अण्णांसाठी पत्र

प्रिय अण्णा,

anna-hazare_040711101854_20110408060620_254x195
अण्णा हजारे लोकपाल साठी उपोषण करताना
अहो अण्णा ! हे काय करायला बसला आहेत तुम्ही....आतापर्यंत फक्त महाराष्ट्राची साफसफाई करत होता आता थेट दिल्लीत जाऊन देशाची साफसफाई करायला घेतली आहेत तुम्ही. अहो कसे काय जमणार तुम्हाला ? अशाने भ्रष्टाचार चा राक्षस संपणार आहे का ? अहो भ्रष्टाचार तर आमच्या रक्ता-रक्तात भरला आहे. असा एक दिवस जात नाही कि आमच्या देशात भ्रष्टाचार उघडकीस आला नाही. तुम्ही उपोषण करा नाहीतर दांडी यात्रा करा, आमच्या भ्रष्ट मंत्र्यांना आणि सरकारी बाबूंना काही फरक नाही पडत. अहो ! तुम्ही भुकेने मेलात तरी त्यांना काही फरक नाही पडणार. अहो आता येणारी नवी जनरेशन च्या अंगातहि त्यांच्या बापाने केलेले भ्रष्टाचाराचे जीन्स आपोआपच येताहेत. पुढे जाऊन हीच जनरेशन भ्रष्टाचाराचे रेकोर्ड करणार आहे.

अहो कुठले कुठले डीपार्टमेंट तुम्ही साफ करणार? असे कुठले डीपार्टमेंट राहिले आहे ज्यात भ्रष्टाचार होत नाही? समाजाशी जास्त संबधित असलेले पोलीस खाते, फायर ब्रिगेड, गृह खाते, म्युन्सिपालीटी सर्व भ्रष्टाचाराने पोखरली आहेत.तुम्ही जो उपक्रम चालू केला आहे त्याला नवीन जनरेशन चा सपोर्ट मिळेल ह्यात काही शंकाच नाही पण ते सर्व आपापले काम धंदा सोडून तुमच्या बरोबर दिल्लीला थोडीच येणार आणि तुमच्या बरोबर उपोषणाला थोडीच बसणार आहेत?

अहो अण्णा पहिले म्हणजे तुमचे टायमिंग जरा चुकले. वर्ल्डकप चा जोश नुकताच कुठे शरीरात भिनत होता आणि परत आयपीएल चालू होतेय. क्रिकेट ह्या देशाचा धर्म, जात, पात, श्वास आहे. अहो आयपीएल चे बिगुल वाजले कि तुम्हाला हे सर्व लोक विसरून जातील. फेसबुक, ओर्कुट आणि कट्ट्यावर फक्त धोनी, युवराज, सचिनच्याच चर्चा होतील. कोण हे अण्णा ? छोड मॅच देख असे बोलायला कमी नाही करणार.

तुम्हाला मध्ये फक्त  ५/६ दिवसच होते. तुम्ही आता चुकीच्या वेळेला उपोषणाला बसला आहात. तुम्हाला वाटले असेल कि जास्तीत जास्त चार ते पाच दिवसात तुम्हाला निकाल भेटेल?  अहो तुम्ही कदाचित विसरला असाल कि ह्या देशाचा पंतप्रधान जेव्हा बॉम्बस्फोट होऊन मृत्युमुखी पडतो आणि त्याची केस १५ वर्षे चालते तिथे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाची काय कथा? राष्ट्रपती नंतर पंतप्रधान ह्या देशातले दुसरे महत्वाचे पद. हे पद आपल्या भारताचे पूर्ण जगात प्रतिनिधित्व करते. अश्या पंतप्रधानाच्या मृत्यूची केस कोर्टात १५ वर्षे चालते मग तुम्ही विचार करा कि आपले कायदा आणि गृह खाते किती सक्षम आहे ते.  तरी नशीब त्या श्रीलंकेने त्या प्रभाकरन ला ठार मारले आणि राजीव गांधीची केस बंद झाली नाहीतर ती अजून चालूच राहिली असती.

अहो तुम्ही ज्या लोकपाल साठी हट्ट धरलाय त्यावर निवडून येणारी पण माणसेच असतील हो. उद्या त्यानीच भ्रष्टाचार केला तर तुम्ही परत उपोषणाला बसणार का ? तुम्ही जो हट्ट धरलाय तो योग्यच आहे ह्या लोकपाल समिती मध्ये अर्धी सरकारची आणि अर्धी जनतेची माणसे हवीत आणि ते सुद्धा उच्च क्षिक्षितच हवी ज्यांना समाजाची आणि बऱ्या वाईटाची चांगली जाण असावी. एका बाबतीत तुम्हाला मानले कि तुम्ही दोन बॉल मध्येच  शरद रावांची विकेट काढली. त्यांच्या सारख्या मातब्बर राजकारण्याची विकेट काढली त्यातच तुम्ही अर्धी लढाई जिंकलात.

अहो भ्रष्टाचार आमच्या जन्मापासून ते स्मशानापर्यंत सोबत आहे. जन्माला आल्यावर पहिले नर्स/ आया च्या हाती पैसे टेकवा नाहीतर तुमची आणि तुमची बाळाची ते काळजी बरोबर घेणार नाही, जन्माची नोंद करायची असेल आणि जन्माचा दाखला पाहिजे असेल तर तुम्हाला अधिकाऱ्याला लाच द्यावी लागणार, पुढे बाळ मोठा झाला त्याला शाळेत घालायचे आहे तर शाळेच्या ऐपती प्रमाणे (तुमच्या ऐपती प्रमाणे नाही ) तुम्हाला डोनेशन द्यावे लागणार. जेवढी शाळा मोठी तेवढे डोनेशन जास्त. पुढे कॉलेज ला डोनेशन, त्याला इंजिनिअरिंग ला जायचे असेल, डॉक्टर बनायचे असेल त्या प्रमाणे डोनेशन रूपी लाच द्यावी लागते, पुढे मोटार सायकल/गाडी  घ्यायची असेल तर लायसन्स काढायला लाच द्यायची, गाडीचे रजिस्ट्रेशन करायला लाच द्यायची, पुढे तर जसे जसे सिग्नल तोडेल, कायदे मोडेल तस तसे तोच लाच द्यायला शिकतो. मग नोकरी लागायला लाच, त्यात जर सरकारी नोकरी असेल तर विचारायलाच नको. लाच देणारे हात कधी घ्यायला चालू होतात ते त्याचे बिचाऱ्यालाच समजत नाही,घर घ्यायचे असेल तर लाच द्यावी लागते, पुढे रिटायर्ड झाल्यावर आपल्याच हक्काचे पैसे परत मिळायला लाच द्यावी लागते, हॉस्पिटल मध्ये चांगला बेड मिळण्यासाठी लाच द्यावी लागते, मरताना बॉडी आपल्याच नातेवाईकांच्या हातात मिळायला लाच द्यावी लागते, मेल्यावर स्मशानात लवकर नंबर लागावा ह्या साठी लाच, मेल्यावर जाळायला सुद्धा चिरीमिरी द्यावी लागते, मृत्यूचा दाखला मिळण्यासाठीहि लाच दिल्याशिवाय मिळत नाही. पण अण्णा तुम्ही लढा!! आम्ही सुधारलो नाही तरी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कधी न कधी तुम्ही जिंकलाच.

आता आम्हाला तुमच्या या उपक्रमाला साथ द्यायला दिल्लीला वगैरे यायला येता येणार नाही पण  आम्ही आमच्या परीने फेसबुक, ओर्कुट वगैरे साईट वर किंवा ह्या लिंकवर क्लिक ( http://www.avaaz.org/en/stand_with_anna_hazare_fb/?copy) करून तुम्हाला साथ देऊ. चक्क तुम्हाला शिवसेनाप्रमुखांनी सुद्धा पाठींबा दिला आहे तुम्ही घाबरू नका. भले काही नेते तुमच्या नावाने शंख करूदे. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही जिंकलाच असे समजा. आम्ही तुमच्या नावाने प्रिंट केलेल्या गांधी टोप्या घालू, एकमेकांना लिंक फोरवर्ड करून सबस्क्रायीब करायला सांगू, तुमच्या समर्थनासाठी एक दिवसाचा उपवास करू, जमले तर आयपीएल बघायचे पण टाळू, पण तुम्ही लढा.

अण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है !!!!

तुमचाच पाठीराखा
आशिष सावंत.

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top