नोंदी- दालराईस !!

मित्रांसोबत हॉटेल मध्ये बसलो होतो …पंजाबी पनीर सब्जी आणि रोटी खाऊन झाल्यावर मित्राने दालराईस ची ऑर्डर केली आणि दालराईस बघून मला माझ्या भूतकाळातील एक आठवण फिल्मी स्टाईल फ्लॅशबॅक मध्ये घेऊन गेली. 

आम्ही शाळेत किंवा कॉलेजच्या सुरवातीला असतानाची गोष्ट असेल आता वर्ष नक्की आठवत नाही. आमच्या एका जिगरी मित्राची गर्लफ्रेंड होती. आमच्या ग्रुप मधला तो एकच प्रेमवीर त्यामुळे त्या दोघांना गुपचूप भेटवण्यात आम्हाला काय आनंद मिळायचा तो असा शब्दात सांगणे अशक्यच. खूप भयंकर अश्या दुश्मन समाजाच्या विरुद्ध जाउन प्रेम करणाऱ्या प्रेमी कबुतरांना मिळवल्याचे अलौकिक समाधान आमच्या चार पाच मित्रमंडळीच्या चेहऱ्यावर असायचे. 

कुठे संधी मिळाली कि आम्ही त्या लैला-मजनूचा मिलाप घडवून आणण्यास एका पायावर उभे असयचो. पण हा जालीम जमाना पण अश्या भेटण्याच्या ठिकाणावर कावळ्यासारखा तिरकी नजर ठेवून असयचा. आजच्या सारखे मुक्त वातावरण अजून आले नव्हते. एखादा मुलगा त्याच्या वर्गातल्या मुलीशी बोलताना जरी दिसला तरी मुलीचे आई बाप आपल्या पोरीला तंबी द्यायचे. आमचा हा मजनू त्या लैला पेक्षा दिसायला ४ पटीने तरी चांगला होता. पण त्या जमान्यात अफेयर होणे म्हणजे मोठे कर्तुत्व होते त्यामुळे त्या दोघांना आमच्या ग्रुप मध्ये वरचे स्थान होते. 

तर ह्या अश्या जालीम जमान्या पासून मुक्तता मिळावी म्हणून आम्ही एके दिवशी नरिमन पॉइंटला जायचे ठरवले. कारण तिथे आमच्या परिसरातील कोणी येणे हे जवळपास अशक्य आणि नरिमन पॉइंटचा 'समाज' त्यातला त्यात इथल्या समाजापेक्षा मोकळ्या मनाचा होता असा आमचा कयास. 

मग आम्ही ह्या प्रेमी युगुलांना तयार केले...अर्थातच मुलीला मनवण्यात अख्खे दोन दिवस गेले आणि ती कशीबशी तयार झाली....त्यांना प्रायव्हसी देऊन आम्ही फॅशनस्ट्रीट ला जाऊन खरेदी करायचे ठरले. तारीख ठरली मग वेळ ठरली...कसे कसे भेटायचे कुठून कुठे जायचे सगळे गुप्त कारस्थान रचले गेले आणि मग आम्ही मोठ्या लढाईची वेळ कधी येते ह्याची आतुरतेने वाट बघत राहिलो.

पूर्णपणे गुप्त मोहिमेवर असल्यासारखे आम्ही ५ जणांनी 3 वेगवेगळ्या स्टॉप वरून एकच बस पकडली........ आज मोबाईल असून सुधा तेवढा समन्वय आमच्यात कधी होत नाही. पण मोबाईल नसलेल्या त्या जमान्यात ते कसे काय आम्ही शक्य केले ह्याचे आजही राहून राहून नवल वाटते.......तर आम्ही एकच बस पकडून वेगवेगळ्या सीट वर बसून घरापासून ते ठाणे स्टेशन पर्यंत प्रवास केला. नेमका आमच्या बसमध्ये त्या मुलीचा मामा जो त्या बसचा कंडक्टरसुद्धा होता तो भेटला. तो मामा आमच्या मजनूला पण ओळखत होता. पण नेमके पुढच्या स्टॉपवर भरत जाणाऱ्या गर्दी मुळे त्याच्या नजरेतून तो सुटला.....नाही तर! जरा जरी शंका यायची खोटी की त्याने मैत्रिणीला खाली उतरवून घरी पाठवले असते. 

पुढे आम्ही रेल्वे स्टेशन मध्ये तिकीट काढून तिला लेडीज डब्ब्यात बसवले. हो! उगाचच कोणी बघू नये म्हणून. मुंबईला तेव्हाच्या व्हीटी स्टेशन वर उतरून आम्ही एकत्र आलो. दुपारचे १२ वाजून गेले होते...म्हणून आधी पोटपूजा करायचे ठरवले. हॉटेल शोधत शोधत आम्ही चर्चगेटला जाणारा रस्ता विचारात विचारात पुढे जायला लागलो. 

मध्ये एक इराणी का उडपी हॉटेल आले...आमच्या ग्रुप मधल्या मैत्रिणीने तिथे खावूया असा विनंती वजा आदेश केला. आम्ही आत शिरून कोपरा बघून पाचही जण बसलो. नेहमीप्रमाणे अडाण्यासारख्या इडलीवडा, मेदुवडा, मसाला डोसा अश्या ऑर्डर दिल्या..... 

ऑर्डर घेणाऱ्या वेटर ने सर्व ऑर्डर मन लावून ऐकून घेतल्या....आम्हा सर्वांना एकदा नखशिखांत बघितले. त्याने समाधान झाले नाही म्हणून परत पाचही जणांच्या चेहऱ्यावरून परत नजर फिरवली.…आणि ज्या मख्खपणे त्याने ऑर्डर ऐकून घेतली होती.…तितक्याच निर्विकार मख्खपणाने त्याने ह्या ऑर्डर मिळणार नाही असे सांगितले. आम्ही पण चक्रावून… ‘का नाही मिळणार?’ असे विचारले.... तर त्याने आम्हाला रेल्वे स्टेशन वर असणाऱ्या गोल घड्याळासारख्या हॉटेलच्या भिंतीवरच्या गोल घड्याळाकड़े बोट दाखवले. आम्ही न समजून पुन्हा विचारले तेव्हा मोठ्या मुश्किलीने त्याने तोंड उघडून सांगितले. 

‘आता लंच टायीम आहे...नाश्ता आइटम नहीं मिलेगा’ 

आमच्या टिम्ब टिम्ब कपाळात.....साल्याने अवघड जागेचे दुखणे करून टाकले. एक तर आम्हीं हॉटेलात वर नमूद केलेल्या पदार्थांशिवाय कधी काही खाल्ले नव्हते. अगदी लंच थाळी सुद्धा नाही. त्यात जेवणाची ऑर्डर काय करायचे ते आमच्या पैकी एकाला पण माहित नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे आमचे महिन्याभराचे पॉकेटमनी जेव्हढे असेल तेव्हढे तर तिथल्या एकेक पदार्थाची किंमत होती. तिसरी गोष्ट म्हणजे आमच्या त्या मैत्रिणीसमोर अडाणीपणाचे दर्शन होऊन इज्जत जाणार. 

शेवटचा उपाय म्हणजे इथून उठून जाणे पण त्यामुळे तर आमच्या सर्व मित्रांच्या इज्जतीचा तिच्या समोर फालुदा होणार. ती म्हणणार साल्या कुठल्या भिकारी मित्रांबरोबर पाला पडलाय. 

वेटर कडे 5 मिनिटाचा टाईम मागितला....

आयला!! कैचीत सापडणे ह्या वाक्यप्रचारचा अर्थ आम्हाला त्या दिवशी खऱ्या अर्थाने समजला. पण आमचा मजनू इथे देवदूतासारखा धावून आला. तो त्या वेळी भल्या पहाटे दुधाची आणि वृत्तपत्रांची एजन्सी घेऊन सकाळी दूध आणि वर्तमानपत्र टाकायला जायचा. त्यामुळे आमच्या पेक्षा थोडे जास्त पैसे नेहमी त्याच्या खिशात असयाचे आणि आज पण इतरांपेक्षा थोडे जास्त पैसे घेऊन आला होता. त्याने खुणेने आम्हाला खिशातले पैसे काढून टेबलाखालून दाखवले आणि आम्हा सर्वांमध्ये न खातां पिता एक वेगळेच चैतन्य आले. एक प्रश्न सुटला होता.....पण पुढे ऑर्डर काय करायची हा मोठा गहन प्रश्न होताच॥.....त्यात एका मित्राने मला काही जास्त भूक नाहीये मी तुमच्यामधलेच थोडे थोडे खाईन असे सांगून आपले हात झटकून घेतले. 

‘एक तीर मध्ये दोन निशाण मारले’ वगैरे सारखा फिल त्याला आला होता. एक तर मजनूचे पैसे वाचवले आणि ऑर्डर देताना होणाऱ्या फजिती पासून सुटका. 

मजनू सकट आम्हाला कोणालाच काही माहिती नव्हते. वेटर पण साला जाणून बुजून आमच्या टेबलाच्या आजूबाजूलाच घुटमळत होता जणू काय आम्ही त्याचे टेबल खुर्च्या पळवून नेणार होतो आणि तो मोठा दीडशहाणा हिंदी सिनेमातल्या नटासारखा आम्हांवर झडप टाकून पकडणार होता आणि गल्ल्यावर बसलेला मालक त्याबदल्यात त्याची पाठ थोपटून बक्षीस देणार होता.....

इडियट लेकाचा साला!!! 

इथे ती मैत्रीण आमच्या मदतीला धावून आली. तिने मेनू कार्ड हातात घेऊन पदार्थांची यादी वाचली आणि एका पदार्थावर बोट ठेवून तुम्ही 'डालराईस' खाणार काय? 

आता परत दोन प्रश्न.... हा काय आणि कसा खायचा प्रकार आहे? आणि सगळ्यांना दालराईस घेतले तर मजनुकडे तेवढे पैसे आहेत काय?  दाल चा उच्चार पण तिने 'डाल' असा केला होता त्यामुळे आम्हाला ह्या पदार्थाचे नाव ऐकताना काहीतरी फॉरेनची डिशचे एखादे नाव घेतल्यासारखे वाटले होते.

मगासचाच मित्र परत.... ‘मला जास्त भूक नाहीये....तुम्ही जे खाणार त्यातले थोडे थोडे मी खाईन’ 

आम्ही रागाने त्याच्याकडे बघून म्हणालों, ‘बाहेर भेट साल्या तुला थोडे थोडे धपाटे खायला घालतो.’ अर्थातच मनातल्या मनात पुट्पुटलो. तो पण दीडशहाणा आमच्याकडे मुद्दाम नजर देऊन बघत नव्हता. 

त्या मैत्रिणीनेचं त्याला झापलं... ‘गप रे!! काय भूक नाही....भूक नाही. आता तर बाहेर खूप भूक लागलीय म्हणून सांगत होतास. ह्यांच्या पैकी तुला कोण खायला देणार तरी आहे का?’ 

दूसरा मित्र मुद्दाम म्हणाला, ‘मला तर जाम भूक लागलीय.... मी नाही कोणाला शेअर करणार’ तशी सगळ्यांनी त्याची री ओढली. आता त्या मित्रावर उपाशी राहायची पाळी आली तसा तो लाईनीवर येऊन म्हणाला, ‘हां!! ठीक आहे.... जे तुम्ही घेणार आहे तेच मला पण एक प्लेट घ्या’ 

साला !! गिरा तो भी तंगड़ी ऊपर… 

पण आमच्या पैकी कोणी कन्फर्म केले नव्हते. जोपर्यत त्या डिशची किंमत किती आहे ते समजत नव्हते तो पर्यंत कन्फर्म करणे आमच्या साठी महापाप होते. 

आम्ही मोठ्या आशेने मजनू कडे बघितले तर त्याचे लक्ष कुठे भलतीकडेच. आधी रागच आला ...साला आमच्याकडे बघत का नाहीये ....पण नंतर समजले की तो मोठ्या मुश्किलीने मैत्रिणीने बोट ठेवलेल्या मेनूकार्ड वर त्या पदार्थाची किंमत दिसते का ते बघत होता. 

त्याचे ते एकट्याने गड लढवणे पाहून आमच्या मित्रांच्या डोळ्यात पाणी येणे फक्त बाकी होते. त्याला अजून वेळ मिळावा म्हणून आम्ही उगाचच आपले एकमेकांना विचारत होतो 'तुला चालेल ना रे?'...... 'पूर्ण एक प्लेट एकाला जास्त होईल का रे?' वगैरे फालतू प्रश्न विचारून वेळकाढूपणा करत होतो. 

आमचे ठरतेय हे पाहून तिने मजनू कडे बघून प्रेमाने विचारले, 'तू काय खाणार रे?' आणि नेमका त्याचवेळेला तिने त्या मेनू कार्ड वरचे बोट उचलले. आणि आमच्या मजनूला त्या पदार्थाची किमंत समजली. किंमत बघून त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच चकाकी आली. ती त्या मैत्रिणीला पण समजली आणि तिने विचारले, ‘काय रे? मध्येच का एवढा खुश झालायास?’ 

त्याने, ‘काही नाही गं !! तुझ्या सोबत खायला मिळणार म्हणून जाम खुश झालोय.’ असे फेकुन दिले. 

मैत्रीण उगाचच लाजल्या सारखी होऊन तिने मान खाली घातली. 

आणि तीच वेळ साधून मजनूने आम्हांला मान उडवून ही डिश घेऊ शकता असा सिग्नल दिला आणि आम्ही त्याच तत्परतेने लगेच दालराईस साठी ऑर्डर कन्फर्म केल्या. 

तिनेच त्या वेटरला बोलावून घेतले आणि ५ दालराईस ची ऑर्डर दिली. डालराईसची ऑर्डर ऐकून वेटर ने आम्हा सगळ्यांकडे बघून एक उपहासगर्भित असे कुत्सित हास्य केले. एकतर त्याला आम्ही काही ऑर्डर करू ह्याची सुतराम गारंटी नव्हती आणि केलीच तरी सर्वात स्वस्त पदार्थाची ऑर्डर करू ह्याची खात्री होती. 

आणि त्याने आमचे भाव म्हणा किंवा लायकी म्हणा बरोबर ओळखली होती...ह्याचा गर्व त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आम्ही त्याला दुर्लक्षित करण्याशिवाय आता त्यावेळेला काहीच करू शकत नव्हतो.… त्याने केलेल्या ‘और कुचं लोगे क्या?’ ह्या प्रश्नावर आम्ही खाली मान घालून नंतर सांगतो असे उत्तर देऊन त्याला त्या वेळेपुरता कटवला. 

आता पुढचा प्रश्न होता...हे डाल राइस काय प्रकार आहे...आणि तो कसा असेल? कसा खायचा असेल… अगदीच न खाण्यासारखं असेल तर बाहेर गेल्यावर गपचूप मैत्रिणीच्या नकळत एक एक वडापाव खाऊ असे आमचे हळू आवाजात ठरत होते. 

तेवढ्यात तो वेटर दालराईस घेऊन आला आणि डिश आमच्या समोर आणून ठेवल्या. 

“आयला! हे तर आपले 'वरणभात'” 

“अर...रे !!! हि तर डाळ भात...” 

असे आम्ही सर्व जण जवळ जवळ किंचाळलोच अर्थात मनातल्या मनात. बोलून दाखवून अर्थातच अडाणीपानाचे प्रदर्शन करायचे नव्हते आम्हाला. तेवढे सुज्ञ तर नक्कीच होतो. 

चेहऱ्यावर एक अद्वितीय तेज झळकू लागले. 'सुटलो एकदाचा' असे एकमेकांकडे बघून कटाक्ष टाकले आणि वरणभातावर आय मीन 'डाल राईस' वर तुटून पडलो. 

बजेट मध्ये होते म्हणून एक एक वॅनिला आईसक्रीम पण खाल्ले अर्थातच हि मैत्रिणीची डिमांड होती...अन्यथा आमच्यासाठी ते सुपर लक्झुरियस प्रकारात मोडणारे होते...आईसक्रीम काय खायची वस्तू आहे का? नुसताच बर्फ तो....त्यापेक्षा आपला १ रुपयाचा चोखून खायचा पेप्सीकोला चांगला ह्या प्रकारात मोडणारे आम्ही सारे होतो. 

उठताना आम्ही सारे मुद्दाम ५ रुपये वेटरला टीप ठेवून उठलो...वो भी क्या याद करेगा…किस अमिरजादेसे पाला पडा था.... 

पुढे आम्ही आमची ती ‘गुप्त मिशन’ यशस्वीरीत्या पूर्ण करून घरी परतलो....पण दालराईस आयुष्यभर लक्षात राहिली....आणि पुढे आमची फेव्हरीट डिश पण झाली. 

लैला-मजनुचे पुढे काय झाले हे सांगणे न लगे.... 

सांगू म्हणताय.... 

पुढे दोघांचे वेगवेगळ्या पार्टनर सोबत लग्न झाले.... लैलाचे लग्न झालेल्या मुलाबरोबर एकदा तिला रस्त्यावरच त्याच्या हाताचा मार खाताना बघितले होते...त्यामुळे त्या दोघांचे कसे काय चालले ह्याचा अंदाज आला होता....कदाचित नवरा बायकोचे प्रेम हि असेल ते.....आपण कशाला वाईट चिंता कोणासाठी 

मजनू प्रेमभंगामुळे खूप वाईट अवस्थेतून कसा बसा सावरत दोन तीन वर्षांनी पुनः मार्गाला लागला...आता तो आपल्या बायको आणि दोन मुलांबरोबर चांगला संसारात रमलाय. 

असो !!! त्या मैत्रिणीमुळे आमचे नाक कापता कापता वाचले होते आणि तिने आम्हाला हॉटेलात नाष्ट्याशिवाय अजून काय मिळते ह्याची ओळख करून दिली होती. आयुष्यातले त्यावेळेचे सोनेरी क्षण आम्ही एकत्र सेलिब्रेट करून आमच्या साठी यादगार केले होते. 

आणि अर्थातच 'दालराईस' आमच्या आयुष्यभराची सोबती झाली.....

===(art inspired by Sachin Khamkar's blog)

CONVERSATION

2 comments:

 1. लहान सहान प्रसंगातील सूक्ष्म बाबींचे सविस्तर वर्णन करण्याची व तो प्रसंग वाचकांच्या डोळ्यासमोर हुबेहूब उभा करण्याची, इतकेच नव्हे तर त्यावेळेचा भावनाकल्लोळ शब्दांतून अचूक पकडण्याची तुझी शैली अतिशय उत्तम आहे...
  असाच लिहित रहा 👍

  ReplyDelete
  Replies
  1. Dhanyavad Yatin...vachun comment dilya baddal

   Delete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top