऊन त्यात पैसे घेतले. आपला प्रेमळ हात त्यांनी मुलाच्या डोक्यावर फिरवला. तो पर्यंत मी बुलेट चालू केली होती. वासुदेवांनी मागून येणाऱ्या माझ्या बायकोकडे बघितले आणि एकदा मुलाकडे बघितले आणि म्हणाले, 'अर्ध्या मार्गावर परत जाऊन आलेला मुलगा आहे तुमचा....खूप पुण्यात्मा आहे तो...' 

त्यांचे ते वाक्य ऐकून मी आणि माझी बायको तिथेच थबकलो. दोघांनी एकमेकांकडे बघितले आणि वासुदेवांकडे बघितले. पुढचे १५ मिनिटे फक्त वासुदेव बोलत होते आणि आम्ही फक्त हो...हो करत त्यांच्या बोलण्याला होकार देत होतो. ते पुढे काय काय म्हणाले जेणेकरून आम्ही सकाळच्या ऑफिसला जाण्याच्या घाईत असून सुद्धा १५ मिनिटे तिथेच उभे राहिलो. ते सांगण्यासाठी आधी आदल्या दिवशी काय घडले होते ते जरा सांगतो.

पूर्वार्ध
२६ फेब्रुवारी २०१५ 
आदल्या दिवशी संध्याकाळी, माझ्या मुलाला आणायला आई बाबांच्या घरी गेलो होतो. संध्याकाळी टीव्ही वर 'जय मल्हार' लागले होते. त्यात देवाचे वेगवेगळे चमत्कार दाखवत होते. जाहिरातीच्या मध्यंतरात वडिलांनी वाहिनी बदलली. एका मराठी वाहिनीवर श्री स्वामी समर्थांचा चित्रपट लागला होता. आमच्या घरात माझ्यासकट सगळेच स्वामींचे भक्त असल्याने तो चित्रपट बघू लागले.  त्यात एक दृश्य असे होते की एका गरीब स्त्रीला पंढरपूरच्या विठ्ठलाची आस लागली असते आणि परिस्थिती मुळे तिला वारीला जाता येत नसते. तरी ती कसेबसे करून स्वामी पर्यंत पोहोचते. स्वामी तिच्या मनातले ओळखून तिला विठ्ठलाचे दर्शन घडविण अशी ग्वाही देतात पण तिला त्यावर विश्वास बसत नसतो. ती आपल्या मुलीला त्यांच्या हवाली करून स्वामींच्या नकळत पंढरपूरचा रस्ता धरते. स्वामींना ते समजल्यावर राग येतो आणि ते रागारागाने उठून चालायला लागतात. इकडे ती स्त्री दमून एका दगडावर बसते आणि डोळे बंद करून विठ्ठलाचे नामस्मरण करायला लागते. डोळे उघडते तेव्हा स्वामी समोरच्या दगडावर मांडी घालून बसलेले असतात आणि तिथेच तिला स्वामींचे आणि विठ्ठलाचे दर्शन होते. स्वामी तिची इच्छा पूर्ण करतात आणि त्या आनंदाने तिथे ती भजन  गाणे करते. असा काहीसा सीन होता....
गाण्यानंतर जाहिरातीचा ब्रेक येतो...

तेव्हा मी उपहासात्मक हसून आईला म्हणालो. स्वामी आणि माउली सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात पण आपली पंढरपूरला जायची इच्छा कधी पूर्ण करणार काय माहित? काही वर्षापूर्वी वेळ होता इच्छा होती पण पैसे नव्हते आता पैसे आहेत...स्वत: गाडी बुक करून जायची ऐपत आहे तरी वेळ नाही...आणि योगही जुळून येत नाही...गेल्या काही वर्षात किमान ५ वेळा तरी पंढरपूर...अक्कलकोट ला जायचे ठरवले आहे पण काही ना काही कारणामुळे ते बारगळले आहे. आई आमची टिपिकल देवभक्त ...ती म्हणाली, ' अरे आपला अजून योग आला नाही. जेव्हा येईल तेव्हा अचानक जाणे होईल आणि आपले दर्शनही होईल. अगदीच नाही जमले तर निदान स्वामी तरी येऊन दर्शन देतील. ' मी हसलो....अगं असे काही होत नाही...असले चमत्कार फक्त चित्रपटात होतात प्रत्यक्षात नाही. लहान बहिणीने पण मला होकार मिळवला ...' हो ना!! देव आपल्याबरोबर असे चमत्कार नाही कधी करत' .....मी हसून तिथून निघालो.

रात्री बायको जेवणावरून, मुलाला लवकर जेवण्यासाठी ओरडत होती...'नालायका...कधी पटापट जेवायला शिकणार आहेस' ...माझा मुलगा नुकताच पूर्ण वाक्य बोलायला शिकत होता त्यामुळे जे काही वाक्य आम्ही बोलतो त्याची तो पुनरावृत्ती करत असतो. आम्ही त्याला ..गधड्या, नालायका, बेअक्कल वगैरे असे खोट्या रागाने बोललो की तेच शब्द तो आम्हाला परत बोलत असे. बायको त्याला गधड्या बोलली की तो पण 'गधड्या मम्मा' असे बोलतो. त्यामुळे मी बायकोला ओरडलो की तू त्याला शिव्या देऊ नकोस...नाहीतर तो पण तेचं शब्द शिकणार. त्याआधी तिने विचारले होते की कालचा भात खूप शिल्लक आहे त्याला तोच देऊ की नवीन घालू. मी म्हटले 'त्याच्या साठी शिळा भात नको देऊस तो मी खाईन त्याला ताजा भात घाल'

 २७ फेब्रुवारी २०१५
वासुदेवांनी मागून येणाऱ्या माझ्या बायकोकडे बघितले आणि एकदा मुलाकडे बघितले आणि म्हणाले, 'अर्ध्या मार्गावर परत जाऊन आलेला मुलगा आहे तुमचा....खूप पुण्यात्मा आहे तो...त्याला कधी शिव्या घालू नका ....त्याला कधी उष्ट जेवण घालू नका.....त्याला कधी शिळे पाके जेवायला घालू नका (ह्या वाक्यावर माझ्या बायकोने रात्रीचा प्रसंग आठवून माझ्या कडे बघितले). 

वासुदेवाचे पहिले वाक्य ऐकल्यावरच मी थबकलो होतो की तुमचा मुलगा अर्ध्या मार्गावरून परत आलाय.....माझी बायको सहा महिन्याची गरोदर असताना तिला रस्ता क्रॉस करताना बसने उडवले होते, हवेत उंच उडून १० फुट लांब रस्त्यावर पडली होती. त्यात तिला मल्टीपल फ्रॅक्चर झाले होते आणि जवळपास खूप वेळ बेशुध्दच होती. लीलावती हॉस्पिटल मध्ये तिला आयसीसीयु मध्ये भरती करून जवळपास दीड दिवस झाले होते तरी बाळाने पोटात काहीच हालचाल केली नव्हती. डॉक्टर आणि आम्ही सगळेच चिंतीत होतो. जवळपास अपघात झाल्यापासून दीड दिवसानंतर त्याने पहिली हालचाल केली तेव्हा कुठे आमच्या जीवात जीव आला. (त्या वेळेचा पूर्ण वृतांत इथे वाचू शकता).

मी विचार केला की वासुदेवाला कोणी सांगितले असेल हि गोष्ट...त्यांच्या कडे बघून तर वाटत नव्हते की त्यांनी माझे ब्लॉग वाचला असेल...किंवा माझ्या जवळपासच्या नात्यातील कोणी त्यांना सांगितली असेल.

त्यांचे ते वाक्य पूर्ण होते न होते तोपर्यंत त्यांनी पुढे सांगायला सुरवात केली. त्यांची काही वाक्ये आणि त्यावर माझे मनातले विचार कंसात मांडले आहेत. त्यांनी उच्चारलेल्या प्रत्येक वाक्यामुळे आम्ही नवरा बायको हादरत होतो आणि एकेक धक्के पचवत पुढचे वाक्य ऐकत होतो.

तुम्ही सुद्धा दोन तीन मोठ्या जिवावरच्या संकटातून वाचला आहात ( माझे जवळपास ५ अपघात झाले आहेत. त्यातले दोन मोठे होते.)

पण तुम्ही किरकोळ दुखापतीतून सुखरूप बाहेर पडला आहात. काही दुखापती आहेत अजून पण त्या सहन करण्याइतपत आहेत (प्रत्येक अपघात काही न काही मुका मार हातापायांवर देऊन गेला आहे (आणि जवळपास प्रत्येकी  १५ दिवसाच्या सिक लिव्ह खावून गेला आहे) .पण तो सहन करण्याइतपत आहे.)

तुमच्या घरातल्या सगळ्यांनाचं ही पीडा आहे. (आमच्या घरात माझे वडील, मी, बायको ह्यांची मिळून जवळपास नऊ अपघात झाले आहेत.) 

पण तुमच्या मागे तुमच्या गुरूंचा आशीर्वाद आहे आणि माऊलींची कृपा आहे त्यामुळे तुम्ही सर्व निभावून नेले आहे. तुम्ही गुरु कडून दीक्षा घेतली आहे त्यामुळे तुम्हाला येणारे धोके परतवण्याची ताकत येते. तुम्ही गुरु घेतला आहे ना??? मी होकारार्थी मान हलवली. (मी जवळपास पंधरा वर्षाचा असताना माझ्या आईने, आमच्या घरातल्या सगळ्यांना पंढरपूरच्या गुरु अण्णा महाराज ह्यांच्याकडून दीक्षा घ्यायला लावली होती.)

तुम्ही खूप जिद्दी आणि हट्टी आहात..सहसा रागवत नाही पण एकदा जिद्दीला पेटलात की ऐकत नाही. (मी मनातल्या मनात हसलो...हट्टी, जिद्दी वगैरे जास्त नाही पण एकदा जिद्दीला लागलो की मग ऐकत  नाही)

म्हणूनच तुम्ही कोणाचे न ऐकता सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले आहे. (ह्या वाक्यावर मात्र मी आणि बायको हैराण होऊन एकमेकांकडे बघितले) 

तुम्ही जात पात वगैरे काही मानत नाही...माणुसकी हीच तुमची जात आणि हाच तुमचा धर्म  (बायको आणि माझी जात वेगवेगळी होती त्यामुळे लग्नाला विरोध होता आणि आम्ही दोघेही जातपात मानत नव्हतो त्यामुळे घरातल्यांच्या विरोधात आम्ही लग्न केले होते.)

भूत, भविष्य, अंधश्रद्धा तुम्ही मानत नाही...भविष्य कधी ऐकत नाही...बघत नाही... (आम्ही दोघेही मानत नाही आणि लग्नाआधी एकमेकांच्या पत्रिकाही बघितल्या नव्हत्या. फक्त स्वभाव जुळले आणि लग्न केले.)

बुलेट वर हात ठेवून...हि तुमची दुसरी गाडी असावी....तुमची पहिली गाडी तुम्हाला जास्त लाभदायक नव्हती..ही बुलेट तुम्हाला चांगली आहे आणि तुम्हाला सूट सुद्धा होत आहे...आता तुम्हाला काही धोका नाही...(माझी जुनी पल्सर बाजूलाच सोसायटीच्या कंपाउंड मध्ये धूळ खात पडली होती. तिच्यावर ३ अपघात झाले असल्यामुळे घरातल्यांनी ती वापरायला बंदी घातली होती म्हणूनच मला नाईलाजाने दुसरी गाडी घ्यावी लागली. दुसरी गाडी घ्यायची तर बुलेटच घ्यायची हे ठरवून घेतली होती.)

तुम्हाला दुसरे भावंड पण आहे आणि तुम्ही मोठे आहात आणि घरातल्यांची सगळी जवाबदारी तुम्ही चांगल्या रितीने पूर्ण करत आहात.. तुम्हाला एक लहान भावंड आहे ना? (त्यांचा म्हणण्याचा उद्देश मला लहान भाऊ आहे का विचारायचे होते...आणि मला एक लहान बहिण आहे..मी त्यांना मला एक बहिण आहे म्हणून सांगितले. हा एकच अंदाज त्यांचा चुकला होता.)

मग बायकोकडे बघून त्याने सांगितले, तुम्हाला शारीरिक त्रास खूप आहेत. तुमचे पाठीचे दुखणे तुम्हाला अर्ध्या तासाहून जास्त बसायला देत नाही तरी तुम्ही कुटुंबासाठी एवढ्या लांब प्रवास करून कमावण्यासाठी जाता. (गरोदर असताना बायकोच्या अपघातामध्ये तिच्या तीन बरगडी फ्रॅक्चर झाल्या होत्या. त्या कधी बऱ्या झाल्याच नाहीत. नंतर गेल्या वर्षी परत रिक्षा अपघातात तिच्या त्याच बरगड्या दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळे एका जाग्यावर अर्ध्या तास पेक्षा जास्त बसणे तिला त्रासदायक होते. त्यात दोन तासाचा बस, ट्रेन, बस असा प्रवास करणे तिला खूप त्रासदायक होते फक्त घरखर्चाला हातभार म्हणून ती कामाला जाते. आम्ही  दोघांनी वासुदेवांच्या बोलण्याला फक्त मान डोलावली.)

हा तुमचा दोष नाही...तुमच्या घराण्याचा त्रास आहे...तुमचा घराचा पिराबलेम (problem) ठीक करा मग तुमचे सगळे मार्गी लागेल. (मी फक्त हो म्हटले...ह्याच्यावर उत्तर देण्यासारखे काही नव्हते)

तुमचे सासरची माणसे खूप चांगली आहेत तुम्हाला खूप मानतात आणि तुम्हाला खूप जीव लावतात आणि तुम्हाला सारखे घरी बोलवत असतात. पण तुम्ही जात नाही... तुम्ही लांबूनच सगळ्यांना प्रेम देता. (बायकोने कोना मारून खुणेने सांगितले...बघ बघ!! अश्या अर्थाने... सासरची मंडळी खरच चांगली आहेत आणि काही न काही कारणावरून घरी बोलावत असतात. पण मी सहसा जात नाही वर्षातून एकदा किंवा दोनदाच जातो. 'अतिपरिचयात अवज्ञा' हा मंत्र मी आधी पासून पाळत आलो आहे.)

तुमचा पोरगा खूप हुशार होणार आहे..विद्वान होणार आहे...एवढ्या मोठ्या संकटाला परवतून तो स्वत:चा आणि त्याच्या आईचा जीव वाचवून आलाय. त्याला कधी दुखवू नका...मारू नका..रागावू नका...त्याच्या बापाने आणि आजाने जे काम आयुष्यात केले नाही ते तो करणार आहे...कधी कोणाची नोकरी करणार नाही....तो लोकांना नोकऱ्या देईल (आम्ही दोघे एकमेकांकडे बघून हसलो ह्या भविष्यावर विश्वास कसा ठेवायचा? पण पोटच्या पोराच्या बाबतीत चांगले सांगितले आहे म्हणून आनंदाने आम्ही ती गोष्ट मनातल्या मनात मान्य केली. आमच्या दोन्ही कुटुंबातले लोक हि गोष्ट मानतात कि एवढ्या मोठ्या अपघातातून मुलाने आपला आणि आपल्या आईशीचा जीव वाचवला आहे. नाहीतर एवढ्या मोठ्या अपघातातून वाचणे जवळपास अशक्यच होते. असो!!)

मी त्यांना म्हणालो, 'बाबा ते सर्व ठीक आहे...आम्हाला माऊलीचे दर्शन कधी होणार ते सांगा...खूप वर्षे झाली जाऊन.'
वासुदेव म्हणाले, ' माऊली जो पर्यंत बोलावत नाही तो पर्यंत दर्शन कसे होणार रे बाबा...तुम्ही स्वत: गाडी करून जायचे म्हटले..पैसा खर्च करून जायला तय्यार असला तरी तुम्हाला बोलावणे आल्याशिवाय दर्शनाचा योग कसा येणार???...माउलीच्या मनात आले तर तुम्हाला एक पैका खर्च न करता सुद्धा बोलावणे येईल आणि त्रास न होता दर्शन होईल. (मला आदल्या रात्रीचा माझा आणि आईचा संवाद आठवला). 

'अगदीच कामधंद्या मुळे नाही तुम्हाला जमले तरी कशाला काळजी करता...तुमची भक्ती बघून आणि मनातले भाव बघून काय माहित....माऊलीच तुम्हाला दर्शन द्यायला कोणत्यान कोणत्या रुपात समोर येईल...तुम्हाला फक्त ओळखता आले पाहिजे...' 

त्यांच्या ह्या वाक्यावर मात्र मी जाम दचकलो. इतका वेळ त्यांचे सगळे बोलणे त्यांची नजर टाळून ऐकत होतो. कारण लहानपणी ऐकले होते की भविष्य सांगणारे डोळ्यात डोळे घालून मनातले ओळखून अचूक भविष्य सांगतात.  पण त्यांचे शेवटचे वाक्य ऐकले  " माऊलीच तुम्हाला दर्शन द्यायला कोणत्यान कोणत्या रुपात समोर येईल...तुम्हाला फक्त ओळखता आले पाहिजे..." आणि मी त्यांच्या नजरेत नजर घालून बघितले. त्यांच्या रुपात तर कोणी आले नाही ना?...ह्याचा शोध घेण्यासाठी...आमची नजरानजर होताच त्यांच्या डोळ्यांची बुबुळे थरथरली. गालावर पसरलेल्या सफेद दाढी मिशी मधून एक हास्य उमलले. आपल्या मुलाने मनात इच्छिलेली एखादी गोष्ट अचूक त्याच्या समोर आणून ठेवल्यावर आपल्या मुलाच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघून माऊलीच्या डोळ्यात जशी एक चमक येऊन गालावर एक जसे वैशिष्ट्यपूर्ण हास्य येते ना....तसेच  काहीसे हास्य मला त्यांच्या त्या दाढी मिशी मध्ये दिसले...मी एवढा वेडा तर नक्कीच नव्हतो की त्यांना विचारू की.... बाबा तुम्ही कोण आहात? ते कोणीही असतील वासुदेव असतील, स्वामी असतील, माऊली असतील किंवा कदाचित कोणीही नसतील. पण त्यांच्या डोळ्यातील चमक आणि त्यांचे ते अर्धवट स्मित हास्य कदाचित मला जे काही पाहिजे होते ते देऊन गेले......कदाचित न मागताच खूप काही देऊन गेले....मला आदल्या दिवशीचा प्रसंग आठवला आणि त्या चित्रपटातील दगडावर बसलेले स्वामी आठवले आणि कालपासूनचा आतापर्यंतचा सगळा प्रसंग सेकंदाहून कमी वेळात झर्रकन डोळ्यासमोरून गेला आणि मी काहीसा गोंधळल्यासारखे झालो.

मी परत त्यांच्या नजरेत पहिले....काही सापडते का ते बघायला? पण तेच हास्य आणि तीच चमक दिसली. ह्यावेळेला त्यांनी फक्त डोळे उघडझाप करून होकारार्थी हलकीशी मान हलवली....अंगावर एक सर्रकन काटा मारून गेला...हृदयात एक हवीहवीशी हलकीशी कळ येऊन गेली..... त्याचा अर्थ काय असावा ह्याचा विचार मी अजूनही करतोय......मी तुझ्या मनातले ओळखले आहे की....... तुझ्या मनात जे चालले आहे ते योग्य आहे की....... तू ज्याला शोधतोयस तो मीच आहे की......दुसरेच काहीतरी....

पण त्यादिवशी पूर्ण दिवसभर एक वेगळीच मन:शांती अनुभवली...बर्फाची लादी डोक्यावर ठेवावी तसा थंड झालो होतो...सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यासारखा...मला स्वामी भेटले होते कि विठूराय भेटले होते...माहित नाही पण एक मन:शांती भेटली होती.

खिशात परत गेलेला हात मी थांबवला...सगळे आनंद पैशात मोजण्याची लागलेली सवयीवर मलाच चीड आली...बाबांना म्हटले ...चला बाबा येतो आता!! बायको त्यांना म्हणाली, " बाबा ! एखाद्या शनिवारी जेवायला घरी या" त्यांनी हसत माझ्या मुलाकडे बघून हात वर करून आशीर्वाद दिला आणि त्याला म्हणाले " सुखी राहा बाळा!!!  येईन मी परत नक्की येईन !!!"

आम्ही बाळाला आई कडे सोडले आणि आम्ही ऑफिसला निघून गेलो. दोघेही मिळालेल्या झटक्यांनी जवळपास फ्रीज होऊन गेलो होतो. बस स्टॉप वर आल्यावर मी बायकोला विचारले, काय ग! त्यांनी सांगितलेले किती पटले? बायको म्हणाली जवळपास ९५% टक्के तरी त्यांनी बरोबर सांगितले'. आईला जेव्हा फोन करून हि गोष्ट सांगितली तेव्हा तर ती आनंदाने नाचायलाच लागली सगळ्यांना सांगत सुटली होती....दादा चे नशीब चांगले वगैरे वगैरे....

एक व्यक्ती ज्यांना आम्ही कधी आयुष्यात भेटलो नाही...ती व्यक्ती एका सकाळी अचानक समोर येते आणि आमचे भूत, भविष्य आणि वर्तमान जवळपास अचूकरित्या सांगते आणि खास करून अश्या वेळी येते जेव्हा आम्ही असे चमत्कार आत्ताच्या जमान्यात होत नाही असे उपहासाने म्हणत असतो..... ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय असावा ? ह्याचा उलगडा अजूनही झाला नाही आणि होऊ सुद्धा नये...एक मन सांगते की तू अंधश्रद्धे कडे झुकतोय त्याच वेळेला त्यांच्या डोळ्याची चमक आणि दाढी मधले ते हास्य आठवते आणि मन काही निर्णयाप्रत येतच नाही....मग मी तो विचार असाच सोडून देतो....काही गोष्टीचे निर्णय झालेच नाही पाहिजेत आणि काही कोडी आयुष्यात उलगडल्याच नाही पाहिजेत.


आज आषाढी एकादशी निमित्त तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोरून गेला. अजून दर्शनाचा योग तर काही आला नाहीये पण त्या आशेवरच आहे. हा ब्लॉग लिहिताना वासुदेवांचा फोटो ब्लॉग वर लावत असताना माझा साडे तीन वर्षाचा मुलगा बाजूला आला आणि ओरडून म्हणाला..."डॅड्डा !!...हे आपल्याला सकाळी सकाळी भेटले होते ना...मला टिक्का लावला होता ना..!! मी हसून म्हणालो..."हो रे बाळा!!..तुझ्यामुळेच तर आम्हाला ते भेटले होते..." तो पण खूप काही समजले तसे मान डोलावून निघून गेला..

माऊली खरंच हो !!! भेटी लागे जीवा !! 








CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top