कह दूँ तुम्हे या....

कालच टीव्ही वर तुझा नमक हलाल चित्रपट पाहत होतो...तसा आधी खूप वेळा पहिला आहे...पण अमिताभ ला समोर ठेवून बनवलेल्या चित्रपटात सुद्धा तुझ्या  हलत डोलत अभिनय करण्याच्या  वेगळ्या शैलीने तू तुझी भूमिका संस्मरणीय केली होती...मनातल्या मनात तुझ्यातल्या अभिनयाचे कौतुक करत होतो.

आणि नेमकी आजच तुझ्या बाबतीत ही बातमी समजावी... वाईट वाटले...

अगदी कालच तर भेटलो होता मला आणि आज गेला पण ....अशी काहीशी चुकचुकलेली भावना मनात दाटून आली....एका अर्थाने तू तुझ्या दीर्घ आजारातून सुटला हेच काय ते बरे झाले...

मल्टी कास्टिंग चित्रपटात इतर नावाजलेल्या कलाकारांबरोबर तू तुझ्या अभिनयक्षमतेच्या जोरावर बेधडक काम केलेस...इतकेच काय भारतीय सिनेमाच्या पहिल्याच यश चोप्राच्या मोठ्या मल्टी कास्टिंग सिनेमात - "वक्त" मध्ये काम केलेस आणि तुझा रोल यादगार केलास.. आज कालच्या नंबर वन म्हणवून घेणाऱ्या खान कंपनींना तुझ्या सारखी मल्टी कास्टिंग चित्रपटात काम करायची डेरिंग कधीच येऊ शकणार नाही.

कपूर खानदानचा नावलौकिक आणि गुडविल पाठीशी असून सुद्धा तू तुझ्या करियरचा मार्ग भिडस्त होऊन स्वतः निवडलास...हिंदी सिनेमा...इंग्लिश सिनेमा....अगदी थिएटर सुध्दा तू गाजवलेस आणि सगळ्यात यशस्वी पण झालास. "उत्सव" सारखा वेगळ्या धाटणीचा चित्रपट काढून तू सगळ्यांना चकवलेस सुद्धा ...त्यात वसंतसेनाssss !!! करत रेखाच्या मागे धावणारा तू अजून सुद्धा लक्षात आहेस....कपूर खानदानातील नावाजलेल्या आणि कसलेल्या अभिनय सम्राटांमधून तू स्वतःचे वेगळे असे अस्तित्व निर्माण केलंस....आणि दादासाहेब फाळके अवॉर्ड सुद्धा मिळवलास...ह्यातच तुझी महानता समजून येते.


"हेयययययय" करत हिरोईन ला हाक मारण्याची किंवा "ये भाssssयययय" करत अमिताभला हाक मारण्याची किंवा खांदे मागे करत चालण्याची किंवा त्याच लकबी मध्ये पाय उडवत डान्स करण्याची तुझी स्टाईल नेहमीच लक्षात राहिली. तुझी केसांची स्टाईल पण वेगळी होती....जाम आवडायची मला...अजून ही कधीतरी तशी हेअर स्टाईल करायचा प्रयत्न करतो मी...

ऍक्शन चित्रपटाच्या जमान्यात तू तुझे चॉकलेटी रूप सांभाळत तुझ्या रोलला न्याय दिला...अमिताभ बरोबर केलेल्या दिवार आणि त्रिशूल मधली तुझी भूमिका तर माझी ऑल टाईम फेव्हरिट..अमिताभ बरोबरची तुझी केमिस्ट्री सुंदरच होती...कभी कभी....शान...नमक हलाल....दो और दो पांच... काला पत्थर ....सगळेच सुपर डुपर होते.

तुझ्या वाट्याला गाणी पण अप्रतिम आली....आणि तू प्रत्येकात तुझी छाप सोडून गेलास...केह दु तुम्हे....नि सुलताना रे...लिखे जो खत तुझे....वादा करो नही छोडोगे....आज मद होश हुआ जाये रे....तुने अभि देखा नही....मोहब्बत बडे काम की चीज है.....तुम बिन जाऊ कहां....खिलते है गुल यहां....ओ मेरी शर्मीली.... अशी एकाहून एक गाणी तू अजरामर केलीस...आज ही गाणी गुणगुणत असताना मन तुझ्या सारखेच खांदे मागे उडवत गाणे गुणगुणत असते ....खास करून "केह दु तुमहें" म्हणताना...
"तेरा मुजसे है पेहले का नाता कोई..."  हे गाणे तर माझे आणि माझ्या 6 वर्षाच्या मुलाचे फेव्हरेट गाणे आहे...लहानपणा पासून त्याला हेच गाणे गाऊन अंगाखांद्यावर झोपवले आहे...अजून एक गौतम गोविंदा चित्रपटातील गाणे "एक रुत आये" सुद्धा कायमचे आठवणीत राहिले ज्यात तु फक्त सायकल वर बसून जाण्याचा निराकार अभिनय केला आहेस..
तुझ्या जाण्याने आज मोठी पोकळी वगैरे झालीय असे काही म्हणणार नाही....पण भारतीय सिनेमाच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड नक्कीच हरवलाय...तुझे चित्रपट पाहत लहानाचे मोठे झालोत आम्ही....त्यामुळे तू 80 वर्षाचा झालास तरी तुला अजून ही एकेरी हाक घालवीशी वाटते....तुझ्या जाण्याने लहानपणीची एक महत्वाची शिदोरी रिकामी झाल्या सारखे किंवा आवडते खेळणे हरवल्या सारखे नक्की झालेय...

तु....तुझा अभिनय....तुझी अदा.... तुझ्या डोळ्यातील चमक आणि धीर गंभीर पकड नक्कीच आठवणीत राहील...

अलविदा !!

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top