ह्या दिवाळीचा आकाश कंदील...मागच्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षी हि कंदील बनवण्याचे ठरवले होते. पण वेळ चा नव्हता मिळत. ऑफिस मध्ये इंटरव्यू असल्याने अभ्यासाची तयारी करण्यातच वेळ जात होता. धनत्रयोदशीच्या दिवशी पर्यंत कंदील तयार झाला नाही त्यामुळे बायकोचे ओरडणे चालू झाले होते. कंदील कधी लावणार? दिवाळी झाल्यावर बनवणार काय? तुझे तर नेहमीच असे असते.... जगाच्या मागून वगैरे वगैरे. मला माहित होते कि मी एकदा बसलो तर ३/४ तासात कंदील बनवून होईल पण वेळच नव्हता भेटत. शेवटी धनत्रयोदशीच्या दिवशी बायकोने शेवटची ऑर्डर सोडली कि आज नवीन कंदील बाजारातून विकत घ्यायचाच, मी मग बिचारा काय करणार ? पण म्हणालो आजचा दिवस दे आज रात्री कंदील बनवूनच टाकतो. मागच्या वर्षी पण असाच आकाश कंदील बनवला होता. तो एवढा चांगला नव्हता झाला. ह्या वर्षी बांबू च्या काठ्यांचा बनवायचा होता. पण शेवटच्या दिवसा पर्यंत काठ्या काही मिळाल्या नाहीत. मग शेवटी ठरवले कि साधा वालाच आकाश कंदील बनवायचं. विचार आला चला, त्या निमित्ताने ब्लॉग लिहायला एक विषय भेटला. मी कंदील बनवायचा केलेला प्रयत्न इथे दिलेला आहे.


वापरलेले साहित्य : पुठठा किंवा कार्डबोर्ड पेपर, पतंगी पेपर, कैची, कटर, स्टेपलर, फेविकॉल,एक सोनेरी पेपर, धागा, करकटक.सर्व प्रथम पुठठा घेऊन त्याच्या समान आकाराच्या दोन पट्ट्या कापल्या. कंदिलाचा जेवढा व्यास आपल्याला ठेवायचा असेल तेवढ्या आकाराच्या पट्ट्या कापाव्यात.ह्या पट्ट्यांना गोलाकार करून त्यांना फेविकॉल लावून स्टेपलर मारले. स्टेपलर मारल्याने फेविकॉल सुकायला वेळ मिळतो आणि गोल सुटत नाही.
त्यानंतर जेवढ्या मोठ्या आकाराचा कंदील बनवायचा असेल तेवढ्या आकाराच्या तीन पट्ट्या कापून घेतल्या.
पहिल्या गोलाकार पुठठयाच्या वर्तुळाला खाली ठेवून तीन समान अंतरावर ह्या पुठ्ठ्याला फेविकॉल लावून स्टेपलर मारले.
यानंतर दुसऱ्या गोलाकार पुठठयाला वर फेविकॉल लावून स्टेपलर मारले. हे पुठ्ठे थोडे मजबूत असणे जरुरीचे आहेत. नाहीतर वाऱ्याने कंदील फाटण्याची शक्यता असते.

हा कंदीलाचा सांगाडा तयार झाला.


ह्याच्या पुढचे काम थोडे किचकट आहे. आता कंदिलाच्या पाकळ्या बनवायच्या आहेत. त्यासाठी एखादि सोपिशी नक्षी निवडावी जी काढायला सोपी असेल आणि कैची ने कापायला पण सोपी असेल. ह्यासाठी रद्दी च्या वर्तमान पत्रावर पहिले सराव करावा. त्यातून एक नक्षी ठरवावी आणि बाकीच्या पाकळ्या त्यानुसार बनवाव्या.पेपर ला चार घडी अशा रीतीने मारावी कि ज्याने आपल्याला फक्त एका बाजूनेच कापावे लागेल आणि उघडल्यावर त्याची अख्खी पाकळी बनेल. हे जरा किचकट असले तरी सरावाने लवकरच जमते.वर्तमानपत्रावर कापलेली नक्षी आधार म्हणून घेऊन सर्व पतंगी पेपर एकाच आकाराचे कापावेत.
कापलेली घडी उघडल्यावर पाकळी अशी दिसेल.

ह्या पाकळीची दोन्ही टोके फेविकॉल ने चिटकवून घाव्यीत. सर्व कामासाठी खळ अथवा फेविकॉल वापरावा, साधा गम वापरण्याचे टाळावे जेणेकरून कंदील वाऱ्यावर सुद्धा न फाटता चांगला राहतो.नंतर सोनेरी पेपर चा ठिपके अथवा चौकोनी तुकडे कापून घ्यावीत आणि ते पाकळीवर अशा पद्धतीने चिटकवावीत.आपल्या कंदिलाच्या सांगाड्याचा घेर लक्षात घेऊन आवश्यक तेवढ्या पाकळ्या कापून तयार ठेवाव्यात.नंतर आधी बनवलेल्या सांगाड्यावर एकामागून एक पाकळ्या शक्य तेवढ्या जवळ लावाव्यात. पाकळ्या जवळ लावल्याने कंदील भरगच्च वाटतो आणि मागील पुठ्ठ्याचा सांगाडाहि दिसत नाही.


नंतर सोनेरी पेपर च्या दोन पट्ट्या कापून घ्याव्यात. बाजारात मिळणाऱ्या सोनेरी पेपर ला पर्याय म्हणून गिफ्ट पेपर पण वापरू शकतो. मी सुद्धा सोनेरी रंगाचा गिफ्ट पेपर वापरला आहे. गिफ्ट पेपर ला जास्त चमक असते आणि आतमध्ये लाईट सोडली असता ती जास्त चमकून दिसते. फक्त हा पेपर जास्त लवचिक असल्याने कापताना जरा त्रास होतो. सरळ रेषेत कापायला जमत नाही. (शक्यतो सोनेरी पेपरच वापरावा कारण इतर चंदेरी आणि रंगीत पेपरने कंदील खुलुन दिसत नाही. मी ते सर्व प्रकार करून बघितले आहेत. सोनेरी पेपर चा चांगला वाटतो.)


सर्व पाकळ्या लावून झाल्यावर कंदील अश्या प्रकारे दिसेल. इथ पर्यंत कंदीलाचे ७०% हून काम पूर्ण होते.आता कंदिलाच्या शेपट्या बनवायच्या. शेपट्या सरळ रेषेत येण्यासाठी पेपर ची अशा रीतीने घडी मारावी जेणेकरून आपल्याला फक्त तुकडाच कापावा लागेल.समान अंतराचे तुकडे कापून ते मोकळे करावेत. अशा तऱ्हेने शेपट्या तयार होतील.
ह्या शेपट्या खालच्या बाजूने एकमेकांमध्ये अंतर न ठेवता आतल्या बाजूने चिटकाव्यावत.


कंदील जवळपास असा दिसेल.त्याच्या वरच्या बाजूला कैचीने अथवा करकटकने छोटे छिद्र करून त्यात धागा ओवला. आत मध्ये बल्ब सोडला आणि अशा रीतीने कंदील तयार झाला.


आता सर्वात शेवटी हाताला लागलेला फेविकॉल काढत बसायचा मला हा टाईम पास खूप आवडतो.|| शुभ दीपावली ||

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top