झोंबी | आनंद यादव
झोंबी हे लेखक आनंद यादव उर्फ आनंद रत्नाप्पा जकाते उर्फ आंद्या ह्यांचे आत्मचरित्र आहे..
सहसा मला आत्मचरित्र वाचायला आवडत नाही. पुस्तक घेऊन आल्यावर समजले आत्मचरित्र आहे. पण पु.ल. देशपांडेंची प्रस्तावना आहे बघितल्यावर विचार केला पाच दहा पाने वाचून बघू....नाही आवडले तर परत करू.
दुसऱ्याच पानावर मिळालेल्या पुरस्कारांची यादी बघून पुस्तक चांगले असणार वाटू लागले. पु.लं. ची प्रतिक्रिया जवळपास दहा बारा पाने आहे. पूर्ण वाचावी अशी वाटली नाही.
ती सोडून सरळ कथेला हात घातला ...पहिली पाच दहा पाने सटासट वाचली आणि दहा बारा पानावर कथेतल्या 'आंदया' चा जन्म एक सहज ओळीमध्ये झाला
"मुलाचा जन्म झाला म्हणून बापासकट सगळ्याना आनंद झाला म्हणून मुलाचे नाव आनंद ठेवले आणि तो 'आनंद' म्हणजे मीच"
ह्या दहा बारा पानात जे लेखकाच्या जन्मा आधीचे वर्णन केले आहे.. त्यात लेखकाच्या सहज सोप्या आणि धावत्या लेखन शैलीने धम्माल उडवून दिली आहे. ह्या दहा बारा पानातच समजून गेले ह्या कादंबरी वजा आत्मकथेत दम आहे...पुस्तक बदलून घायचा विचार मनातून काढून टाकला
जवळपास 380 पानाचे हे पुस्तक आनंद यादव ह्यांच्या जन्मापासून ते SSC पर्यंतच्या करकीर्दीवर घडलेला धावता घटनाक्रम आहे. ह्या कादंबरीतून आपल्याला ग्रामीण जीवनाचे, अर्थव्यवस्थेचे, दारिद्र्याचे, माणसांच्या विविध स्वभावाचे, प्रखर गरिबी आणि दुर्गम इच्छाशक्तीचे प्रदर्शन होत राहते
लेखकांचे बालपण सुस्तिथीतून अतिशय गरिबीकडे चाललेले असते...सतत शिव्या घालणारा बाप...दहा बारा बाळंतपणे काढणारी बारीकशी आई... जगलेली सात आठ रोगी भावंडे...आयुष्यभराची मेहनत...गरिबी...वर्षातून एकदाच मिळणारी अंगावर घालायची कापडे.... अस्वच्छता....आजारपण...उपासमार....आणि अतिशय कठिण परिस्थितीत सुद्धा शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा आनंदा बघून डोळ्यात पाणी उभे रहाते.
जमेल तसे राबून....दिवसरात्र उपाशी राहून....बारा पंधरा तास शेतातील मेहनतीची कामे करून....शाळेतला एखादा तास हजर राहून....मोट ओढत रात्रंदिवस केलेला अभ्यास...सतत होणारी मनाची आणि शरीराची उपासमार....वडिलांचा स्वार्थी आणि अप्पलपोटेपणा....शिक्षणाला सतत होणार विरोध...काही शिक्षकांचा मिळणार आधार आणि काही शिक्षकांचा कडवा राग...आणि ह्या सगळ्या अडचणीतून तावून सुलाखून सुद्धा तालुक्यात पाहिले येणे...शाळेत पाहिला...दुसरा नंबर येणे...केवळ आणि केवळ मजबूत ईच्छाशक्ती वरच शक्य होऊ शकते.
मामाशी लग्न करून दिलेल्या आपल्याच लहान बहिणीचा क्षयरोगाने झालेला मृत्यू आणि त्यानंतर मामा आणि त्यांच्या मुलावर आलेले पोरकेपण हे वाचणाऱ्याच्या काळजाला हात घालते...मामाला बायकोची आणि त्यांच्या लहान मुलाला आईची किती गरज होती ह्याचे लेखकाने केलेलं वर्णन अप्रतिमच. ह्या टोकावर वाचकाने काही वेळ नक्की एक पॉज घेऊन ते दुःख अजमावून बघावे.
पु.लं. च्या भाषेत म्हणायचे तर झोंबी म्हणजे एक बाल्य हरवलेलं बालकांड.
नक्कीच वाचण्यायोग्य कलाकृती आहे...ह्याचा असर तुमच्या मनावर नक्कीच खोलवर कोरला जाईल.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!