साल बहुतेक १९९४ किंवा १९९५ असावे. मी आठवी किंवा नववीत शिकत होतो. मार्च महिन्यातील परीक्षांचे दिवस होते. अशा वेळी नात्यातील एका जवळच्या लग्नासाठी आम्हा सगळ्यांना भांडुपला जायचे होते. खरं सांगायचं तर, मला अजिबात जायचं नव्हतं. डोक्यात फक्त परीक्षा आणि अभ्यास याच गोष्टी होत्या. लग्न जवळच्या नात्यातलं असल्यामुळे वडिलांनी ठामपणे सांगितलं— "जायचंच!"
मी नाराज होतो, मनात थोडासा रागही होता. आईने नेहमीप्रमाणे समजूत काढण्याचा प्रयत्न केला, "लग्न लागलं की लगेच आहेर देऊन निघूया. येताना भांडुपवरून थेट रिक्षाने येऊ, म्हणजे तुला अभ्यासाला वेळ मिळेल.
आहेरासाठी पाकीट तयार करायचे म्हणून वडील बाहेर पडणार, इतक्यात माझ्या एका मावस बहिणीचे मिस्टर—माझे भावोजी—आमच्याजवळ आले. त्यांनाही आहेरासाठी काही भांडी घ्यायची होती. ते आई-पप्पांच्या मागेच लागले की, "तुम्हीच भांडी बघायला सोबत चला."
पण माझं लक्ष दुसरीकडेच होतं. त्या दुकानाच्या शेजारीच घड्याळांचं दुकान होतं. काचेच्या शोकेसमध्ये ठेवलेली घड्याळं चमकत होती. काही पांढऱ्या डायलची, काही काळ्या-तपकिरी रंगाची, तर काही काळ्या कातडी पट्ट्याची... काही स्टीलच्या पट्ट्याची. साधी, पण अत्यंत आकर्षक आणि महागडी वाटणारी! त्या काळात लहान मुलांकडे सहसा डिजिटल घड्याळं असायची; अॅनलॉग घड्याळं म्हणजे मोठ्या माणसांची गोष्ट! तास, मिनिट आणि सेकंदाचे काटे... १ ते १२ अंक... माझ्यासाठी ती एक फार महागडी गोष्ट होती.
मी त्या घड्याळांकडे एकटक पाहत राहिलो… त्या वयात स्वतःच्या मनगटावर घड्याळ असावं, ही एक फार मोठी इच्छा असते.
"वेळेला" आपल्या मनगटावर बांधून घेण्याची एक वेगळीच मजा असते.
मी स्वतःला कल्पनेत पाहू लागलो—परीक्षेच्या हॉलमध्ये बसलेलो आहे… मनगटाव
र घड्याळ बांधलेलं आहे… आणि परीक्षा संपल्यावर मित्रांना ते अभिमानाने दाखवतोय!
माझ्या मित्रांपैकी कुणाकडेही असं अॅनलॉग घड्याळ नव्हतं. मी आयुष्यात कधीच आई-वडिलांकडे कसलाही हट्ट केला नव्हता, पण त्या दिवशी मात्र त्या घड्याळासाठी मन आतून हट्ट करू लागलं.
त्यांची भांडवाल्याबरोबर घासाघीस चालू असतानाच मी पप्पांकडे जाऊन म्हणालो, "मला घड्याळ घेऊया ना..."
त्यांनी साफ नकार दिला. "नको ते खर्च नकोत" असे म्हणत ते मला शांतपणे दम देऊन गप्प बसवत होते.
मग मी आईला मस्का मारायला सुरुवात केली, पण आईनेही नजरेनेच नकार दिला.
त्या काळात मुलांसाठी घड्याळं म्हणजे बहुतेक 'डिजिटल'च असायची. अॅनलॉग घड्याळं महाग असायची—अगदी हजार रुपयांच्या आसपास! पण तेव्हा आर्थिक उदारीकरणाची (Liberalization) चाहूल लागली होती. परदेशी बनावटीची, साधी पण आकर्षक अॅनलॉग घड्याळं बाजारात दिसू लागली होती. सहसा गोल किंवा चौकोनी डायल... काळा किंवा पांढरा रंग, लेदरच्या पट्ट्याऐवजी काळा रेक्सीनचा पट्टा आणि स्टीलच्या बॉडीऐवजी क्रोम-प्लेटेड बॉडी! चावी देण्याऐवजी ही घड्याळं सेलवर चालायची, त्यामुळे त्यांची किंमतही कमी होती. ती साधी होती, पण मन मोहून टाकणारी होती.
| त्या दिवशी अडीचशे रुपयांत मिळालेली 'अमूल्य' भेट! |
आईने तो बॉक्स आपल्या खांद्यावरच्या बॅगेत ठेवायला घेतला, पण मी लगेच म्हटले, "मला आताच हे घालायचे आहे!" त्यावर आई म्हणाली, "नको, उद्या परीक्षेला जाताना घाल." मी हट्टाने "नाही" म्हणालो. त्यावर भावोजी पुन्हा मदतीला आले, "अहो, घालू द्या की त्याला!" आईने माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला, पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. तो रिकामा बॉक्स आईच्या बॅगेत टाकला आणि घड्याळ हातात बांधूनच मी दुकानातून बाहेर पडलो
भावोजी दुकानातून बाहेर पडले आणि त्यांच्या मागे मीही निघालो. बाहेर पडता पडता हातातल्या घड्याळाकडे कौतुकाने बघत मी उगाचच एक डायलॉग मारला, "मग, होते ना तुमच्याकडे पैसे... उगाच 'नाही नाही' म्हणत होतात!"
बास्स! पप्पांचा पारा चढला. भावोजींच्या नकळत त्यांनी माझ्या पाठीत एक धपाटा घातला. तो हलकाच होता, पण त्यामागची चीड आणि हतबलता मला लगेच समजून आली. आईने तिथल्या तिथे स्पष्ट सांगितले, "आता रिक्षाने जायला पैसे उरले नाहीत, बसने गपचूप जायचे!"
आई-पप्पांचा घरातून निघताना जो आनंदी मूड होता, तो आता पूर्णपणे बदलला होता. लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचल्यावरही दोघेही अगदी शांत होते; फक्त चेहऱ्यावर एक खोटे हसू आणून लोकांच्या भेटीगाठी घेत होते.
मी उरलेल्या अर्ध्या महिन्याचं बजेट बिघडवलं होतं... मला माझ्या चुकीची थोडीफार जाणीव होऊ लागली होती, पण आता मी काहीच करू शकत नव्हतो.
लग्नाचं जेवण आटोपून आम्ही निघालो. मला वाटलं होतं की, निदान माझ्या परीक्षेचा विचार करून तरी ते रिक्षा करतील; पण आम्ही अर्धा किलोमीटर चालत बस स्टॉपवर पोहोचलो आणि दुपारच्या कडकडीत उन्हात उभे राहिलो. रिक्षासाठी खर्च करायला खरंच पैसे उरले नव्हते.
पूर्ण प्रवास अगदी शांततेत झाला... घरी आल्यावरही तीच जीवघेणी शांतता कायम होती. मला वाटलं होतं की, घरी गेल्यावर माझ्यावर ओरड पडेल किंवा मला मार बसेल, पण दोघेही मला काहीच बोलले नाहीत.
"वाढतं वय आहे, काही इच्छा होणारच... जाऊ द्या... आतापर्यंत त्याने कधी कशाचा हट्ट केला नाही, पहिल्यांदाच काहीतरी मागितलं आहे," असं सांगून आईने बहुतेक पप्पांची समजूत काढली असावी.
पण जगात सगळी सोंगं आणता येतात, पैशाचं सोंग मात्र आणता येत नाही!
पप्पांना पुढे महिनाभर घर चालवायचं होतं. पुढचे दहा दिवस तरी घरात पूर्ण 'सन्नाटा' होता. आई-पप्पा एकमेकांशी मोजकेच बोलत होते. घरात एक आठवडा भाजी आणली गेली नाही; रोज फक्त वरण-भात आणि खिचडी बनत होती, तोंडी लावायला फक्त लोणचं... घरातील ते तणावाचं वातावरण निवळायला शेवटी पुढचा पगारच यावा लागला.
त्या घड्याळाची किंमत केवळ अडीचशे रुपये होती, पण त्यामागचा माझ्या आई-वडिलांचा त्याग मात्र खरोखर 'अमूल्य' होता.
वेळ दाखवणारे ते घड्याळ आता जरी बंद असले, तरी त्या घड्याळाने आणि त्या एका दिवसाने मला आयुष्यभरासाठी 'वेळेची' आणि 'पैशाची' खरी किंमत शिकवली. ⏳ कारण ते माझ्यासाठी फक्त एक घड्याळ नाही; तो माझ्या आई-वडिलांच्या प्रेमाचा, त्यागाचा आणि माझ्या बालपणातील एका मोलाच्या शिकवणीचा अनमोल ठेवा आहे.
खरंच, काही घड्याळे फक्त वेळ दाखवतात... पण काही घड्याळे मात्र त्या काळाची 'वेळ' दाखवतात!
2 टिप्पण्या
खूप छान लिहीलंयस..
उत्तर द्याहटवाMast maa baap ke tyag va balidan tabhi samaj me jyada aate he jab hum maa baap ban jate he.
उत्तर द्याहटवाआवडले तर कमेंट करायला विसरू नका !!