सकाळी सोसायटीच्या खाली...रस्त्यावर...ऑफिसला जाण्यासाठी बुलेट काढत असताना, आपापल्या कामासाठी धावपळ करणारी आजूबाजूची माणसे बघुन माझ्या ४ वर्षाच्या पिल्लू ने हा प्रश्न विचारला.....त्याने जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हाच माझ्या ध्यानात आले की खरंच रस्त्यावर खुप धावपळ चालू आहे....कोणी ऑफिस साठी तर कोणी मुलांना शाळेत सोडण्यासाठी... कोणी बस पकडण्यासाठी तर कोणी ऑटो च्या मागे धावतंय....कोणी वजन कमी करायला धावतोय तर कोणी वजन वाढवायला धावतोय.....कोणी दुध टाकायला धावतोय तर कोणी वर्तमानपत्र टाकायला.....हे सगळे दररोज धावत असतात पण मी कधी निरखुन पाहिलेच नाही कदाचित मी पण त्यातलाच एक असल्यामुळे कधी लक्ष दिले गेले नाही.
ही सगळी लोकं कुठे चाललीय...त्याचा फायदा काय ? आणि सगळ्यांचा शेवट काय आहे?...मृत्यू येईपर्यंत जे आपण जगतो त्यालाच बहुतेक 'जीवन' म्हणतात आणि शेवट माहित असूनही ते थोडेफार 'जीवन' जगण्यासाठीच ही धडपड आणि धावाधाव चाललीय....कोणी इथे काही घेऊन आले नाही आणि इथून काही घेऊन ही जाणार नाही तरी पण आपली धावपळ चालूच असते. पण का? त्याचे समाधानकारक उत्तर मला तरी अजून सापडले नाही.
" सांग ना !! डॅड्डु... ही सगळी लोक कूटे चालली आहेत? "
त्याच्या पुन:प्रश्नाने भानावर येत मी पण महाभारत स्टाइल मध्ये म्हटले ..."हे अर्जुना!!!....ह्या प्रश्नाचे उत्तर खरंच कठीण आहे रे!!...किती तरी साधु, संतांनी, महंतांनी ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपले आयुष्य घालवले आहे....मनुष्य कुठून येतात अणि कुठे जातात हे उत्तर ज्याला सापडले तोच कदाचित भगवान कॄष्ण होतो."
त्यानेही सगळे समजले ह्या अविर्भावात मान डोलवाली....आणि दोन सेकंद विचार करून म्हणाला......"डॅड्डी!! आपल्या घरी पण आहे ना बालकृसन् (बालकृष्ण)".
मी फक्त होकारार्थी मान डोलावली आणि बुलेट स्टार्ट केली. तो ही उगाच आपल्या डॅडी ला अजून संकटात नको पाडायला म्हणून पुढे काही न विचारता....आपल्या परीने विचार करत आजूबाजूची रहदारी बघत राहिला.
***
0 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!