जिंदगी कि मंजील...

           गेले तीन दिवस खूप बेकार गेले. परवा सकाळी ऑफिस मध्ये असताना माझ्या चुलत भावाचा फोन आला. त्याने सांगितले कि माझे चुलत काका आम्ही त्यांना भाईंदरचे काका म्हणायचो ते हृदयविकाराच्या झटक्याने गेले.काही क्षण मला विश्वासच नाही बसला. मी परत परत विचारले. त्याने बातमी कन्फर्म केली. घरी फोन लावला तर घरी सुद्धा हि बातमी समजली होती. खूप कसेतरीच वाटले. एकदम अनपेक्षित होते. 

भाईंदरचे काका स्वभावाला खूप चांगले होते. सडपातळ, काटक बांधा, टिपिकल सहनशील कोकणी माणूस होते. स्वत:ची कामे स्वत:च करणे हा त्यांचा एक सर्वात चांगला गुणधर्म. विहिरीवर पाणी भरण्यापासून ते स्वत:चे जेवण करण्यापर्यंत सर्व कामे स्वत:च करायचे. त्यांनी कधीच कोणाला त्रास दिलेला मला तरी आठवत नाही. कधीच कोणाबद्दल वाईट बोलताना बघितले नाही, ऐकले नाही. कधी कोणाची इकडची बातमी तिकडे नाही कि कधी कोणामध्ये भांडणे नाही. आपण भले कि आपले काम भले हा त्यांचा स्वभाव. ते महिंद्रा कंपनी मध्ये कामाला होते. रिटायर झाल्यावर गावाच्या घरात जाऊन येऊन असायचे. आमची गावची जत्रा झाल्यावर त्यांचे कुटुंब मुंबईला आले आणि ते गावालाच राहिले होते. रात्री त्यांना त्रास झाला पण त्यांनी दुर्लक्ष केले आणि दुसऱ्यादिवशी मोठा झटका आल्यामुळे ते आम्हाला सोडून गेले. 

मला आवडणाऱ्या काकांपैकी ते एक होते. वाईट एवढेच वाटते कि मी त्यांना हि गोष्ट सांगू शकलो नाही. एकदम उदास वाटले. आदल्यादिवशीच त्यांनी गावावरून आम्हाला भेट पाठवली होती. (कोकणामध्ये कोणी कधी खायच्या वस्तू दिल्यातर त्याला "भेट" असे म्हणतात.) आमचे कुटुंब गावाला जाऊ न शकल्यामुळे त्यांनी देवीचा प्रसाद आणि मालवणी खाजे पाठवले होते. सहसा कधी ते अशी भेट कधीच पाठवत नाही. पण ह्या वर्षी त्यांनी ती दुसऱ्या एका नातेवाईकांकडून पाठवली होती. आम्ही घरात चर्चा पण केली कि काकांनी ह्या वर्षी कशी भेट पाठवली? आई म्हणाली कि त्यांचा माझ्या पप्पांवर खूप जीव आहे म्हणून पाठवली असेल. ते चुलत असले तरी एकमेकांना सख्ख्या भावासारखे होते. त्यांनी भेट पाठवली ह्याचा आनंद पण झाला. खूप बरे वाटले. आणि दुसऱ्या दिवशी अशी बातमी आली त्यामुळे त्याहून जास्त वाईट वाटले. पप्पांना पण बातमी ऐकून खूप वाईट वाटले त्यांचा चेहरा खूप उदास झाला होता. मूड पूर्ण उतरला होता. खूप अपसेट वाटले. 

जे जन्माला आले ते जाणार हे तर विधिलिखितच असते पण काही माणसे जाता जाता अशी मनाला चुटपुट का लावून जातात?ते समजत नाही.  का त्यांनी ह्यावर्षीच आम्हाला भेट पाठवली? दीडशे च्या वर सदस्य असलेल्या आमच्या कुटुंबापैकी त्यांनी आम्हालाच का भेट पाठवली? असे का ?त्यांना आपल्या जाण्याचा संकेत मिळाला होता का ? काही मागचे पुढचे ऋण बाकी होते का ? का आम्ही त्यांची आठवण शेवटपर्यंत काढावी अशी त्यांची इच्छा होती का ? त्यांच्या मनात काय होते ते तेच जाणो. पण  मी काकांना खूप मीस करेन. त्यांनी दिलेल्या भेटीचे ओझे आता जन्मभर मनावर राहून जाईल त्याची परतफेड करता येणार नाही. वाईट जास्त ह्याचेच वाटेल कि मी माझ्या त्यांच्याबद्दल असलेल्या फीलिंग्स त्यांना सांगू शकलो नाही आणि आता कधी सांगूहि शकणार नाही.
कोणत्या व्यक्ती ला सांगायचे असेल कि ती तुम्हाला आवडते तर ते सांगायची वाट पाहू नका. चुकून उशीर झाला तर स्वत:ला माफ करावेसे वाटत नाही.
---------
त्या धक्क्यातून सावरत नाही तो पर्यंत आज माझ्या मित्राचा फोन आला त्याने सांगितले कि माझ्या प्रसाद नावाच्या एका मित्राची आजी हृदयविकाराच्या झटक्याने वारली. ८५ हून जास्त वय झाले होते. गेले पंधरा दिवस ती हॉस्पिटल मध्ये होती अगदी शेवट पर्यंत ती बोलत होती. स्मृती शेवटपर्यंत चांगली होती. पण शरीराने साथ सोडली होती. डॉक्टरांनी सांगितले होते कि आता तिला परत मोठा झटका येणार आहे. तिचे जगण्याचे चान्सेस खुपच कमी आहेत. ऑफिस मधून पोहचे पर्यंत तिला शेवटचे बघायला पण नाही मिळाले. ठाण्यात पोहोचल्यावर मित्राला फोन लावला त्याने सांगितले आता आम्ही स्मशान भूमी कडेच चाललो आहे. तू डायरेक्ट तिथेच ये. दुसऱ्या एका नातेवाईकाने स्मशानभूमी कडे यायचा रस्ता फोनवरच सांगितला. खारेगावच्या स्मशानभूमीत जायचे होते. खारेगावला गेलो असल्यामुळे थोडा फार रस्ता माहित होता. त्या पुढे त्याने जे काही लेफ्ट राईट सांगितले ते सर्व डोक्यावरून गेले. म्हटले तिथे जाऊन बघू मग विचारत विचारत जाता येईल. 

तिथे पोचल्यावर इकडे तिकडे बघितले तर रस्त्यावर फुले दिसली. मनात आले कि बहुतेक हि प्रेतयात्रेचीच फुले असावीत. त्याचा मागोवा घेत लेफ्ट राईट करत करत गावाच्या एकदम दुसऱ्या टोकाला पोहोचलो. रेल्वेच्या ब्रीज खालून गेलो तर पुढे एकदम सुनसान रस्ता दिसला रस्त्यावर कोणीच नव्हते आणि फुले पण दिसत नव्हती. थोडे पुढे एक बल्बचा अंधुक प्रकाश दिसत होता. तसाच पुढे गेलो. तर भरपूर माणसे दिसली तेव्हा अंदाज केला हीच स्मशानभूमी असणार. 

बाईक पार्क केली आणि आत प्रवेश केला. आयुष्यात पहिल्यांदाच स्मशानभूमीत गेलो होतो. मनात असलेल्या कल्पनेप्रमानेच खूप भयाण होती. बल्ब च्या अपुऱ्या प्रकाशात पूर्ण स्मशानभूमी दिसत होती. स्मशानात दोन चितेची व्यवस्था होती. दुसऱ्या चितेवर नुकतीच कोणाला तरी अग्नी दिली होती. त्याची अग्नी पूर्णपणे विझली सुद्धा नव्हती. लाल लाल निखारे अजून हि आतल्याआत जळत होते. पाठीमागे दोन कट्टे होते बहुतेक प्रेत ठेवायला जागा होती. इतर वेळेला चांगली वाटणारी अष्टर आणि झेंडूची फुले स्मशानभूमीत नकोशी वाटत होती. 

आजीला तिरडीवरून उतरवून नुकतेच चिते वर ठेवले होते. भटजी काहीतरी मंत्र म्हणत तिच्या मुलाला पाण्याची घागर हातात देत होते. मग त्यांनी हातात पाणी घेऊन अंगठ्याने आजीला पाणी भरवले. मग एकेक करत सर्व जमलेल्यानी अंगठ्यांनी पाणी भरवले. स्मशानात कामाला असलेले रॉकेलचा डब्यातून रॉकेल काढून मशालीवर ओतत होते. त्यांना बहुतेक सर्व लवकर उरकायची घाई लागली होती. तोंडात पाणी घालून झाल्यावर कामगारांनी लाकडे ठेवायला सुरुवात केली. त्याचवेळेला त्यांच्या घरातल्या माणसाला काहीतरी आणायला जावे लागल्यामुळे मी त्याला बाईक वर घेऊन गेलो तोपर्यंत चितेला अग्नी दिला गेला होता. 

मी येईपर्यंत चिता पूर्णपणे जळायला लागली होती. ८५ वर्षेहून अधिक जगलेल्या व्यक्तीचा असा अंत बघून खूप वाईट वाटले. सुरुवातीला जेव्हा आजीला माझ्या बायकोची ओळख करून दिली होती तेव्हा तिला तीला माझी बायकोचा स्वभाव आणि वागणे खूप आवडली होती. तिच्यासारख्या कट्टर कोंकणी बाई कडून कौतुक होणे म्हणजे बायकोसाठी मोठे सर्टिफिकेटच होते. माझ्यासाठी सुद्धा ते खूप स्पेशल होते. तिथे काहींची सांत्वनपर भाषणे झाले. सर्वानी दोन मिनिटे शांत उभे राहून श्रद्धांजली वाहिली आणि सर्वजण हळूहळू बाहेर पडायला लागले. कामगार सर्व बाजूने चितेवर रॉकेल टाकत होते. चिता पूर्णपणे जळते आहे कि नाही ते बघत होते. चार पैकी दोघेजण आशेने नातेवाईकांकडे बघत होते. ते समजल्यामुळे एका नातेवाईकाने दोनशे रुपये काढून दिले आणि चौघात वाटून घ्यायला सांगितले. 

आता माणसाच्या प्रवृत्तीला काय बोलणार? दु:खात असलेल्या नातेवाईकांकडे आशेने बघायचे आणि आपण पण दु:खी असूनही त्यांना बक्षीस द्यायचे. का ?तर त्यांनी आपल्या प्रिय व्यक्तीला ह्या शरीरधर्मातून मुक्त करायला मदत केली म्हणून? तिच्या प्रेतावर लाकडे ठेवली म्हणून? कि तिचे प्रेत पूर्णपणे जळावे ह्या साठी चारही बाजूने रॉकेल टाकले म्हणून? 
पण काय करणार त्यांच्या बाजूने विचार केला तर तेही बरोबरच आहेत. तेच त्यांची कमाई आहे. त्याच पैश्यावर त्यांचे घर, कुटुंब पोसले जात असेल, मुलांना खायला पियाला मिळत असेल. असो मेहनत करताहेत निदान ते भीक तर नाही मागत आहे ना !! एवढेच एक समाधान!!

खरे तर ह्या गोष्टी ब्लॉग वर टाकण्यासारख्या नव्हत्या पण मनातले स्पंदने, विचार आणि भावनांच्या लाटा स्वस्थ बसू देत नव्हत्या.  कुठे तरी मन मोकळे करावेसे वाटत होते. कुठे ते समजत नव्हते म्हणून सरळ लिहायला बसलो. अशी कुठली पोस्ट लिहिताना किमान दोन दिवस तरी लागतात. पण आज मनात एवढा भावनांचा कल्लोळ उठला होता कि त्यातून उमडणाऱ्या तुफानातून एका तासात एवढी मोठी पोस्ट लिहून झाली.परत न वाचता, व्याकरण न तपासता सरळ पब्लिश करणार आहे कारण ती मनातून जशीच्या तशी उतरली आहे.

आता जरा हलके वाटायला लागले आहे. निदान शांत झोप तरी येईल.

मागे एका स्मशानभूमीच्या बाहेर असलेल्या बगीच्यात एक पाटी बघितली होती.

जनाब आ गये तुम ??
आईये !! ऐसे मायूस क्यू हो ?
तुम्हारी मंजील तो यही थी...
सिर्फ आते आते जिंदगी गुजर गयी.....

सहसा शेरोशायरी,कविता माझ्या कधीच लक्षात राहत नाही पण हे वाक्य डोक्यात अगदी फिट्ट बसले आहे 

देव करो मृतात्म्याला शांती आणि मुक्ती देवो.

CONVERSATION

3 comments:

 1. देव मृतात्म्याला शांती आणि मुक्ती देवो.

  ReplyDelete
 2. खरच त्या चार ओळी वाचून असे वाटते कि,
  "आपण जीवनात एवढे रमून जातो कि, लक्षात देखील राहत नाही कि आता आपल्याला जायचे आहे."
  !! देव त्यानं च्या आत्म्याला शांती व मुक्ती देवो !!

  ReplyDelete
 3. धन्यवाद प्रशांत & श्रीकांत. शेवटपर्यंत वाचल्याबद्दल आणि कमेंट दिल्याबद्दल.

  ReplyDelete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top