सुटलो बुवा एकदा !!!

चला आनंदाची बातमी आहे...अण्णा उपोषण सोडताहेत.गेले १० दिवस ब्लॉग लिहायला बसतोय..पण अण्णांच्या उपोषणामुळे काही सुचेनासेच झाले होते. देशप्रेम, देशभक्ती ह्याशिवाय दुसरे काही सुचतच नव्हते. मनात खूप विचार येताहेत, लिहावेसे वाटतेय पण काही उतरताच नव्हते. ब्लॉग पण सुना सुना झाला होता. अण्णांवर, त्यांच्या उपोषणावर लिहायचे होते पण काही सुचतच नव्हते. हा तिढा कधी सुटतोय ह्याची एवढी काळजी लागली होती जेवढी मनमोहन सिंग आणि पूर्ण काँग्रेस पण लागली नसेल. शेवटी काल संसदेत झालेल्या चर्चेवर तोडगा निघेल असे वाटत होते...आणि टीम अण्णाला जे पाहिजे होते ते झालेच.

अण्णांनी पण आवाज दिला अजून लढाई पूर्ण झाली नाही पण सर्वानी आनंद व्यक्त करायला काही हरकत नाही. लगेचच अण्णांचा आदेश मानून ब्लॉग लिहायला घेतला. गेले दहा/बारा दिवस मलाच उपोषणाला बसल्या सारखे वाटत होते. काँग्रेस आणि मनमोहन टीमच्या वागण्यावरून तर वाटत होते की त्यांना अण्णांच्या उपोषणात काहीच रस नाही. मिटींग्स काय घेताहेत, इफ्तार पार्ट्या काय करताहेत. तिथे एक ७२ वर्षाचा म्हातारा देशासाठी १० दिवस उपोषणाला बसलाय आणि तिथे हे सर्व मंत्री लोक एकमेकांना मिठ्या काय मारताहेत, एकमेकांना भरवताहेत काय? खिदळताहेत काय? मुर्ख साले !!!! एक जात अक्कलशून्य !!! कधी सुधारायचे नाहीत.

लहानपणी गांधीजींना कधी समजून घेतलेच नाही. पण पुढे पुढे जसे वाचन वाढत गेले तसे त्यांनी दिलेल्या अहिंसा आणि सत्याग्रह ह्या दोन शस्त्रांची ताकत समजू लागली. फक्त उपोषण आणि सत्याग्रहच्या जोरावर इंग्रजांसारख्या शिस्तप्रिय आणि कडक साम्राज्याला त्यांनी नामोहरम केले आणि त्यांना देश सोडवा लागला. ह्यातच ह्या शस्त्रांची महती समजते. गांधीजींच्या तश्या काही निगेटिव्ह बाजू पण होत्या त्या वर आता वाद नाही करायचा आहे. प्रत्येक माणसाच्या चांगल्या वाईट बाजू असणारच.

आज भ्रष्टाचाराच्या चक्कीत पिसालेल्या देशाला परत अण्णांनी एक नवी संजीवनी दिली. खूप दिवस वाटत होते की लवकरच देशात काहीतरी बदल घडणार आहे. खूप अती होत होते, नक्कीच अशी कुठली तरी गोष्ट घडणार आणि देशाचे तरुण बाहेर पडणार ह्याची मनात शंका वाटत होती. जगाच्या इतिहासात बघितले असेल तर समजते की जेव्हा जेव्हा जनतेमध्ये असंतोष वाढतो तेव्हा तेव्हा अशी एक गोष्ट घडते की जेणेकरून पूर्ण साम्राज्य उखडले जाते, पूर्ण असंतोष बाहेर पडतो. मग ती १८५७ च्या स्वतंत्र लढ्याची क्रांती असो, ट्युनिशिया देशातील क्रांती असो, इजिप्तची क्रांती असो किंवा लिबियातील गद्दाफी साम्राज्याचा पाडाव असो. ह्या सगळ्या गोष्टी जगातल्या काही मोठ्या क्रांती मध्ये गणल्या जातात. काही मोठ्या क्रांती तर रातोरात झाल्या आहेत. फक्त एक ठिणगीचा पडायचा अवकाश की वणवा पेटायला तयारच असतो. तीच ठिणगी पाडण्याचे काम अण्णांनी आणि त्यांच्या टीम ने केले आहे. असंतोषाचा लाव्हा बाहेर येण्याची वाट बघत होता त्याला अण्णांनी रस्ता करून दिला. ह्या क्रांती चे एक वैशिष्ट्य म्हणजे ही निशस्त्र क्रांती होती. 

आतापर्यंत झालेल्या अनेक क्रांती ह्या सशस्त्र होत्या. पण निशस्त्र क्रांती होण्याचे उदाहरण हे एकमेव असेल आणि ती फक्त भारतातच घडू शकते. ह्यातच गांधीगिरीचा विजय आहे. अण्णांच्या आंदोलनाला प्रसिद्धी आणि यश मिळण्यात मिडिया, सोशल नेटवर्किंग, आणि तरुण समाजाचा मोठा हातभार होता. तरुण जेव्हा जेव्हा क्रांती साठी रस्त्यावर उतरतो तेव्हा तेव्हा मोठ्या क्रांती होतातच. कितीतरी मोठ्या प्रभात फेऱ्या निघत होत्या. रेल्वे स्टेशनवर पब्लिक जमत होते. आझाद मैदान, रामलीला मैदान भरून वाहत होते. हे सगळे एका एसेमेस आणि तोंडावाटे होणाऱ्या पब्लिसिटी वरच भेटत होते. त्यांना कोणी घरोघरी जाऊन बोलवत नव्हते किंवा मंत्रांच्या सभेला जसे पैसे देऊन बोलावले जाते तसे कोणी बोलावले नव्हते. हे सर्व आपल्या मनाने आले होते. प्रत्येकाला वाटत होते. अभी नही तो कभी नही !!!

अण्णांनी आतापर्यंत कितीतरी उपोषण केली असतील पण ती महाराष्ट्र पुरती मर्यादित होती. मी तर त्यांच्याकडे कधी लक्ष ही दिले नव्हते. पण ह्या वेळेला गोष्ट वेगळी होती. ह्यावेळेच्या उपोषणामागे अरविंद आणि किरण बेदीचे सुपीक डोके होते. तसा अरविंद केजरीवाल हुशार माणूस पण जरा थोडा धूर्त वाटतो. पण ठीक आहे अगदीच दहा लांडग्यांच्या हाती मरण्यापेक्षा एकाच्या हातून मेलेले काय वाईट.

असो !! शेवट गोड व्हावा हीच इच्छा. देव करो लोकपालचा कायदा अस्तित्वात येवो आणि सर्व मंत्र्यांच्या उधळपट्टीला चाप बसो.




CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top