तो येतोय......तो आलाच

आज काय वाटले काय माहित? ऑफिस मध्ये बॉस नव्हता लवकर निघावेसे वाटले. कोणालाच न विचारता पाच वाजता निघालो....मित्राच्या बाईक वरून आलो आणि ट्राफिक लागायच्या आधी निघालो त्यामुळे अर्ध्या तासात ठाण्यात पोहोचलो. पार्किंग मधून माझी बाईक काढली आणि घरी यायला निघालो. येताना समोरच्या डोंगरावर तो मला दिसला.... हळू हळू मंद पावलानी पुढे सरकत होता....तशी त्याने यायची वर्दी आधीच दिली होती.....काल परवा त्याने केरळमध्ये हजेरी लावली होती...काल सोलापूर, तळ कोकणात त्याने आपली चुणूक दाखवली होतीच.....अंदाज होता कि त्याला मुंबईत येईपर्यंत सोमवार उजाडेल पण डोंगराच्या टोकावर मला तो दिसला आणि मनात आनंदाचे तरंग उठले....तो आज येईल काय??? एक मन सांगत होते...अरे तो आलाय पण तर दुसरे सांगत होते अरे अजून वेळ आहे...पण पहिले मन जिंकत होते.....

गाडी पार्क केली वर बघितले....नारळाच्या झाडाची झावले आपल्याच मस्तीत डोलत होती...रस्त्यावर कडकडीत उन पडले होते.....म्हटले तो येतोय कि नाही?...तेवढ्यात नारळाच्या झावळ्या जोरात सळसळल्या. 

घरी आलो भयंकर उकडत होते. खिडकीतून गरम वाफा येत होत्या....अंघोळ करून गादीवर पडलो...कधी डोळा लागला समजलंच नाही...अचानक थंड वाऱ्याची झुळूक लागली आणि जाग आली....खिडकीतून बाहेर बघितले तर माडाच्या झावळ्या जोरजोरात सळसळत होत्या ....उन् थोडे शांत झाल्या सारखे वाटत होते.... आज काहीतरी वेगळे दिसतेय....बहुतेक तो येणारच आहे....नारळाच्या झावळ्या एका विशिष्ट पद्धतीने डोलत होत्या....कोणी नोटीस केले आहे कि माहित नाही पण कदाचित नारळाच्या झाडांना त्याच्या येण्याची खबर बहुतेक आधीच  मिळते...ते आपल्याच धुंदीत डोलत असतात नेहमी पेक्षा वेगळेच चैतन्य त्यांच्या फांद्या फांद्यात वळवळत असते ... बिछान्यावर पडल्या पडल्याच  बायकोला म्हणालो अग बहुतेक तो आज येणारच.....

अरे कोण येणार ? 

अग तो बघ.....तो येतोय ...पक्षी कसे किलबिलाट करताहेत.....झावळ्या बघ कश्या डोलताहेत ...आकाशात बघ एक वेगळाच पिवळसर रंग आला आहे...आज नेहमीपेक्षा लवकर अंधार पडणार आहे... 

ती समजली....म्हणाली जा उठ खिडकीच्या कट्ट्यावर बस...त्याची वाट बघ.....मी मस्त पैकी चहा टाकते...झोपायचे होते...पण अंगात एक वेगळेच चैतन्य आले आणि उठलो...खिडकीच्या कट्ट्यावर लोळायला लागलो...आज किती सुंदर वातावरण आहे....खूप दिवस ब्लॉग पण नाही लिहिला आहे आज सुरुवात करुया...लॅपटॉप चालू केला...लिहायला सुरुवात करणार....तेवढ्यात..... 

तेवढ्यात...तो आलाच....खिडकीच्या वर असलेले पत्रे ताड ताड वाजू लागले....खाली खेळणारी मुळे ओरडत ओरडत घरी पळू लागली....कट्ट्यावर बसलेल्या बायका धावत धावत घरात पाळल्या...बघता बघता त्याने जोर धरला आणि वातावरणात झटपट बदल होत गेले.....गरम वाफांचे थंडगार झुळूकीत रुपांतर झाले...लॅपटॉप बंद केला आणि परत खिडकीच्या कट्ट्यावर जाऊन कॅमेरा घेऊन बसलो.... म्हटला आज त्याला कॅमेरात कैद केल्याशिवाय सोडायचे नाही....असा पण कॅमेराचा पहिलाच प्रसंग होता त्याला कैद करण्याचा .....तो घेतल्यापासून त्याचा हा पहिलाच पाऊस होता...वारा घाबरून इकडून तिकडून सुसाट वाहू लागला....खिडक्या आपटू लागल्या....पाने सळसळू लागली.....झाडे सर्व आनंदाने नाचू लागली.....मातीला पण त्याच्या येण्याचीच आस होती....ती ही नटून थाटून सुगंधित होऊन घुमु लागली....घरट्याकडे फिरणारे पक्षी ही थांबून त्याच्या स्वागतासाठी थबकले......कोरड्या झालेल्या विहिरी सुद्धा आनंदाने दोन्ही हात पसरून स्वागतासाठी तयार झाल्या...

क्षणात आसमंत भरून आले. मातीला सुगंध फुटला....पूर्ण आसमंतात दरवळू लागला. श्वासागणिक तो रोमरोमांत फिरू लागला. झाडे झुडूपांनी अंगावरची धूळ झटकून टाकली आणि त्याच्या स्वागतासाठी तयार झाल्या. खारुताई, साळुंकी, चिऊताई आनंदाने किलबिल करू लागल्या. घाबरून घरात गेलेली मुले जरा धीर करून डोके बाहेर काढून बघायला लागली. तेव्हढ्यात एक पोरगा आपले शर्ट काढून ओरडत बाहेर आला. त्याला बघून बाकीच्यांना धीर आला. आई ओरडत असूनही एकेक करत सर्व बाहेर पडले. नवीन लग्न झालेली जोडपी खिडकीतून बाहेर  डोकावू लागली.

तो पण अगदी जोरात आला...नेहमीसारखा थोडाच येऊन फसवून नाही गेला...आला तो चांगला एक दीड तास राहिला....खिडकी पूर्ण उघडून मीही त्याला घरात घेतले....त्याच्याशी हस्तांदोलन केले.....बायकोने मस्त चहा करून आणला...खिडकीत ठेवला....त्याने पण तो चाखून बघितला.....त्याला कॅमेरात कैद करत चहाचे मस्त झुरके घेत त्याच्याबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या....नेहमीप्रमाणे लाईट गेली. अगदी अंधार होईपर्यंत त्याच्याबरोबर गप्पा मारल्या....त्याला पण घाई नव्हती...मनसोक्त आला..बसला..खेळ खेळ खेळला...सर्वाना आनंद दिला...सर्वांशी गळा भेट केली आणि मग परतीच्या प्रवासाला निघाला. ते सुद्धा परत लवकरच येईन असे आश्वासन देवूनच गेला.....



पहिला पाउस 

पहिला पाउस 

विहिरीने ही आपली तहान भागवून घेतली आहे.

माडाच्या झावळ्या 

माडाच्या झावळ्या 

गरमागरम चहा 



टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या

  1. @ chetana...
    धन्यवाद ब्लॉगला भेट देवून कमेंट दिल्याबद्दल.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्युत्तरे
    1. व्वा मस्त ..... छान वाटलं वाचून अगदी पहीला पाउस अनुभवतो आहे असे वाटले ☔

      हटवा

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!