शानदार!! जबरदस्त!!! ज़िंदाबाद!!!

शानदार!! जबरदस्त!!! ज़िंदाबाद!!!

असेच काहीतरी वाटेल तुम्हाला ‘माँझी- धि माउंटेन मॅन’ चित्रपट बघून. एक साधीशी स्टोरी घेऊन तुम्हाला जर नवाजउद्दीन सिद्दीक्की सारखा ऍक्टर (हीरो नाही) आणि केतन मेहता सरखा डायरेक्टर भेटला असेल तर तुम्ही एक अप्रतिम कलाकृती सादर करू शकता. हयाचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘माँझी- धि माउंटेन मॅन’.

सत्यकथेवर आधारित चित्रपट बनवताना खूप काही गोष्टीचे तारतम्य बाळगावे लागते. सत्यकथेला फाटा न देता त्यात रोमांस, गरीबी, कॉमेडी टाकत चित्रपट सजवणे तसे म्हटले तर मुश्कील असते. पण लेखकांच्या टीमने आणि डाइरेक्टर ने ते चांगले हाताळले आहे आणि आपल्या समोर एक व्यवस्थित बांधलेली कलाकृती सादर केली आहे.

राधिका आपटेने सुद्धा तिला मिळालेल्या संधीचे चांगले सोने केले आहे. तिचा अभिनय पण अप्रतिम झाला आहे. तिचे मॉडर्न लुक बघायची सवय झालेली असून सुद्धा तिचा गावरान लुक चित्रपट संपल्यावर ही लक्षात राहतो.

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अथांग प्रेमं असले की पर्वत ही माणसा पुढे फिका पडतो हेच ह्या चित्रपटात दाखवले आहे. मग त्यात येणारे नैसर्गिक अडथळे, मानवी अडथळे, शारीरिक अडथळे सुद्धा मनुष्य लीलया पार करून जाऊ शकतो. स्वातंत्र्यनंतर सुद्धा असलेली जमिनदारी, सावकारी कर्जात अडकलेले गरीब शेतकरी, अन्याय सहन करणारे गरीब मजूर, स्पृश्य अस्पृश्य भेदाभेद, त्यातून होणारे अन्याय, अन्यायावरून झालेला नक्षलवादाचा जन्म, सूड ह्या गोष्टी खूप कमी वेळात दिग्दर्शकाच्या टीम ने चित्रपटात मांडल्या आहेत.

ह्या सर्व गोष्टी घडत असताना दशरथ आणि फागुनिया ह्यांचा चाललेला रोमांस, त्यातून त्यांचे घट्ट होणारे प्रेमंबंधन, दशरथाचे प्रेमं व्यक्त करायच्या पद्धती, दोघांचा गावठी नाच, प्रेमं व्यक्त करायच्या टिपिकल त्या काळाच्या पद्धती ह्या अफलातून जमून आल्या आहेत. नवाजउद्दीनच्या २५% रोल फक्त राधिकाच्या वाट्याला आलाय तरी सुद्धा तिने त्यातून आपली छाप उठवलीय. उत्कृष्ट लेखन आणि संवाद ह्या चित्रपटाची एक जमेची बाजू. 'शानदार!! जबरदस्त!!! ज़िंदाबाद!!!'.....''जबतक तोडेंगे नहीं, तबतक छोडेंगे नहीं'.....'भगवान के भरोसे मत बैठीये, का पता भगवान हमरे भरोसे बैठा हो....'हम तुमको इतना चाहते है की..इतना चाहते है की....इतना चाहते है की....का बताये' वगैरे सारखे हलके फुलके संवाद सुद्धा नवाजउद्दीने अप्रतिमरित्या सादर केले आहेत.

बायकोचा मृत्यू झाल्यावर उगाचचं दर्दी पार्श्वसंगीत लाऊन नवाजउद्दीनला रडवले नाही. पण त्याला झालेले दु:ख डायरेक्टरने आणि नवाजउद्दीनने अभिनयाच्या जोरावर अप्रतिम व्यक्त केले आहे. साप चावल्यावर...दगडाखाली पाणी भेटल्यावर नवाजउद्दीनने केलेल्या अभिनयाला तोड नाही. रागाने डोंगर फोडता फोडता त्याच्या बरोबर आपण पण त्या डोंगराच्या प्रेमात पडायला लागतो.

एकूण प्रबळ मानवी इच्छाशक्ती, निरपेक्ष प्रेमं असले की मनुष्य काहीही करू शकतो हे खूप चांगल्या रीतीने मांडण्यात सर्वच यशस्वी झाले आहेत. दरवेळेप्रमाणे शाहरुखने ह्या वेळचे अवॉर्ड विकत नाही घेतले तर बेस्ट अभिनयाचा अवॉर्ड नवाजउद्दीनला मिळण्यात काही हरकत नाही आणि पुढच्या सहा महिन्यात एखादा तोडीस तोड अभिनय असलेला चित्रपट आला नाही तर नवाजउद्दीनला राष्ट्रीय पुरस्कार हि देण्यात काही वावगे होणार नाही. 


(all images source:internet)


CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top