दोन तासाचा प्रवास


मागच्या शनिवारी सकाळी धावत धावत घरातून निघालो. बाईक काढली आणि कंपनीची बस पकडायला गेलो. बाईक पुलाखाली पार्क केली आणि स्टॉप वर पोहोचलो. नेहमीप्रमाणे बस नुकतीच निघून गेली होती. नेहमीप्रमाणे अशासाठी कि गेले 8 शनिवारी मी बस पकडू शकलो नाही आहे. इतर दिवशी बस बरोबर मिळते पण शनिवारीच का चुकते ते मला अजून समजले नाही. उलट शनिवारी बस १० मिनिटे लेट असते. कदाचित तेच कारण असू शकेल. 

असो तर मी स्टॉप वर जाऊन उभा राहिलो विचार केला आता बेस्ट ची बस पकडून जावे लागणार. बेस्ट ची बस पकडण्यासाठी मुलुंड च्या चेक नाक्यावर जावे लागते. तिथे जाईपर्यंत ऑटो ने कमीत कमी 25 ते 30 रुपये होतात. आणि पुढे एसी (Air condition) बस ने ऑफिस ला जायाला 35 रुपयाचे तिकीट लागते. ऑटो मध्ये बसण्याआधी मी नेहमी पैसे आहेत कि नाही ते चेक करतो. आणि नेमके त्यादिवशी माझी पर्स रिकामी होती. एटिएम मधून पैसे काढायला विसरलो होतो. जवळपास कुठेही एटिएम नव्हते. मला सवय आहे सुट्टे पैसे किंवा दहा रुपयाच्या नोटा मी पर्सच्या कानाकोपर्‍यात घुसवून ठेवतो. आयत्यावेळेल्या उपयोगी पडतात म्हणून. इकडून तिकडून सर्व मिळून ६३ रुपये मिळाले. म्हटले चला ट्राय करून बघुया. ज्या रुट ने जाणार होतो त्या रुट वर एकहि बॅंकेचे एटीएम नाही आहे. भीती होती फक्त ऑटोची, कधी कधी मीटर ऑटो पेक्षा जास्त पळतात म्हणून. पण नशिबाने ऑटो चे २५ झाले आणि बसचे ३५ झाले आणि ३ रुपये उरले म्हणून वर्तमानपत्र घेतले वाचायला. एसी बस चा भरवसा नसतो. चायना मेड असल्यामुळे रस्त्यात कधीही गरम होऊन बंद पडतात पण नशीब जोरावर होते म्हणून ऑफिसला सुखरूप पोचलो. 
       मी ऑटो तून उतरत असतानाच अगदी रिकामी बस समोरून गेली होती. त्यामुळे स्टॉप वर कोणीच नव्हते मीच पहिला होतो. पेपर वाचत उभा राहिलो. ४/५ मिनिटातच अजून ७/८ लोक येऊन उभी राहिली बस स्टॉप भरून गेला. तेव्हढ्यात समोरून एक जवळपास ६० ते ६५ वर्षाची म्हातारी बाई आली आणि डायरेक्ट माझ्या समोरच उभी राहिली. मी पहिलाच होतो. पण मी काही हटकले नाही. सहसा म्हातारे आणि अपंग असतील तर मी लाईन मध्ये घुसले तरी काही बोलत नाही. बाकीचे पण कोणी काहीच बोलले नाही. तिच्या मागोमाग एक अर्धांग वायू झालेला, गॉगल लावलेला आणि ए के हंगल सारखा दिसणारा म्हातारा आला. तिने हात देऊन त्याला स्टॉप वर चढवून लाईन मध्ये घेतले. मी सरकून बसायला जागा दिली. 

म्हातार्‍या बाईने विचारले, "This line is for Andheri na ?" 

मी उत्तर दिले, ‘yes Andheri only’ 

माझ्या आधी तिने डेपोत आणि एका कंडक्टरला विचारले होते पण परत खात्री करून घेतली होती. म्हातारा बहुतेक तिच्या मागे चालून वैतागला होता. तो बसला आणि घाम पुसत बोलला " अभी ८ ही बजे है, फिर भी बहुत धूप है, We should have take an Auto!” 

म्हातारी.,'See!! now you are retired and we have limited money. Auto will take minimum Rs 300 for Andheri. We will go by bus only. 

म्हातारा,’ but, we….. 

म्हातारी, okay keep quite now… 

म्हातारा उगाच आपला कपाळावरचा आणि अर्ध्या पडलेल्या टकल्यावरचा घाम पुसत राहिला. 

मी विचार केला चला ह्यांची ऑटोची कॅपासिटी नाही निदान एसी बस ची तरी आहे. बिचारा म्हातार्‍याचा त्रास कमी होईल. 

१० मिनिटे झाली बस आली नाही तशी सर्वाची चुळबुळ चालू झाली. काही जण कंडक्टर च्या केबिन कडे बघून बडबड करायला लागले. म्हातारा घाम पुसतच होता. तेव्हढ्यात दोन एसी बस समोर येऊन उभ्या राहिल्या. आता म्हातारीची चुळबुळ चालू झाली. ड्रायवर उतरून त्यांच्या केबिन कडे चहा प्यायला निघून गेले. म्हातारीने इकडे तिकडे बघून माझ्या मागच्या माणसाला विचारले. (कदाचित मला विचारून झाले होते म्हणून), This line is for Andheri na ? 

त्या माणसाने सांगितले, “yes for andheri only’ 

म्हातारी 'But is it for normal BEST bus ?' 

तो माणूस, 'No this line is for A/c bus and normal bus queue is at opposite site.'

म्हातारीने त्या म्हातार्‍याला हात धरून उठवले आणि चालायला सांगितले. तो बिचारा वैतागून तिच्या मागे मागे पाय ओढत चालत राहिला. 
आता माझ्या मनात काय काय विचार आले ते लिहायला गेलो तर ब्लॉग हि कमी पडेल. एक निर्णय घेतला कि लवकरच निवृत्त झाल्यानंतरचा उपयोगी येणारा पेन्शन प्लॅन घ्यायचा आणि गुंतवणूक चालू करायची. 

बस आली बस मध्ये बसलो. ग़र्दी नसल्याने प्रत्येक जन विंडो सीट वर बसले. दोन स्टॉप गेल्यावर एक जाडसा माणूस बस मध्ये आला. सीट बघत बघत माझ्या बाजूला बसायला आला. मनात म्हटले झाले कल्याण, मी पण जाडा आता सीट वर मारामारी होणार. पण अचानक त्याचे लक्ष मागच्या सीट वर गेले आणि तिथला माणूस त्याचा ओळखीचा निघाला. 

अरे तू ? 
अरे तू? कसा आहेस ?? 
मजेत !!! 
तू कसा इथे ? 
अरे मी दररोज ह्याच बस ने जातो. 
अच्छा मी आज लेट झालो. 

तो मागे बसायला गेला. मी हुश्श केले. 

त्यांच्या गप्पा चालू झाल्या. नवीन चढलेल्या माणसाचा आवाज जरा मोठा होता त्यामुळे सर्व गप्पा ऐकायला येत होत्या. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. मग पहिल्याने विचारले तुझा भाऊ कसा आहे? लग्न झाले का? 

दुसरा: हो काही विचारू नकोस, लग्न झाले एक गोड मुलगी पण आहे. पण त्याने जाम वैताग आणला आहे. 

पहिला :का काय झाले ? 

दुसरा : अरे जाम पितो रे ? सर्व कमावतो ते सगळे दारूत उडवतो. बायका पोरांकडे पण बघत नाही. 

पहिला: काय प्रोब्लेम आहे का ?टेंशन आहे का ? 

दुसरा: अरे काही नाही अंगात मस्ती दुसरे काय? 

पहिला: अरे मग झापाडवायचे ना..लहान भाऊ आहे ना तुझा. मी असतो तर चांगल सुतासारखा सरळ केला असता. 
दुसरा: अरे तो काय लहान राहिला आहे का मारायला? नशेत माझ्यावरच हात उचलायचा. माझ्या बायकोला वासाचा त्रास होतो ति कटकट करत राहते. मागेच त्याला घराबाहेर काढले आणि वेगळे राहायला सांगितले. आई पण खूप रागावते त्याला. पण काही फरक नाही. वेगळा राहिला तर निदान जवाबदारी ने वागेल म्हणुन आम्ही त्याला भाड्याने घर हि घेउन दिले. पण कसले काय? 

पहिला: अरेरे ! साल्याला काठीने बदडावयाला पाहिजे. 

दुसरा: त्यादिवशी आई ने जेवायला घरी बोलावले होते. त्याची बायको आणि मुलगी आली होती. हा भाई रात्री १० वाजता आला ते सुद्धा फुल टाईट होऊन. चालायला पण जमत नव्हते. आई जाम ओरडत होती पण तो शुद्धीवर असायला पाहिजे न ऐकायला. 

पहिला: अरे काय यार ! एक दिवस चांगला थोबडावून सरळ करायचा ना !!!

दुसरा: काय बायको आणि पोरी समोर मारणार रे? 

पहिला: अरे अश्या साल्यांना टायर मध्ये घालुन मारले पाहिजे. मी असलो असतो ना तर..... 
(बहुतेक हा पोलिस खात्यात असला पाहिजे ....माझा अंदाज) 

दुसरा: मी विचार करतोय त्याला जरा एकदिवशी विजेचा झटका द्यायचा. जमला तर एक दिवसी तशी अँरेंजमेंट करणार आहे. आपला प्लग मधून येणारा विजेचा लोड किती असतो रे? त्याने माणूस मरत तर नाही ना? 

पहिला: ते बाबा मला काही माहित नाही ती माझी फिल्ड नाही रे? 
(आवाजातली जरब जरा कमी झाली.)

दुसरा: कोणी माहिती आहे का असे सांगणारा ? 

पहिला: नाही रे ! तू थोडासा झटका देऊन बटन बंद करू शकतो. 

दुसरा: हा रे! तसच काहीतरी करावे लागणार बहुतेक. माझ्या ऑफिस मध्ये कोणाला तरी विचारून बघतो. जाम डोक्याला त्रास होतोय रे. काय करणार साला सुधारतच नाही. 

पहिला: हम्म्म्म !!! 
(बहुतेक पहिल्या माणसाची हवा टाईट झाली असावी त्याने काहिच उत्तर नाही दिले.) 

दुसरा: साल्याला पुढच्या आठवड्यात जेवायला बोलावतो आणि पंख किंवा लाईट चालू करायला सांगतो आणि झटकाच देतो. साला असा लाईन वर येणार नाही. 

पहिला: हम्म्म्म ! बघ काय ते... 
(माझी खात्री पटली नक्कीच पोलीस नसावा)

पहिल्याने संभाषण थांबवण्याचे संकेत दिले. पण दुसरा माणूस फुल फॉर्म मध्ये होता.त्याची बडबड चालूच होती. त्याच्या डोक्यात लाईट चा करंट, प्लग, शॉक ह्याच गोष्टी फिरत होत्या. पहिला माणूस फक्त हो, हम्म करत होता.

मी पण कानात हेड फोन लावला आणि काय जमाना आलाय, भाऊ भावावरच उठलाय असे विचार करत मी पण शांत पणे झोपून डुलक्या काढायला लागलो. 

आता दुसरे काय करणार ???
दोन तासाच्या प्रवासात किती वेगळेच अनुभव आले.

CONVERSATION

4 comments:

  1. BUS MADHE AATA 33% MAHILANSATHI RESERVE SET ASTE, TEVHPASUN AAPLE GOODLUCK BIGADLELE AAHE , AATA PRATYEK VELI TOCH SUNDAR NAAVA CHA KAAL SAAND SARKHA MANUS MAJA BAJUCHI SET VAR BASTO.

    LOL : JEVHA 33% RESERVE SET NAHUTI TEVA PAN AAPLA LUCK NAHUTA...PAN AATA BAR AAHE PURN BAS MADHE MAAN FIRAT NAHI...FAKT RIGHT SIDE BECH NUMBER 1 TE 6 !!!!!!!!!!!

    ReplyDelete
  2. LoL
    शनिवारी बस वेळेवर येतच नाही आणि अशाप्रकारचे किस्से खूप ऐकायला मिळतात बसमध्ये .... पण तू लिहून ठेवलयस ते वाचायला मज्जा आली ....

    ReplyDelete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top