अखेरचा हा तुला दंडवत !!


बाळासाहेबांनी हे काय केले? का अचानक सोडून गेले? दिवाळी पासूनचं कसे तरी वाटत होते..मन उदास होते होते. पण काल साहेबांची प्रकृती सुधारते ऐकून बरे वाटले होते. आणि आज अचानक ते सोडून गेले. खूप कसेसेच झाले..शब्दात न सांगता येण्यासारखे. दसऱ्याच्या भाषणात जेव्हा त्यांनी जय महाराष्ट्र केला तेव्हाच मनात शंकेची पाल चूकचुकली होती. कधी न कधी ते जाणार होते पण मन मानायला तयार नव्हते. तो जय महाराष्ट्र त्यांचा शेवटचा जय महाराष्ट्र असेल असे वाटले नव्हते.


बाळासाहेब!!!! कोण आहेत ते? का त्यांच्याबद्दल एवढी आस्था वाटावी. काय केले त्यांनी असे की त्यांची काळजी वाटाला वी. त्यांची आठवण यावी? ह्या प्रश्नांची उत्तरे आयुष्यभर सापडणार नाहीत? खरच खूप वाईट वाटतेय. घरातकोणी जवळचा नातेवाईक गेल्यासारखे. मन खूप बेचैन झाले आहे. खूप कोंडमारा होतोय. जीव अडकल्यासारखा झालाय. लवकर निचरा नाही झाला तर हालत खराब होईल.....पण निचरा होणेहि शक्य नाही. खरचं बाळासाहेब गेलेत. एवढे दिवस फक्त अफवा येत होत्या. आज खरचं साहेब गेलेत, तेच ते शिवसेनाप्रमुख, तेच ते व्यंगचित्रकार, तेच ते फाटक्या तोंडचे, तेच ते निर्भीड राजकारणी, तेच ते जहाल हिंदुत्ववादी, तेच ते आयुष्यभर पाकड्यांना शिव्या घालत आले....तेच ते....तेच ते...आज सोडून गेलेते. अजून हि विश्वास नाही बसत आहे. सात वाजल्यापासून सर्व टीव्ही ची चानेल्स बघून झाली पण कोणीच सांगत नाही आहे की बाळासाहेबांची प्रकृती आता स्थिर आहे. सगळेच सांगताहेत की बाळासाहेब गेलेत. सर्वाना सोडून...आता पर्यंत एकच असा राजकारणी आहे...ज्याच्यासाठी मला खरच रडावेसे वाटतेय. अगदी धाय मोकलून रडावेसे वाटतेय. माझ्यासाठी ते पहिले राजकारणी असतील आणि कदाचित शेवटचे राजकारणी ज्यांचासाठी माझ्या डोळ्यात अश्रू येतील. त्यांचासारखे महामानव एकदाच जन्माला येतात. शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर नंतर ते एकच असे नेते असतील ज्यांच्या जाण्यामुळे समाज खऱ्या अर्थाने अनाथ झाला असेल. खरच पोरके झाल्यासारखे वाटतेय. अगदी रिते रिते झालाय. प्रवासातून येताना काही तरी महत्वाची गोष्ट मागे गाडीत राहून गेली आणि ती परत मिळण्याची शेवटची आशा हि संपल्यावर जसे वाटते तसेच काहीतरी आता वाटतेय. उद्या त्यांचे ह्या पृथ्वीतलावरचे उरले सुरले अस्तित्वही नष्ट होणार. नाही सहन होत आहे हि कल्पना.


चार / पाच तास टीव्ही बघून शेवटी चादर ओढून झोपायला घेतले तरी झोप येत नव्हती. बेचैनी वाढत होती...कोणाशी तरी बोलावेसे वाटत होते. मन मोकळे करावेसे वाटत होते. म्हणून उठलो आणि रात्री साडे बारा वाजता लिहायला बसलोय. मी असे कुठल्या राजकारणी नेत्यासाठी एवढा बैचेन होईन असे कधी वाटले नव्हते...पण इथेच बाळासाहेबांचे प्रेम आहे. बाळ नावाचा बाप माणूस होता. मी राज ठाकरेच्या काय भावना/ मनस्थिती असेल ते समजू शकतो, शिवराय गेल्यावर मावळ्यांची काय मनस्थिती झाली असेल ती मी आता अनुभवतोय. स्वराज्य नसेल तरी बाळासाहेब राजे होते, सम्राट होते. देव माणूस होते.

देवांचे बोललेले शब्द जसे कधी बदलत नसतात. तसे बाळासाहेबांचे शब्द होते. मला नाही आठवत ते कधी असे बोलले असतील कि मी हे वाक्य कधी बोललोच नाही किंवा माझ्या शब्दांचा विपर्यास केला गेला आहे. ते जे काही बोलले त्याबद्दल कधी त्यांना माफी मागावी लागली नाही, त्यांना कधी आपले शब्द मागे घ्यावे लागले नाही. निधड्या छातीचे वाघ होते ते. एकदा डरकाळी फोडली कि फोडलीच. तो मी नव्हेच असे कधी त्यांच्या बाबतीत झालेच नाही. पोलीस, कायदा, सरकार कश्या कश्याला ते घाबरले नाहीत. किडकिडीत बांध्याच्या शरीरात अपार मानसिक ताकत होती. तीच ताकत त्यांनी मराठी माणसात ओतली. बाबरी मशीद पाडल्यावर जेव्हा मशीद कोणी पडली ह्याची चौकशी चालू झाली आणि भाजपचे सर्व नेते मूक गिळून बसले होते.. तेव्हा हा ढाण्या वाघ बांद्र्यात बसून डरकाळी फोडत होता. जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे..गर्व आहे. "गर्व से कहो हम हिंदू है" हे त्यांचे वाक्य त्यांनी सार्थ करून दाखवले. असे होते माझे बाळासाहेब.

शिवसेना उभी करायसाठी घेतलेले त्यांनी मेहनत, रेषांवरचे त्यांचे प्रभुत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व, मराठी माणसासाठी त्यांची लढाई, कधीही लिहून न आणलेली खणखणीत आवाजातली त्यांची भाषणे, एक उत्कृत्ष्ट वक्ता, एक प्रेमळ नेता, एक श्रेष्ठ हिंदू नेता हे सगळे सगळे कायमचे संपले आहे. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. तुमच्या दारी आलेला कधीच रिकाम्या हाताने परत गेला नसेल अगदी यमराजाला पण तुम्ही दोन दिवस थांबवून ठेवले पण जाता जाता त्याची इच्छा पूर्ण केली. आज देशातल्या कोणी नेत्याने जर मराठी किंवा हिंदू वर आरोप केले तर आपल्या अग्रलेखातून त्याला सडेतोड उत्तर देणारे कोण नसेल. पाकिस्तानच्या नावाने शंख करणारा कोणी नसेल. आता बीसीसीआय न भिता पाकिस्तान बरोबर सामने खेळवू शकेल आणि आम्ही मुर्दाडा सारखे बघत राहू. आमच्या चेतना जागवणारा, रक्त उसळवणारा आमचा लाडका नेता नसेल. 


एक भयाण पोकळी निर्माण झालीय आणि कोणीतरी जोर जोरात पाय पकडून त्या पोकळीत खेचतय....हतबल झालोय... शरीराची आणि मनाची ताकत दोन्हीही संपत चालल्या आहेत. बाळासाहेब...तुम्हीच बाहेर काढू शकता होता ह्यातून आणि तुम्हीच सोडून गेलात वाऱ्यावर...का ?? हा हक्क तुम्हाला कोणी दिला? आता खिडकीतून हात कोण दाखवेल तुमच्या शिवसैनिकांना? आमच्या हक्कासाठी कोन नडेल?  आयुष्यात एक खंत नक्कीच राहील की तुम्हाला प्रत्यक्ष्यात कधी पाहू शकलो नाही. माझ्या पुढच्या पिढीला अभिमानाने सांगू शकणार नाही की मी शिवरायांसारखा एका महान नेत्याला बघू शकलो नाही. 

आयुष्यभर हि खंत राहील.....आयुष्यातली हि पोकळी कधीच भरणार नाही. एक नक्की की स्वर्गातील इंद्रदेव ही घाबरला असेल. पृथ्वीवरचा महान नेता....महाराष्ट्राचा सम्राट येतोय. तिथेही तुम्ही भगवा फडकवाल ह्यात शंका नाही. महादेव तुमच्या आत्म्याला शांती देवो. जय महाराष्ट्र !!!!


CONVERSATION

1 comments:

  1. यशोधन तुझा ब्लॉग वाचला चांगला वाटला..
    follow पण करतोय.

    ReplyDelete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top