आशा भोसले... स्वर-साम्राज्याची शेवटची साम्राज्ञी
लता दीदी गेल्या तेव्हा त्यांच्याबद्दल खूप काही लिहायचे होते, पण शब्द सुचले नाहीत वेळ ही भेटला नव्हता. आज आशा ताई सुद्धा गेल्या... आणि असं वाटतंय की एका सुवर्णयुगाचा शेवट झाला.
मुंबईत राहूनही या दोन महान कलाकारांना 'ह्या देही ह्या डोळा' पाहता आले नाही, ही रुखरुख मनात कायम राहील. या दोघींसारखे कलाकार हजारो वर्षांत कदाचित एखादेच जन्माला येत असतील.
कधी कधी काही आवाज हे फक्त गाणी नसतात, ते आठवणींचे दरवाजे असतात. आशा ताईंचा आवाज म्हणजे असाच एक उघडलेला दरवाजा! त्यांच्या आवाजात एक वेगळीच चपळता आणि ऊर्जा होती. जणू प्रत्येक गाणं त्या जगायच्या, फक्त गायच्या नाहीत. आशा ताईंची गाणी ऐकताना आपण केवळ गाणं ऐकत नाही, तर आपण तो 'काळ' जगत असतो.
त्यांची आणि सुधीर फडके यांची गाणी म्हणजे कानांसाठी एक पर्वणीच! विशेषतः 'ऋतू हिरवा'... हे गाणं रात्री शांततेत लाईट बंद करून ऐकून बघा. मला संगीतशास्त्रातील सूर-ताल फारसे कळत नाहीत, पण हे गाणं ऐकताना आपणही नकळत आशा ताईंच्या सुरांसोबत ताल धरायला लागतो, इतकी ताकद त्या आवाजात आहे.
माणसाच्या आयुष्यात अशी काही गाणी असतात जी त्याच्या सुख-दुःखाचा कायमचा सोबती बनतात. जेव्हा आपण ९० च्या दशकातील आठवणींचा किंवा त्या आधीच्या सुवर्णकाळाचा विचार करतो, तेव्हा एका आवाजाशिवाय तो काळ अपूर्ण वाटतो... तो आवाज म्हणजे आशा आणि लता दीदींचा! या दोघींनी हजारो गाणी गाऊन एक प्रकारे आपल्या सर्वांवर उपकारच करून ठेवले आहेत.
मराठी भावगीतांच्या दुनियेत त्यांनी जे काही दिलंय, ते शब्दांच्या पलीकडचं आहे. हृदयनाथ मंगेशकरांच्या कठीण चाली असोत किंवा सुधीर फडके यांची साधी-सोपी गाणी, आशा ताईंनी प्रत्येक सुराला स्वतःचा असा एक वेगळा 'अंदाज' दिला.
गिनीज बुकमध्ये नाव असूनही, हजारो गाणी गाऊनही त्यांना 'भारतरत्न' दिला गेला नाही, याचे दुःख कायम राहील. लता दीदींसारख्या हिमालयासमोर त्यांना नेहमीच थोडं कमी लेखलं गेलं, पण त्यांनी ते कधीच चेहऱ्यावर दाखवलं नाही किंवा कधी कुठल्या मुलाखतीत तसा शब्दही काढला नाही. कदाचित म्हणूनच… त्यांचं मोठेपण त्यांच्या आवाजाइतकंच त्यांच्या शांततेतही दिसतं.
त्या स्वतःच्या कर्तृत्वाने हिमालयासारखी उंची गाठू शकल्या नसतील, तरी त्यांनी आपल्या कलेचा एक अभेद्य 'सह्याद्री' नक्कीच उभा करून दाखवला.
आज त्या हे जग सोडून गेल्या आहेत. जाताना लाखो गाण्यांची मोठी शिदोरी मागे ठेवून गेल्या आहेत... निदान मला तरी ती जन्मभर पुरेल!
त्या गेल्या असतील… पण त्यांचा आवाज अजून इथेच आहे. आणि तो असेपर्यंत… त्या कधीच जाणार नाहीत.

0 टिप्पण्या
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!