दोन क्षितिजे !!

"मला ते हवंय"

शट..अप !! काही काय बोलत असतोस तू ??

अग !! सिरियसली बोलतोय...मला उद्या माझ्या बर्थडे ला गिफ्ट म्हणून हवंय !!

शटप् जानू... तुला समजतंय का तू काय मागतोयस ?
लग्ना आधी हे सगळे काही मला चालणार नाही

अगं !! लग्न करायला तूच उशीर करतेय...तुलाच करियर करायचे आहे ...मी किती दिवस थांबू...तुझ्या प्रेमात मी आकंठ बुडून चाललोय....आता तूच मला ह्यातुन बाहेर काढू शकतेस...प्लिज ना...बड्डे आहे ना माझा...प्लिज ना !

तिला त्याच्या अश्या बोलण्यावर हसायला आले पण हसू दाबत ती म्हणाली...
हे बघ ! लग्नाआधी मी काहीही 'तसले' करणार नाही...आणि आता मला खूप कामं आहेत...तुझ्या बड्डे साठी उद्या मी सुट्टी टाकली आहे...त्यामुळे खूप काही कामे उरकायची आहेत.

म्हणजे तू उद्या नक्की माझे गिफ्ट देणार ना ?

गिफ्ट वगैरे काही नाही...आपण सकाळी देवळात जाणार आहोत... मग दुपारी कुठेतरी चांगल्या हॉटेलात जेवायचे आणि संध्याकाळी मस्त चौपाटीवर फिरायचे..

यार तू एवढी बोरिंग असशील वाटले नव्हते...तुझ्या प्रियकराची एवढी एक छोटी रिक्वेस्ट पण नाही पूर्ण करणार का???

करेन ना राजा .....पण लग्न झाल्यावर.. आता ते काही नाही............आता मला काम उरकू दे...चल बाय !

अगंSSग  ऐक ना...एक मिनिट.... अगं......

तो पुढे काही  बोलायच्या आतच तिने फोन कट केला.

त्याच्या त्या बड्डे गिफ्ट मागण्याचे तिला हसू येत होते...पण तिच्या सुद्धा मनाच्या एका कोपऱ्यात खळबळ उडू लागली होती...उद्या त्याचा बड्डे होता...आणि गेल्या तीन दिवसांपासून तो तिच्याकडे "ते" बड्डे गिफ्ट मागत होता...आधी तिने मस्करीवर नेले...पण त्याच्या मागणीने जोर धरल्यावर तिच्या मनाने पण उचल खाल्ली होती

त्याच्याशी बोलताना पण तिच्या अंगावर शहारे येत होते...मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी रिमझिम चालू झाली होती....तिच्या नकळत तिच्या शरीरातील रक्त जोरात पळू लागले होते...नसा गरम होऊ लागल्या होत्या...आपली तगमग त्याला समजू नये म्हणून त्याचे बोलणे हसण्यावारी नेत होती....पण तिला माहीत होते की जास्त वेळ त्याला नकार देऊ शकणार नव्हती...आणि त्याला नाराज ही होऊ देऊ शकत नव्हती..

काय करावे ...काय नाही...ह्या धर्मसंकटात ती पडली होती

आज तिच्या आणि त्याच्या रिलेशनशिप ला जवळपास 5 वर्षे झाली होती...सकाळी ऑफिस ला जाताना पकडणाऱ्या बस मध्ये त्याच्याशी ओळख झाली होती...गर्दीमध्ये सीट देण्यावरून झालेली ओळख...मैत्री मध्ये आणि पण मग प्रेमात रूपांतरित झाली होती...तसा तो खूप प्रेमळ आणि समंजस होता...थोडा शाय पण होता. कसा बसा तिने आणि त्याच्या मित्रांनी उकसवला म्हणून तरी त्याने तिला प्रपोज केला होता...नाहीतर आयुष्यात कधी डेरिंग पण नसती केली त्याने...प्रेम कसे करावे... रोमांस कसा करावा... हे पण त्याला शिकवावे लागले... मनाने खूप चांगला होता....निरागस होता...पण थोडा विस्कळीत होता...हळू हळू आस्वाद घेत खाणे त्याला कधी जमायचे नाही... पुढ्यात आले की गपकन संपवून टाकायचे असा त्याचा स्वभाव होता...पण ती त्याला आणि तो तिला ... दोघे एकमेकांना चांगले जमवून घ्यायचे.

हळू हळू फुललेल्या प्रेमाची कळी त्याला आज कुस्करायची होती...आणि ते सुद्धा तो तेव्हढ्याच निरागसतेने मागत होता..."नाही" म्हणून त्याला दुखवयाचे नव्हते आणि "हो" म्हणून लग्नानंतर घेऊ शकणाऱ्या सुखाचा....आताच उपभोग घ्याच्याच नव्हता...सर्वस्वी निर्णय तिचा होता... आणि ती काल पासून त्या गोष्टीचा विचार करून करून गोंधळून गेली होती

तिला तिच्या जुन्या टीम लीडर ची आठवण झाली..ती प्रमोशन घेऊन आता दुसऱ्या ऑफिस मध्ये ट्रान्सफर झाली होती...बिनधास्त गर्ल म्हणून तिची ओळख होती...ह्या शहरात ती एकटीच आई वडिलांना सोडून जॉब करायला आली होती...फ्लॅट भाड्याने घेऊन एकटीच राहायची....ऑफिस मध्येच एका कलिग बरोबर तिचे सूत जुळले होते... काही दिवसांनि दोघांनी मिळून एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि लिव्ह इन मध्ये राहायला गेली...ऑफिस मध्ये कोण काय बोलेल ह्याची तिला फिकर नसायची... आपली लाईफ कशी जगायची हे ठरवण्याचा अधिकार आपण दुसऱ्यांना का द्यावा असा तिचे म्हणणे असायचे... तीला ह्यांचे प्रेमप्रकरण अगदी पहिल्या दिवसापासून माहीत होते..ह्या मैत्रिणीच्या सांगण्यावरूनच तिने त्याला प्रपोज करायला उकसवले होते.

आता तिने तिलाच कॉल करून एका दमात सगळी घटना सांगितली...तिने शांतपणे ऐकून घेतले आणि तिला विचारले....तुला काय करायचे आहे ?

अगं मी ना.... थोडी कन्फ्युज आहे... तसा मला काही प्रॉब्लेम नाही...पण ह्या सगळ्या गोष्टी लग्नानंतर करायच्या असतात ना?

ए !! काकूबाई कुठल्या जमान्यात राहते तू गं ?? उद्या कोणी पाहिलंय... आज मध्ये जगायला शिक...आज तू नाही म्हणालीस आणि तो रागावून गेला तर मग कोणाशी लग्न करणार आहेस....ढक्कण कुठची ??

अगं पण...

अगं आता तुम्ही जवळपास 5 वर्षे रिलेशनशिप मध्ये आहात... तुला चिट तर नाही करणार आहे ना तो ... मग काय म्हणून एवढा विचार करतेय... चिल मार बेबी...ये जवानी कुछ दिनों की साथी है तेरी...मी काय म्हणते... ते तुझ्या डोक्यात जातेय ना ???

खरं म्हणजे तिला पण हेच उत्तर ऐकायचे होते आणि म्हणूनच तिने तिला कॉल केला होता...तिच्या म्हणण्याला हो..हो करत तिने कॉल ठेवून दिला.

आता तिच्या मनाची उरलीसुरली तयारी झाली होती...उद्या काय होईल त्या कल्पनेनेच तिच्या अंगावर काटा आला. कानाच्या पाळ्या गरम झाल्या. धमन्या मधून रक्त जोरात वाहू लागले. तिचे विचारविश्व चालू झाले. उद्या तो आपल्याला कुठे घेऊन जाईल....एखादे मस्त पैकी औटिंग ला घेऊन जाईल... की त्याच्या बाईकवर लॉंग ड्राइव्ह ला घेऊन जाईल....त्याला आपण घट्ट मिठी मारून बसायचे...तो छानश्या रिसॉर्ट मध्ये एखादा हनिमून सूट बुक करेल.... मस्त डीम लाईट मधला बेडरूम... सॉफ्ट म्युजिक....रोमँटिक गप्पा....हळुवार ओझरते स्पर्श....त्याच्या मिठीत हळुवार पणे विरघळून जाणे.... ते सर्व अंगावर झालेले पाहिले स्पर्श... पहिल्या वेदना... समाधानाची अनुभूती.... हे सगळे तीने बसल्या बसल्या अनुभवले.

मोबाईल व्हायब्रेट झाला आणि तिचे विचारचक्र भंग पावले। त्याचाच मेसेज होता. 

उद्याचे कन्फर्म कर ना मला अरेंजमेंट करावी लागेल...प्लिज ना !!!

तिने "येस...ओके" करून हार्ट ची स्माईली पाठवली. 

त्याने पण लव्ह यु डार्लिंग....थँक्स डिअर....असा मेसेज पाठवला

तो काय अरेंजमेंट करणार असेल....कदाचित आपण जो आता विचार करत होतो तसे च आपल्या आयुष्यात घडणार बहुतेक...आऊटिंग...बाईकवर घट्ट मिठी .... रोमांस....सॉफ्ट म्युझिक....स्पर्श...मिठी...

स्वतःच्या विचारांवर तिला हसू आले....कामावर लक्ष केंद्रित करून तिन लवकर आटपायचे ठरविले

लवकर निघून त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट पण घ्यायची होती आणि उद्या साठी नवीन ड्रेस पण खरेदी करायचा तिने विचार केला. 

त्याला लाल रंग आवडतो....मग लाल रंगाचा एखादा नवीन ड्रेस घेण्याचे ठरवले...अगदी इनरवेअर सुद्धा

शेवटी तिच्या साठी पण उद्याचा दिवस "खासच" होता.

दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याने फोन केला मी तुला पिकअप करायला येतोय...अमुक अमुक वाजता तयार राहा...ती अर्धा तास आधीच तय्यार होती...त्याच्यासाठी खास घेतलेलं कपडे घालून...त्याचा आवडत पर्फ्युम मारून स्वतःला आरशात न्याहाळत ती खूप वेळ बसली होती. ठरल्या वेळेपेक्षा थोडा उशीरच आला तो ..

त्याचा फोन आला तशी ती रस्त्यावर येऊन उभी राहिली
त्याला रिक्षात येताना बघून थोडी हिरमुसली..
रिक्षा समोर थांबली तशी ती रिक्षात बसली

तुझी बाईक कुठेय ???

ती पुढे काही बोलायच्या आताच त्याने तिला जवळ ओढून तिचे चुंबन घेतले...

माझा बर्थडे आहे ते विश करायचे सोडून तुला बाईक ची पडलीय....असे म्हणत त्याने परत तिला मिठीमध्ये घेतले...

रिक्शावला आरशात बघत आहे हे तिला जाणवले म्हणून ती थोडी अस्वस्थ झाली...पण त्याच्या ताकतीपुढे ती जास्त विरोध करू शकली नाही

चुंबनाचा भर ओसरल्यावर त्याच्या मिठी तुन थोडी सैलावत तिने थोड्यावेळाने परत विषय काढला....

तू बाईक का नाही घेऊन आलास???
आपण बाईक वर लॉंग ड्राइव्ह ला जाणार होतो ना??
आपण आता कुठे जाणार आहोत ???
तुझा नेमका प्लॅन काय आहे जरा सांगशील का तरी???

अग किती प्रश्न विचारते ??? आपण माझ्या मित्राच्या रूम वर जाणार आहोत...तिथून कुठे तरी हॉटेल मध्ये जेवण करू...मग तुला मी परत तुझ्या घरी सोडेन.

रूम वर ??

ते ऐकूनच तिला कसे तरी झाले...
अरे आपण कुठेतरी चांगल्या रिसोर्ट मध्ये नाहीतर चांगल्या हॉटेल मध्ये तरी गेलो असतो ना ??

अग कुठे लांब जाऊन उगाच वेळ आणि पैसे वाया घालवायचे
माझ्या मित्राची रूम सकाळची रिकामीच असते ना...म्हणून म्हटले तिकडेच जाऊ

सकाळची म्हणजे ???

ती पुढे काय विचारणार तेवढ्यात त्याने एका सोसायटी समोर रिक्षा थांबवायला लावली

पैसे चुकते करून तो सोसायटीच्या आवारात शिरला...सोसायटीच्या वॉचमन ने रजिस्टर खोलून नाव लिहायला सांगितले...

रूम नंबर 302 का ??
असे कुत्सित हास्य करत त्यानें विचारले

त्याने हो म्हटल्यावर ....वॉचमन ने तिच्या कडे वरतून खाली एका वेगळ्याच नजरेने बघितले...जणू काय ती 302 रूम बहुतेक अश्या मुलींना घेऊन येणासाठी त्याचे मित्र वापरत असावेत.

तिला एकदम ओशाळाल्यासारखे झाले...वॉचमन ची नजर चुकवून ती उगाच इकडे तिकडे बघत राहिली

तो तिचा हात धरून लिफ्ट ने तिला वर घेऊन आला...कॉरिडॉर मध्ये गप्पा मारत उभ्या असलेल्या शेजारी बायकांच्या नजरा चुकवत ते दोघे 302 समोर येऊन उभे राहिले. त्याच्याकडच्या चावीने त्याने दरवाजा खोलला...आणि एक उग्र वासाचा भपकारा तिला जाणवला... ओले कुबट कपडे....दारूचा उग्र वास ह्यांची सरमिसळ होऊन त्या रूम ला वेगळीच दुर्गंधी येत होती

दरवाज्यातून आत येताच ती ओंगळवाणी रूम बघून तिला कसे तरीच झाले...इतस्ततः पडलेलं कपडे...विखुरलेले कामाचे कागद..पुस्तके...दारूच्या रिकाम्या बाटल्या....जमिनीवरच पसरलेल्या गाद्या... विस्कटलेली अंथरुणे... आडव्या तिडव्या रश्या बांधून वाळत घातलेले कपडे...अंडरवेअर...फाटक्या बनियन...जमिनीवर साचलेला एक धुळीचा थर.... कोळ्यांनी जाळे करून भरलेले एकूण एक कोपरे....किचन आणि बाथरूमची अवस्था तर बघण्यासारखीच नव्हती

त्याने तिला आत खेचून दरवाजा बंद करून घेतला... आणि तिला मिठीत ओढून घेतले.... तिने त्याला बाजूला करत..रूम च्या एकंदरीत अवताराकडे बघून ...

हे कुठे घेऊन आलास तू मला??? असे विचारले

त्याला ही रूम चा अजागळ पण जाणवला....दोनच मिनिट थांब असे सांगून...
त्याने सगळी रुम आवरायला घेतली... सगळे समान बेडरूम मध्ये सरकवून त्याने हॉल रिकामा केला...गादीवरची चादर झटकून परत घातली आणि तिला गादीवर ओढून घेतले...

तिला काय करावे ते सुचत नव्हते...विरोध करताच येत नव्हता...तो काय बोलतोय ते शब्द ऐकू येत होते पण आत पोचत नव्हते...त्याने तिची ओढणी काढून बाजूला घेतली...आणि तिचे खांदे पकडून तिला गादीवर आडवी करायला घेतले... त्या रूम मधला एक मित्र कॉलेज करून दुपारी येतो तो यायच्या आत त्याला ती रूम खाली करून जायचे होते... असे काहीसे शब्द तिच्या कानावर आले....त्यासाठी त्याची घाई चालली होती...

तिला त्या गादीवर झोपवत नव्हते...पण त्याच्या जबरदस्ती पुढे ती निष्प्रभ होत चालली होती...अंगातले त्राणच नाहीसे झाले होते...डोक्यात विचारांचे काहूर माजू लागले होते...

कुठे तो हनिमून सूट....कुठे ही ओंगळवाणी रूम
कुठे तो डीम लाईट मधला बेडरूम....कुठे हा कोंदट अंधारी हॉल
कुठले ते सॉफ्ट म्युजिक....इथला कॉरिडॉर मधला बायकांचा आवाज
हळुवार स्पर्श....आता सगळ्या अंगावर अधाशा सारखे फिरणारे त्याचे हात...
त्याच्या मिठीत विरघळून जाण्याऐवजी त्याला बाजूला करावेसे तिला वाटत होते...पण त्राण नव्हते....रोमँटिक गप्पा तर दूर....त्याला तिच्याशी बोलता ही येत नव्हते...तो काही बोलण्याच्या मनस्थितीत ही नव्हता ....हळू हळू आस्वाद घेणे त्याला माहीतच नव्हते.....पुढ्यात आले की गपकन संपवून टाकायचे हाच त्याचा स्वभाव.....तिच्या नवीन कपड्यांचे कौतुक तर दूर... तिला निर्वस्त्र कधी करतोय असे त्याला झाले होते....

त्याचा स्वभावच तसा आहे...अशी मनाची समजूत घालून तिने त्याला प्रतिसाद द्यायचा प्रयत्न केला सुद्धा....पण त्याच्या घिसाड घाई मूळे तो ही व्यर्थ गेला...तिला खुलवायचे सोडून तो तिला ओरबडण्यातच गुंग झाला होता....त्याला सर्व कार्यक्रम दहा मिनिटातच उरकायचा होता....शेवटी तिने स्वतःला त्याच्या हवाली करून टाकले....आणि होणाऱ्या वेदना ओठाखाली दाबत...छतावर फिरणाऱ्या पंख्याला लागलेली जळमटे मोजत राहीली...

पुढची काही मिनिटे ती संवेदनाहीन झाली होती...बराच वेळ तिला ओरबाडून तो शेवटी गलितगात्र होऊन तिच्या शरीरावरुन बाजूला झाला.. मिळालेल्या सुखाचा आनंद ही घेणे त्याला जमत नव्हते...पुढच्याच पाच मिनिटात तो उठून स्वतःचे कपडे घालत होता...तिचे कपडे तिच्या अंगावर फेकून तिला लवकर कपडे घाल म्हणून सांगत होता...

जड मनाने तिने आपले कपडे गोळा केले आणि ती आतल्या रूम मध्ये गेली....पुढच्या दहा मिनिटात ते दोघे रूमच्या बाहेर पडले....लिफ्ट कडे जाताना शेजारच्या बायकांचे कुत्सित हसणे तिच्या कानावर पडले....आणि त्या बायकांनी तिला काय समजले असावे हे ओळखून तिची तळपायाची आग मस्तकातच गेली... स्वतःला शांत ठेवत...ओरबाडलेले शरीर आणि चुरगळलेले मन घेऊन ती लिफ्ट मधून खाली आली...मोबाईल वर तिच्या त्या टीम लीडर मैत्रिणीचे 2 मिस्ड् कॉल येऊन गेले होते...परत आलेला कॉल तिने कट केला...

लिफ्ट मधून बाहेर आल्यावर वॉचमन ने परत रजिस्टर समोर केले....आणि तिच्याकडे परत वरून खाली बघत ....त्याला उद्देशून म्हणाला.

इतने जलदी हो भी गया ???

त्याच्या ह्या वाक्यावर मात्र तिचा कंट्रोल सुटला....डोळ्यातुन पाण्याची धार लागली....ती तशीच सोसायटीच्या गेट बाहेर धावत सुटली...त्याला न सांगता..... त्याला माहित पडल्यावर...तो ही तिच्या मागे हाक मारत धावला....

तो मागून येई पर्यंत तिने समोर आलेली रिक्षा पकडून एकटीच पुढे निघून गेली...रिक्षात बसून तिने आसवांना वाट मोकळी करून दिली.....मैत्रिणीचा फोन परत आला....

तिने कॉल उचलला....

क्या मॅडम!!! किधर हो??? मालूम है मालूम है !! .... अभी हमारा फोन भी नही उठाओगी !!! कैसा था पैहिला वैहिला एक्सपिरियन्स !!!

तिला अजून उमाळा फुटला....आणि ती अजून जोराने रडू लागली

काय ग ??? काय झाले??? सगळे ठीक आहे ना?? काय झाले तुला ??? बोल ना गं..

तिने एक मोठा पॉज घेतला आणि रडत रडत म्हणाली

आय हॅव बीन रेपड् !!! मेंटली अन फिजिकली !!!



CONVERSATION

2 comments:

  1. मनोगाथा दोन जीवा ची चांगली प्रदर्शित केली आहे

    ReplyDelete
  2. आपला ब्लॉग उत्कृष्ट वाटला.मराठी साहित्यातील काही अप्रतिम कालसुसंगत लेख,कथा आणि इतर साहित्य शोधून ते आम्ही आमच्या #पुनश्च या पोर्टलवर प्रसिध्द करतो. त्यासाठी १०० ते १५० व्र्षांपुर्वीचेही साहित्य आम्ही वाचतो आणि उत्तम निवडून वाचकांना पोर्टलवर देतो. नुकतीच मराठी ब्लॉगर्स साठी आम्ही एक अभिनव स्पर्धा जाहीर केली आहे. कुठलेही प्रवेशमुल्य नसलेल्या या स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर www.punashcha.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पर्धेबद्दल सविस्तर जाणून घेऊन भाग घ्या.

    ReplyDelete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top