मनाचा मेगाब्लॉक

गेले काही दिवस खूप रिकामे रिकामे झाल्यासारखे वाटत होते. नवीन ज्ञानात काही भरच पडत नव्हती. मेंदूला काही नवीन खुराकच नव्हता मिळत. ऑफिस मध्ये कामाचा रगाडा एवढा वाढला होता की मेंदू दुसरा काही विचार करायला ऐकतच नव्हता. नवीन क्रिएटीव्हीटी (creativity) जन्मतच नव्हती. ब्लॉग लिहायला विषय तर भरपूर होते. पण शब्द सुचत नव्हते. ब्लॉगर मध्ये लॉगिन करून अर्धा अर्धा तास बसून राहायचो. कितीतरी पोस्ट अश्या अर्ध्याच ड्राफ्ट मध्ये पडून आहेत. काही तयार पण आहेत....पण पोस्ट कराव्याश्या वाटत नाही आहेत. अगदी पहिली इयत्तेत शिकणाऱ्या मुलाने निबंध लिहावे तश्या झाल्या आहेत...स्वत:लाच वाचून मानसिक समाधान नाही मिळत तर त्या पब्लिश कश्या करणार ? 

काहीतरी कमी होत चाललेय...पण काय ते समजत नव्हते. मी काही एवढा मोठा लेखक नाही की माझ्या प्रतिभेला गंज चढतोय असे म्हणायला...पण जे काही शुद्ध बोलतोय, विचार करतोय, ते लिहिता येत नव्हते....जे  तरंग मनपटलावर उमटत होते तसे प्रत्यक्ष्यात उतरत नव्हते. अगदीच कृत्रिम वाटत होते. पण असे का होतेय? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. कदाचित उत्तर शोधायला पण मेंदूला वेळ आणि निवांतपणा मिळत नव्हता. 

मग एका रविवारी अंघोळ करताना असा निवांत वेळ मिळाला. सहसा अंघोळ करताना माझे मन खूप रिकामे असते. अंघोळीचे ७ ते १० मिनिटे मी कसलाच विचार करत नाही. स्वत:चा, घरच्यांचा, ऑफिसचा, पैशांचा , भविष्याचा, अगदी कसलाच नाही. त्या वेळात मी कसला विचार करतो तेच मला नंतर आठवत नाही....त्याचाच अर्थ म्हणजे तेवढ्या वेळापुरते मन नक्कीच रिकामे होत असावे. नुसती शरीराची नाही तर मनाची पण अंघोळ होत असते आणि ही सवय बहुदा अक्कल येण्याआधीपासून आहे...अगदी शाळेत असल्यापासून. त्यामुळे अंघोळ केल्यावर मानसिक आराम नक्कीच खूप मिळतो आणि रविवारी कामावर जायची घाई नसल्याने अंघोळ निवांत चालते.

तर अश्या एका रविवारी अंघोळ करून अंग पुसताना अचानक 'दिमाग की बत्ती जली'....हे जे काही मनात  उलथापालथ चालली आहे.....जे मानसिक समाधान मला मिळत नाही आहे ते मराठी भाषेमुळे मिळत नाही आहे. गेले काही महिने मराठी भाषेत संवादच होत नाही आहे, भाषा ही मनातल्या भावना प्रस्तुत करायचे सर्वात  चांगले माध्यम असते. मनातल्या विविध भावनांना आपली भाषाच....खास करून मातृभाषाच.....शब्दरूप देते. भावनांचे अस्तित्व शब्दामुळे जास्त चांगले प्रकट होते....ह्या भाषेलाच कुठे तरी मेगा ब्लॉक लागला आहे. त्यामुळे भावनांचा, मनातल्या विचारांचा निचरा होत नाही आहे. सर्व तुंबून राहिले आहे.

असं का? आजार समजल्यावर आपोआप मनाने आजाराचे कारण आणि त्यावर औषध शोधायला सुरुवात केली.  गेले काही महिने ऑफिस मध्ये प्रचंड काम वाढले होते. ऑफिस मध्ये ९० टक्के हून जास्त संवाद, लिहिणे, बोलणे, इमेल्स पाठवणे, ऑफिस नोट्स लिहिणे, टेंडर काढणे हे सर्व इंग्लिश मधूनच होत होते. उरलेल्या १० टक्क्यामध्ये ८ टक्के हिंदी असायचे आणि मराठीच्या वाट्याला फक्त २ टक्केच येत होते.  गेले वर्षभर महाराष्ट्र टाईम्स वर्तमान पत्र आणि काही निवडक मराठी ब्लॉग वगळता मराठीतून काही वाचन झालेच नाही. शेवटचे पुस्तक किंवा कादंबरी वाचून कमीत कमी दोन वर्षे तरी झाली असतील. कोणती वाचली ते पण आठवत नाही. घरात मराठीच बोलत होतो पण ते सुद्धा माहित असलेले मराठी. नवीन शब्दांची, वाक्यांची भरच पडत नव्हती. काही प्रतिभावान लेखकांचे मराठी ब्लॉग वाचनात येत होते. पण त्याने भूक  भागत नव्हती.  मित्र परिवार तर मराठीएतर जास्त आहे. त्यामुळे भाषेला म्हणावे तसे पॉलिश होत नव्हते.

मग त्यावर उपाय काय? मराठीचे वाचन, मनन, चिंतन केले पाहिजे. त्या साठी सर्वात चांगला उपाय म्हणजे आपली मराठी साहित्यसंपदा. मराठी साहित्यात अशी अनोखी ताकत आहे की ती ह्या आजारपणाला पळवून लावेल. पण मग मराठी साहित्य आणायचे कुठून..विकत घ्यायची तर सध्या ऐपत नाही आणि घरात तेव्हढी जागाही नाही. मग लायब्ररी चालू करायला पाहिजे. राहत्या घराच्या जवळपास एकहि चांगली लायब्ररी नाही. एक होती तिच्या मालकिणीने दोन वर्षापूर्वीच बंद केली अगदी डिपॉजिट पण परत नाही केले.  पुस्तक वाचून परत करायला गेलो तर तिथे मोबाईलचे दुकान! 'इधर लायब्ररी था ना ...कहां गया?' मी भोळेपणाने त्याला विचारले तर अगदी भीक मागणाऱ्या भिकाऱ्याकडे बघावे तसे तुच्छ कटाक्ष टाकून तो बोलला, 'वो तो उसके मॅडम ने  बंद कर दिया, अभी हमारा दुकान है!' आणि अशी काही नजर दिली की त्याच्या म्हणण्याचा उद्देश्य होता की हे आता मोबाईलचे दुकान आहे आणि परत इथे लायब्ररी बद्दल विचारायला येऊ नकोस...चालता हो.'

ठाण्यात तश्या लायब्ररी आहेत पण जवळपास नाही. स्टेशन जवळ 'माझे ग्रंथ भांडार' म्हणून मोठी लायब्ररी आहे तीच चालू करायचा विचार करत होतो. फक्त येण्याजाण्याचा त्रास होणार होता. पण मनाने नक्की केले होते की वेळ नाही भेटला तरी चालेल पण लायब्ररी नक्की चालू करायची.

'अरे तुला झोप पूर्ण करायला तरी वेळ मिळतोय का? लायब्ररी चालू करून पुस्तके कधी वाचणार? कशाला उगाच पैसे फुकट घालावतोयस?'....बायकोचा प्रश्न!!!  

'तिला म्हटले काहीही होऊ देत...भले वर्षाला एक पुस्तक वाचून झाले तरी चालेल पण आता लायब्ररी चालू करणारच. पैसे गेले तरी चालतील.'

'पैसे काय झाडाला लागलेत तुझे?' बायकोचा प्रतिप्रश्न

'अगं ! लोकांना दारू, गुटखा, सिगारेट ची सवय असते. पगारातला दहा टक्के भाग ते ह्या व्यसनात उडवतात. मला तर ह्यापैकी काहीच व्यसन नाही. वाचनाचे एक व्यसन होते ते पण खूप दिवस झाले सुटले आहे. असे समज पैसे तिकडेच खर्च झाले.'

'ठीक आहे तुझी मर्जी !!' .....बायको शांत (कदाचित पहिल्यांदा) 

दुसऱ्याच दिवशी ऑफिस मधून परत येताना पहिल्या मजल्यावरच्या काकूंकडे एक माणूस पुस्तक घेऊन आला होता. काकूंकडे विचारले तर त्या म्हणाल्या, 'अरे! ही नवीन लायब्ररी चालू झाली आहे. ते आपण फोनवर सांगितलेले पुस्तक घरपोच आणून देतात.'  त्या माणसाला मी त्याचा मोबाईल नंबर विचारला तर त्याने त्यांच्या लायब्ररीचे जाहिरातीचे पत्रकच हातात दिले व म्हणाला ह्या नंबर वर फोन करून बोलून घ्या.

योगायोग असा की मी लायब्ररी चालू करण्याचा विचारच करत होतो व कुठली लायब्ररी लावायची हेच शोधत होतो आणि नेमकी लायब्ररीच माझ्या समोर चालून आली होती. म्हटले हा नशिबाचाच कौल आहे लवकरात लवकर चालू केली पाहिजे.

ते पत्रक घेऊन घरी आलो आणि त्याला फोन लावला. दोनशे रुपये महिना फी, दोनशे रुपये  डिपॉजिट आणि दोनशे रुपये सभासद वर्गणी असे करून पहिल्या महिन्याचे सहाशे रुपये नंतर प्रत्येक महिन्याचे दोनशे रुपये असे त्याने सांगितले. म्हटले उद्या येऊन पैसे घेऊन जा आणि चांगले पुस्तक देऊन जा. दुसऱ्या दिवशी तो येऊन पैसे घेऊन गेला आणि पुस्तकांची लिस्ट घेऊन गेला. त्याला फक्त लेखकाचे नाव आणि पुस्तकाचे नाव सांगायाचे त्या दिवशी संध्याकाळी तो ते पुस्तक घेऊन येणार.

काही दिवसा पूर्वी नेट वर 'मेलुहाचे मृत्युंजय' ह्या पुस्तकाबद्दल खूप चर्चा वाचली होती. तेच पुस्तक मागवून घेतले आणि नेमके ते पुस्तक त्यांनी दोन दिवसापूर्वी नवीन खरेदी केले होते. मीच त्याचा पहिला वाचक झालो. जवळपास ४८५ पानांपैकी सव्वा दोनशे पाने वाचून ही झालीत.

आता कुठे जरा मनाचा मेगाब्लॉक सुटेल आणि साचलेल्या निरुपयोगी विचारांचा निचरा होईल अशी अशा करतोय. देखेंगे आगे आगे होता है क्या???

भोवरा पुस्तक वाचताना


CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top