भारत पाकिस्तान सेमी फायनल

भारत पाकिस्तान च्या सामन्यावर खूप काही लिहिले गेले आहे. मी लिहायचा विचार केला कारण कालचा दिवस खूप चांगला गेला. त्याच्या आठवणी चांगल्या कोरून राहाव्या म्हणून विचार केला लिहून काढाव्या. आता लहान असलेली जनरेशन किंवा पुढे येणारी जनरेशन नी विचारले कि भारत पाक ची सेमी फायनल कशी होती तर सांगता आली पाहिजे म्हणून लिहून ठेवावीशी वाटतेय. काय भरवसा परत पाक भारत समोर कधी येईल आणि काही दिवसांनी तर तो देशाच्या नकाशावरूनच गायब होण्याची भीती वाटते.

सामना चालू व्हायच्या आधीच २ दिवसापासुन सुट्टी मिळेल कि नाही ह्याची चर्चा चालू होती तेवढ्यात पाक ने त्यांच्या इथे राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली ऐकून आपल्याकडे का नाही झाली ह्याची गरमागरम चर्चा चालू होती. ऑफिस मध्ये काही मित्रांनी सुट्टी टाकली पण, आणि साहेब लोकांनी इमानदारीत मान्य पण केली. माझा एक मित्र म्हणाला कि तू सुट्टी घेऊ नको करून तू सुट्टी घेतली कि आपण हरतो. (आमच्या ऑफिस मध्ये इंटरनेट सर्वाना दिलेले नाही आहे आमच्या ग्रेड ला नाहीच नाही. सुदैवाने एकदा मोठा बॉस खुश असताना त्याच्या कडून परवानगी घेऊन ते चालू केले होते. त्यामुळे मी मटा च्या साईट वर स्कोर बघून सर्व मित्र मैत्रिणींना फटाफट फोरवर्ड करत असतो. अगदीच क्रुशिअल सामना असेल तर रेडीओ वर कॉमेंट्री ऐकत मेल वर लिहून पाठवतो. आमच्या ऑफिस मध्ये क्रिकेट संदर्भातल्या सर्व साईट सर्वर पातळीवरच बंद करून ठेवल्या आहेत. नशिबाने मटा चालू असते म्हणून स्कोर मिळतो.)  तर गेल्या काही महत्वाचे सामन्याची मी रनिंग कॉमेंट्री करून सर्वाना अपडेट देत असतो. काही सामन्याच्या वेळेला माझे महत्वाचे काम असल्यामुळे मी सुट्टीवर होतो आणि त्यादिवशी सामना हरलो होतो. असे दोन तीन वेळा झाले ते सुद्धा त्याच मित्राने दर्शविले. तेव्हापासून काही महत्वाचे सामने असेल तर मी सुट्टी घेतच नाही, भले मला बघायला मिळाले नाही तरी चालेल. अर्थात सुट्टी जर ऑफिशिअल असेल तर तो अपवाद असतोच. त्यामुळे ह्या वर्ल्ड कप चे सामने बघायला तरी मिळाले.

तर मित्राने आठवण करून दिल्यामुळे मी सुट्टी टाकायचा विचारच रद्द केला आणि ऑफिस मध्येच राहायचे ठरवले. ऑफिस मध्ये टीवी चा बंदोबस्त होत होता त्यामुळे काही काळजी नव्हती. सकाळपासून सामन्याचे वेध लागले होते. बस, ट्रेन सगळीकडे तीच चर्चा चालू होती. भारतात एका अभूतपूर्व बंदला सुरुवात होणार होती. असा बंद जो कुठल्याही राजकीय पार्टीने पुकारला नव्हता आणि तरी त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळेल ह्याची खात्री होती, मोठमोठ्या खाजगी ऑफिसेस नी आधीच सुट्टी जाहीर केली होती. काही ऑफिसेस नी अर्धा दिवसाची सुट्टी दिली होती. ज्यांना पूर्ण दिवस होते ते मनातल्या मनात शिव्या घालत कामावर येणार होते. रिक्षा, टॅक्सी, खाजगी वाहने हे रस्त्यावर काढणार नव्हते. सर्व राजकीय नेते रस्त्यावर न उतरता घरात टीवी समोर बसून राहणार होते. मॉल, मल्टीप्लेक्स सगळी रिकामी होणार होती. जिथे टीवी किंवा स्क्रीन चा बंदोबस्त केला होता तिथेच फक्त गर्दी दिसणार होती. रस्ते दोन नंतर ओस पडणार होते, सदानकदा भरलेल्या मुंबईच्या लोकल रिकाम्याच धावणार होत्या. एका अभूतपूर्व बंद ला सुरुवात झाली होती.

ऑफिस मध्ये पोचल्यावर एक सुतकी वातावरण होते. सुट्टी दिली नाही ह्याचे सुतक होते. जसे जसे घड्याळाचे काटे सरकु लागले तस तसे हृदयाच्या धडधडी वाढू लागल्या. एक वाजायच्या आताच जेवणं उरकून घेतली. मटा ची साईट चालू केली आणि बसलो. धोनीने अश्विन ला काढून नेहरा ला घेतले हि बातमी ऐकूनच डोके फिरले म्हटले ह्या माणसाला झालेय काय? सामना जर हातातून गेला तर नक्कीच हा शिव्या खाणार. पण बहुतेक नशीब त्याच्या बाजूने होते. टॉस जिंकून भारताने फलंदाजी घेतली ऐकून आनंद झाला चला सचिन ला सेन्चुरी करायला संधी मिळेल.
india_vs_pakistan_images

पहिले काही ओवर रेडीओ वर ऐकून तर अंगावर काटेच मारायला लागले म्हटले सेहवाग ची अशी फलंदाजी बघायला घरीच राहायला हवे होते. पण काय करणार बॉस समोरच बसून होता स्वत: पण टीवी बघायला जात नव्हता आणि त्यामुळे आम्ही पण जाऊ शकत नव्हतो. शेवटी मनाचा  हिय्या करून आम्ही दोघा तिघांनी टीवी बघायला जाऊ का विचारले आणि परवानगी मिळाली. तसाच धावत जेवायच्या रूम मध्ये जिथे टीवी लावला होता तेथे पळालो. तेथले वातावरण बघून अंगावर सर्रकन काटा मारून गेला, सेहवागने नुकतेच ५ चौकार मारले होते आणि सर्वच नाचत होते. आम्ही पण जाऊन सेलेब्रेशन करायला सुरुवात केली. पुढच्याच ओवर मध्ये सेहवाग ने उपर कट मारला आणि आम्ही एवढा गोंधळ घातला कि विचारायलाच नको,. प्रत्येक बॉलला गोंधळ चालू होता आणि अचानक सेहवाग पायचीत झाला आणि शांतता पसरली. सेहवाग ने रेव्ह्यू घेतला पण त्यात पण आउटच झाला. पुढची सर्व भिस्त आणि सचिन वर राहिली. पण पीच ला चांगला टर्न मिळत होता पाहिजे तसे शॉट बसत नव्हते.

current-pakistan-india-semi-final-photosआणि सामान्यातले दोन महत्वाचे बॉल ११ व्या षटकात टाकले गेले. अजमल च्या गोलंदाजी वर सचिन ला पायचीत दिले गेले आणि सर्व पाकड्यांनी स्टेडियम वर गोंधळ घालायला सुरुवात केली. पाक मध्ये तर नक्कीच फटाके फोडले गेले असतील. सचिन गंभीर कडे आला आणि त्याच्याशी चर्चा केली रिव्यू घ्यायचा कि नाही करण सेहवाग चा रिव्ह्यु फुकट गेला होता. शेवटी सचिनने रिव्ह्यू मागितला आणि स्क्रीन वर दिसायला लागले कि सचिन आउट नाही आहे मग जो भारतीयांनी गोंधळ घातला त्यामध्ये पाकचा आवाज कुठल्या कुठे दाबून गेला. सर्व शांत होत नाही तोपर्यंत त्याच धावसंख्येवर आणि अगदी अजमलच्या पुढच्याच चेंडूवर सचिन थोडा पुढे सरसावला आणि यष्टीरक्षक कामरान अकमलने बेल्स उडविल्या,परत टीवी अंपायर कडे निर्णयासाठी गेला. पण सचिनचा पाय त्याआधी क्रीझमध्ये पोहोचला होता आणि अशाने जल्लोषाला डबल उधान आले. अगदी नाचून, बिचून बोंबा मारत आम्ही गोधळ घातला तेसुद्धा काही सिनिअर बॉस लोक समोर असताना. त्यांनी सुद्धा अगदी मनापासून दाद दिली.

नशीब अंपायर रिव्ह्यू सिस्टीम चालू केली नाहीतर सचिन अशा बाबतीत खूप अनलकी असतो. आउट नसताना त्याला आउट द्यायची अंपायर लोकांना खूप आवड असते साले मोठ्या फुशारकीने सांगत असतील कि मी सचिन ला आउट दिले आहे.  पण कालचा दिवस सचिन चा होता एक नाही दोन नाही तब्बल सहा वेळा त्याला जीवदान भेटले. काल खरच देवच मैदानात फिरत असावा.  जसे ब्रह्मा वर संकट आले कि विष्णू धावत येतो, विष्णू वर आले कि शिवा धावून येतो तसेच क्रिकेटच्या ह्या देवाला सुरक्षा कवच घालून एखादा देवच मैदानावर फिरत असणार. म्हणून तर साधे साधे झेल पाकड्यांच्या हातून सुटत होते.

7829821सेहवाग गेल्यावर भारतीय फलंदाजी पुढे बहरलीच नाही. युवराज तर भोपळा न फोडता परतला होता. गंभीर, कोहली, युवराज, धोनी थोड्या थोड्या वेळाने परतले. पुढे रैनाने चिवटपणे मैदानावर उभा राहून स्कोर २६० वर नेला. घरी यायला बस मध्ये बसलो रस्त्यावर काही मोजके वाहने सोडले तर कोणीही नव्हते. दररोज  कमीतकमी १ ते दीड तास लागतो तिथे काल फक्त ३५ मिनिटात घरी पोचलो. पूर्ण हायवे रिकामा....सातच्या आत घरात. नुकतीच पहिली ओवर टाकून झाली होती. मग टीवी समोर बसून राहिलो ते ४० ओवर संपे पर्यंत उठलोच नाही. नेहरा, हरभजन आणि मुनाफ ची चांगली गोलंदाजी आणि रैना, कोहली ची चांगली फिल्डिंग बघून आनंद झाला. सचिनला मैदान वर बघताना छान वाटत होते. एवढी वर्षे झाली तरी अजून नवीन खेळाडू असल्याप्रमाणे प्रत्येक बॉलवर चांगली फिल्डिंग करतोय, बॉलरला येऊन टिप्स देतोय, कोणाकडून फिल्डिंग चुकली तर हाताच्या खुणा करून सांगतोय. पाक समोर खेळताना ह्या पठ्ठ्याला काय होते काय माहिती आपले जे काही खास शस्त्र, अस्त्र असतील ती सर्व काढून पाकी खेळाडूंवर तुटून पडतो. ह्या माणसाची भूक कधी थांबणार ? देव करो ह्याचा फिटनेस असाच राहो आणि हा अशा हजारो सामने खेळो.

7829812सामन्याचा आनंद लुटण्यासाठी काही राज्यकर्त्यांनी रस्त्यावर मोठे मोठे स्क्रीन लावले होते. आमच्या नाक्यावर सुद्धा अशी स्क्रीन लागली होती आणि तिथून मोठा गोंधळ ऐकायला येत होता म्हणून कपडे करून खाली जाऊन उभा राहिलो रस्त्यावर हि गर्दी पसरली होती. मी पण त्या गर्दीचा एक भाग होऊन गेलो. मित्र एकमेकांना फोन करून बोलवत होते, अरे !घरात काय बघत बसलाय येथे रस्त्यावर ये...काय धमाल येतेय बघ. आता प्रत्येक डॉट बॉल वर आनंद साजरा होत होता. गर्दी मध्ये एक माणूस होता, कोण होता ते दिसला नाही पण आपल्या फाटक्या आवाजात बॉल टाकायच्या आधी एका विचित्र टोन मध्ये 'आता आउट', 'आता आउट' असे ओरडायचा आणि नेमकी त्या वेळेला विकेट पडायची आणि सर्व लोक गोंधळ घालायचे. मला शेवट पर्यंत त्याचा चेहरा दिसला नाही. पण मजा येत होती तो जेव्हा बोलायचं तेव्हा विकेट पडायची जणू काय ह्याला स्वप्नात दिसत होते. तो पण साला पठ्ठ्या प्रत्येक बॉलला बोलायचं नाही. पब्लिक ने सांगितले तरी नाही बोलायचा, जेव्हा त्याच्या मनाला येईल तेव्हाच बोलायचा आणि विकेट काढायचा.

78299097829839खरच असे सामने एकटे बघण्याला काहीच मजा नसते. शेवटी सामना जिंकल्यावर लोकांनी खुर्च्या घेऊन नाचायला सुरुवात केली, फटाक्यांच्या माळा लागल्या, आकाशात रॉकेट सोडली गेली रस्त्यावर दिवाळी साजरी व्हायला सुरुवात झाली. भारत फायनलला गेला ह्याचा आनंद नव्हता तर पाकला चिरडले ह्याचा आनंद सगळ्यात जास्त होता. आईस्क्रीम ची दुकाने, वाईन शॉप वर थोड्याच वेळात गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली. पाकला चिरडण्यात आमच्या सचिनचाच मोठा वाटा होता आणि त्याने हि सांगितले कि पाक विरुद्ध खेळलेले सर्व सामने आणि मिळवलेले विजय हे संस्मरणीय आहेत. धन्यवाद सचिन तुझ्यामुळे आमच्यासाठीहि काही संस्मरणीय आठवणी आहेत.

CONVERSATION

1 comments:

  1. खरच दादा हि मॅच बघण्या सारखी होती.आमच्या घरातले पण कधी न मॅच बघणारे काल आपल्या टीव्ही सिरीयल बाजूला ठेवून मॅच बघत होते आणि हे तर काही च नाही आजीला मॅच समजत नव्हती तरी पण तिने आमच्या सर्वान बरोबर बसून संपूर्ण मॅच बघितली आणि सारखी मला विचारायची कि आता कोण आउट झाल कोण खेळतय एवढच नाही तर बाहेर फटाका फुटला कि ती समजायची कि आता कोण तरी आउट झाल.खरच सचिन मुळे आपण जिंकलो.आता वर्ल्ड कप पण आपलाच आहे.

    ReplyDelete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top